कोविड-१९विरोधी 'एम-आरएनए' जातीची लस

विवेक मराठी    26-Sep-2020
Total Views |

 @डॉ. मिलिंद पदकी

कोविड-१९विरोधी लशींमध्ये अनेक कंपन्या 'एम-आरएनए' जातीची लस बनवीत आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान काहीसे खर्चीक असले, तरी ते अतिशय वेगाने प्रगती करू शकत असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. सध्या बिनीच्या तिन्ही लशी - ऑक्स्फर्ड-अस्त्रा-झेनेका, मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांच्या - या जातीच्या आहेत. ऑक्स्फर्ड, फायझर, मॉडर्ना यांच्या या लशी आता मानवी चाचण्यांच्या फेज ३ या अखेरच्या टप्प्यात आहेत.


vaccine_1  H x


कोविड-१९विरोधी लशींमध्ये अनेक कंपन्या 'एम-आरएनए' जातीची लस बनवीत आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान काहीसे खर्चीक असले, तरी ते अतिशय वेगाने प्रगती करू शकत असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. सध्या बिनीच्या तिन्ही लशी - ऑक्स्फर्ड-अस्त्रा-झेनेका, मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांच्या - या जातीच्या आहेत. त्यांचे विषाणू-एम-आरएनएचे वाहक वेगवेगळे आहेत. वाहक म्हणून, फायझर आणि मॉडर्ना हे स्निग्ध पदार्थांचे नॅनो-कण वापरीत आहेत, तर ऑक्स्फर्ड 'अडिनो-विषाणू' नावाचा, चिंपांझी माकडांमध्ये आढळणारा विषाणू वापरीत आहे.

जीव-रसायनशास्त्रातला एक मूळ सिद्धान्त म्हणजे पेशींच्या केंद्रकातील डीएनए नावाचा संचालक रेणू, एम-आरएनए नावाचा संदेशवाहक रेणू बनवून केंद्रकाबाहेर पेशींच्या सायटोप्लाझममध्ये पाठवितो. सायटोप्लाझममध्ये पेशींची रायबोसोम नावाची अतिसूक्ष्म 'इंद्रिये' या एम-आरएनएच्या कोडनुसार इच्छित प्रथिन बनवितात.

आता एम-आरएनए लस तंत्रज्ञानात आपण बाहेरून विषाणूचे एम-आरएनए मानवी पेशींना पुरवितो आणि त्या त्यातील कोडनुसार विषाणूचेच 'एस' नावाचे प्रथिन बनवितात, जे अँटीजेनचे (बाह्य, अनिच्छित प्रथिनाचे) काम करते. विषाणूच्या बाह्य आवरणावरील 'एस' प्रथिन हे मानवी पेशीवरील  रिसेप्टरबरोबर संलग्न होऊन तो दरवाजा उघडते आणि विषाणूला पेशीत नेते. या प्रथिनाविरुद्ध आपल्या शरीराने अँटीबॉडी तसेच टी-सेल रिस्पॉन्स निर्माण केल्यास विषाणू निकामी करता येतो.

 

vaccine_1  H x

एम-आरएनए लस (ऑक्स्फर्ड, फायझर, मॉडर्ना) दिल्यावर काय घडते?

१. आपण दंडाच्या स्नायूत लस टोचतो. या स्नायूपेशी लशीमधले विषाणूच्या 'एस' प्रथिनाचे 'एम-आरएनए' घेऊन त्याच्या कोडनुसार विषाणूचे 'एस' प्रथिन बनवितात. हे 'एस' प्रथिन रक्तात उतरून लिंफ नोडमध्ये पोहोचते, जिथे ते अँटीजेन-प्रदर्शक 'डेनड्रायटिक' पेशींकडून पकडले जाते आणि त्याचे तुकडे त्या आपल्या पृष्ठभागावरील MHC या प्रथिन-समूहावर प्रदर्शित करू लागतात.

२. लिम्फ नोडमध्ये या 'अँटीजेन-प्रदर्शना'कडे संथपणे 'बघत' वाहत चाललेल्या शिकाऊ बी लिंफोसाइट्स या तुकड्यांविरुद्ध अँटीबॉडीज बनवू लागतात आणि शिकाऊ टी लिंफोसाइट्स (मुख्यतः CD4 या 'मदतनीस' - 'हेल्पर' जातीच्या टी सेल्स), 'हा शत्रू आहे' हे शिकतात. या हेल्पर टी सेल्स मग CD8 नावाच्या 'किलर' टी सेल्स बनवायला मदत करतात. CD8 नावाच्या 'किलर' टी सेल्स यांचे काम, जी मानवी पेशी आपल्या पृष्ठभागावर विषाणू प्रथिनांचे तुकडे दाखवीत असेल (म्हणजेच ती 'इन्फेक्टेड' असेल) त्या मानवी पेशीला ठार मारून विषाणूने 'काबीज' केलेल्या मानवी पेशींचे प्रमाण कमी करणे हे असते, ज्यायोगे विषाणूचे पुनर्निर्माणही बंद होते.

३. पहिल्या डोसनंतर १५ दिवसात IgG ही अँटीबॉडी आणि ती बनविणाऱ्या बी लिंफोसाइट्स पेशी रक्तात दिसू लागतात. यातल्या काही 'मेमरी' बी सेल्स बनतात. मेमरी सेल्स सोडून यातल्या बाकीच्या बी सेल्स लवकरच मरण पावतात. याला महत्त्व अशासाठी आहे की तुम्हाला सतत कोणता तरी संसर्ग होतच असतो, केवळ कोरोना नव्हे. आता एका संसर्गाने निर्माण झालेल्या बऱ्याचशा लिंफोसाइट्स जर मेल्या नाहीत, तर रक्तात अशा निरनिराळ्या लिंफोसाइट्सची गर्दी वाढत जाऊन बाकी कशालाच जागा उरणार नाही - 'लिंफोमा' नावाच्या ब्लड कॅन्सरसारखी परिस्थिती निर्माण होईल.

४. मेमरी सेल्स मात्र तोच अँटीजेन नव्याने त्यांना दिसला (लशीच्या दुसऱ्या 'बूस्टर' डोसने किंवा विषाणू संसर्गाने), तर लगेच कार्यरत होऊन द्विभाजनाने आपल्या शेकडो कॉपीज तयार करू लागतात, ज्या अँटीबॉडी-निर्मात्या बी सेल्स (किंवा अ‍ॅक्टिव्हेटेड 'टी' सेल्स) आपापले काम करू लागतात.

५. मॉडर्नाच्या लस इंजेक्शननंतर ४३व्या दिवसापासून ५७व्या दिवस या काळातही अँटीबॉडीजचे प्रमाण काहीसे कमी झालेले दिसले आहे, ते या कारणासाठीच. तुम्ही अशी रक्तात विशिष्ट पेशींची आणि अँटीबॉडी-प्रथिनांची 'गर्दी' करून ठेवू शकत नाही. इतर संसर्गांसाठी जागा ठेवावी लागते.

६. कोरोना विषाणूविरुद्धच्या मेमरी पेशी निर्माण होणे आणि त्या टिकून राहणे हे महत्त्वाचे, ज्यायोगे प्रत्यक्ष विषाणू संसर्ग झाल्यास संरक्षक रिस्पॉन्स लगेच मिळेल. २००२च्या सार्स-१विरुद्धच्या मेमरी सेल्स १७ वर्षे टिकून राहिल्याचे दिसले आहे, जी आशादायक गोष्ट आहे!

ऑक्स्फर्ड, फायझर, मॉडर्ना यांच्या या लशी आता मानवी चाचण्यांच्या फेज ३ या अखेरच्या टप्प्यात आहेत. यात ३०,००० निरोगी लोकांना लस किंवा 'रिकामे' प्लासिबो इंजेक्शन दिले जाईल व या दोन्ही गटांची तुलना केली जाईल. हे दोन्ही गट बाहेर समाजात मिसळून राहू लागतील, जिथे कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव असेल. लस दिलेल्या गटातील लोकांमध्ये जर प्रत्यक्ष कोविड-१९ रोगाचे प्रमाण प्लासिबोवाल्यांपेक्षा पुष्कळच कमी किंवा सौम्य आढळले, तर लस 'यशस्वी' जाहीर केली जाईल.

फेज ३ पद्धतशीर पूर्ण करण्यास दोन वर्षे लागतील. पण या नोव्हेंबरमध्ये यातील एखाद्या (किंवा तिन्ही) लशीना 'आपत्कालीन' मंजुरी मिळून ती लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्स्फर्ड लशीचे कोट्यवधी डोसेस बनवू लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, कोरोना-१९ रुग्णांचे नातेवाईक अशा काही विशेष प्रकारच्या लोकांना ते आधी मिळण्याचा निर्णय सरकारे घेतील असे दिसते.

लोकांना लवकरात लवकर लस मिळून लोकांचे प्राण वाचतील आणि अर्थव्यवस्थाही पूर्ववत होऊ लागेल, अशी आशा करू या! त्यासाठी सर्वांस शुभेच्छा!