समन्वय - वेदान्त आणि क्वाॅन्टम

विवेक मराठी    21-Sep-2020   
Total Views |

@रमेश पतंगे

 
'समन्वय, दृष्टी आणि साधना' या शीर्षकाचे विनोबांचे पुस्तक आहे. समन्वयाची भारताची परंपरा आणि आजच्या काळातील गरज यावर विनोबांचे भाष्य या पुस्तकात आहे. क्वाॅन्टम विज्ञान म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून विज्ञानाच्या सिद्धान्तानुसार आणि शास्त्रानुसार वेदान्त मांडण्याची ज्ञानशाखा आहे अंतिम सत्याला वेदान्ताचा शब्द आहे 'ब्रह्म' . क्वाॅन्टम विज्ञानात कोणताही कण एकाकी नसतो. तो परस्परसंलग्नच असतो,वेदान्त हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडते.


patange_1  H x

योगायोगाने एकाच दिवशी विचारांना चालना देणारे दोन लेख माझ्या वाचनात आले. ९ मार्चच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये 'क्वाॅन्टम थिअरी ऑफ आयडिया' या शीर्षकाचा अश्विन संघी यांचा लेख आहे. अचानक तो माझ्या वाचनात आला. क्वाॅन्टम थेअरी हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे गणिताच्या भाषेत न मांडलेले क्वाॅन्टमविषयीचे लेख आणि पुस्तके मी वाचत राहतो. त्यातून मला एवढे समजले की, क्वाॅन्टम म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून विज्ञानाच्या सिद्धान्तानुसार आणि शास्त्रानुसार वेदान्त मांडण्याची ज्ञानशाखा आहे. अश्विन संघी यांनी अर्ध्या लेखात वेदान्त आणि क्वाॅन्टम मांडला आहे आणि उरलेला अर्धा लेख विचारधारा आणि त्यांच्या एकत्रीकरणाचा आहे. 'क्वाॅन्टम एन्टॅगल' हा क्वाॅन्टम विज्ञानातील फार महत्त्वाचा विषय आहे. दोन कण जेव्हा एन्टॅगल होतात - परस्परांशी गुंततात, तेव्हा एक नवीनच स्थिती निर्माण होते. तेव्हा हे दोन्ही कण अभिन्नतेने वावरू लागतात.

अंतिम सत्याला वेदान्ताचा शब्द आहे 'ब्रह्म'. त्याचे वर्णन करताना उपनिषदकार म्हणतात,
तदेजति तन्नेजति तद् दूरे तद्वन्तिके| तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः||' म्हणजे हे ब्रह्म चालतही आहे आणि नाहीही. ते अत्यंत जवळ आहे, त्याच वेळी ते दूर आहे. हे सर्व जग व्यापून आहे, त्याच वेळी ते विश्वाच्या बाहेर आहे. त्याला आकार नाही, रंगरूप, वास नाही.' अश्विन संघी आपल्या लेखात म्हणतात, 'मूलकणांच्या स्थितीत कधीही निश्चितता नसते. ज्याला आपण वस्तुरूप म्हणतो, ते कधीही तरंगरूपानेदेखील अस्तित्वात असते. स्थूलकणांचे तरंग आणि तरंगाचे कण हे सतत होत राहते. ऊर्जा आणि मॅटर परस्परांत परावर्तित होत राहतात. क्वाॅन्टम विज्ञानात कोणताही कण एकाकी नसतो. तो परस्परसंलग्नच असतो.' वेदान्त हीच गोष्ट कशी मांडते, हे संघी यांनी वरील श्लोकाच्या इंग्लिश अनुवादात सांगितले आहे.

मनुष्य हा या सर्व कणांपासून बनलेला आहे. त्याच्यात असलेली ऊर्जा (चेतना) मन, बुद्धी ही सर्व कणांपासूनच बनलेली असतात, स्थिर नसतात. त्यातून निर्माण होणारे विचार सार्वकालिक एकमेव सत्य कसे असू शकेल? कारण ज्या मूलकणातून आपण बनलेले आहोत, ते मूलकणच नित्य परिवर्तनशील असतात. परिवर्तनशील मुळातून अपरिवर्तनीय कसे निर्माण होणार? विचारांची प्रत्येक संकल्पना पूर्णतः सत्य किंवा पूर्णतः असत्य असू शकते का? सेक्युलर, कम्युनल, डावी, उजवी, भांडवलशाही, समाजवादी अशा प्रकारे परस्परांपासून भिन्न अशी त्यांची रचना करता येईल का? वेदान्ताचा विचार केला तर नाही करता येणार आणि क्वाॅन्टमचा विचार केला तरी नाही करता येणार. विचाराला चालना देणारा हा मुद्दा मला वाटला.

गिरीश प्रभुणे यांनी मला डाॅ. अभय बंग यांचा 'सुळी दिलेला संत' हा विनोबा भावे यांच्यावरील लेख पाठविला. ४८ पानांचा हा लेख आहे. विनोबा माझ्या आवडीचे लेखक आहेत. त्यांची भाषा सोपी असते. ते जे काही बोलतात आणि लिहितात, त्यामध्ये जबरदस्त विचार असतो आणि संघाचा एक स्वयंसेवक म्हणून विनोबांच्या लेखनातील माझ्या मनाला स्पर्श करुन जाणारी गोष्ट म्हणजे ते निरंतर हिंदू चिंतनावर लिहीत आणि बोलत राहिले. गीता, उपनिषदसार, वेगवेगळी भजने, भगवान गौतम बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानदेव आणि महात्मा गांधी यांच्याविषयी मला जे काही समजले, त्याचे श्रेय विनोबांनाच द्यायला पाहिजे. याचा अर्थ मी सर्वोदयवादी किंवा गांधीवादी झालो असे नाही, माझी मुळे संघातच खोलवर आहेत.

या दोन लेखांचा तसा परस्पर काही संबंध नाही. जाता जाता एका ठिकाणी डाॅ. अभय बंग यांनी मूलकणांचा उल्लेख केलेला आहे. परंतु त्यावर त्यांचे काही भाष्य नाही. मात्र त्यांच्या लेखाचे शीर्षक अतिशय बोलके आहे. पूर्ण लेखात मला माहीत नसलेला असा कोणता विषय नाही. एवढ्या पुस्तकांचे दाखले दिलेले आहेत, त्यातील बरीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. 'सुळी दिलेला संत' हे लेखाचे शीर्षक मात्र विचार करायला लावणारे आहे. पहिला प्रश्न मनात असा निर्माण झाला की विनोबांना सुळी कोणी दिले? येशू ख्रिस्त सुळावर चढविले गेले. गांधीजींना गोळ्या घालण्यात आल्या. मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर मारेकऱ्याच्या गोळीला बळी पडला. अब्राहम लिंकन हेदेखील गोळीनेच मारले गेले. विनोबांना सुळी कोणी चढविले? याचे उत्तर अभय बंग यांच्या लेखात नाही. ते मलाही माहीत नसल्यामुळे उत्तर देण्याचे धाडस मीही करू शकत नाही. पण माझ्या मनात वेगळा प्रश्न आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात भारतात प्रचंड विचारधन देणारे ज्ञानसागर झाले. काही ठळक लोकांचीच नावे घ्यावी लागतील - राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा, डाॅ. आंबेडकर, सावरकर, डाॅ. हेडगेवार, श्रीगुरुजी इत्यादी. यातील हेडगेवार आणि श्रीगुरुजी सोडले, तर बाकी सर्व विचारधारांचे काय झाले आहे आणि काय चालले आहे, याचा श्रद्धेने नाही, भावनाप्रधान होऊन नाही, तर तटस्थपणे विचार केला पाहिजे. काहींचे संप्रदाय झालेले आहेत, काहींचे मठ झालेले आहेत, काहींचे जातीकरण झालेले आहे.

ज्या विचारवंताचा संप्रदाय होतो, मठ होतो, त्याचे अनुयायी सांप्रदायिक होतात. माझेच खरे, माझ्याच गुरूचा विचार जगात सर्वश्रेष्ठ विचार, त्यांच्यासारखा महान अन्य कुणी नाही, अन्य कुणाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. यातील काही जण पावित्र्याच्या अशा काही सोवळ्यात बसलेले असतात, ते वेगळ्या विचारधारेच्या व्यासपीठावर जात नाहीत. आपण अपवित्र होऊ अशी त्यांना भीती वाटत राहते. माझ्या पावित्र्यामुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल, असे त्यांना वाटत राहते. क्वाॅन्टम वाचल्यानंतर अशी सर्व मंडळी अज्ञानाच्या महाजालात फसलेली आहेत, असे वाटू लागते. विज्ञान आणि क्वाॅन्टम सांगते की, जगात स्थिर काही नाही. स्थायी काही नाही. नित्य परिवर्तनशीलता हा विश्वाचा नियम आहे. परस्पर संलग्नता हे तिचे वास्तविक रूप आहे.

यासाठी विचार संकल्पनेच्या क्षेत्रातदेखील परस्पर संलग्नतेचा विचार का केला जाऊ शकत नाही? 'समन्वय, दृष्टी आणि साधना' या शीर्षकाचे विनोबांचे पुस्तक आहे. समन्वयाची भारताची परंपरा आणि आजच्या काळातील गरज यावर विनोबांचे भाष्य आहे. समन्वयाच्या संदर्भात ते म्हणतात, "समन्वयाची त्या काळात जितकी आवश्यकता होती, त्यापेक्षा जास्त आज आहे, कारण पूर्वीच्या काळी समन्वय झाला तो हिंदू संस्कृतीच्या अंतर्गत झाला. बौद्ध, जैन, सर्वांची गणना मी हिंदूमध्येच करतो. परंतु आज जगात नाना प्रकारच्या श्रद्धा आहेत. जवळपास शे-सव्वाशे कोटी बौद्ध असतील, तीस-पस्तीस कोटी मुसलमान आणि जवळपास तेवढेच हिंदू. इतक्या प्रकारच्या श्रद्धा एवढ्या मोठ्या समाजात स्थिर झालेल्या असताना त्या सर्वांच्या समन्वयाची आवश्यकता आहे. एखादी महान व्यक्ती निघेल आणि करील हे काम! परंतु आपण येथे बसलो आहोत, आपण काय करायला हवें?" दार्शनिक विनोबांचे हे भाष्य वाचून सोडून द्यायचे नसून, ते विचार करुन कृतीत आणण्याचे आहे, असे मला वाटते.

vivekedit@gmail.com