कोरोना महामारीची मानसिक बाजू

स्रोत: विवेक मराठी    दिनांक07-Aug-2020
|
@स्मिता कुलकर्णी

महामारीमुळे भावी काळात बिघडणारी अर्थव्यवस्था, बेरोजगारी, नातेसंबंधांना झालेली दुखापत, वाढणारे गुन्ह्यांचे आकडे, वातावरणातील अस्थिरता व अनिश्चितता अनेक लोकांना मानसिक स्तरावर त्रासदायक ठरणार, हे नक्की. मानसिक अस्वस्थतेमुळे माणसाचे आरोग्य, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. हीच गरज ओळखून, तसेच याचे गांभीर्य जाणून महामारी वैश्विक असल्याचे जाहीर होताच 'समर्थ भारत' म्हणून या विषयात कामाला सुरुवातही झाली आहे. आमच्या या टीममध्ये समाजशास्त्रज्ञ, प्रशिक्षित समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ काम करीत आहेत. या कामाने आज चांगली गती घेतली आहे व अनेकांकरिता नॉर्मल जीवनशैलीकडे नेण्यास ही सेवा पूरक ठरत आहे.


seva_1  H x W:

'आपत्तीतील मानसिक आरोग्य' या विषयाशी माझा संबंध प्रथम १९९३च्या मराठवाड्यातील भूकंपानंतर आला. या भूकंपात २०,०००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते, काही कुटुंबांत तर १० ते १२ माणसे गेल्याचेही मी पाहिले होते. मागे राहिलेल्या लोकांकरिता ही घटना एक मोठा मानसिक धक्का होती, म्हणून भूकंप व त्याची मानसिक बाजू ठळकपणे दिसू लागली होती. चिंता, ताण, नैराश्य यासारख्या गोष्टी अनेक लोक अनुभवत होते. झोप न येणे, भूक मंदावणे, वारंवार ती घटना डोळ्यासमोर येणे, दिवस दिवस रडणे इ.मुळे लोक मानसिक स्तरावर अस्वस्थ झाले होते. लोकांना मानसिक आधार व उपचार देण्याकरिता MIMHची टीम या भागात पोहोचली व देशात पहिल्यांदाच अत्यंत सुसूत्रतेने एखाद्या आपत्तीत मानसिक आरोग्य या विषयाला धरून प्रदीर्घ काम व संशोधन झाले. समुपदेशक म्हणून मी या टीमचा एक भाग होते.

सर्वसाधारणपणे कोणत्याही आपत्तीत अथवा महामारीनंतर समाजात मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. ज्यांना आधीपासून ताण, नैराश्य, चिंतेचा आजार असतो, जे लोक अतिसंवेदनशील असतात, ज्यांची frustration tolerance level कमी असते किंवा ज्यांना अस्थिरता सहन होत नाही, ज्यांना या आजारांवर उपचार व औषधे सुरू असतात किंवा पूर्वी होती, अशांचा मानसिक त्रास त्या मानाने लवकर सुरू होतो. काही वेळा या निमित्ताने मानसिक आजार असल्याचे नव्यानेही लक्षात येते. त्यामुळे असे सदस्य कुटुंबात असल्यास त्यांना अधिक डोळसपणे या परिस्थितीत जपावे लागते.

त्यामुळे कोणत्याही आपत्तीत, महामारीत समुपदेशन सेवेला अन्ययसाधारण महत्त्व प्राप्त होते व ही गरज ओळखून आम्ही महाराष्ट्रात २४ मार्च २०२०पासून ही (टेलिफोनिक) सेवा सुरू केली. समाजातील सर्व स्तरांतील व वयातील लोकांचे फोन मानसिक मदतीकरिता येत होते. भीती, चिंता, एकटेपण, तणाव, चिडचिड होणे, नैराश्य, झोप न येणे, OCDच्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या.

मानसिक आजार फक्त स्त्रियांनाच होतात असे अजिबात नाही. मात्र दुय्यमतेची वागणूक, हिंसा व आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे स्त्रियांना अनेक प्रसंगी अधिक ताण व नैराश्य येऊ शकते. आपत्तीत मात्र स्त्री-पुरुष असा भेद राहत नाही, मात्र काही कारणांमुळे मानसिक अस्वस्थतेची तीव्रता, वारंवारता व कालावधी कमी-अधिक प्रमाणात असू शकते.

कोरोना संसर्ग हा जागतिक माहामारी घोषित होताच, भारतात मार्चमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. यापूर्वीपासून लोकांनी प्रसारमाध्यमांतून, बातम्यांमधून कधीही न ऐकलेल्या गोष्टी पाहिल्या होत्या. इतक्या मोठया संख्येने होणारे 'मृत्यू' हा सर्वात भयानक प्रकार लोकांनी तेव्हा पाहिला व यामुळे लोकांमध्ये या संसर्गाविषयी प्रचंड भीती पसरली होती. या भीतीत भर घालणारे अस्थिर व अनिश्चित वातावरण लोकांना मानसिक स्तरावर अधिकच बाधित करू लागले. भीती, चिंता, नैराश्य, तणाव, भूक मंदावणे, एकटेपण, भीतियुक्त स्वप्न पडणे, स्वत:च्या मृत्यूची भीती, झोप न येणे इ. समस्यांमुळे अनेक लोक त्रस्त झाले होते. ही लोकांमधील मानसिक अस्वास्थ्याची सुरुवात होती. अर्थातच जे लोक 'काटक' असतात, त्यांनी या परिस्थितीतही स्वत:तील 'सजगता' राखत या परिस्थितीतही चांगले समायोजन केले. 'कुटुंबसंस्था व नातेसंबंधांची घट्ट वीण' याचे महत्त्वही या आपत्तीत मानसिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता किती गरजेचे आहे, याची जाणीवही या निमित्ताने अनेकांना झाली.

अगदी उद्या दूध मिळेल का? औषधे मिळणार का? परगावी, परराज्यात अडकलेले कुटुंबातील सदस्य परतणार का? कामाकरिता, शिक्षणाकरिता परगावी असलेल्या लोकांना घरी परतण्याच्या वाटा दिसेनाशा झाल्या, हातावर पोट असणारे लोक अशा अनिश्चिततेसह उपासमारीसही बळी पडू लागले. शासनाने व संस्थांनी त्यांच्या निवाऱ्याची व पोटापाण्याची सोय केली, मात्र वातावरणातील अस्थिरता व संसर्गाची भीती त्यांचे मानसिक प्रश्न वाढवीत होती.

पहिल्या टप्प्यात मानसिक आधार, मदत व माहिती घेण्याकरिता अशा लोकांचे मोठया प्रमाणावर फोन येत होते. याच दरम्यान कौटुंबिक कलहदेखील वाढल्याचे दिसून आले. यात फक्त पतिपत्नीतील बेबनाव अशी प्रकरणे होती असे नव्हे, तर कुटुंबातील इतर सदस्यांचेदेखील 'वर्तन व समायोजन' या अनुषंगाने निर्माण होणारा कौटुंबिक ताण याबाबतही तक्रारी व प्रश्न येत होते.

मात्र जून २०२०नंतर सगळीकडे 'अनलॉक' झाल्यानंतर लोकांमधील मानसिक अस्वस्थतेची खोली अधिक वाढल्याचे दिसून आले. अनेक लोक 'अनलॉक'नंतर बाहेर पडले व रुग्णसंख्याही झपाटयाने वाढली. कोणत्याही महामारीत लोकांचे 'जबाबदार वर्तन व सामूहिक जबाबदारी' या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. सद्य:स्थितीत संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणे, शंका येताच, लक्षणे दिसताच चाचणी व उपचार घेणे याला आपण 'जबाबदार वर्तन' म्हणू व physical distancingचे सर्व नियम पाळणे यास 'सामूहिक जबाबदारी' म्हणू. मात्र या दोन्ही गोष्टी अनलॉकनंतर दुर्लक्षित राहिल्या व यामुळे लोकांमधील भीती, काळजी व चिंता वाढीस लागली.

साथीच्या आजारात किंवा महामारीत त्याला एक 'मानसिक बाजूही' असते. एखादा विषाणू आला व त्याचा संसर्ग झाला इतकीच ती गोष्ट मर्यादित नसते. लोक किती जबाबदारीने वागतात? या संसर्गाला किती समजून घेतात? संसर्ग रोखण्याकरिता काय जबाबदारी घेतात? या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याकरिता महत्त्वाच्या ठरतात.

याच टप्प्यात आपण सामूहिक संसर्गाकडे जाणारी वाटही धरली होती. हळूहळू रोजची रुग्णसंख्या ४ आकड्यांत दिसू लागली व संसर्ग आता आपल्या उंबऱ्याच्या आत नक्की येणार, या शंकेने अनेकांच्या मनाचा थरकाप उडला. ज्येष्ठ नागरिक, आजारी व दीर्घ व्याधी असणारे लोक व महिला यांना या काळात आम्ही समुपदेशन सेवा मोठया संख्येने पुरविली.

संसर्गाची शंका, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले, लक्षणे दिसू लागलेले, असे असतानाही दुर्लक्ष करणारे व घरगुती उपचार करणारे, प्रत्यक्ष चाचणीकरिता जाण्यापूर्वीचा काळ, चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंतचे २४ ते ४८ तास, चाचणी पॉझिटिव्ह आलेले, निगेटिव्ह आलेले, दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेणारे, संस्थेच्या व शासनाच्या विलगीकरण केंद्रातील रुग्ण ते आज घरीच विलगीकरणात असलेल्या लोकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे, (रुग्ण मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांचे) जून ते ऑगस्ट २०२० या कालावधीत आम्ही समुपदेशन करीत आहोत. महामारीत समुपदेशन सेवेचे महत्त्व व गरज किती आहे, ते या विवेचनातून आपल्या लक्षात येईल.

seva_1  H x W:  

संसर्गाची व संसर्ग होण्याची भीती, उलटसुलट माहितीमुळे निर्माण होणारी भीती व ताण, स्वत:ला संसर्गापासून नक्की कसे जपायचे? याची भीती, काही वेळा यातून घडणाऱ्या सामाजिक बहिष्काराच्या घटना व भांडणे अशा अनेक बाबी सध्या समुपदेशनाच्या कक्षेत आम्हाला हाताळाव्या लागत आहेत. मात्र सध्या असलेले अस्थिर व अनिश्चित वातावरण व त्यातून निर्माण होणारी भीती, काळजी, चिंता, चिडचिड व ताण हे या सगळ्याचे मूळ कारण आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून संबंधितांची मानसिक स्थिती पूर्वपदावर आणत, नॉर्मल आयुष्य जगण्यासाठीची काही कौशल्ये आम्ही अनेकांना शिकवीत आहोत.

जुलै मध्यावर स्थानिक प्रशासनाने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह मात्र संसर्गाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे कुटुंबच नव्हे, तर सोसायट्या व वस्त्यांमध्येही या रुग्णांबाबत दहशत पसरली. टीव्हीत दिसणारा रुग्ण आता प्रत्यक्ष घरात, शेजारच्या घरात, सोसायटीत दिसणार यामुळे भीती, ताण, काळजी अधिक 'संसर्गकेंद्रित' झाली व अनेक पटींनी वाढलीही. यामुळे लोकांचे मानसिक स्तरावरील प्रश्नदेखील वाढीस लागले.

घरीच विलगीकरण ही बाब पचविण्यास अनेक सोसायट्या अक्षम ठरू लागताच आम्ही सोसायट्यांकरिता समुपदेशन सेवा सुरू केली. वैद्यकीय माहितीसह समुपदेशन मिळाल्यामुळे संबंधित रुग्णास व कुटुंबास सोसायटीकडून सहकार्य वाढू लागले व एकूणच सर्वांमध्ये सकारात्मकताही वाढली. आज मात्र अनेक सोसायट्या स्वत:चे क्लब हाउस, जिम 'विलगीकरण कक्षात' रूपांतरित करीत आहेत, हेदेखील सोसायट्यांच्या मानसिकतेवर केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम म्हणता यईल.

विलगीकरण केंद्रात व दवाखान्यातील रुग्णांकरिता समुपदेशनाचे काम करताना अनेक रुग्णांमध्ये भीती, राग, दोषी असल्याची भावना, सतत रडणे, ताण, काळजी, चिंता, एकटेपण अशा भावना आढळून येत आहेत. समुपदेशनाच्या माध्यमातून या भावना नियंत्रित करण्याकरिता आम्ही त्यांच्यासह काम करीत आहोत. भावनांचे व्यवस्थापन (disciplined) व योग्य भावनांना अधिक वाव देण्याच्या दृष्टीने व प्रामुख्याने सकारात्मक विचारसरणीवर काम केले जात आहे.

'पुनश्च हरिओम' म्हणत आपण कोरोनासह जगण्याची सवय व कोरोना संसर्गापासून दूर राहत, पुन्हा आपले रुटीन सुरू केले आहे, मात्र अद्यापही काही व्यवस्था पूर्वपदावर येण्यास मर्यादा व अडचणी येत आहेत. नुकतीच समोर आलेली बाब म्हणजे आपल्या कुटुंबात सेवा देणारी आपली मदतनीस, मोलकरीण किंवा हेल्पर, मात्र अद्यापही अजून आपल्या कुटुंबात काम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक सोसायट्यांनी याबाबत परवानगी दिली आहे. मात्र या संसर्गाची भीती व संसर्गापासून दूर राहण्याची कौशल्ये माहीत नसल्याने, आज अनेक कुटुंबे गरज असतानाही या सेवेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कष्टकरी मंडळी आता "आम्हाला सहानभूतिपूर्वक मदत नको" म्हणत, स्वाभिमान जपत काम मागत आहेत. समुपदेशनाच्या कक्षेत येणाऱ्या या दोन्ही घटकांच्या गरजा लक्षात घेत नुकताच 'समुपदेशन व वैद्यकीय' माहिती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याला मिळणारा प्रतिसाद अनेक कष्टकरी महिलांच्या स्वाभिमानपूर्ण जगण्याला बळ देणारा ठरत आहे.

या महामारीत, समाजाच्या उतरंडीवरील प्रत्येक घटकाकरिता आम्ही 'समुपदेशन सेवा व मानसिक आरोग्य' या विषयाला धरून काम करीत आहोत. या निमित्ताने अत्यंत दुर्लक्षित अशा या विषयाची, नव्याने सर्वांना ओळखही करून देण्यात समाधानकारक यश मिळत आहे. या विषयाला धरून स्थानिक वर्तमानपत्रातून लेखनही मोठया प्रमाणात प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच अत्यंत प्रभावी अशा रेडिओच्या माध्यमातून हा विषय व ही सेवा अगदी जनसामान्यांपर्यत पोहोचविल्यामुळे, समाजात 'समुपदेशन' या विषयाकडे बघण्याची दृष्टीही स्वछ झाली आहे.

कोणत्याही आपत्तीनंतर समाजातील सर्वच व्यवस्था विसकळीत होतात, तसेच सामाजिक स्तरावरही अनेक बदल होतात. याचा लोकांच्या मनावर दूरगामी परिणाम होतो. लोकांवर झालेले मानसिक आघात व त्याचे भावी काळात दिसणारे परिणाम पाहता, पुढील किमान पाच वर्षे या कामाची गरज व महत्त्व अधोरेखित करते. कोणत्याही आपत्तिपश्चात काही कालावधीनंतर post traumatic stress disordersचा त्रास लोकांमध्ये दिसू लागतो.

महामारीमुळे भावी काळात बिघडणारी अर्थव्यवस्था, बेरोजगारी, नातेसंबंधांना झालेली दुखापत, वाढणारे गुन्ह्यांचे आकडे, वातावरणातील अस्थिरता व अनिश्चितता अनेक लोकांना मानसिक स्तरावर त्रासदायक ठरणार, हे नक्की. मानसिक अस्वस्थतेमुळे माणसाचे आरोग्य, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.

हीच गरज ओळखून, तसेच याचे गांभीर्य जाणून महामारी वैश्विक असल्याचे जाहीर होताच 'समर्थ भारत' म्हणून या विषयात कामाला सुरुवातही झाली आहे. आमच्या या टीममध्ये समाजशास्त्रज्ञ, प्रशिक्षित समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ काम करीत आहेत. या कामाने आज चांगली गती घेतली आहे व अनेकांकरिता नॉर्मल जीवनशैलीकडे नेण्यास ही सेवा पूरक ठरत आहे. 

समर्थ भारताची पुनर्बांधणी करताना, समाजातील सकारात्मकता वाढीस लागली तर अनेक बिघडलेल्या, ढासळलेल्या व्यवस्था अधिक गतीने व ताकदीने उभ्या राहतील हे नक्की!


समुपदेशक व विकास सल्लागार
समर्थ भारत
Samarthbharatpune
९८२२७५२०५६