संघशरण नाना

08 Aug 2020 12:17:15
@डॉ. भास्कर गिरधारी

कोठेही ते  संघाचे काम करण्यात आनंद मानीत होते. त्यांनी पालघर जिल्हा पिंजून काढला, म्हणून ते संघचालक झाले याचा मला खूप आनंद झाला होता. आमची दोस्ती शेवटपर्यंत कायम राहिली. जव्हारच्या कॉलेज मैदानात ४० हजाराचा जनजाती मेळावा  घेतला होता.

nana_1  H x W:

नाना चंपानेरकर गेले हे वाचून मला व्यक्तिशः मोठा धक्का बसला. ते असाध्य रोगाने आजारी म्हणून पुण्यात उपचार घेत होते, ते माहीत असूनही मला धक्का बसला. कारण जव्हारमधील माझे नऊ वर्षांचे वास्तव्य. सहज मी व्हॉटस ऍपवर कालच प्रकाशित झालेल्या आमच्या वन पुण्याई नियतकालिकावरील प्रतिक्रिया वाचत होतो. त्यात एक श्रद्धांजली होती. नंतर बघू, या विचारात होतो, पण पुन्हा पाहूनच घेऊ म्हणून पहिले, तर माझे जव्हारमधील जवळचे सन्मित्र चंपानेरकर गेले.. म्हणून अचानक वाचलेल्या बातमीने मी खूप दुःखी झालो. खूप वाईट वाटले.

तसे आम्ही दोघेही जव्हारमध्ये नवीन होतो. आपापले बस्तान बसवीत होतो. सुयोग म्हणून ते माझ्याच गोखले संस्थेच्या के.व्ही. हायस्कूल येथे गणित शिक्षक म्हणून लागले होते. शाळा झाली की अर्धी खाकी चड्डी. मला पुरता बोध झाला. मग काय, मीही कॉलेज प्रौढ शिक्षण जाळे विणले. त्या वर्गांना दररोज भेट देऊन एकूण २८३ पाड्यांवर जात राहिलो. अपेक्षित काम केले.

नव्वदीच्या दशकात वाहन नसायचे आणि नाना चंपानेरकर यांची मोटरसायकल नानासह माझ्या हाताशी होती. आम्ही निर्भयपणे जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यात फिरत राहिलो. या निमित्ताने माझे जनजाती जीवनाचे सूक्ष्म अवलोकन झाले. नानांनी मंदिर, भजनी मंडळे, युवक कार्य उभे केले. कार्यकर्ते जोडले. गावात संघाचे म्हणून चर्चा झाली. त्यातून गावातल्या त्या वेळच्या राजकारणाने दुसऱ्या संस्थेत नानांची नियुक्ती झाली. ते गणिताचे दुर्मीळ शिक्षक म्हणून स्वावलंबी व स्वाभिमानी होते. 'मोडेन पण वाकणार नाही' असा त्यांचा बाणा होता.

पुढे त्यांची खूप प्रगती झाली. आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. वीरेंद्र, सुरेंद्र ही त्यांची जुळी व गुणी मुले माझ्या घरात खोलीत, ११वी ते पदवी अशी पाच वर्षे राहिले. मला त्यांच्या प्रगतीचा साक्षीदार होता आले.

नाना मग विक्रमगड, डेंगाची मेठ, पुन्हा जव्हार निवासी झाले. आमदार चिंतामण वनगा, विष्णू सावरा त्यांचे मित्र होते. पण कोठेही ते शाखा, संघाचे काम करत आनंद मानीत होते. त्यांनी पालघर जिल्हा पिंजून काढला, म्हणून ते संघचालक झाले याचा मला खूप आनंद झाला होता. आमची दोस्ती शेवटपर्यंत कायम राहिली. जव्हारच्या कॉलेज मैदानात ४० हजाराचा जनजाती मेळावा, निवडणुका, धार्मिक उपक्रमात आम्ही भेटत राहिलो. त्यांच्या मुलीच्या लग्नाला मी मुंबईहून सहकुटुंब सहपरिवार आलो होतो.

मी अन्यत्र होतो, तरीही त्यांची सगळी माहिती घेतच होतो. नांगर्मोडा, पिंपळगाव या गावी त्यांनी जनजाती वसतिगृह स्वबळावरच चालवले. तेथे मी अनेक भेटी दिल्या. दत्तमंदिर उत्सवात सामील झालो.

असे लिहू तेवढे कमीच. पण जव्हारच्या घरात आता 'नाना' नाही ही गोष्ट वेदनादायक होते!

नाना चंपानेरकर यांना माझी भावपूर्ण आदरांजली.

Powered By Sangraha 9.0