राष्ट्रोद्धारक विभूती स्वामी श्री वरदानंद भारती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक31-Aug-2020
|
@रोहिणी देशपांडे

श्री स्वामी वरदानंद भारती हे भगवद्भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून ओळखले जात असले, तरी एक प्रज्ञावंत साहित्यिक म्हणून मराठी साहित्य संपदेत त्यांनी मोलाची भर टाकली आहे. वेदान्तविचाराबरोबरच देशप्रेम आणि हिंदुत्व याची विशेष जोड त्यांच्या साहित्याला दिसून येते. निरपेक्ष कट्टर हिंदुत्वाचे एक पुरस्कर्ते म्हणून लौकिकास पावलेले हे योगी म्हणजे आचार्य श्री वरदानंद भारती होय. जन्मशताब्दी वर्षानिमित्त या लेखामार्फत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न! 


seva_1  H x W:

श्री स्वामी वरदानंद भारती संतवाङमयातून मांडल्या गेलेल्या व अपेक्षिलेल्या आदर्श जीवनाचे एक अभिव्यक्त रूप!

श्री अनंत चतुर्दशी.. पूज्य स्वामीजींचा जन्मदिन. पूर्वसुकृतामुळे त्यांचे कृतार्थ जीवन जवळून पाहण्याचे थोर भाग्य आम्हा शिष्यांना लाभले. जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. स्वामीजींच्या प्रसिद्धिपराङ्मुखतेमुळे हे व्यक्तिमत्त्व सामान्यांत फारसे ज्ञात नसले, तरी आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची विशेष ओळख होती. विद्वत्ताप्रचुर वाणी आणि नि:स्पृह वृत्ती यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे.

त्यांच्या स्मरणप्रीत्यर्थ गतवर्ष हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. वाचकांसाठी ही एक अभूतपूर्ण पर्वणीच होती. त्यांच्या वाङ्मयाचे, वेदान्त विचारांचे अधिकाधिक स्मरण, चिंतन करत अगदी साधेपणाने हा शताब्दीनिमित्त महोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या एकांतामुळे श्रीविष्णुसहस्रनामाच्या साधनेलाही अनुकूल असे वातावरण प्राप्त झाले होते, म्हणून नियोजित संकल्पपूर्तीलाही वेळ लागला नाही. कलम ३७०, श्रीरामजन्मभूमी यासारखे विषय त्यांच्या व्याख्यानातून आवर्जून चर्चिले जात असत, त्याची पूर्तताही या वर्षातच होताना दिसत होती, हा एक विलक्षण योगायोग होता. नित्य स्मरणात असलेल्या स्वामींजींची आज प्रकर्षाने आठवण येत होती.

पूज्य स्वामींजींच्या समाधीला अठरा वर्षे उलटून गेली, तरी आजही ते दिवस आठवतात. श्रीरामजन्मभूमी आंदोलनानंतरचा तो काळ होता. कट्टर हिंदुत्व आणि निर्भीडपणा घेऊन स्वामीजी एक योद्धा संन्यासी होऊन अविरत 'अखंड भारताचे' स्वप्न उराशी जपत झपाट्याने कार्यात सहभागी झाले होते. उतारवयातही त्यांचा उत्साह पाहून आम्हा सर्वांना नवल वाटत होते.
 
उठा हिंदूंनो, जागे व्हा रे राज्य आपुले स्थापावे।
त्याविण नाही गतीच दुसरी परिस्थितीशी जाणावे।।

हिंदूंना खडखडून जागे करणाऱ्या स्वराज्याच्या पोवाड्यातील या ओळी हिंदूचे रक्त उसळवण्यास कारण ठरत होत्या. श्रीराममंदिराच्या आंदोलनानंतर तर त्याच्या कीर्तन-प्रवचनालाही अशी काही धार चढली होती की कीर्तनाचा पूर्वरंग हिंदुत्वाने आणि देशाभिमानाने ओतप्रोत भरून वाहत होता. राजा दाहीर, धनेश्वर अशा वेगळ्या आख्यानांतून त्यांचे विचार प्रभावीपणे समोर येत होते. हॉल, मैदाने खचाखच भरून गर्दी उसळत होती आणि या अलोट गर्दीकडे ते मोठ्या आशेने हिंदुत्वाचे रक्षक म्हणून पहात होते. त्यांच्यात नवचेतना जागवत होते.

समाजिक स्थितीचा समतोल विस्कळीत झाला की संत अवतार घेतात, असे म्हटले जाते आणि धर्मसंस्थापनेसाठी संतांना धर्माला अनुकूल अशी पार्श्वभूमी आधी तयार करावी लागते. ईश्वरी श्रद्धेतूनच विश्वास निर्माण करत समाजाला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न सतत करावा लागतो. पूज्य स्वामींजींनी अवतार घेतला, त्या वेळी पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव एवढा वाढला होता की समाज श्रद्धाहीन, निराधार बनतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. प्राचीन आदर्शाचे, प्रज्ञाहत झालेल्या विद्वानांकडून सद्ग्रंथाचे विकृतीकरण चालू होते. पराभवप्रचुर इतिहासामुळे, गुलामीच्या संस्कारामुळे व भौतिक अध्ययनाच्या अभावी या देशातील युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच परंपरेची हेटाळणी करताना दिसत होता.. भारतावर अनेक अक्रमणे झाली, पण इंग्रजी आक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचे आतोनात नुकसान झाले होते. आचार्यांनी आपल्या एका काव्यात व्यक्त होताना,

मेकॉलेने बुद्द्धिपुरस्सर शिक्षण जे आम्हास दिले।
तेणे मेली बुद्धी आमुची खरे असे ते तिज नकळे ।।
असे या परिस्थितीचे वर्णन केले आहे.

हिंदू सदैव झोपलेला! 'सुचिरात् प्रसुप्त देशं' तो जागा झाला की सिंहासारखा, पण तो जागाच होत नाही. गेल्या सहस्र वर्षांच्या अधःपतनाचा विचार केला, तर हिंदू समाजातील विघटितपणा आणि संघटनेचा अभाव या मुख्य दोषांमुळेही विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. दूरदृष्टीचा अभाव हेही आणखी एक वैगुण्य होते. त्यामुळे सामाजिक अन्यायाच्या प्रतिकाराला व्यक्तिशः वा संघटितपणे उभे राहता येत नव्हते. "जाऊ द्या ना" किंवा "मला काय त्याचे? " या वृत्ती दुर्दशेस कारण झाल्या, असे स्वामींजींचे स्पष्ट मत होते.

श्री वरदानंद भारती हे भगवद्भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून ओळखले जात असले, तरी एक प्रज्ञावंत साहित्यिक म्हणून मराठी साहित्य संपदेत त्यांनी मोलाची भर टाकली आहे. वेदान्तविचाराबरोबरच देशप्रेम आणि हिंदुत्व याची विशेष जोड त्यांच्या साहित्याला दिसून येते. आजचा तरुण विज्ञानाच्या कसोटीवर हिंदू धर्माशी अध्यात्माचे परीक्षण करू पाहतो आहे. तरुण समाज दृष्टीपुढे ठेवून त्यांच्या पुढील सांस्कृतिक समस्यांच्या उकलीसाठी स्वामीजींनी साहित्याची निर्मिती करत त्यांना अध्यात्म प्रवृत्त केले होते. प्राचीन वाङ्मयाबद्दल गैरसमज घालवून त्याचे शुद्ध, बुद्द्धिनिष्ठ, सर्वहितकारक आणि प्रांजळ स्वरूप लोकांपुढे मांडून या वाङ्मयाबद्दल डोळस आस्था निर्माण करण्याकडे त्यांच्या व्याख्यान-प्रवचन-कीर्तनाचा आणि लिखाणाचा रोख सदैव राहिला आहे. 'महाभारताचे वास्तव दर्शन' यासारख्या समर्थ ग्रंथातून त्यांनी महाभारतावरील सर्व आक्षेपांचे खंडन केले आहे, तर 'वाटा आपल्या हिताच्या' आणि 'हिंदू धर्म समजून घ्या' अशा ग्रंथातून त्यांनी धर्माचे आणि संस्कृतीचे शुद्ध स्वरूप मांडले आहे. मानवी जीवनाच्या सर्वांगीण सुखाचा निर्दोष विचार जर कुठे आढळत असेल, तर तो फक्त भारतीय संस्कृतीत हे वेळोवेळी सप्रमाण दाखवून दिले आहे.

सगळ्या आपत्तीचे, सगळ्या संघर्षाचे मूळ या 'मी'च्या अज्ञानात आहेे. तेे समजून घेणे वैयक्तिक पातळीवर जेवढे आवश्यक आहे, तेवढेच समष्टीच्या पातळीवर जास्त आवश्यक आहे, असे ते म्हणत असत. या 'मी'चे यथार्थ स्वरूप मांडणारी आणि कर्म-भक्ती-ज्ञान यांचा समन्वय घडवणारी त्यांची विपुल ग्रंथसंपदा समाजासाठी मोठी देण आहे. जातिभेद हे केवळ सोयीसाठी समजुतीसाठी मानले गेलेले असून जातीचा आत्यंतिक अभिमान धरणे, इतर जातीचा द्वेष करणे ही वृत्ती समाजाला पोखरून टाकते, असे स्पष्ट मत मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतून मांडले आहे. प्रस्थानत्रयीवरील अलौकिक भाष्याने त्यांना आचार्यपद प्राप्त करून दिले. 

पूज्य स्वामीजींनी मांडलेले तत्त्वज्ञान हे 'आधी केले आणि मग सांगितले' या जातीचे आहे. समाजमनावर संस्कृतीचा दूरगामी परिणाम व्हावा, म्हणून ते स्वतः स्वदेशीसारख्या काही गोष्टी आवर्जून आचरणात आणत असत. त्यांच्या या कट्टरतेचे अनेक किस्से सांगितले जातात. एकदा आयुर्वेद संस्थेचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतीं सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भेटायला गेले होते. स्वामींजींनी धोतर, शर्ट आणि त्यावर कोट असा पारंपरिक पोषाख धारण केला होता, तर आधुनिक कपड्यात आलेल्यांना स्वामींजींचे ते पारंपरिक वेष धारण करून राष्ट्रपती भवनात येणे रुचत नव्हते. स्वतः राष्ट्रपतीच दाक्षिणात्य पारंपरिक वेषातच असल्यामुळे स्वामींजींना त्यांचे भूषण वाटत होते आणि स्वामींजींचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व पाहून राष्ट्रपतींचेही लक्ष सारखे स्वामीजींकडे वेधले जात होते. ते स्वामींजींच्या जवळ आले आणि त्या दोघांमध्ये बराच वेळ समकालीन विचारांवर चर्चा झाली होती. त्यांनी नेहमीच आपल्या आचरणातून असा स्वदेशीचा पुरस्कार दाखवून दिला आहे.

भारतभूमीविषयी प्रचंड आस्था असणार्‍या या भूमिपुत्राने सर्वांगांनी भारतभूचे दर्शन घेतले होते आणि देशप्रेमाचा धागा इथेही अखंड ठेवत तिची महती आपल्या काव्यातून गाइली होती. आपल्या पूर्वजांनी शतावधी पिढ्यांनी हिमालयात तपश्चर्या करून वैदिक संस्कृती सिंधुतटावर समृद्ध केली होती, त्या सिंधू नदीलाच देशविभाजनाने दूर केले होते याचे शल्य त्यांना कायम बोचत होते.

कसे तोडिले प्रागितिहासापासूनचे नाते।
केविलवाणे झाले तुजविण स्वराज्य हिंदूचे।।

मनातील खंत अशी शब्दातून व्यक्त होत गेली. राजकीय अस्वास्थ्य, वाढता भ्रष्टाचार, नीतिमूल्ये हरपलेली नेतेमंडळी हे पाहून आसामला कालीमातेचे उग्र दर्शन होताच त्यांची जागृत राष्ट्रनिष्ठा त्वेषाने विचारत होती "क्रुद्ध जिव्हेने आता कोणाला भय दाविसी काली?" खरोखंर असा प्रश्न कालीमातेला करणारा भक्तही विरळाच! 

हिंदू धर्माविषयी बोलताना ते म्हणतात, "हिंदू हा एकच धर्म असा आहे, याचे मूळ शोधूनहि सापडत नाही, म्हणून त्याचा नाशही संभवत नाही. कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.." आमचे अस्तित्व मिटू न देणारे हे तत्त्वज्ञान पक्क्या पायावर उभे आहे. जो जो विज्ञान प्रगत होत जाते, तो तो तत्त्वज्ञानातील मूलभूत तत्त्वेच मान्य करण्याचा प्रसंग येतो, ही वस्तुस्थिती आहे.

आपली संस्कृती प्राचीन असून पूर्णावस्थेला पोहोचलेली आहे. तेथील आदर्श निश्चित झालेले आहेत. तेव्हा ती तेथेच टिकून राहावी, या दृष्टीने आपले प्रयत्न करणे अपेक्षित असते. आपला देश निसर्गसंपत्तीने एवढा संपन्न आहे, आपले तत्त्वज्ञानही इतक्या उच्च कोटीचे आहे, मग आपण विपन्न का? त्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. मी देशासाठी काय करतो याचे गणित प्रत्येकाने मांडावे, असे त्यांना वाटते. व्यक्तीला आजारपण येते हे आपण समजू शकतो, पण संस्कृतीला का यावे? जातीला का यावे? धर्माला का यावे? आणि अमरत्व हे खरे तर प्रजेच्या माध्यमातूनच येत असते असे वेदही सांगतात, म्हणून त्यांनी प्रजेसाठी केलेला उपदेश या घडीला अधिक मोलाचा ठरतो. या पवित्र भारतभूमीची थोरवी वर्णितांना पूज्य स्वामींजींनी आपले सारे आयुष्य समर्पित केले. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या सनातन संस्कृतीची मुळे शोधतानात्यांनी व्यासंगी चिंतन केले आहे. 'श्रीसंत दासगणू प्रतिष्ठान'ची स्थापना हे महान कार्य करत त्यांनी साधनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून दिले आहे. 

संन्यासाश्रमानंतरसुद्धा त्यांची देशभक्ती ज्वलंत होती. 'संस्कृती विचार सेवक संघ', 'श्री संत विद्या प्रबोधिनी', 'राधादामोदर प्रतिष्ठान' अशा समाजहितैषी आणि संस्कृती संवर्धन करणाऱ्या संस्थांची निर्मिती संन्यासोत्तरच झाली. "श्रीविष्णुसहस्रनामाशिवाय मी दुसरी कुठलीही साधना केली नाही" असे ते नेहमी सांगत असत. त्यांची साधना गुप्तच होती. काही वेळा भावार्चना या काव्यसंग्रहातून त्याचे गूढ उकललेले दिसते. 

अगदी शेवटच्या दिवसांत मात्र ते दीर्घ काळ एकांतवासात उन्मनी सिद्धासारखे राहत होते. त्या स्थितीत आत्मचिंतन करित असताना कधी भावसमाधीमध्ये, तर कधी सहज समाधीमध्ये, तर कधीकधी सविकल्प समाधीचा आनंद घेत असत. अखेर भक्तसमाधी घेऊन ते परमात्मस्वरूपाशी एकरूप झाले..

'मी' म्हणजे ना शरीर, मी मद् ग्रंथांचा संभार।
त्याचे वाचन चिंतन, यथाशक्ती आचरण ।
हीच गुरूपूजा खरी., नित्य धरावी अंतरी।।

स्वामींजींच्या पश्चातही त्यांच्या ग्रंथांतून त्यांचे अस्तित्व सिद्ध होते. त्यांच्या विचारांच्या लहरी ग्रंथातून प्रकट होतात आणि एका दिव्य अनुभूतीचा प्रत्यय येऊ लागतो.

निरपेक्ष कट्टर हिंदुत्वाचे एक पुरस्कर्ते म्हणून लौकिकास पावलेले हे योगी म्हणजे आचार्य श्री वरदानंद भारती! त्यांचे अलौकिक चरित्र या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहील.