श्रीमंतीचा राजमार्ग

स्रोत: विवेक मराठी    दिनांक14-Sep-2020
|
हर्षद माने

उद्योग हा श्रीमंतीचा राजमार्ग आहेच, तसेच स्वतःचे काही निर्माण केल्याची - नवनिर्मितीची त्यात मजा आहे. ही मजा दुसऱ्यासाठी राबण्यात नाही. त्यामुळे उद्योगाची कास धरणे - आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा एक आनंददायक अनुभव आहे. जीवन एकच आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःचे काही निर्माण करणे आवश्यक आहे.


 Self-reliant_1 &nbs
 
 सध्या कोरोनाच्या संकटाने आर्थिक संकटांचा गाडा समोर उभा करून ठेवला आहे. ह्यामध्ये बेरोजगारी आणि नोकऱ्या जाण्याचे मोठे संकट उभे ठाकणार आहे. कोरोनाच्या आधीसुद्धा असलेले बेरोजगारीचे सावट कोरोनामुळे अधिक गडद होत जाणार आहे. पण.. इतिहास असे सांगतो की संकटे संधीसुद्धा घेऊन येतात. बघणाऱ्याच्या दृष्टीत फरक असला की संकटांचे संधीत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. सध्याच्या संकटातून जर कुठली संधी निर्माण झाली असेल, तर ती आहे उद्योजकतेची! कोरोना काळातही तुम्ही पहिले असेल - अनेक मराठी तरुणांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले. हा बदल अतिशय सुखावह आहे. कोरोनानंतरच्या जगात उद्योजकता हाच मंत्र राहणार आहे. केंद्र शासनानेसुद्धा यासाठी भरीव कर्जवाटपासाठी भरीव पॅकेज जाहीर केले आणि त्याबरोबर एकशब्दी मंत्र दिला- आत्मनिर्भर होण्याचा. हाच एक मंत्र आता पुढील आयुष्यात तुम्हाला मोठे करेल. तो मंत्र आहे आत्मनिर्भरतेचा.

या आत्मनिर्भरतेच्या पाठीमागे उद्योजकतेच्या संधींचे इतरही कंगोरे आहेत. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी 'मेक इन इंडिया'चा नारा दिला. मात्र त्यामध्ये परदेशी कंपन्यांना भारतात येऊन उत्पादन करण्यासाठी सरकारने निमंत्रण दिले. यातून भारतीय उत्पादक निर्माण झाले नाहीत. आताच्या 'आत्मनिर्भर'मध्ये मात्र सरकारने आपला दृष्टीकोन बदलला आहे आणि भारतीय उत्पादक निर्माण व्हावेत आणि लघू आणि मध्यम उद्योग वाढावेत हा प्रयत्न आहे. त्यामुळॆ आपल्या ह्या लेखातही आपण उत्पादन उद्योगांवर भर देणार आहोत. कारण, यातूनच खऱ्या अर्थाने 'मेक इन इंडिया'चे स्वप्न साकार होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयात पर्यायीकरण - म्हणजे इम्पोर्ट सब्स्टिट्यूशन. ज्या गोष्टी आपण आयात करत आहोत, त्या वस्तू भारतातच बनू लागल्या तर भारताचे खूप परकीय चलन वाचेल. अर्थात सगळ्याच गोष्टी आपण भारतात बनवू शकणार नाही. तसे सयुक्तिकही नसते आणि आवश्यकही. मात्र ज्या ज्या वस्तू भारतात कमी खर्चात बनणे शक्य आहे, त्या आपण भारतात बनवू शकलो तरी आयातीला पर्याय उभा करू शकतो.

कोरोनानंतरच्या काळात जागतिक उद्योगातही उलथापालथ होईल असे वाटते. विशेषतः चीनमध्ये असलेल्या कंपन्यांनी इतरत्र आपले बिऱ्हाड हलवायला सुरुवात केली आहे असे दिसते. मागील दोन दशकांत भारताच्या जागतिक स्तरावर झालेल्या इमेजमुळे यातील काही कंपन्या भारतात येतीलच. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात घेतलेल्या गुंतवणूक परिषदेनंतर महाराष्ट्रातच यातील काही कंपन्या येऊ घातल्या आहेत. या मोठ्या कंपन्या आपल्याबरोबर स्थानिक उद्योजकांना खूप मोठी संधी उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ, एखादी मोटार कंपनी मोटारीला लागणारे लहानसहान भाग इतर उत्पादकांकडून विकत घेते. याला ऍन्सिलिअरी उद्योग म्हणतात. यातूनही खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील. तिसरी गोष्ट म्हणजे प्रस्थापितांचे हललेले स्थान. कोरोनाआधीच्या काळात सुरू असलेल्या अनेक उद्योगांना सध्या पैशाची चणचण जाणवते आहे. कारण कोरोना काळात उत्पादन आणि व्यवसाय बंद असतानाही त्यांना खर्च करावे लागले होते. अनेक लहान आणि रस्त्यावरील उद्योजक यामुळे त्रासांमध्ये सापडले आहेत. यातील काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत असे दिसते. विशेषतः हॉटेल इंडस्ट्रीला याचा फटका सर्वाधिक बसला आहे. जुने जाते, तेव्हा नव्यांना संधी देऊन जाते हे तर जगाचे सूत्र आहे. त्यामुळे जाणारे हे उद्योग जी पोकळी निर्माण करतील, त्यात नवीन उद्योगांना स्थान मिळेल.

आता एवढे वाचल्यावर, नव-उद्योगाची कास धरून आत्मनिर्भर होणे शक्य आहे, अशी तुमच्या मनाची खात्री पटली असेल तर असे कोणते उद्योग तुम्हाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाऊ शकतात त्याकडे आपण नजर टाकू या.

 Self-reliant_1 &nbs 

सगळ्यात पहिला उद्योग आहे - अन्नप्रक्रिया उद्योग. जगात सजीव जन्माला आला, तेव्हापासून पहिली मागणी कुठली निर्माण झाली असेल तर ती अन्नाची. शेवटचा सजीव पृथ्वीवर असेपर्यंत ती राहणारच आहे. एवढी मूलभूत गोष्ट ध्यानी घेतली तर अन्नप्रक्रिया उद्योगाला किती प्रचंड संधी आहे हे तुम्हाला कळेल. पुस्तकी ज्ञानातून पाहिले, तर तुम्ही अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केल्यावर 'तुमची मार्केट साइज काय?' असा व्यवस्थापकीय प्रश्न जर कुणी विचारला, तर त्याचे पुस्तकी उत्तर - 'जगातील प्रत्येक माणूस' असेच असेल. जगाचे सोडा, भारतात खाणारी तोंडे किती आहेत ह्यावरूनच अन्न-प्रक्रिया उद्योग तुम्हाला किती मोठी संधी देतो हे कळेल. आपण एक साधे उदाहरण पाहू. १९९१मध्ये भारतीय अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर जगभरातील ज्या कंपन्या भारतात आल्या, त्यात सर्वाधिक होत्या ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या आणि त्यातही खाद्यान्न विकणाऱ्या कंपन्या. याचे कारणच होते की भारतातील अजस्र लोकसंख्येत त्यांना आपला अवाढव्य ग्राहकवर्ग दिसला होता. मग जे परदेशी कंपन्यांना दिसले, ते आम्हाला का दिसू नये? भारतातील प्रचंड लोकसंख्येकडे आपण ग्राहक म्हणून का पाहू नये? विशेषतः भारतातील तरुणांची जी संख्या आहे, ती २०४०पर्यंत अशीच राहील. त्याला आपण 'डेमोग्राफिक डिव्हिडंड' म्हणतो, त्याकडे आपण तरुण ग्राहक म्हणून जरी पहिले आणि तरुण हेच आपले मार्केट सेगमेंट निवडले, तरी फार मोठी संधी आहे.

आता अन्नप्रक्रिया उद्योगात काय संधी आहेत? अगदी ताजा भाजीपाला, फळे विकण्यापासून ते फळप्रक्रिया, मासेप्रक्रिया, भाजीप्रक्रिया असे असंख्य उद्योग त्यात मोडतात. लहान मुलांपासून सुरुवात केली, तर बेबी फूड म्हणून जे विकले जाते, तसे काही पदार्थ आपण तयार करू शकतो. केरळमध्ये फणसापासून असे बेबी फूड तयार केले गेले आहे. त्यानंतर वाढत्या वयाच्या मुलांना आवडणारे खाद्य म्हणजे हेल्थ ड्रिंक. अशा हेल्थ ड्रिंक्सचे अनेक मोठे ब्रँड्स तुम्हाला ठाऊक आहेत. तुम्हीही त्याचे सेवन केले असेल, तुमच्या मुलांना तुम्ही ते आणून देत असाल. असे एखादे हेल्थ ड्रिंक खऱ्या अर्थाने न्यूट्रिशनने भरलेल्या फळांपासून तयार केले गेले, तर त्याला भारतातच नव्हे, तर जगभरात मागणी असेल. व्यायामशाळेमध्ये जाणाऱ्या तरुणांना आणि तरुणींनासुद्धा असेच हेल्थ ड्रिंक लागत असते. फळ सरबताचा उद्योग असाच प्रचंड मोठा आहे. याचे कारण, उत्तम आरोग्यासाठी फलाहार सांगितला आहे. त्यामुळे फळांचा नाही, तरी अनेक जण आपल्या आहारात फळांच्या सरबताचा समावेश करतात. सरबते बनवणाऱ्या मोठ्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे ह्या उत्पादनाला तयार ग्राहकवर्ग आहे. मार्केटिंग गुरू फिलिप कोटलर म्हणतो, 'तुमचे उत्पादन असे असावे की त्यानेच स्वतःला विकले पाहिजे.' उत्कृष्ट गुणवत्ता, स्वाद आणि पॅकेजिंग असेल, तर तुमचे सरबत स्वतःला विकेल. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा तर अनेकांच्या आहाराचा अविभाज्य घटक. सध्या देशी गाईच्या दुधाकडे परतण्याचा ओघ सुरू झालेला आहे. अशा स्थितीत आपला स्वतःचा देशी गाईंच्या दुधाचा आणि तुपाचा ब्रँड तयार करता आला तर हीच ती वेळ! दुधाचे टेट्रापॅक बनवून आठवडाभर कामात असणाऱ्या तरुणांना उत्तम उत्पादन देता येईल. त्याचबरोबर दही, श्रीखंड, ताक अशा अनेक विविध पदार्थांची रेंज तयार करता येईल. आता दूध केवळ गाय आणि म्हशीपर्यंतच संपत नाही. शेळी, उंट यांचेही दूध मोठ्या प्रमाणात बाजारात विकले जाते. शिवाय ओट आणि नारळाचे दूध फार प्रसिद्ध आहे. नारळाचे दूध आणि त्याची पावडर बनवण्याचा खूप मोठा व्यवसाय आहे. किंबहुना नारळ हा एकच पदार्थ घेतला, तर त्यातून किती विविध वस्तू बनवता येतील. नारळ खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष आहे. मासे उत्पादन, विक्री आणि माशांवरील प्रक्रियेतही अशाच प्रचंड संधी आहेत. जगभरातील मोठ्या मोठ्या कंपन्या पाहिल्या आणि त्यांची अजस्र आकडेवारी पाहिलीत, तर मत्स्यउत्पादनाला आणि विक्रीला आणि त्यावरील प्रक्रियेला किती मागणी आहे हे कळून येईल. केंद्र सरकारनेही मत्स्यव्यवसायाला विशेषत्वेकरून प्राधान्य देण्यासाठी 'मत्स्यसंपदा' ही विशेष योजना आणली आहे. 


self_1  H x W:
त्यानंतर आपण वळू या किराणा व्यवसायाकडे. एका मल्टिनॅशनल कंपन्यांच्या अजस्र व्यवसायाकडून थेट किराणासारख्या दुकानदारी उद्योगाकडे आपण वळलो. पण या किराणा व्यवसायाकडे असेच अजस्र होण्याची संधी आहे. किराणा मालाचे दुकानसुद्धा टाकता येऊ शकते, त्यातही खूप मोठी संधी आहे. सध्या मोठ्या कंपन्यांची किरकोळ विक्री-साखळीसुद्धा (retail chain) असते. अशा एखाद्या ब्रँडचे फ्रँचाइजसुद्धा घेता येईल. पण इथे आपण बोलणार आहोत ई-कॉमर्सविषयी. रिलायन्स रिटेल ही भारतातील फार मोठी रिटेल कंपनी. रिलायन्सने कोरोना काळात तब्बल दीड लाख कोटी गुंतवणूक गोळा केली ती जिओ ह्या डिजिटल आणि रिटेल ह्या दोन व्यवसायांमध्येच. जिओमार्ट ही रिलायन्सची रिटेल ई-कॉमर्स वेबसाइट जिओ आणि फेसबुक यांचा संयुक्त उपक्रम (joint venture) आहे. याचा अर्थ जगभरातील गूगल, फेसबुक यासारख्या मोठ्या कंपन्यांना भारतातील रिटेल उद्योगात 'राम' दिसतो आहे. तीच संधी आपल्यालाही आहे. अगदी जिओमार्ट किंवा डीमार्ट किंवा एमेझॉन यांची फ्रँचाइज घेण्यापासून ते स्वतःचीच ई-कॉमर्स रिटेल कंपनी सुरू करेपर्यंत तुम्ही कितीही भरारी यात घेऊ शकता. किराणा किंवा रिटेल हा भारतातील प्रचंड संधी असणारा उद्योग आहे.

याच किरकोळ किंवा घाऊक विक्रीमधील एक विशिष्ट संधी ग्रामीण भागातही खुली होते. ग्रामीण भागाकडे वास्तविक फार मोठी क्रयशक्ती आहे. ग्रामीण भाग गरीब आहे, अशी समजूत करून रिटेल कंपन्यांनी शहरी भागातील ग्राहकांकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. आता त्यांना त्यांची चूक ध्यानी आली आहे. आता ते ह्या ग्रामीण ग्राहकांकडे आपले पूर्ण लक्ष वळवत आहेत. सध्या ग्रामीण भागात असलेला तरुण अशीच संधी घेऊ शकतो. ग्रामीण भागातील तरुणांनी जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर जर विभागणी केली, तर प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक दारापर्यंत पोहोचणारी एक विक्रीयंत्रणा तयार करता येऊ शकेल. या यंत्रणेच्या माध्यमातून कोणत्याही वस्तू गावच्या प्रत्येक दरवाजापर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात. यासाठी ग्रामीण तरुणांच्या सहकार संस्था तयार होऊ शकतील. अशा संस्थांकडे विविध उद्योग, मोठमोठ्या कंपन्यासुद्धा स्वतः चालत येतील. थोडक्यात ग्रामीण विक्री व्यवस्थेची एक यंत्रणा तयार केली, तर अशा यंत्रणेकडे उद्योग स्वतः चालून येऊ शकेल. एकदा अशी यंत्रणा तयार केली की मग पिनपासून पिंपांपर्यंत आणि बॅटरीपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत काहीही विकत येऊ शकेल. 

आता वळू या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाकडे. सर्वसामान्य कुटुंब प्रत्येक दिवशी ज्या वस्तू वापरतात, अशा वस्तूंचे उत्पादन तुम्हाला एक मोठा ग्राहकवर्ग देऊ शकतो. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा वस्तूंना प्रचंड मागणी आहे, हे तुम्हाला कळेल. साधे मसाल्यांचे उदाहरण घ्या. मसाल्यांचे मोठे ब्रँड आहेत. त्यांच्या जाहिराती, विक्री यंत्रणा सर्व काही आहे. बाजारामधील मोठा हिस्सा त्यांनी काबीज केला आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मसाल्यांचे लहान उद्योग नाहीत. असे अनेक लहान ब्रँड आहेत, काही तर ब्रँडही नाहीत असे घरगुती मसालेही आहेत. थोडक्यात काय, भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे की मोठ्या कंपन्या असल्या तरीही लहान उद्योगांना आपापली बाजारपेठ निर्माण करायला जागा उरतेच. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन सुरू केलेत, तर तुम्हालाही स्वतःचा ग्राहक तयार करता येईल. या ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये वर उल्लेखलेल्या खाद्य वस्तू सोडल्या, तर टूथपेस्ट, टूथब्रश, कपडे, नॅपकीन रुमाल इथपासून ते साबण, डिटर्जंट, परफ्यूम्स, प्लॅस्टिकच्या वस्तू, नोटबुक्स अशा कितीतरी वस्तू तुम्हाला काढता येतील. ह्या वस्तूंमध्ये किंवा त्यातील ठरावीक किंवा एखाद तरी वस्तूमध्ये तुम्ही तुमची उत्पादने काढलीत, तरी त्याला मार्केटिंगसाठी वाव आहे. अशा नवीन ब्रँडला गुणवत्तेबरोबरच आपली किंमत तुलनेने कमी ठेवणे हा बाजारपेठ मिळवण्याचा सोपा उपाय असतो. तुम्ही सर्फ आणि निरमा यांच्यामधील मार्केटिंग युद्धाची कथा वाचली आहे काय? नक्की वाचा. एखाद्या स्थानिक ब्रँडने मनात आणले, तर मोठ्या मल्टिनॅशनल ब्रँडलासुद्धा तो टक्कर देऊ शकतो. त्यामुळे मल्टिनॅशनल कंपन्यांकडे मार्केटिंगसाठी, जाहिरातींसाठी बक्कळ पैसे आहेत, आपण त्यांच्यासमोर काय टिकाव धरणार.. असा विचार करू नका. त्यातही, साबण, लिक्विड सोप, डिटर्जंट, शांपू आणि टाल्कम पावडर ह्या उत्पादनांमध्ये नवीन ब्रँड्सच्या प्रवेशाला चांगली संधी मिळते.

याव्यतिरिक्त, इंजीनिअरिंग वस्तू आणि सेवा, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, एलईडी लाइट्स, धातूकाम, प्लास्टिक्स इंजीनिअरिंग अशा अवजड उद्योगांमध्येही पाय रोवता येईल. यामध्ये, त्या त्या क्षेत्राचे विशिष्ट ज्ञान आणि मार्केटची ओळख दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे त्याचा मी इथे मोठा ऊहापोह करणार नाही. तांत्रिक विषयात प्रवीण असणाऱ्यांना आपण कुठल्या उद्योगात जाऊ शकतो याची माहिती असते. आणि तो तांत्रिक विषय असल्याने प्रावीण्याचा विषय आहे. मात्र त्यातही काही उद्योग ज्यामध्ये अधिक चांगली संधी दिसते आहे, त्यामध्ये ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक व्हेइकल्स, डिजिटल डिव्हायसेस - त्याच्यामध्ये आकर्षक आणि फिटनेस घड्याळांपासून ते वायरलेस सुविधा देणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा समावेश आहे. ह्या झाल्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. विशेषतः चीनवरील आपले व्यापारी अवलंबित्व कमी करण्यासाठी, आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन सुरू व्हावे यासाठी ज्या मूलभूत गोष्टीची आवश्यकता आहे, ती आहे लिथियम बॅटरी आणि विविध सर्किट्स. जर ह्या क्षेत्रातील कुणी जाणकार उद्योजक त्याचे उत्पादन सुरू करेल, तर भारताला त्याची खूप निकड आहे.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, 'आत्मनिर्भर' शब्दामध्ये उत्पादक उद्योगांना प्राधान्य असल्यामुळे आपण सेवा क्षेत्राचा इथे विचार केला नाही. सेवा उद्योग अनेक आहेत, मात्र सध्या कोरोना काळात आणि नंतरही जो एक सेवा उद्योग सर्वांना आवश्यक आहे, तो म्हणजे खानावळ. अतिशय जुना असलेल्या ह्या उद्योगाला पुन्हा सुगीचे दिवस येतील. कारण हायजिन आणि पौष्टिकता (न्यूट्रिशन) ह्या दोन शब्दांना घरगुती जेवण हेच उत्तर आहे. त्यामुळे पौष्टिक जेवणामागे जाणारी तरुणाई कदाचित, जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पण शरीरासाठी चांगल्या नसणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन कमी करेल. अशा वेळी, टिफिन सेवेला चांगली मागणी येऊ शकते.

वर आपण जे उद्योग पहिले, त्यात उत्पादन असो, रिटेल असो किंवा सेवा - गुणवत्ता आणि किंमत ह्या दोन अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. गुणवत्तेत जराही तडजोड न करता रास्त भावात वस्तू किंवा सेवा पुरवता आली, तर ग्राहक तिथे वळतो हे सूत्र आहे. यामध्ये आधुनिक अंगाने आणखी एक भाग जोडला जातो, तो म्हणजे पॅकेजिंगचा. तुमचे पॅकेजिंग जितके आकर्षक, तितकीच ग्राहकाची तुमच्या उत्पादनाकडे नजर लवकर वळेल. त्यामुळे तुमच्या वास्तूचे पॅकेजिंग फार छान असले पाहिजे. ग्राहकाचा वस्तू विकत घेण्याचा अनुभव सर्वतोपरी आनंददायक असला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. पॅकेजिंगच्या बरोबरीने येते ब्रँडिंग. तुम्ही एक छान ब्रँड ठरवून तो वाढवत नेलात, लोकांच्या मनावर बिंबवलात तर तुमच्या उद्योगावर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. तुम्ही कोणताही उद्योग सुरू करा, त्याचे लघू आणि मध्यम उद्योगाचे सर्टिफिकेट नक्की घ्या. शासनाच्या अनेक योजनांसाठी आणि बँकांच्या वित्त आणि अनुदानाच्या योजनांसाठी ही नोंदणी आवश्यक असते. ही नोंदणी पूर्ण मोफत आहे आणि ऑनलाइन सर्टिफिकेट लगेच मिळते.

उद्योग हा श्रीमंतीचा राजमार्ग आहेच, तसेच स्वतःचे काही निर्माण केल्याची - नवनिर्मितीची त्यात मजा आहे. ही मजा दुसऱ्यासाठी राबण्यात नाही. त्यामुळे उद्योगाची कास धरणे - आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा एक आनंददायक अनुभव आहे. जीवन एकच आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःचे काही निर्माण करणे आवश्यक आहे.

सुखी व्हा! आनंदी व्हा! आत्मनिर्भर व्हा! आणि त्यासाठी उद्योगी व्हा! 

हर्षद माने
९९६७७०६१५०
अध्यक्ष, प्रबोधक यूथ फेडरेशन