भव्य स्मारक व्हावे, पण...

विवेक मराठी    22-Sep-2020   
Total Views |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रदीर्घ काळ आंदोलन झाले आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित केला, पण तो होऊ शकला नाही. मात्र या निमित्ताने स्मारकाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर 'सर्वांचा सहभाग, सर्वांचे प्रेरणास्थान' हे सूत्र घेऊन पुढे कसे जायचे, याचा विचार करायला हवा.

ambedkar_1  H x 
मुंबईतील इंदू मिल येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दोन वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. या भूमिपूजनानंतर जागेची साफसफाई व जुन्या वास्तू पाडण्याचे कामही वेगाने सुरू झाले होते. रामजन्मभूमी पायाभरणी सोहळा संपन्न झाल्यावर देशभरात उत्साह संचारला असताना महिन्याभरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने इंदू मिलच्या जागेवर पायाभरणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. निवडक सोळा लोकांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम रद्द झाला. कार्यक्रम रद्द होण्याची कारणे काय आहेत? हा वेगळ्या चर्चेचा विषय असला, तरी या निमित्ताने काही गोष्टींना तोंड फुटले आहे, याचा विचार करायला हवा.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण व्हावे, यासाठी दीर्घ काळ आंदोलन झाले आहे. चैत्यभूमीला लागून असलेल्या इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक व्हावे, यासाठी सुरुवातीला अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दोन एकर जमीन दिली, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संपूर्ण साडेबारा एकर जमीन या स्मारकासाठी दिली. वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीची जमीन स्मारकासाठी संपादित करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयभावातून त्यांनी हा निर्णय घेतला होता.

अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पायाभरणी कार्यक्रम होणार होता, तोही रद्द झाला. या प्रस्तावित कार्यक्रमास निवडक सोळा लोकांना आंमत्रित केले होते, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांपैकी कुणाचाही समावेश नव्हता. या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, "पुतळा उभारण्याला माझा विरोध आहे. पुतळा उभारण्याऐवजी एक बौद्धिक विचार केंद्र निर्माण व्हावे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. या जागेबाबतच्या अटलजींच्या पत्राचे अध्ययन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करावे." प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. माध्यमांतून प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेची थोडीबहुत चर्चा झाली असली, तरी ती पुरेशी नाही. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातून आपल्याला कोणत्या प्रेरणा जागवायच्या आहेत? याचा विचार करायला हवा आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करायला हवा.

ambedkar_1  H x 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह कशासाठी केला? नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा आग्रह कशासाठी केला? १९३५ साली धर्मांतराची घोषणा का केली? भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणत्या मूलभूत तत्त्वावर भर दिला? आणि शेवटी तथागतांचा धम्म का स्वीकारला? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्रित द्यायची, तर असे म्हणता येईल की, आपल्या समाजातील कुप्रथा दूर व्हाव्या, जातिभेद, अस्पृश्यता संपावी आणि आपला समाज समतेच्या पायावर उभा राहून एकात्म व्हावा, सर्वांना समान संधी मिळावी यासाठी सामाजिक एकात्मता हीच राष्ट्रीय एकात्मतेची पूर्वअट आहे. समाजातील हीनपणा संपावा आणि बंधुभावाची वाढ व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण चळवळ चालविली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "आपण बंधुभावाचे तत्त्व आचरणात आणत नाही ही आपल्यामधील उणीव आहे. हिंदी लोक हे परस्परांचे सख्ये भाऊ होत, ही सर्व हिंदी जनता एका जिव्हाळ्याची एकच जनता आहे अशी जी भावना असते, ती बंधुभाव या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृतसिंचन जर कोणते तत्त्व करीत असेल, तर ते बंधुभावाचे तत्त्व होय. राष्ट्र या पदाला पात्र होण्याची आपणास खरोखरच इच्छा असेल, तर आपण सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते, तेथेच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा आत्मा असणारा एकात्मभाव त्यांच्या स्मारकातून कशा प्रकारे साकार करता येईल, हा विचार केला पाहिजे.
महापुरुष हे राष्ट्रीय संपत्ती असतात आणि त्याच भावनेने महापुरुषांची चरित्रे अभ्यासली गेली पाहिजेत. महापुरुष जातीय अस्मितांचे ऊर्जाकेंद्र न होता त्यांच्या जीवनातील समतेचा विचार संपूर्ण समाजाला उपयुक्त आहे ही भावना कशी जागेल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशातील सर्व महापुरुष हे संपूर्ण देशाचे आहेत व त्यांचे विचार आणि कार्य हे संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम करतात, ही भावना जागृत होणे आवश्यक आहे.

ambedkar_1  H x 
या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी काय विचार करता येईल? सा. विवेकच्या माध्यमातून याआधी दोन-तीन वेळा याच विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरूष आहेत, म्हणून त्यांच्या स्मारक उभारणीत संपूर्ण राष्ट्राचा सहभाग असायलाच हवा अशी आमची भूमिका आहे. जोपर्यंत स्मारक उभारणीत प्रत्येक भारतीय नागरिकाला सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत स्मारकाचा विषय हा तथाकथित समाजाच्या अस्मिता जागृत करण्यापुरताच मर्यादित राहील आणि म्हणून सर्व समाजबांधवांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करायला हवा. 'सर्वांचा सहभाग, सर्वांचे प्रेरणास्थान' या भूमिकेतून या विषयावर चिंतन केले पाहिजे, असे आम्हाला वाटते.

हा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण आपणच मागच्या शतकात अशा सर्व सहभागातून एक भव्य स्मारक निर्माण केले आहे, हे आपण विसरता कामा नये.
कन्याकुमारी येथे श्रीपाद शिलेवर स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक निर्माण झाले, ते भारतीय नागरिकांनी दिलेली एक एक रुपया देणगी जमा करून जमा झालेल्या निधीतून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हाच प्रयोग करता येऊ शकतो का? प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे पुतळा नको, स्टडी सेंटर उभे करावे यावर तपशीलवार चर्चा करून मार्ग निघू शकतो. स्मारकाचे स्वरूप आणि भव्यता निश्चित करताना भविष्याचा विचार केला पाहिजेच. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्याऐवजी भव्य ग्रंथालय उभारा अशी मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबतही असा कालसापेक्ष विचार करायला हरकत नसावी. मात्र ही चर्चा करताना संपूर्ण भारत या स्मारकाशी कशा प्रकारे जोडता येईल यांचा विचार करायला हवा. भव्यदिव्य पुतळा प्रेरणादायक मानणारा खूप मोठा समूह आपल्या देशात आहे, हे न विसरता त्यांच्या भावना जपत संपूर्ण समाज या स्मारकाशी कशा प्रकारे जोडता येईल असा विचार करून तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाची आपल्या देशाला गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व अन्य मंडळींनी पुढाकार घेऊन असे नेतृत्व विकसित केले पाहिजे.