दम मारो दम..

स्रोत: विवेक मराठी    दिनांक11-Sep-2020
|
@प्रभा कुडके

असे म्हणतात की जेव्हा आपल्या डोळ्यावर लख्ख प्रकाश पडत असतो, तेव्हा आपल्या भोवतीचा आसमंत उजळून निघतो, आपला चेहरा त्या प्रकाशात खुलून दिसतो. पण एकदा का हा प्रकाश बंद झाला की त्यानंतर आपल्या नजरेला काही काळ काहीच दिसत नाही. डोळे त्या प्रकाशाच्या लखलखाटाने बधीर होतात. काही क्षण का होईना, नजरबंद होते, काहीच दिसत नाही. आपल्या बी टाउनचेही असेच काहीसे आहे. प्रकाशात दिसणारे मेकअपचे थर चढवलेले चेहरे जेव्हा ड्रग्जच्या किंवा कोकेनच्या नशेत दिसतात, तेव्हा आपली नजर क्षणभर मरते. मुखवट्यावर मेकअपचे थर चढवल्यावर इथे कोणता खरा आणि कोणता खोटा हा चेहरा ओळखणे फार कठीण जाते. सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील एक काळी किनार पुन्हा एकदा लोकांच्या समोर आलेली आहे. ड्रग्जचे सेवन करणे हे बॉलीवूडला कधीच नवीन नव्हते. याआधीही आपण ड्रग्जच्या अशा अनेक केसेस पाहिल्या आणि त्यावर चर्वितचर्वणही केले. सुशांतच्या मृत्यूनंतर पुन्हा आपण या एकूणच प्रकरणावर एकदा कटाक्ष टाकू या.


 There are many faces in

साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी गोव्याला काही मित्र-मैत्रिणींसमवेत जात असताना गोव्यात पोहोचायला पहाट झाली. पहाटेची साधारण साडेचार ते पाचची वेळ. एका बीचनजीक रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. थोडे थांबून आत डोकावल्यावर लक्षात आले, रेव्ह प्लस डोप पार्टी होती ती... रात्रीच्या कुशीत दम मारलेले अनेक चेहरे, काही परिचित तर काही अपरिचित चेहरे... दम मारो दमच्या नशेमध्ये बेधुंद झालेले हे चेहरे होते. अंगावरच्या कपड्यांचेही त्यांना भान नव्हते. या पार्टीच्या बाहेरही अनेक परदेशी पर्यटक या नशेमध्ये अगदी तल्लीन झाले होते. त्यामुळे तिथे थांबणे फार काळ योग्य नाही असे म्हणत आम्ही सर्वांनी काढता पाय घेतला. रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज हे समीकरण अगदी हातात हात घालून चालत आलेले आहे.

रेव्ह पार्टींमध्ये ड्रग्ज मिळतात, म्हणूनच अनेक मध्यमवर्गीय तरुण-तरुणीही रेव्ह पार्टी या कल्चरकडे वळताना दिसतात. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचे अकाली जाणे त्रासदायक आणि वेदनादायक नक्कीच आहे, पण यामागचे नेमके आणि खरे कारण कोणते, हे आजही चर्चेचाच विषय बनलेले आहे. रिया चक्रवर्तीला झालेली अटक आणि ड्रग्ज कनेक्शन अशी अनेक कारणे समोर आलेली आहेत.

तुमच्यावर कुणीतरी काहीतरी सतत बोलले पाहिजे, तर तुम्ही चर्चेत राहता. चर्चेत कसे राहायचे हे राजकारण्यांना आणि बॉलीवूडकरांना कुणीही शिकवायला नको. त्यामुळे काहीतरी वाद किंवा तत्सम किडूकमिडूक गोष्टी करत हे सदैव स्वतःला चर्चेत ठेवत असतात. बॉलीवूड चर्चेमध्ये असण्याचे मुख्य कारण म्हणजे कास्टिंग काउच, घराणेशाही, पक्षपातीपणा हे तिन्ही मुद्दे आता जुनाट आणि बुरसट झालेले असले, तरीही अनेक जण आपल्या सोयीनुसार या मुद्द्यांचा वापर करत आलेले आहेत. याउपर बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध हे असे अनेक मुद्दे बॉलीवूडकरांना कायम चर्चेत ठेवतातच.
 
कंगना रनौतने नुकत्याच केलेल्या ड्रग्ज आणि बॉलीवूड यांच्याबद्दल केलेल्या काही विधानांमुळे ड्रग्ज हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आला आणि अर्थात कंगनाही. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाउंटवर नाव न घेता सांगितले की, बॉलीवूडमधील अनेक नामांकित ड्रगचे व्यसन करतात. त्याच ट्वीटमध्ये कंगनाने अगदी इंडस्ट्रीतील काही मोठी नावे कोकेनच्या आहारी असल्याचेही उघड केले होते. तनू वेड्स मनू या अभिनेत्रीने असा दावा केला आहे की ड्रग्सची बाब येते, तेव्हा पोलीस आणि राजकारणीसुद्धा गुन्हेगार आहेत, असे म्हणत कंगनाने एकूणच बॉलीवूड आणि राजकारणी यांच्या हितसंबंधावरही भाष्य केले होते. बॉलीवूड ड्रगच्या वादात अडकले आहे हे काही प्रथमच नाही, तर अंमली पदार्थांचे सेवन करणे ही समस्या बॉलीवूडमध्ये खोलवर रुजली असून काही कलाकारांनी कबूल केले आहे की त्यांनी ड्रग्ज घेतली किंवा व्यसनाधीन असले, तरी त्यांनी आता त्यावर मात केली आहे.

 There are many faces in  
 
बॉलीवूडबरोबर काम करणारे किंवा त्यांना जवळून पाहणारे अशा अनेकांना या व्यसनाविषयी इत्यंभूत माहिती आहे. केवळ माहितीच नाही, तर कोणत्या पार्टीमध्ये आज किती कोकेन येणार आहे इतपत सर्व माहिती आजही अनेक सेलिब्रिटी ठेवून असतात. आजही नामांकित स्टार्सच्या घरामध्ये गेटटुगेदरच्या नावाखाली होणाऱ्या हाय फंडू पार्टीमध्ये ड्रग्ज नसतील तर ती पार्टी चर्चेत नसते. परंतु यामुळे आपण ड्रगिस्ट हे लेबल सर्वांनाच लावून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक दिग्दर्शक आजही म्हणतात की, बॉलीवूडकरता ड्रग्ज हे नवीन नाही. पण यामध्येही अनेक जण स्वतः केवळ हौस म्हणून ड्रग्ज घेणारे आहेत. एकदा घेऊन तरी बघू या म्हणून ड्रग्ज घेणारे इथे बरेच दिसतात. परंतु याचे जेव्हा व्यसन लागते, तेव्हा मात्र जगजाहीर होते. त्यामुळे व्यसन लागणारे नजरेसमोर येतात, बाकी अनेक चेहरे अनभिज्ञच राहतात. आज अनेक नामांकित सेलिब्रिटी आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. यामध्ये सेलिब्रिटी आपला आहार आणि व्यायाम यांची उत्तम सांगड घालतात. त्यामुळे ड्रग्ज सरसकट सर्वच जण घेतात हा दावा खोटा असल्याचेही या दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.
बॉलीवूड हा केवळ एक मुद्दा म्हणून उचलला जातो. अनेक प्रतिष्ठित घरांमधील मुलेही ड्रग्ज घेतात, पण असे म्हणतात की पकडला तोच चोर... तसेच काहीसे आता झालेले आहे. शो बिझनेसच्या या खेळात अनेक जण स्वतःला सिद्ध करायला जातात. आपण कुठेतरी यांच्यापेक्षा वेगळे वाटू नये म्हणून केवळ तोंडदेखल सुरू केलेल्या सवयी कधी अंगवळणी पडतात, हेच अनेकांना कळत नाही. वेळ निघून जाते आणि मग सुरू होतो तो अधोगतीच्या दिशेने प्रवास...

एक औषध विक्रेता या अंमली पदार्थांचा पुरवठा करतो या आरोपाखाली काही वर्षांपूर्वी त्याला अटक करण्यात आलेली होती. बकुल चंदारिया नामक एक औषध विक्रेता अनेक नामचिन पार्टीमध्ये हजर असायचा. काही काळानंतर हे सर्व रॅकेट उघड झाले, तेव्हा बकुलचे रणबीर कपूर तसेच सलमान खान यांच्याशी असलेले हितसंबंध समोर आले. एक काळ असा होता की, बकुल चंदारिया म्हणेल त्या किमतीने बॉलीवूड सेलिब्रिटी ड्रग्ज विकत घेत होते. बकुलच्या नावाने एक ठरावीक अमली पदार्थही विकला जायचा, अशीही माहिती त्या वेळी समोर आली होती. आजही अगदी काही ठरावीक पब्जमध्ये एका नामांकित अभिनेत्रीच्या नावाने अमली पदार्थ मोठ्या किमतीला विकला जातो. या अभिनेत्रीच्या नावाने मिळणारे हे ड्रग्ज अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी स्टेटसचा विषय आहे. ठरावीक किमतीचे ड्रग मिळवण्यासाठी घरातील वस्तूंची चोरी करणे हे अनेक चांगल्या घरातील मुले-मुली करतात. पुढे पैसे मिळेनासे झाले की मग कोणत्याही किमतीमधील नशा विकत घेतली जाते. शेवटी हेतू एकच असतो - नशा चढायला हवी. मग ती लाखोंची असो की हजारांची असो.. नशा महत्त्वाची.
 

 There are many faces in  

आज काळ बदलला आणि काळाबरोबर या ड्रग्जचे सेवन करण्याच्या पद्धतीही बदलल्या. पूर्वी केवळ पार्टी कल्चरमध्ये उपलब्ध असणारे ड्रग आता घरपोचही मिळू लागले आहेत. त्यामुळे पार्टीपर्यंत मर्यादित असलेल्या या व्यसनाने आता घराच्या उंबरठ्यावर ठकठक केलेली आहे. पैसा फेको आणि तमाशा देखोच्या या जगात तुमच्या घराच्या चौकटीच्या आत तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही, अडवू शकत नाही आणि समजा, अडवल्यास तुम्ही कसे कायदे दाखवू शकता, या सर्व वाटा संबंधितांना माहीत आहेत.
 
ड्रग्ज आणि दारू या व्यसनांच्या आहारी गेलेले अनेक चेहरे बॉलीवूडमध्ये आहेत. संजय दत्तच्या चढ-उतार असलेल्या आयुष्यामध्येही ड्रग्ज हा एक भाग होताच की... हनी सिंग हा गायक तद्दन ड्रग्जच्या आणि दारूच्या अतिसेवनामुळे मरणाच्या उंबरठ्यावर होता. हनी सिंगने तर अनेकदा या व्यसनांच्या आहारी जाऊन सार्वजनिक ठिकाणी कहर केला होता, असेही ऐकिवात येते.

आजही पार्टी म्हटली की तिथे अनेकांची गर्दी जमते. खासकरून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची ही गर्दी असते. अर्थात पार्टी जर नामांकित सेलिब्रिटी देणार असेल, तर मग विचारता सोय नाही. खास या पार्टीसाठी काही किलोंच्या ड्रग्जचा पुरवठाही होतो. पार्टीचे आमंत्रण देण्यात येते, तेव्हाच काही सांकेतिक शब्दांमध्ये अंमली पदार्थ कोणता असणार आहे हे कळते. समजा, नुसती साधी पार्टी असेल तर मात्र येणाऱ्यांची संख्याही घटते. त्यामुळे या शो बिझनेसच्या विश्वात पार्टी देणार असाल, तर नशाही तितकीच जरुरी आहे, तरच आणि त्यावरच तुमचा औदा ठरतो. तुमची हुकमत ठरते. तुमचे मोठेपण आणि तुमची दिलदारी ठरते. 
शेवटी काय, तर म्हणतात ना, दिव्याखाली अंधार असतो. चित्रपटामधून समाजमनामध्ये आदर्श असणारे असे अनेक चेहरे आपल्याला दिसतात. परंतु या मुखवट्यांमागील खरा चेहरा जेव्हा दिसतो, तेव्हा काही काळ आपल्याला सुचेनासे होते. सुशांतसिंगच्या बाबतीतही तेच झाले, अनेकदा छोट्या शहरांमधून आलेल्या या मुलांना मायानगरीचा हा झगमगाट डोळे दिपवायला लावतो. तिथूनच पुढे प्रवास सुरू होतो तो अधोगतीच्या मार्गाचा. काही काळ आपण या गोष्टींवर चर्चा करतो, चर्चा घडवतो, चर्वितचर्वण करतो. पुन्हा नव्या दमाने अंमली पदार्थाचे पुरवठा करणारे उदयास येतात. कोट्यवधींची कमाई करणारे अंमली पदार्थांवर लाखो उधळतात... पार्टी रंगते.. पुन्हा एकदा चर्चा घडते.. काही जण यातून वाचतातही, तर काही जणांचे आयुष्य केवळ एक ट्रॅजडी म्हणूनच कुलूपबंद होते. दम मारो दमच्या या जगात जाण्याचे असंख्य मार्ग आहेत. पण या नशेच्या आहारी गेल्यावर बाहेर पडण्याच्या वाटा फार खडतर आहेत. हा नशेचा एक चक्रव्यूह आहे, ज्यातून बाहेर पडताना तुम्ही या नशेच्या गाळात खोलवर रुतलेलेले असता. नशेचा शेवट जर मृत्यू किंवा आत्महत्या असेल, तर मात्र मग अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.. अगदी सुशांतसिंगच्या जाण्यासारखेच.