@डॉ. दिवाकर कुलकर्णी
बाळासाहेब आंबेडकरांच्या मंदिरांची द्वारे खुली करावीत ह्या आंदोलनाने समाजातील सर्वांच्याच मनाची द्वारे खुली होतील आणि परस्परांचा आदर करणारी एक व्यापक सामाजिक सद्भावाची सुसंवादी समाजगंगा प्रवाहित होईल, अशी आशा करू या.

आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर, आपणास आदरपूर्वक जय भिम, सप्रेम जय हरी! आपण तमाम भाविक-भक्तांच्या मनातील भावनांना साद घालत कोरोना काळात सुरक्षा उपाय म्हणून बंद असलेल्या मंदिरांची द्वारे खुली करावीत, म्हणून आपला आवाज बुलंद केला. शासनानेही आपल्या हाकेला प्रतिसाद देत आठ दिवसांची मुदत मागत मंदिरे खुली करणार असल्याचे मान्य केले. आपण उदार मनाने ही मुदत मान्य केली. शासनाने घालून दिलेल्या मर्यादेत १५ भाविक-भक्त-कार्यकर्ते यांच्यासह पंढरीच्या विठ्ठल-रुख्माई मंदिरात जाऊन आपण श्रीविठ्ठल आणि रुख्माईमातेचे दर्शन घेतले. नंतरच्या उद्बोधनात, सर्व अनुयायांना आंदोलन यशस्वी झाले असून शांतेत परतण्याचे आवाहन केले. आपण लक्षावधी भाविक-भक्तांच्या भावभावना ओळखून तुमच्या नेहमीच्या शैलीने हे आंदोलन छेडले. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला - विशेषत: सामाजिक समरसतेच्या समर्थक कार्यकर्त्याला हे सर्व काही खूप सुखावणारे आहे, म्हणून सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आणि आपण ही ठाम भूमिका घेतली, त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदनही करतो.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची वक्तव्य, भूमिका, आंदोलने ही लक्षवेधी असतात. त्यांची कृती-उक्ती समाजात एक वैचारिक घुसळण निर्माण करते. साहित्यिक, विचारवंत, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार त्यांच्या ह्या भूमिकेवर विश्लेषण करीत राहतात. ते भारतरत्न पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्यामुळे त्यांच्याविषयी एक श्रद्धाभावही समाजात आढळतो. वस्त्यां/वाड्यांमधील जनतेत तो जसा आहे, तो तसा बुद्धिवादी मंडळींमध्येही दिसतो. त्यामुळेही त्यांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागलेले असते. ते जे बोलतात, करतात त्याचे परिणाम किंवा त्याचे यश मोजण्याची आवश्यकता नाही. परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचे वागणे-बोलणे व्यक्त होणे हे काही ना काही विचार करायला लावते, हे मात्र नक्की.
आपल्या समाजात द्वेषाची भावना सहजतेने रुजत नाही. ती आपल्या समाजाची सहज स्थिती नाही. अशी द्वेषभावना समाजात पसरविण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु त्यास प्रत्येक वेळी व्यापक जनाधार मिळत नाही. समाज ह्या संभ्रमित स्थितीतही सद्भाव शोधत शेजारपाजाऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होत राहतो. द्वेषमूलक प्रसार-प्रचाराकडे दुर्लक्ष करतो. आपला समाज हा सश्रद्ध समाज आहे. तो सहिष्णूही आहे. परमताचा आदर करणारा आहे. आपला समाज हा प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या आधाराने नांदतो-वाढतो, तसेच तो खूप सकारात्मकता जोपासणाराही आहे. हा समाज स्वत: असे वागतो आणि मग दुसऱ्यानेही आपल्याशी तसेच वागावे अशी अपेक्षा ठेवतो. ही गोष्ट राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. तीस प्रोत्साहन दिले पाहिजे. ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या आंदोलनाने ह्या सकारात्मकतेस साद घातली आहे.
पंढरीचा विठ्ठल, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आई भवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई, सोलापूरचा सिद्धेश्वर, कोल्हापूरचा ज्योतिबा, संपूर्ण देश व्यापून टाकणारे १२ ज्योतिर्लिंग, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, संत नामदेवांचे नरसी, शांतिब्रह्म श्री एकनाथांची नाथनगरी पैठण ही यादी कितीही मोठी होऊ शकते. ही महाराष्ट्राची लोकदैवते आहेत. आपण ह्या साऱ्याच लोकदैवतांचे आणि प्रामुख्याने वारकऱ्यांच्या माहेराची निवड आंदोलनासाठी केलीत. आपण हे आंदोलन करून एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. आपले हे अधिक व्यापक होणे एक सामाजिक महाराष्ट्राला सकारात्मक साद घालील आणि सहिष्णू, सद्भावप्रेमी महाराष्ट्रही त्यास तसाच सकारात्मक प्रतिसाद देईल, असा विश्वास वाटतो.
बहुसंख्य जनतेच्या श्रद्धास्थानांवर टीका करून, त्या श्रद्धास्थानांची निंदा, टवाळकी करून, प्रसंगी त्या श्रद्धास्थानांची निर्भर्त्सना करून स्वत:चे राजकीय सामाजिक स्थान निर्माण करण्याचा एक अनाकलनीय पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या संतांच्या भूमीत गेली काही वर्षे सातत्याने सुरू आहे. अन्य समाजालाही धार्मिक श्रद्धा आणि भावना असतात आणि सामजिक, राजकीय जीवनात त्यांचा सन्मान करायचा असतो, हे साधे शुचितातत्त्व पायदळी तुडवत हा द्वेष पसरविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. हे सातत्याने होत आल्यामुळे व्यापक जनमताचा पाठिंबा मिळविण्यातही अडथळे निर्माण होतात, होऊ शकतात हा साधा विचारही केला गेला नाही. आपली उपयुक्तता शक्ती प्रदर्शित करावी की उपद्रवी शक्ती प्रदर्शित करावी, ह्याचेही भान राहिले नाही. व्यापक होण्याच्या वाटेतील ही धोंड आणि हा श्रद्धाभंजनाचा नकारात्मक कार्यक्रम थांबल्याशिवाय संवादी सूर निघणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. ह्या सामाजिक पार्श्वभूमीवर आपण हाती घेतलेल्या ह्या आंदोलनाने सर्वांच्या श्रद्धास्थानांचा सर्वांनी आदर करावा, हा एक मोठा संदेश सर्वदूर जाऊ पाहतो आहे. त्यामुळेच आपले मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. आपापल्या श्रद्धा जोपासत सर्वांनी धार्मिक स्वातंत्र्य उपभोगावे, हे आपल्या घटनेनेही अपेक्षित केले आहे.
संभाजीनगरला आपण काहीं कार्यक्रमाला आले असतना आपण केलेली एक मागणी अशीच भावणारी होती. आपण म्हणाला होतात, "आपणास जातीअंताकडे जायचे असेल, तर आपले आडनाव लावणे आपण बंद केले पाहिजे. आपल्याकडे आडनाव कळल्याबरोब्बर आपण त्या व्यक्तीची जात शोधायला लागतो." आपले आणखी एक व्यक्तव्य असेच आहे. "जातीअंत साधायचा असेल, तर टी.सी.वरूनच जात नाहीशी केली पाहिजे." आपण राजकीय आरक्षणाच्या विषयातही असेच वक्तव्य केलेले आहे. ही मागणी ही सामाजिक विचारमंथन गतिमान करणारी आहे. दुसरी बाजूही हिरिरीने मांडली जाईल. आपल्या भूमिकांचे राजकीय वा सामाजिक विश्लेषण करण्याचा आज हेतूही नाही. त्या त्या क्षेत्रातील दिग्गज आणि विद्वान ते करतील. ह्या भूमिकांची उपयुक्तताही काळाच्या कसोटीवर जी काही सिद्ध व्हायची असेल तीही होईल. हे विचारमंथन एका निकोप वातावरणात व्हावे, ते सामाजिक वातावरण परस्परांच्या श्रद्धा-भावनांचा आदर-कदर करीत व्हावे, हीच आज जनसामन्यांची सामान्य अपेक्षा आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारताची जडणघडण ही भारतीय राज्यघटनेनुसारच होणार आहे. ही राज्यघटना निर्माण झाली, त्याचा मोठा इतिहास आहे. ती आधुनिक शक्तिशाली, समतायुक्त, शोषणमुक्त, समरस समाज घडविण्यास सक्षम आहे. परंतु ती राज्यघटना अजूनही व्यापक जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही. ती जनतेपर्यंत नेण्यासाठी आपणास लोकशिक्षणाची व्यापक चळवळ हाती घ्यावी लागेल. त्यासाठी काम सुरूही झाले आहे. आपण पंढरपुरात केलेले आंदोलन हे लोकशाही मार्गाने केलेले आहे. त्याचे व्यापक दृष्टीने अनुकरण केले पाहिजे. आपल्या सार्वभौम राष्ट्रास हिंसक मार्गाने आव्हाने देणाऱ्या तथाकथित माओवाद्यांनाही आपल्या ह्या आंदोलनाने काही संदेश मिळावा अशी आशा वाटते आहे. बौद्ध धम्माचे सुप्रसिद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी ह्यांनी संपादित केलेल्या जातक कथा ग्रंथात धम्मपदातील,
नहि वैरेण शाम्यन्ति ह कदाचन|अवैरेण च शाम्यन्ति येस धर्म सनातन: (महावग्ग धम्मपद)
ह्या धम्मपदावर आधारित दिघीतीकोसल जातक ह्या शीर्षकाखाली कथा आलेली आहे. कथा दीर्घ आहे. वैराने वैर शमत नाही, ते केवळ अवैरानेच शमते हा संदेश ह्या कथेचा संदेश आहे. हा संदेश सर्वच राष्ट्रप्रेमी जनतेने लक्षात घेतला पाहिजे. ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मंदिरांची द्वारे खुली करावीत ह्या आंदोलनाने समाजातील सर्वांच्याच मनाची द्वारे खुली होतील आणि परस्परांचा आदर करणारी एक व्यापक सामाजिक सद्भावाची सुसंवादी समाजगंगा प्रवाहित होईल, अशी आशा करू या.
यथावकाश राज्यशासन मंदिरे खुली करण्याची नियमावली बनवून भाविक-भक्तांची अपेक्षा पूर्ण करेल. आपण त्या वेळी सहकुटुंब सहपरिवार कार्यकर्त्यांसह - अर्थात सर्व अपेक्षित नियमांचे पालन करीत पंढरपुरात श्रीविठ्ठलाची महापूजा मनोभावे करावी, अशी आम्हा सर्व समता-समरसताप्रेमी जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण होईल ह्या अपेक्षेसह आपणास पुनश्च एकदा मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
डॉ. दिवाकर कुलकर्णी
अध्यक्ष,
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ
संभाजीनगर (औरंगाबाद)
maitra63@rediffmail.com
९८२२४३५५३१