साध्यासुध्या उत्सवाला आदिम कलेचा साज!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Sep-2020
|

@संजय देवधर
 
यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी सर्वार्थाने वेगळा ठरला. मूर्तींचा आकार व संख्या मर्यादित झाली. बऱ्याच जणांनी शाडूमातीच्या छोट्या गणेशमूर्ती घरीच तयार करून बादलीतच विसर्जन केले. अर्थातच जलप्रदूषण होण्यापासून वाचले. अनेकांनी साध्यासुध्या पद्धतीने आरास करून आदिम कलेचा साज चढवला. 

 
ganpati_2  H x

यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी सर्वार्थाने वेगळा ठरला. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. यंदा त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. या वर्षीच त्यांच्या कल्पनेतील आदर्श उत्सव पार पडला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध असल्याने डीजे-लाउडस्पीकरचा दणदणाट नव्हता. त्यामुळे ध्वनिप्रदूषण झाले नाही. विजेची चोरी व अपव्यय टळला. मिरवणुकांवर बंदी घालण्यात आल्याने गुलालाची उधळण, फटाक्यांची आतशबाजी झाली नाही, पेट्रोल-डिझेलचा अपव्यय व वायुप्रदूषण टळले. मूर्तींचा आकार व संख्या मर्यादित झाली. बऱ्याच जणांनी शाडूमातीच्या छोट्या गणेशमूर्ती घरीच तयार करून बादलीतच विसर्जन केले. अर्थातच जलप्रदूषण होण्यापासून वाचले. अनेकांनी साध्यासुध्या पद्धतीने आरास करून आदिम कलेचा साज चढवला.

आदिवासी वारली चित्रशैली अत्यंत लवचीक आहे. सर्वसमावेशकता हा कलेचा गुण असल्याने ती कोणत्याही सण-उत्सवाचा आनंद द्विगुणित करते. पर्यावरणपूरक व निसर्गस्नेही सजावटीसाठी वारली चित्रशैली आदर्श ठरते. अनेकांनी यंदा या आदिम कलेचा कलात्मक वापर करून घरच्या बाप्पाची आकर्षक सजावट केली. अभिनेत्री सायली संजीव मूळची नाशिकची. लॉकडाउनमुळे ती मार्चपासून नाशिकला घरीच आहे. यंदा तिने विटांवर वारली चित्रे रंगवून सुंदर सजावट केली. रीमा पंजाबी-गुलाटी ही कलाकार आहे. लहान मुलांना ती चित्रकलेचे मार्गदर्शन करते. या वर्षी तिने घरीच वारली झोपडी उभी केली. त्यात गणरायाची स्थापना करून वारली चित्रांनी झोपडी व परिसर सुशोभित केला. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्वांना वारली चित्रे रेखाटलेले मास्क प्रसाद म्हणून भेट देण्यात आले. गणेशभक्तांनाही हा अनोखा व ऊपयुक्त प्रसाद आवडला.
 

ganpati_1  H x  

ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातील महाराष्ट्र मंडळात दर वर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा नाशिकचे सतीश पेठकर यांचे भाचे मंदार वाळिंबे यांनी तेथील सजावटीत पुढाकार घेतला. व्यवसायाने मरीन इंजीनिअर असलेल्या मंदार यांनी पत्नी आणि इतरांच्या सहकार्याने सुंदर वारली झोपडी साकारली. ऑस्ट्रेलियात तेथील अ‍ॅबोरिजिन्सच्या - म्हणजे आदिवासींच्या कलेची परंपरा आहे. ती कलादेखील आपल्या वारली चित्रशैलीशी खूपच मिळतीजुळती आहे. दोन्ही कला महिलांनीच जपलेल्या आहेत. त्या कलेत रंगांचा मुक्तपणे वापर केला जातो. भौमितिक मूलाकार - म्हणजेच त्रिकोण वापरून मानवी आकार रेखाटले जातात.

वारली कलेला उज्ज्वल परंपरा आहे. तिला लोकाश्रयही मिळतो,, पण शासकीय पातळीवर अनास्था काही संपत नाही. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक धोरण अनाकलनीय आहे. सध्या राज्यात लोककलांची स्थिती फारशी बरी नाही. रंगमंचीय कला (परफॉर्मिंग आर्ट्स) या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अंतर्गत आहेत, तर दृककला ( व्हिज्युअल फाइन आर्ट्स) या कला संचालनालयाकडे आहेत. या रस्सीखेचीत लोकचित्रकलेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी आदिवासी कला उपेक्षित राहतात. जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या वारली कलेला आपल्या मातीत मानाचे स्थान मिळत नाही. परिणामी वारली युवक त्यांच्याच कलासंचितापासून दूर जात आहेत. शासनाने लोकचित्रकलेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. लोकचित्रकलांचा व कलाकारांचा विकास होण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच विविध उपयुक्त उपक्रमांमध्ये त्यांचा समावेश करण्यात यायला हवा. वारली चित्रशैली सर्वांसमोर आल्याला लवकरच ५० वर्षे होतील. या कलेचे पुढील ५० वर्षांतील भवितव्य काय असेल यावर चिंतन, मंथन होणेही अगत्याचे आहे. महाराष्ट्र शासन ललित कला विद्यापीठ स्थापन करणार असे गेली १५ वर्षे ऐकतोय, पण त्याला काही मुहूर्त मिळत नाही. लोकचित्रकला हा ललित कलांचाच महत्त्वाचा भाग आहे. नव्या पिढीला अभ्यास, संशोधन व कलानिर्मिती यासाठी कला विद्यापीठात व्यासपीठ उपलब्ध व्हायला हवे. लोकचित्रकलेचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम निर्माण केले पाहिजेत, तरच वारली कलेला लोकमान्यतेबरोबरच राजमान्यता लाभेल.

९४२२२७२७५५

ganpati_1  H x ऑस्ट्रेलियन चित्रजगतात तेथील आदिवासी कलेने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरलाइनने आपली विमाने तेथील आदिवासींच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांनी रंगवली. या चित्रांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. जेथे जेथे ही विमाने जातात, तेथे ही कला पोहोचली. एकेकाळी ही कला तेथील आदिवासी पुरुषांची मक्तेदारी होती. मात्र आदिवासी महिलांनी ती आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळवले. एवढेच करून त्या थांबल्या नाहीत. आपल्याबरोबर शहरी कलाकार महिलांना त्यांनी सामील करून घेतले. समनव्यातून वेगवेगळे प्रयोग केले. त्या कलेनेच या सर्व महिलांना एका सूत्रात गुंफले. ऑस्ट्रेलियन आदिवासी महिलांनी मूळच्या पारंपरिक कलेत आपल्या कल्पनेचे असे काही गहिरे रंग भरले की त्यामुळेच कलेची भरभराट झाली. त्याला सरकारी पातळीवर प्रयत्नांची जोड मिळाली. या कलेचे आपल्या महाराष्ट्रातील व आता जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या आदिम वारली चित्रकलेशी खूपच साम्य व कलात्मक नाते आहे. ठिपक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर असणाऱ्या या कलेतही भौमितिक मूलाकारांचा वापर करण्यात येतो. तसेच पांढऱ्या शुभ्र रंगाचाही मुक्तपणे वापर केला जातो. शिवाय त्यात रॉकआर्टपासून संगीत, नृत्याचे विषय रंगवतात. कौटुंबिक परंपरा, सामाजिक, राजकीय आशय यांनाही चित्रांमध्ये स्थान देण्यात येते. तेथील मातीशी असलेली जवळीक चित्रातील सौंदर्य व ऊर्जारूपाने प्रकटते. मंदार वाळिंबे यांनी गणपती बाप्पांच्या सजावटीत त्याचा सुरेख समन्वय साधला.