एकात्म मानव दर्शन

25 Sep 2020 15:38:11

pandit_1  H x W
 

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे अभ्यासक होते. आपला हिंदू समाज सबळ, समृध्द व्हावा या आकांक्षेने त्यांनी प्रदीर्घ चिंतन केले. या चिंतनाचा परिपाक म्हणजेच 'एकात्म मानव दर्शन' होय. गेल्या पन्नास वर्षांत एकात्म मानव दर्शनावर अनेक मान्यवरांनी भाष्य केले आहे. आपण युगानुकूल जीवन कसे जगू शकतो, याबाबतचा आराखडा एकात्म मानव दर्शनातून पंडितजींनी पन्नास वर्षांपूर्वी मांडला. व्यक्ती ते समष्टी अशा व्यापक परिघातील शाश्वत चिंतन मांडून, आपण परस्परपूरक जीवनाचा अंगीकार केला पाहिजे हे पंडितजींनी सांगितले. पंडितजींच्या तत्त्वज्ञानाला आधारभूत मानून आजवर अनेक मान्यवरांनी कृतिरूप एकात्म मानव दर्शन साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे अनेक अभ्यासकांनी पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनाचे आकलन करून घेऊन त्यातील अनेक संज्ञा, संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. एकात्म मानव दर्शन साकार होऊन आज पन्नास वर्षांचा काळ उलटून गेला, तरीही त्यावर संशोधन, कृतिरूप प्रकटीकरण चालू आहे. यातच पंडितजींचे आणि एकात्म मानव दर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते आहे.

एखादा विचार, संज्ञा, संकल्पना काळाच्या कसोटीवर घासून तिची उपयुक्तता तपासण्याची आपली परंपरा आहे. एकात्म मानव दर्शनाची जेव्हा मांडणी झाली, तेव्हाचा काळ आणि आजचा काळ यात खूप अंतर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे अंतर केवळ पन्नास वर्षांचे नाही. आज सर्वच क्षेत्रांत वेगवान बदल होत आहेत. एकात्म मानव दर्शनात व्यक्ती ही समाजाचे एकक मानले आणि व्यक्तीच्या विकासातून समाजाचा विकास, समाजाच्या विकासातून राष्ट्राचा विकास असा विकासाचा ओनामा मांडला. हा ओनामा आज प्रत्यक्षात आणणे अवघड होत आहे. कारण मुख्य एकक मानलेली व्यक्ती आज समाजापासून तुटली आहे. एकलकोंडेपणा, अलिप्तता हा व्यक्तिजीवनाचा स्थायिभाव झाला आहे. समाज एकरस नाही, संघटित नाही. त्याचप्रमाणे कृषी, शिक्षण, उद्योग, आर्थिक धोरणे इत्यादीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. जागतिकीकरणानंतर अनेक संज्ञा आणि संकल्पना धूसर होताना दिसत आहेत. शोषण हा जागतिकीकरणाने दिलेला सिध्दान्त स्वीकारला जातो आहे. आणि दोहन कशाचे करायचे हा प्रश्न उभा राहतो आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काळाच्या कसोटीला आधार मानून एकात्म मानव दर्शन नव्याने आकलन करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
आजच्या संदर्भात एकात्म मानव दर्शन कशा प्रकारे लागू पडते, याचाही विचार करण्याची आवश्यकता असून आज खाजगीकरण, उदारीकरण यामुळे सर्व प्रकारचे संदर्भ बदलले गेले आहेत. माणूस घडवणारे शिक्षण आता व्यवसाय झाला आहे. माणसाची भूक भागवणारे कृषी क्षेत्र दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या यासाठी चर्चेत आहे. जागतिकीकरणाने आर्थिक क्षेत्रात क्रांती केली असली, तरी आहे रे आणि नाही रे यांच्यामधील दरी अधिक रुंद होत आहे. व्यक्ती आत्ममग्न आणि समाज जातिकेंद्रित होत आहे. निसर्गाचे वारेमाप शोषण चालू आहे. जगण्याचे सर्वच संदर्भ बदलले आहेत. जग ही मुक्त बाजारपेठ झाली असून येथे श्रम, ज्ञान, कौशल्य यांची खरेदी-विक्री होत आहे. मूल्यसंकल्पना धूसर होत आहे. या साऱ्या 2020 सालच्या समस्या आहेत. एकात्म मानव दर्शनातून या समस्येवर उतारा मिळू शकतो काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कोणतेही तत्त्वज्ञान कालातीत असते. एकात्म मानव दर्शनातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जो विचार मांडला, त्याचा आजच्या काळात कशा प्रकारे अंगीकार करता येईल आणि आजच्या समस्या एकात्म मानव दर्शनातून कशा प्रकारे सोडवता येतील, याचा विचार मांडण्याचा हा प्रयत्न असेल. या प्रयत्नात सहभागी झालेले सर्वच जण एकात्म मानव दर्शनाच्या मांडणीनंतर जन्मलेले आहेत. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पाहिलेले नाही. पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनाच्या संदर्भात केलेल्या चार बौध्दिकांच्या आधाराने आपली मांडणी केली आहे. ही एक सुरुवात आहे एकात्म मानव दर्शन नव्याने समजून घेण्याची.आणि ती कालसापेक्ष मार्गाचे व्यवहारात आणण्याची. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त इतका विचार केला तरी खूप पुढे जाता येईल.
@
रवींद्र गोळे
Powered By Sangraha 9.0