आत्मविलोपी व्यक्तिमत्त्वाचा धनी कार्यकर्ता - दत्ताजी रावदेव

विवेक मराठी    25-Sep-2020
Total Views |

 @श्रीनिवास जोशी
संघटकामध्ये अनेक गुण असावे लागतात व ते दत्ताजींमध्ये निश्चितच होते
, त्यांचे थोडक्यात वर्णन एका संस्कृत सुभाषितामध्ये केल्याप्रमाणे असे आहे - 'उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रू विग्रहे| राजओएद्वारे स्मशाने च य: तिष्ठति स: बांधव:||' आयुष्यात आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यात त्यांनी संघातून मिळालेल्या संस्काराची आठवण ठेवली होती. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा लेखप्रपंच.
 dattajirao_1  H

जो खरा आणि हाडाचा नेता असतो, त्याच्या रोजच्या व्यवहारावरून जे लक्षात येते, त्याचे थोडक्यात वर्णन करायचे तर असे करता येईल - हा नेता स्वत: घडत असताना इतरांनाही संधी उपलब्ध करून देतो व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. योग्य व्यक्तीची निवड करणे व ओत्याला तशी संधी उपलबब्ध करून देणे हेही तो सतत लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असतो. अशा मोठ्या मनाचे कार्यकर्ते निर्माण करण्याच कारखाना आपल्या देशात १९२५ साली नागपूर येथे सुरू झाला व थोड्याच दिवसांत या विलक्षण कारखान्याचा विस्तार देशभर झाला. त्या कारखान्याचे नाव रा.स्व. संघ. या देशव्यापी कारखान्यात एकापेक्षा एक महान अशा असंख्य कार्यकर्त्यांची निर्मिती झाली, त्यातलेच एक म्हणजे द.मो. उर्फ दत्ताजी रावदेव. अत्यंत सामान्य रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबात २३ जुलै १९३४ रोजी विदर्भात दत्ताजींचा जन्म झाला व गेल्या २९ ऑगस्ट २० रोजी वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे बालपण नागपुरात महाल परिसरातच गेल्याने संघाशी संबंध आला नसता तरच आश्चर्य घडले असते. आयुष्यात आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यात त्यांनी संघातून मिळालेल्या संस्काराची आठवण ठेवली होती. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा लेखप्रपंच.


२३ जुलै हा दिवस म्हणजे लोकमान्य टिळकांची जन्मतिथी. या दिवशी जी व्यक्ती किंवा संस्था जन्मास येईल, ती व्यक्ती किंवा संस्था अलौकिक/अजरामर कार्य करणारच, असा संकेत असावा. २३ जुलै या दिवशी दत्ताजी रावदेव व भारतीय मजदूर संघ या दोघांचा जन्म झाला. भा.म. संघाच्या माध्यमातून असंख्य कामगारांच्या जीवनातील समस्या सोडवण्यात दत्ताजींनी आपल्या जीवनाची ५० वर्षे आनंदाने व कर्तृत्वभावनेने खर्ची घातली. रेल्वेतील सुमारे ३७ वर्षांच्या सेवेत त्यांनी १९६४ साली वाडीबंदर येथील गूड्स शेडमधून भा.म. संघाशी संलग्न मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या कार्यात प्रवेश केला. सुरुवातीला शाखा स्तरावर कामाला सुरुवात करून १९७३मध्ये मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या महामंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली व एक वर्षाच्या आत - म्हणजे १९७४ साली आपल्या मागण्यासाठी रेल्वे कामगारांनी देशव्यापी संप घडवून आणला. विख्यात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी या संपाचे नेतृत्व केले होते, पण संप सुरू होण्याच्या आधीच सरकारने त्यांना व त्यांच्या अनेक नेत्यांना अटक केल्याने संपूर्ण देशभराची जबाबदरी भारतीय रेल्वे मजदूर संघावर (भारतीय मजदूर संघाशी संलग्न देशातल्या रेल्वेच्या सर्व झोनमधील संघटनांचा महासंघ) आली व मध्य रेल्वेची जबाबदारी रावदेव यांच्यावर आल्याने त्यांनी महिनाभराची सुटी घेऊन मध्य रेल्वेवरील सर्व प्रमुख स्टेशनांवर दौरा केला. या दौऱ्यात शेकडो कार्यकर्त्यांच्या व हजारो कामगाराच्या गाठीभेटी घेऊन ८ मे १९७४पासून सुरू होणाऱ्या देशव्यापी संपासाठी त्यांची मानसिक तयारी केली. त्यामुळेच तो संप यशस्वी झाला.

त्या संपाच्या काळातल्या काही आठवणी कायम लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्या संपाची नोटिस देण्यासाठी एप्रिल १९७४मध्ये दोन प्रमुख संघटनांचे (साम्यवादी व भारतीय मजदूर संघाचे) कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने बोरीबंदर येथे जनरल मॅनेजर कार्यालयासमोर एकत्र झाले होते. प्रथम साम्यवादी नेता बोलायला उभा राहिला व त्याने रेल्वे प्रशासनाविरोधात दमदाटीची भाषा करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी दम देताना म्हटले, “हमारी मांगे पुरी नही होगी, तो हम ये बिल्डिंगको तोड डालेंगे, आग लगा देंगे।" त्याचबरोबर शिव्या द्यायला सुरुवात केली. आम्ही सर्व भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते विचलित झालो. त्यानंतर रावदेव बोलायला उभे राहिले व त्यांनी आधीच्या साम्यवादी नेतृत्वाच्या भाषणाचा जाहीर निषेध करून न थांबता असे घोषित केले की ही तोडफोडीची भाषा थांबवली नाही, तर भा.म. संघाचे आम्ही कार्यकर्ते या संयुक्त मोर्चातून बाजूला होऊ. आम्ही सरकारला/रेल्वेला आश्वासन देतो की घातपाताच्या मार्गावर भा.म. संघाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही व आम्ही रेल्वे मालमत्तेचे प्राणपणाने रक्षण करू. कारण ही व्यवस्था देशाची आहे व आम्ही देशहितसर्वोपरी मानणारे आहोत. मात्र सनदशीर मार्गाने आम्ही आमच्या मागण्या पदरात पाडून घेऊच.त्यांच्या या स्पष्ट व आश्वासक भाषणामुळे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. नंतर साम्यवाद्यांच्या नेत्याने माफी मागितली व असली भाषा पुन्हा काढणार नाही असे आश्वासन दिले. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रातही शिस्तपालन होऊ शकते व देशहिताला प्राधान्य दिले जाते, हे अधोरेखित झाले व रावदेवांच्या खंभीर व देशभक्तिपूर्ण भाव असलेल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.

संपाच्या काळात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली होती. त्यांच्या घरी आर्थिक अडचण निर्माण झाली होती, तिची दखल घेऊन आम्ही कार्यकर्त्यांनी त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन योग्य ती मदत उपलब्ध करून दिली. अशाच प्रकारे त्यांच्या कार्यकाळात सर्व सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सतत उभे राहून दत्ताजींनी भारतीय मजदूर संघटना म्हणजे ब्रेड-बटर युनियन नसून परिवार आहे, हे सिद्ध केले.

असाच एक प्रसंग - वाडीबंदर कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने (कक्कड यांनी) एक दिवस तेथील एका महिला कार्माचाऱ्याला आज्ञा केली की तुम कलसे मेरे कमरेमे बैठना शुरू करो.यावर ती महिला कर्मचारी घाबरली व रडायला लागली, कारण तिने त्याच्या नजरेतला विखारी भाव ओळखला होता. रावदेवांना ही गोष्ट समजताच त्यांनी एका कार्यकर्त्याला (रुईकर यांना) बरोबर घेऊन तातडीने बोरीबंदर गाठले. डी.आर.एम. साठ्ये यांच्या ऑफिसमध्ये जाऊन हा घाणेरडा प्रकार त्यांच्या कानावर घातला. डीआरएमसाहेबांनी तेथल्या तेथे त्या लंपट अधिकाऱ्याला तेथून हलवले व तोंडी आदेशाने दुसऱ्या जागी त्याची बदली करून त्याला शिक्षा दिली. अत्यंत तत्परतेने केलेल्या या कामगिरीमुळे अधिकाऱ्यांमध्ये रावदेवांविषयी दबदबा निर्माण झाला.

भारतीय मजदूर संघाने रावदेवांमध्ये असलेल्या नेतृत्वगुणांची योग्य ती नोंद घेतली व १९७८मध्ये चेन्नई येथील ऐतिहासिक अधिवेशनात भारतीय रेल्वे मजदूर संघाच्या (रेल्वेतल्या संघटनांचा महासंघ) राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी दत्ताजींवर सोपवण्यात आली. त्यांनी अत्यंत समर्थपणे १४ वर्षे ती जबाबदारी पेलली. त्यानंतर भा.रे.म. संघाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सरकारी कर्मचारी राष्ट्रीय परिसंघाची जबाबदारीही त्यांच्याकडे चालून आली. त्या काळात त्यांनी रेल्वे कामगारांच्या समस्या मार्गी लावल्या. त्यातील एक समस्या म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यावर तो मूळ वेतनात समाविष्ट करावा अशी वेतन आयोगाने केलेली शिफारस कार्यान्वित होत नव्हती, ती गिरीश अवस्थी (भा.म. संघाचे तत्कालीन अध्यक्ष) यांच्या मदतीने रावदेवांनी त्या वेळचे पंतप्रधान मा. अटलजींच्या कानावर घातली व मान्य करून घेतली (२००४). त्यांच्या या कामगारहिताच्या कामगिरीची दखल सर्वांनी घेतली. एव्हाना त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती, पण कामगार सेवेच्या व्रतात खंड पडला नाही. भा.म. संघाच्या नियमाप्रमाणे सत्तरीनंतर कोणत्याही पदावर न राहता जमेल ती जबाबदारी पार पडायचीच, या नियमाला अनुसरून त्यांनी २००७ साली रेल्वेतल्या मान्यतेसाठी होऊ घातलेल्या निवडणूक दौऱ्यात सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करून प्रचार केला व काही प्रमाणात यश प्राप्त करून दिले. या काळात असंख्य कामगारांच्या शासनात अडकून पडलेल्या समस्या मार्गी लावल्या, त्याचबरोबर कित्येकांच्या घरगुती समस्याही मार्गी लावल्या. त्यामुळे संघटनेच्या परिवारात अण्णा रावदेव यांना कुटुंबप्रमुखाचे स्थान मिळाले व ते त्यांनी कर्तृत्वभावनेने स्वीकारले. त्यामुळे भा.म. संघ म्हणजे पारिवारिक संघटनाहा विश्वास पक्का झाला. म.रे.क. संघाचे प्रथम महामंत्री म्हणून अमलदारसिंग यांची नियुक्ती झाली. ते संघाबाहेरचे होते, तरी दत्ताजींनी त्यांना योग्य तो मानसन्मान दिला.

दत्ताजींच्या या आगळ्यावेगळ्या जीवनप्रवासात सौ. वहिनीनी भारतीय नारीचा आदर्श समोर ठेवून जी साथ दिली, तिला तोड नाही. आर्थिक विवंचना असतानाही त्यांनी संसाराचा गाडा हाकताना पतीला मोलाची साथ दिली, तिला सलामच करायला हवा. वहिनींच्या अकाली मृत्यूने (दि. १६ जून २००३) दत्ताजींच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी मुलाने व सुनेने भरून काढली. त्यांनी दत्ताजींच्या मार्गात अडथळे येऊ दिले नाहीत. त्यांच्या एकुलत्या एक नातीने त्यांच्या अंतिम प्रवासात अमेरिकेतून येऊन त्यांच्या मृत्यूला थोपवून धरले होते. तिच्या उपस्थितीत अण्णांनी २९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता जगाचा निरोप घेतला.

श्रद्धेय दत्तोपत ठेंगडी, संघाचे प्रचारक यांना व भा.म. संघाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना ते त्यांच्या या संघटनेच्या जीवनप्रवासाचे श्रेय देत असत. दत्तोपंत तर रावदेवांच्या परोक्ष त्यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना आम्ही अनेक वेळा अनुभवले आहे. संघटकामध्ये अनेक गुण असावे लागतात व ते दत्ताजींमध्ये निश्चितच होते, त्यांचे थोडक्यात वर्णन एका संस्कृत सुभाषितामध्ये केल्याप्रमाणे असे आहे - 'उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रू विग्रहे| राजद्वारे स्मशाने च य: तिष्ठति स: बांधव:||'

अशा या आत्मविलोपी नेत्याचे निधन अकाली झाले असे जरी म्हणता येत नसले, तरी केवळ त्याच्या अस्तित्वामुळे आजही अनेक समस्या सुटू शकत होत्या, म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कामगारांतर्फे व संघस्वयंसेवाकांतर्फे त्यांना ही विनम्र श्रद्धांजली!


श्रीनिवास जोशी

8097130269