युगानु युगाचे 'देवेंद्र'कार्य

विवेक मराठी    05-Sep-2020   
Total Views |
जनतेला धीर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचा विस्तृत दौरा करीत आहेत. अनेक शहरांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. रुग्णालयात जाऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला आहे. अधिकार्यांना ते कोणत्या सूचना करु शकत नाहीत, किंवा हे करा ते करा असे सांगू शकत नाही तो त्यांचा अधिकार नाही. पण त्यांच्या भेटीमुळे जनतेला असे वाटते की कुणीतरी आमच्या पाठीशी आहे. आमच्या सुखदुःखाशी समरस होणारा नेता आहे. जनतेचे मनोबल याच्यामुळे वाढते. धोका पत्करून जो रणांगणात उतरतो, तो खरा सेनापती असतो.

devendra _1  H
 
मुख्यमंत्री पदासाठी निवडून दिलेले देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून कोविड संकटात महाराष्ट्राचा दौरा सातत्याने करीत आहेत. कोरोना व्हायरसशी ते महाभारतातील अर्जुनाप्रमाणे लढत आहेत. अनेक शकुनी मामांच्या कारस्थानांमुळे महाराष्ट्रात त्यांच्या जागेवर दुसराच कुणी बसला आहे. न दिसणार्या कोरोनाला तो इतका घाबरला, इतका घाबरला आहे की, तो घराच्या बाहेर पडतच नाही. पंढरपूरच्या विठ्ठल पुजेत निसर्ग चक्रिवादळ येऊन गेल्यानंतर रत्नागिरीत आणि मध्ये एकदा कधीतरी पुण्यात, असे त्यांचे 'दिव्य' दर्शन जनतेला झाले. जनता धन्य झाली.
 
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून कोरोना हात धुवून मागे लागला आहे. देशातील ३०%च्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. कोरोना खेडोपाडी पसरू लागला आहे. कोरोनाची आमच्याशी लढण्याची हिम्मत आहे का, असे म्हणणारे मुख्यमंत्री बाहेरच येत नाही. त्यामुळे कोरोनाला चारही दिशांना हातपाय पसरण्यास मोकळीक मिळालेली आहे.
 
जवळजवळ तीनशे वर्षांपूर्वी अफजलखानरुपी कोरोना संकट महाराष्ट्रावर आले होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी राजगडावर लपून राहण्याचे सोंग केले. अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलाविले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. ही शिवशाही आहे. घरात बसून असणार्या नेत्याची कोणती 'शाही' आहे , हे वाचकांनी ठरवावे. शिवशाहीचा खरा नेता आपल्या हिम्मतबाज मावळ्यांना घेऊन गावोगावी फिरतो आहे, देवेंद्र फडणवीस त्याचे नाव आहे, त्या नेत्याला सलाम.
 
महाराष्ट्रात जेथे मंत्री बसतात, त्याला मंत्रालय म्हणतात आज ते सचिवालय झालेले आहे. सचिवालय म्हणजे सचिव शासन चालवितात. ज्याला जो योग्य वाटेल ते तो आदेश काढतो. एक म्हणतो एसटी सुरु होणार, दुसरा म्हणतो नाही होणार, तिसरा म्हणतो, ई-पासची गरज आहे तर चौथा म्हणतो गरज नाही. मदिरेची दुकाने उघडी राहतील पण मंदिरे बंद राहतील. महाराजांच्या नावाने कसे सगळे छान छान चालेले आहे. लोक कोरोनाने मरत आहेत आणि पिता-पुत्रांना चिंता लागली आहे की मेट्रो कारशेड आरे काॅलनीच्या जागेत ठेवायची की दूर डोंगरात घेऊन जायची? जनता आज कोरोनाने ग्रस्त आहे आणि कुशासनाने त्रस्त आहे.
 

devendra _1  H  
 
या जनतेला धीर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचा विस्तृत दौरा करीत आहेत. अनेक शहरांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. रुग्णालयात जाऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला आहे. अधिकार्यांना ते कोणत्या सूचना करु शकत नाहीत, किंवा हे करा ते करा असे सांगू शकत नाही तो त्यांचा अधिकार नाही. पण त्यांच्या भेटीमुळे जनतेला असे वाटते की कुणीतरी आमच्या पाठीशी आहे. आमच्या सुखदुःखाशी समरस होणारा नेता आहे. जनतेचे मनोबल याच्यामुळे वाढते. धोका पत्करून जो रणांगणात उतरतो, तो खरा सेनापती असतो. बायकोचे नाव सेना ठेवले म्हणून सेनेचा पती म्हणून तो सेनापती असे असंख्य असतात. देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करणार्या मर्द मावळ्यांच्या रक्तबीजाचे आहेत.
 
आणि यामुळेच घरात बसणार्यांना लढणारा वीर चालत नसतो. आपले लाडके मुख्यमंत्री म्हणतात गावभर फिरण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोरोना संकटावर मात करता येईल. पुढे ते आणखीन म्हणतात की विमानाने प्रवास करण्याऐवजी बैलगाडीने प्रवास का करीत नाहीत? महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याचा धसका घेऊन एक जीआर काढला. सरकारी अधिकार्यांना या जीआरमार्फत सांगण्यात आले की विरोधी पक्षाने आयोजित केलेल्या कोणत्याही बैठकीत त्यांनी उपस्थित राहता कामा नये. फक्त मंत्र्याचे सूचनांचे आणि आदेशांचे पालन करावे. देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याचा धसका राजपुत्रांना एवढा बसला आहे की, त्यांनी या दौर्याचे वर्णन 'डिझास्टर टुरिझम' या शब्दात केले. त्यांना असा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही डेव्हलपमेंट टुरिझम कधी करणार, तो करायचा असेल तर राजपुत्रगिरी उपयोगाची नाही. डेव्हलपमेंटचे प्लानिंग हवे आणि व्हिजन हवी. देवेंद्र फडणवीस हे डिझास्टर ते डेव्हलपमेंट याबाबतीत मास्टर मांइड आहेत.

devendra _1  H  
 
देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यात अनेकजण आपली गार्हाणी सांगतात. एका पोलिस शिपायाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परिस्थिती हाताळण्यासाठी आम्हाला फारशी मदत होत नाही, असे तो म्हणाला. आपल्या शूर मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली तात्काळ दूरदेशी करुन टाकली. देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग चक्रिवादळानंतर कोकणाचा प्रवास केला. सगळ्या परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. मुंबईत येऊन त्यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. वादळात नारळ, सुपारी, आंबा इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या सर्व बागायतदारांच्या पाठीवरून शासनाचा आश्वासक हात फिरणे फार आवश्यक आहे. त्यांनी राज्यशासनाला काही सूचना केलेल्या आहेत. मच्छीमार बोटींची त्यांनी पाहणी केली. बोटींचे नुकसान झाले त्यांना किमान एक लाख रुपयांची मदत करावी, अशी सूचना केली.
जनतेचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जनतेत फिरत आहेत, हादेखील एक प्रकारचा वनवास आहे. वनवासात सत्वपरीक्षा होत असते. ज्या सत्यासाठी जीवनसंघर्ष चाललेला असतो, ते सत्य सोडायचे नसते. न्यायाच्या भूमिकेचा त्याग करायचा नसतो. अवहेलना आणि अपमान क्रोधाच्या आहारी न जाता सहन करायचे असतात. या सर्व काळाचा उपयोग आपले आत्मबळ वाढविण्यासाठी करायचा असतो. श्रीरामाने आणि पांडवांनी हेच काम केले. हे काम आता देवेंद्र फडणवीस आपल्या सहकार्यांसहित करीत आहेत.
 

devendra _1  H  
 
लोकमत केवळ जन आंदोलने करुन अनुकूल होत नसते, भारतीय मन तसे नाही. भारतीय मन प्रत्येक गोष्ट धर्माच्या कसोटीला घासून पाहते. त्यांना न्याय काय आणि अन्याय काय, हे फारसे प्रवचन न देता समजते. अन्याय म्हणजे अधर्म आणि ज्यांनी अन्याय केला ते अधर्मी, अशी लोकभावना असते. महाभारतात बहुमत दुर्योधनाच्या बाजूने होते, धर्म पांडवांच्या बाजूने होता. त्यामुळे पांडवांचा विजय झाला. जनतेची स्वाभाविक मनोवृत्ती धर्म अधर्माचा निर्णय करण्यास समर्थ असते. धर्माचा पक्ष त्यांच्यासमोर जोरदार येणे आवश्यक असते.
 
कोरोना व्हायरसच्या काळातील देवेंद्र फडणवीस यांचे दौरे म्हणजे जनतेच्या मनातील न्याय-अन्यायाची भूमिका पक्के करण्याचे दौरे आहेत. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. तो कुणालाही आणि कसाही होऊ शकतो, याचे पूर्ण ज्ञान असूनही माझ्या जीवनापेक्षा जनजीवन फार मोठे आहे, पवित्र आहे, जनार्दन स्वरुप आहे, ही भावना त्याहून मोठी आहे. ही समाज समर्पणाची भावना आहे. आपले जीवन सत्तेची खुर्ची उबविण्यासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे , हा भाव त्यामागे आहे. 'देवेंद्र'चे युगानु युगे चालत आलेले हेच तर काम आहे.
 
- रमेश पतंगे