प्रेरणादायक आत्मकथा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Sep-2020   
|

उमाकांत मिटकर हे भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यातील महत्त्वाचे कार्यकर्ते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत घडलेल्या या कार्यकर्त्याचा प्रवास पालावरच्या झोपडीपासून ते सरकारी खुर्चीपर्यंत झाला आहे. या अनुभवांची शिदोरी म्हणजेच 'डिव्हाईन जस्टिस' हे आत्मकथन होय.book_1  H x W:

आज कोणत्याही क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांची मोठी आवश्यकता असते. निरपेक्षपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे खऱ्या अर्थाने त्या क्षेत्राचा प्रसार, प्रचार होत असतो. भटके विमुक्त विकास परिषदेतले निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते म्हणजे उमाकांत मिटकर. संघाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचे, संधीचे उमाकांत यांनी सोने केले आहे. द्रष्टेपण, व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण, कामाचा ध्यास आणि समाजविषयीचा कळवळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आहेत.


२००२ ते २०१६ हा काळ उमाकांत यांच्या जडणघडणीचा काळ आहे. २००२ ते २०१९पर्यंतचा कालपट उमाकांतजींनी 'डिव्हाईन जस्टिस' या आपल्या पुस्तकात मांडला आहे. महाविद्यालयीन काळात संभाजी ब्रिगेडशी आलेला संबंध, विद्यापीठातून अर्धवट शिक्षण सोडून गावी येणे यामुळे आलेले नैराश्य असे विविध प्रसंग आणि अनुभव पुस्तकात वाचायला मिळतात. त्यामुळेच एक संग्राह्य आणि चिंतनीय पुस्तक तयार झाले आहे. हे आत्मकथन वाचकांसमोर आणण्याचे कार्य प्रेरक लेखक दत्ता जोशी यांनी केले आहे.

वारकरी आणि शेतकरी नाते असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात उमाकांत यांचा जन्म झाला. आधी आपल्या रोजच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करावी आणि मग आपल्या आवडीचे काही करत राहावे. 'सुरक्षितता' हे मुख्य सूत्र. अशा वातावरणात राहिलेल्या या तरुण कार्यकर्त्याची आयुष्याची दिशा व कृतियोजना नेमकी वेगळी आहे म्हणजे समाजाभिमुख आहे, शिवाय ती समरसता प्रस्थापित करणारी आहे. त्यामुळेच उमाकांत यांचा प्रवास खेड्यापासून ते पालावरच्या झोपडीपर्यंतआणि सामान्य ध्येयवाद्यापासून ते उच्च ध्येयवाद्यापर्यंत सुरू असल्याचे चित्रण पुस्तकात वाचायला मिळते.seva_1  H x W:
 उमाकांत मिटकर

२००२ या वर्षी उमाकांतच्या जीवनाला कलाटणी मिळाली, निमित्त होते यमगरवाडी. इथल्या कामामुळे त्यांच्या अनुभवाला वेगळी दिशा मिळाली, मनात राष्ट्रचेतना आणि समाजचेतना निर्माण झाली. उमाकांतना मानवी जीवनाबाबत अपार सहानुभूती आहे, याचा प्रत्यय त्यांच्या पुस्तकातून येतो. भटक्या समाजाचे जीवन आजही अंधारात आहे. येथे जगणार्‍या‍ माणसाला पोटाचा प्रश्न अस्वस्थ करत असतो. कसेही करून जगले पाहिजे, हेच त्यांचे जगण्याचे स्वतंत्र तत्वज्ञान आहे. या सार्‍यांचे चित्रण उमाकांत आत्मीयतेने करतात.

संपर्क-संवाद-सहवास या आणि संघकामाच्या माध्यमातून उमाकांत यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्रपणा प्राप्त झाला आहे. भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बाहेर पडून भटक्यांच्या पालीत जाऊन त्यांना आपलेसे करणे, त्या लोकांना धीर देणे, त्यांचे प्रश्न सोडवणे आदी सेवा कार्यामुळे भटके विमुक्त विकास परिषदेला उमाकांतच्या रूपाने हाडाचा कार्यकर्ता मिळाला, हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते.

'डिव्हाईन जस्टिस' पुस्तकातून उमाकांत यांचा जीवनपट समोर येत असला, तरी असाहाय्यता आणि भुकेलेल्या भटक्या समाजाचे भावविश्व अशी अनेकविध आशयसूत्रे मुख्य आशयसूत्राला या पुस्तकात अधिक बळकट करणारी आहेत. संघ कार्यकर्ता, शिक्षण समन्वयक, पालावरची शाळा आणि महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण न्यायिक सदस्य हे पद सांभाळत असताना जबाबदार्‍या, आलेले अनुभव, तिथल्या आठवणी यांनी उमाकांतच्या मनाचे किनारे व्यापलेले आहेत. या आठवणी नव्या पिढीला प्रेरणा देतात.seva_1  H x W:


"विधायकतेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न" - लेखक दत्ता जोशी


"उमाकांत यांचे आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे, वयाच्या चाळिशीलाही स्पर्श न केलेल्या या व्यक्तीच्या जीवनात अनेक वैविध्यपूर्ण आणि प्रेरक असे अनुभव त्यांच्या वाट्याला आले आहे. अनुभवांचे संचित नव्या पिढीसमोर पडले तर विधायकतेला नवी दिशा मिळू शकेल, ह्या हेतूने 'डिव्हाइन जस्टिस' हे पुस्तक आकारला आले.

एखाद्या व्यक्तीचा उदोउदो करणे या पुस्तकाचे उद्दिष्ट नाही. माझ्या लेखनाचेही ते कधी उद्दिष्ट नसते. मी पाहिलेले जग, मी अनुभवलेली माणसे नेमकी कशी घडली, उभी राहिली, त्यांनी समाजाला काय दिले याचा लेखाजोखा मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यातून समाजाला काही दिशा मिळावी, युवा पिढीला त्यांचा मार्ग सापडावा, असा या मागचा उद्देश आहे."

उमाकांत समाजात वावरताना, जगताना 'स्व'चा शोध घेतात आणि समाजाशी एकरूप होतात. म्हणूनच उमाकांत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना त्यांच्या अनुभवाचा शोध घ्यावा लागतो.

 

उमाकांत यांनी या पुस्तकात दोन स्तर मांडले आहेत. पहिला स्तर पूर्णवेळ कार्यकर्त्याचा, तर दुसरा प्रशासनाचा (पोलीस प्राधिकरण सदस्य) आहे. हे दोन्ही स्तर त्यांनी निष्ठेने, प्रामाणिकपणे सांभाळाले आहेत. दोन्ही पातळ्यांवर काम करताना ते स्वतःला तपासून पाहतात, त्यामुळेच ते आपल्या भोवतालच्या व्यक्तींचे आणि सामाजिक मूल्यांचे वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून मूल्यमापन करू लागतात. उमाकांत यांच्यासह दाखल करण्यात आलेल्या खोट्या अँट्राँसिटी प्रकरणा संदर्भातील प्रसंगही शब्दबद्ध केलेला आहे.

प्रस्तुत पुस्तकाला वातावरणनिर्मिती करण्याची गरज भासत नाही. ते आशयातून आपोआपच तयार होते. त्यामुळे पुस्तकाच्या एकूण संहितेतून हे वातावरण वाचकांच्या मनात आकारात जाते.

उमाकांत हे बुद्धिवादी, संवेदनाक्षम, जीवनाकडे गांभीर्याने पाहणारे संघकार्यकर्ते आहेत. कृतिशीलतेपासून दूर राहण्याचा त्याचा मूळ पिंड नाही. 'भाकरी'च्या चाकाभोवती माणूस फिरत असतो, भूकच माणसाला लाचार बनवते, या जाणिवांचे चित्रण पुस्तकात आहे. उमाकांत यांच्या उमरगा येथील पालावरच्या शाळेतील विद्यार्थी पोटातील आग विझवण्यासाठी लग्नातील उष्टया पत्रावळ्यावर हक्क सांगण्यासाठी एकमेकांशी भांडण करताना उमाकांत यांनी पाहिले होते. हे दृश्य पाहून ते अस्वस्थ झाले होते. समाजातील विदारक स्थितीचे चित्रण वाचताना अंगावर काटा उभा राहतो. मसणजोगी वस्तीला ऐन दिवाळीत उमाकांत यांना आलेला अनुभव वाचकांना बैचेन करणारा आहे.

उमाकांतनी भटक्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी केलेली धडपड प्रेरक आहे. शिक्षण ही परिवर्तनाच्या बदलाच्या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे. भटके विमुक्त विकास परिषदेच्या उपक्रमातील महत्त्वाचे अंग म्हणजे पालावरच्या शाळा. शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या भटक्या समाजातील मुलांना त्यांच्या स्व- भाषेतून, आकलन होईल, अशी शिक्षणपद्धत विकसित करण्याचे कार्य पालावरच्या शाळेने केले आहे. या माध्यमातून उमाकांतनी भटक्यांच्या मुलांना समजेल, उमजेल अशी बाराखडी, बडबडगीते आणि गाणी शिकून या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कष्ट घेतले आहे. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले तर फार मोठा बदल घडून येऊ शकतो, हे लेखकाला पुस्तकातून सूचित करायचे आहे.

व्यक्तिगत आयुष्यात आलेले कटू अनुभव उमाकांतनी प्रकर्षाने मांडले आहेत. प्रकल्पात काम करताना यमगरवाडी येथेच शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रणिता यांच्याशी जुळलेले प्रेम, पुढे आंतरजातीय विवाह केला म्हणून घरातूनच झालेला विरोध पाहून उमाकांत यांनी दाखवलेले धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे. या अनुभवातून उमाकांतच्या उमेदीचे दर्शन घडते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी प्रांताच्या बैठकीसाठी जालना येथे उपस्थित राहतात. आपले काम बाजूला ठेवून इतरांचे भले करण्यासाठी झटणाऱ्या उमाकांत यांचे गुणदर्शन पुस्तकातून होते. सक्रिय कार्यकर्ता समाजकार्य करतेवेळी आपले स्वतःचे कार्य बाजूला ठेवून समाज-संस्थेच्या कार्याला प्राधान्य देतो, याचे एक उत्तम उदाहरण उमाकांत यांच्या रूपाने समाजासमोर येते. ह्या गुणविशेषामुळे संघटनात्मक कामाच्या दृष्टीने, ध्येयदर्शन होण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरते.

उमाकांत मिटकर - ९४२१४८०८७४