... तुला झाड व्हायचं आहे !'

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-Sep-2020
|
@ दुर्गेश सोनार

सध्याच्या अपरिहार्य अशा संकटकाळात शाळा घरबसल्या ऑनलाइन भरत असल्या, तरी विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष शाळेतलं ते विश्व ऑनलाइन अनुभवता येणं शक्य नाही. शेतात लावलेलं झाड मनमोकळेपणे बहरतं, त्या झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोकळी माती आणि खुलं आकाश हवं असतं. आता या झाडांचं बोन्साय करून ते घरातल्या कुंडीत लावता येईलही, पण त्याची वाढ सर्वांगीण असणार नाही, ती खुजीच असेल...

seva_1  H x W:
परवा व्हॉट्सऍपवर एक मेसेज आला - काका आपल्या चिमुकल्या पुतणीला मोटरसायकलवरून बाहेर घेऊन जातो. तिथे एके ठिकाणी दुकानाबाहेर ते थांबतात. त्या वेळी त्या चिमुकलीला एक वास्तू दिसते. ती वास्तू पाहून ती चिमुकली हरखून जाते. ती आपल्या काकाला म्हणते, "काका, मी गेल्या जन्मात या वास्तूत बागडले आहे, खेळले आहे. माझे बरेच मित्रमैत्रिणी इथे माझ्यासोबत यायचे... मला आठवतंय काका हे सगळं...!" हे ऐकून तिचा काका हसतो आणि तिला म्हणतो, "अगं वेडाबाई, गेल्या जन्मात नाही, तू याच जन्मात इथे आलेली आहेस. ही तुझी शाळा आहे. लॉकडाउनमुळे शाळेची ही वास्तू गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे तुला असं वाटतंय."

थोडा विनोदी शैलीतला हा मेसेज वाचला आणि मुलांनी फुलून गेलेल्या शाळेचं आवार आठवलं. कोरोनाच्या संसर्गकाळात शाळाच काय, सगळं सगळं ठप्प झालं. प्रत्येकालाच आपल्या आपल्या घरात बंदिस्त व्हावं लागलं. गेले पाच-सहा महिने शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत जाता येत नाहीये. आता वर्ग भरतायत, पण ते ऑनलाइन... वर्गातल्या बाकावर बसून इतर मित्रांसह करता येणारी मौजमजा त्यात नाही. मुलं आपापल्या घरी आणि त्यांचे शिक्षक त्यांच्या घरी... लॅपटॉपवर, स्मार्टफोनवर झूम, गूगल मीट यासारख्या ऑनलाइन माध्यमातून हे वर्ग आता सुरू झालेयत. शाळा अशा ऑनलाइन भरतील असं सहा एक महिन्यांपूर्वी जर कुणी म्हटलं असतं, तर त्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं. पण कोरोनामुळे शिक्षणपद्धतीतच आमूलाग्र बदल करणं अपरिहार्य बनलं आणि त्याचीच प्रचिती आता घरोघर येतेय.

इंटरनेटमुळे माणसाचा एकूणच जीवनव्यवहार बदलेल, असं नव्वदच्या दशकात बोललं जात होतं. ते आता तंतोतंत खरं होताना आपण अनुभवतो आहोत. मराठीतील एका बालकवितेतही हीच शक्यता वर्तवली होती. माजलगावमधील पेशाने शिक्षक असलेले कवी प्रभाकर साळेगावकर यांनी १९९८ सालीच आपल्या एका बालकवितेत ही शक्यता वर्तवली होती. 'रोप' नावाची त्यांची ही कविता नंतर २००८ साली प्रकाशित झालेल्या 'तूच आमची शान' या बालकवितासंग्रहात समाविष्ट करण्यात आली. या कवितेत साळेगावकर लिहितात,

नव्या युगाचे आभाळ गाणे
तुला आता गायचे आहे
माझ्या चिमुकल्या रोपा
तुला झाड व्हायचे आहे
बहरताना सावर तोल
आकांक्षेचे इथे फुटले आहेत पेव
संगणकातून मिळेल जीवन
मुळं घट्ट धरून ठेव
इंटरनेटच्या धाग्यांनी
पान न् पान गुंफायचे आहे
दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना साळेगावकर यांनी लिहिलेली ही कविता. यात निरोप नाही, तर रोप महत्त्वाचं. हे रोप घेऊन या मुलांना आता अधिक व्यापक जगात प्रवेश करायचा आहे. त्याची जाणीव करून देताना कवी म्हणतो, की 'हे चिमुकल्या रोपा, तुला आता झाड व्हायचं आहे.' आणि हे झाड होताना काय काळजी घ्यायची, हेही कवी अगदी निगुतीने सांगतो. येता काळ हा संगणकाचा असेल, इंटरनेटचा असेल... त्याचा वापर करून तुला पान आणि पान गुंफायचं आहे, असं कवी सहजपणे सांगून जातो. खरं तर या कवितेचा लेखनकाल १९९८चा. मात्र, त्यातून व्यक्त झालेल्या जाणिवा आता तब्बल २२ वर्षांनी आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. कवी द्रष्टा असतो असं म्हटलं जातं, त्याचाच प्रत्यय या कवितेतून आपल्याला येतो.

इंटरनेटशिवाय आता आपलं पानही हलत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या आजवरच्या मूलभूत गरजा होत्या. त्यात आता भर पडलीय ती इंटरनेटची. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसेल, तर जगापासून आपण तुटल्याची भीती सतत सतावत राहते, इतकं हे इंटरनेट अंगवळणी पडलंय. आपले बहुतांश व्यवहार आता इंटरनेटवरूनच होतायत. शॉपिंग असो किंवा बँकिंग... सारं काही ऑनलाइन. प्रत्यक्ष भेटींपेक्षाही ही 'नेट'भेटच प्रत्येकाला हवीहवीशी वाटण्याचा हा काळ. अशा काळात शिक्षणसुद्धा ऑनलाइन झालं नसतं तरच नवल. शिक्षणपद्धतीत होऊ घातलेले हे बदलही प्रभाकर साळेगावकरांच्या आणखी एका कवितेत प्रत्ययाला येतात. ते या कवितेत लिहितात...
परवा
माझा मित्र मला म्हणाला,
"आता म्हणे सारेच वर्ग
सॅटलाइटवरून चालणार आहेत.
गुरुजी, तुमचं काही आता काम नाही..."
मी फक्त एवढंच म्हणालो,
"कृत्रिम पावसाने धरण भरत नाही....!"
शाळांचे वर्ग ऑनलाइन भरतील, पण असं झालं तरी शिक्षकांची गरजच उरणार नाही, असं काही नाही. मुलांच्या शैक्षणिक विकासात उलट शिक्षकाची भूमिका अतिशय मोलाची असते. पालक-बालक-शिक्षक या संबंधातला शिक्षक हा घटक आवश्यकच आहे. गजबजलेल्या शाळा या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचं प्रयोगपीठ असतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपले समवयस्क सवंगडी भेटतात, तिथे मैत्रीची बीजं पक्की होतात. समूहाबरोबर अध्ययन करता करता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत जाते. घराच्याही पलीकडे शाळेचं असलेलं हे विश्व मुलांसाठी अत्यावश्यकच आहे. त्यामुळे सध्याच्या अपरिहार्य अशा संकटकाळात शाळा घरबसल्या ऑनलाइन भरत असल्या, तरी विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष शाळेतलं ते विश्व ऑनलाइन अनुभवता येणं शक्य नाही. शेतात लावलेलं झाड मनमोकळेपणे बहरतं, त्याला त्या शेतातली माती आपलीशी करून घेते, त्या मातीत त्या झाडाची मुळं घट्ट घट्ट रोवली जातात. त्याला त्याच मातीची ओल सुखावते, त्यातूनच ते झाड बहरत जातं. त्या झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोकळी माती आणि खुलं आकाश हवं असतं. आता या झाडांचं बोन्साय करून ते घरातल्या कुंडीत लावता येईलही, पण त्याची वाढ सर्वांगीण असणार नाही, ती खुजीच असेल...

९९२०७०४११३