चदरिया झिनी रे झिनी

विवेक मराठी    26-Sep-2020   
Total Views |
२०१७च्या बुद्धपौर्णिमेला अर्जुन रामजींनी ‘एक सफर हमसफर के साथ’ हे सहजीवनावर आधारित पुस्तक लिहून पानादेवींना समर्पित केले. या पुस्तकात सुखी आणि समाधानी सहजीवनाचे सार सांगितले आहे. दोघेही जण एकमेकांना पूरक, समर्पित आणि एकमेकांची बूज राखणारे आहेत. प्रेम आणि समाधान पसरवणे हेच जीवनाचे तत्त्वज्ञान मानणाऱ्या पानादेवींनी ओवलेल्या प्रत्येक मण्याबरोबर आपणही त्यात स्वत:ला गुंफून घेतो आणि बनते मण्यांची स्नेहमय चदरिया नकळत.

bjp_1  H x W: 0

सखी सूत्रच्या निमित्ताने मुलाखत घेण्यासाठी मंत्रीमहोदय अर्जुन राम मेघवाल यांच्या घरी पोहोचले. राजस्थानी शाही थाटात स्वागत झाले. पानादेवींशी गळाभेट झाली. गप्पा सुरू झाल्या. त्या बोलता बोलता शेजारी अर्धवट झालेली मण्यांची पर्स विणू / गुंफू लागल्या. मुलाखत संपेपर्यंत पर्स गुंफून पूर्ण झाली होती. निरोप घेताना ती पर्स त्यांनी सहजतेने मला भेट म्हणून दिली. हे मणीकाम म्हणजे पानादेवींचे सुखनिधान, चिंतन-मनन करण्याचा मार्ग, दातृत्वाचे समाधान असे सर्व काही आहे.

वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या मणीकाम करत आहेत. राजस्थानातील नाल गावातील पुकाराम आणि अन्चीदेवी यांची ही कन्या. सहा भावांची एकुलती एक बहीण. पिता रेल्वे कर्मचारी. आई समाजात मानाचे स्थान असलेली. त्यामुळे पानादेवी लाडाकोडात वाढल्या. जुजबी शालेय शिक्षण आणि त्या काळी मुलीला आवश्यक असलेली गृहविद्या शिकून वयाच्या १४व्या वर्षी शेजारच्या किशामिदेसर गावातील अर्जुन राम यांच्याशी विवाह झाला. तेव्हा अर्जुन रामजीदेखील १४ वर्षांचे होते. शिकत होते. जात्याच हुशार असल्याने शिक्षणाची गाडी हळूहळू पुढे चालली होती. त्यांचे कुटुंब कोष्टी, विणकर. खानदानी व्यवसाय कांबळी आणि आसने विणण्याचा. घरी दोन पिट लूम. घरातील स्त्री-पुरुष, लहानथोर सर्वांना विणायची कला अवगत होती. अर्जुन राम हे वडील लखुराम आणि आई हिराबाई यांचे पहिले अपत्य. एकत्र कुटुंबपद्धती, सर्व अधिकार आजीच्या हातात. लग्न होऊन पानादेवी सासरी आली. पण लग्न, संसार यांच्या जबाबदारीची जाणीव नव्हती. तिने पतीला लग्नाआधी पाहिलेसुद्धा नव्हते. पण हळूहळू परिस्थितीचे आकलन झाले. माहेरी विणण्याचा सराव नसल्याने अन्य कामांत रस घेतला. घरातले सगळे सदस्य उठल्यापासून ते झोपेपर्यंत विणण्याच्या कामात व्यग्र असताना, त्या पहाटे उठून तीन कि.मी.वरील भिनासर गावातून एका वेळी तीन-चार हंडे पाणी आणायच्या (कमीत कमी तीन फेऱ्या), गोठ्यातील पशुधनाची देखरेख, चारा-पाणी, दूधदुभते पाहणे, कपडे धुणे, साफसफाई, घरचे स्वयंपाकपाणी करणे या सगळ्या कामांत पारंगत झाल्या.

bjp_1  H x W: 0 

मुळात पानादेवी चतुर, समंजस. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कसब त्यांच्याइतके कुणाकडेही नाही, असे अर्जुन रामजींचे प्रांजळ मत आहे. पानादेवी सासरी हळूहळू रुळत होत्या. अर्जुन रामजी शिकत होते. बाजारात लाइफबॉय हा अंग धुवायचा साबण नवीनच आला होता. तरुण-तरुणी परंपरागत मुलतानी माती अंगाला लावण्याऐवजी साबणाकडे आकर्षित होत होते. पानादेवींना वाटे आपणही साबण घ्यावा, पण पैसे कुणाकडे मागणार? नवरा तर शिकतोय, त्यांच्याकडे पैसे नाहीत. मग त्यांनी युक्ती केली. माहेरून पाठवणीच्या वेळी जे थोडेबहुत पैसे मिळतात, ते शिल्लक होते त्यातून त्यांनी तालुक्याच्या ठिकाणाहून मणी, वायर, कातर इत्यादी साहित्य आणले. तोरण, चुंबळ, शोभेच्या वस्तू बनवून बाजारात विकायला दिल्या आणि आलेल्या कमाईतून साबण विकत आणला. तेव्हा पानादेवींचे वय होते केवळ १७ वर्षे. त्या निमित्ताने एक छोटा गृहउद्योग सुरू झाला. हातखर्चासाठी नियमित आवक सुरू झाली.

अर्जुन रामजींनी सांगितलेला एक प्रसंग फारच हृदयस्पर्शी आहे. “गृहस्थ जीवन सुरू झाले होते. बाळाची चाहूल लागली. शिक्षणही सुरू होते. समाजातील पहिला शिकणारा, होतकरू तरुण म्हणून समाजात स्थान प्राप्त होत होते, पण घरची जबाबदारी निभावण्यासाठी हातपाय मारणे गरजेचे होते. पुढील शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैसे मिळणे शक्य नव्हते. वडील बाहेरगावी गेले होते. फी भरण्याची शेवटची तारीख जवळ आली होती. शिक्षण सोडून नोकरी करणे हा एकच पर्याय समोर होता. पानादेवींनी स्वकमाईतून फीसाठी 'दोन रुपये' अर्जुन रामजींना दिले. समजावले की लग्न झाल्यानंतर मुले होणे नैसर्गिकच आहे, परंतु शिकून मोठे होणेसुद्धा गरजेचे आहे. तुम्हाला जेवढे शिकायचे आहे तेवढे शिका, आमची काळजी करू नका." ते पुढे म्हणतात, “या दोन रुपयांमुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली.”

अर्जुन रामजी पुढे सनदी अधिकारी (IAS) झाले. खासकरून ग्रामीण विभागामध्ये मामलेदार-कलेक्टर म्हणून काम करून वाहवा मिळवली. राहणीमान मात्र सामान्य ठेवले. १९९३ची बुद्धपौर्णिमा. अर्जुन रामजी गंगानगरला अधिकारपदावर होते. सायंकाळी एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघेही स्कूटरवरून निघाले होते. पानादेवींनी सहज सांगितले, "आज आपल्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत." त्यांच्या घरी वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम नसे. गोडधोड करून मुलाबाळांबरोबर आनंद साजरा करायचा. याला उजवणी म्हणतात. त्याक्षणी अर्जुन रामजींनी निश्चय केला की लग्नाचा ५०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात उजवायचा. २०१७च्या बुद्धपौर्णिमेला अर्जुन रामजींनी ‘एक सफर हमसफर के साथ’ हे सहजीवनावर आधारित पुस्तक लिहून पानादेवींना समर्पित केले. या पुस्तकात सुखी आणि समाधानी सहजीवनाचे सार सांगितले आहे. दोघेही जण एकमेकांना पूरक, समर्पित आणि एकमेकांची बूज राखणारे आहेत. लोकांना जेवू घालणे पानादेवींना आवडते. त्यांना एकच मंत्र येतो - 'रोटी सबसे मोटी (महत्त्वकी)'. अर्जुन राम बिकानेरहून खासदार म्हणून २००९ साली निवडून आल्यानंतर पानादेवी गरजू लोकांच्या अन्नपूर्णा झाल्या आहेत. आजही त्यांच्या बंगल्यापाठी सुमारे ५० ते ६० लोकांची राहण्या-खाण्याची सोय होते आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सामानाची - उदा., कणीक दळण्यापासून ते भाजी, मसाले यांची तयारी त्या स्वत: करतात. रोजचा स्वयंपाक, स्वच्छता यावर लक्ष ठेवतात. सर्वांचे योग्य ते आतिथ्य व्हावे यासाठी त्या दक्ष असतात.

या दांपत्याचा सामाजिक कार्याचा आवाका मोठा आहे. अंत्योदयाचे काम करीत असताना त्यांच्या या कार्याविषयी माहिती मिळाली होती. ‘स्व. भावना मेघवाल ट्रस्ट’मार्फत गरजू आणि हुशार मुला-मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. काही मुले शिकून-सवरून ट्रस्टच्या कामात हातभार लावतात. गेली अनेक वर्षे त्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहेत. दर वर्षी २८ जानेवारीला हा सोहळा होतो. सामूहिक विवाहाच्या वेळी या सर्व नवदांपत्यांना भेटवस्तू दिल्या जातात. सोहळ्यासाठी दूरवरून लोक येतात. या उपक्रमामुळे अनेकांच्या जमिनी, घरे सावकाराच्या घशात जाण्यापासून वाचली आहेत. १९९८मध्ये पानादेवी आणि अर्जुन रामजींची मुलगी भावना हिचे, वयाच्या बाविसाव्या वर्षी क्षुल्लक तापाचे निमित्त होऊन निधन झाले. अर्जुन रामजींवर त्याचा परिणाम झाला, मात्र पानादेवी धीरोदात्तपणे उभ्या होत्या. त्यातून या ट्रस्टची स्थापना झाली. आज या ट्रस्टचे कार्य जोरात सुरू आहे.

रवी शेखर, मनीषा, नवीन, रचना ही त्यांची चार मुले. त्यातील नवीन हरहुन्नरी आहे. त्याने उर्दू साहित्याचा अभ्यास केला आहे आणि तो योगासने शिकवतो. त्याची हाॅंगकाॅंगमध्ये ‘आनंदम योग’ नावाची संस्था आहे. जरी मंत्र्यांची मुले असली, तरी कोणीही त्याचा फायदा उठवताना दिसत नाही, कारण स्वत: अर्जुन रामजी संसदेत सायकलने जातात. पानादेवी संतप्रवृत्तीच्या आहेत. सामान्य जनात देव पाहतात. त्यांचा तात्त्विक पाया मजबूत आहे. हे तत्त्वज्ञान तुम्हाला कोणी शिकवले? असा प्रश्न विचारला तर त्या तत्काळ म्हणाल्या, "घर आणि गृहस्थीने शिकवले. आईवडिलांकडून आपल्याला उपजत सद्बुद्धी मिळते, पण पुढचे ज्ञान/शहाणपण आपणच आपल्याला शिकवावे लागते." त्या पारदर्शक आहेत. मनात असेल ते लगेच बोलतात. त्यात सात्त्विक सच्चेपणा आहे. अर्जुन राम यांच्यावर संत कबिरांचा खूप प्रभाव आहे. ते स्वत: उत्कृष्ट दोहे गातात. तंतुवाद्य – एकतारी, वीणा वाजवतात. कबीर यात्रा नावाचा कार्यक्रम त्यांनी केला होता. त्यात पूर्ण राजस्थानात संत कबीरांचे दोहे गायले. त्यातही काही महिन्यांपूर्वी, त्यांनी जम्मूमध्ये गायलेला अभंग ‘चदरिया झिनी रे झिनी’ तर फारच अविस्मरणीय रंगला.

स्त्री-पुरुष समानता ह्याचे न बोलता आचरण करणारे दांपत्य म्हणून त्यांच्या जीवनाकडे पाहावे लागेल. रोजची कामे पतिपत्नी मिळून करणार - उदा., दूरवरून पाणी भरणे, अंगण करणे, शेतीची कामे करणे, शेणापासून छाना बनवणे, धान्य कांडणे, बाजारातून घरासाठी लागणारे सामान खरेदी करणे. अद्वैत भाव जागृत होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, मग तो माणूस अथवा परमेश्वर असो, आत्मा-परमात्मा असो अथवा स्वयं आणि समाज असो.. प्रेम आणि समाधान पसरवणे हेच जीवनाचे तत्त्वज्ञान मानणाऱ्या पानादेवी एक प्रकारे भारतीय सर्वसामान्य महिलेच्या प्रतिनिधी आहेत आणि म्हणूनच त्या खूप जवळच्या वाटतात. त्यांनी ओवलेल्या प्रत्येक मण्याबरोबर आपणही त्यात स्वत:ला गुंफून घेतो आणि बनते मण्यांची स्नेहमय चदरिया नकळत.
BJP