शेअर बाजारात पाळावयाची पथ्ये

विवेक मराठी    08-Sep-2020
Total Views |
आपल्याला शेअर बाजारामध्ये शेअरची खरेदी/विक्री दलालामार्फतच (ब्रोकरमार्फतच) करावी लागते. कुठलाच शेअर आपण थेट बाजारातून खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, तसेच शेअरचे सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. शेअर बाजारामधून जर आपल्याला अधिक उत्पन्न मिळवायचे असेल, तर लेखात दिलेली पंचसूत्री अवलंबणे जरुरीचे आहे.

market_1  H x W


शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी चार वाजता बंद होतो. सकाळी ९ ते ९.१५ ह्या वेळेला pre-opening सत्र म्हणतात, त्याचप्रमाणे दुपारी ३.३० ते ४.०० ह्या वेळेस closing सत्र म्हणतात. खरी उलाढाल सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० ह्या वेळेत होते. आपल्याला शेअर बाजारामध्ये शेअरची खरेदी/विक्री दलालामार्फतच (ब्रोकरमार्फतच) करावी लागते. कुठलाच शेअर आपण थेट बाजारातून खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, तसेच शेअरचे सर्व व्यवहार ऑनलाइन होतात. शेअर बाजारामधून जर आपल्याला अधिक उत्पन्न मिळवायचे असेल, तर खालील पंचसूत्री अवलंबणे जरुरीचे आहे.

१. संयम बाळगा.

अनेक जण रातोरात श्रीमंत होण्याच्या उद्देशाने शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवतात. पण झाडाच्या रोपट्याचा फळे देणारा वृक्ष होण्यास जसा काही कालावधी लागतो, तसेच शेअर बाजारामधून चांगले उत्पन्न मिळण्यास संयम बाळगणे गरजेचे असते. संयम बाळगणे शक्य नसेल, तर लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही, पण संयम ठेवणाऱ्याचे बारा हजाराचे उत्तम वृद्धिदराने एक लाख होतील. बाजारामध्ये चढ/उतार होतच असतात. विशेषतः भारताबाहेरील घटनेमुळे जेव्हा बाजार कोसळतो, तेव्हा 'सेन्सेक्समध्ये २% घट, गुंतवणूकदारांनी xxxxx कोटी गमावले' अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून गुंतवणूकदाराने जर घाबरून जाऊन विक्री केली, तर त्याचे नुकसान होते. शेअर बाजारामधील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठी करायची असते. दीर्घ मुदतीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कुठल्याही १० वर्षांच्या कालखंडात १०%पेक्षा अधिक परतावा मिळाल्याचे आपल्याला दिसते. सबब संयम असेल, तरच शेअर बाजारात उतरा.

२. विविध क्षेत्रांतील कंपन्यांत गुंतवणूक करा (Diversify)

शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध असलेल्या प्रमुख क्षेत्रांतील काही नामांकित कंपन्या खालीलप्रमाणे आहेत.
अनुक्र. क्षेत्र (Sector ) कंपन्यांची नावे
१. बँकिंग अँड फायनान्स स्टेट बँक, एचडीएफसी. बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक
२. वाहन उद्योग मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, हिरो मोटर कॉर्प., टाटा मोटर्स
३. माहिती तंत्रज्ञान (IT) इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल, विप्रो
४. तेल आणि वायू रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम, ओएनजीसी, इंडियन ऑइल
५. ग्राहक वस्तू आयटीसी, एचयूएल, नेस्ले, टायटन, एशियन पेन्ट्स,
६. धातू कोल इंडिया, टाटा स्टील, हिंडाल्को, जेएसडब्लू
७. औषध उत्पादन सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला


याशिवाय दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेल, सिमेंट क्षेत्रातील ग्रासिम, श्री सिमेंट, अल्ट्रा टेक सिमेंट अशा अनेक नामांकित कंपन्यांचे शेअर्स बीएससीवर/ एनएससीवर सूचिबद्ध आहेत.

विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या गुंतवणुकीसाठी निवडाव्या, याचे प्रमुख कारण आहे. प्रत्येक क्षेत्राचे एक आर्थिक चक्र (Economic cycle) असते. काही क्षेत्रांना सुगीचे दिवस असतात, तेव्हा काही क्षेत्रे मंदीच्या काळातून जात असतात. आपला जोवर याचा नीट अभ्यास होत नाही, तोवर विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, तर खूप नफा जरी झाला नाही तरी नुकसानापासून बचाव होतो.

यातील ज्या कंपन्या सेन्सेक्समध्ये किंवा निफ्टीमध्ये आहेत, त्यांना त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार वेटेजेस आहेत, उदा., रिलायन्स इंडस्ट्रीजचे जवळपास १४% वेटेज आहे. त्यामुळे समजा, आपण सेन्सेक्समध्ये येणाऱ्या सर्व तीस कंपन्यांमध्ये सारखी रक्कम गुंतवली, तरी सेन्सेक्सच्या वृद्धीएवढी आपली गुंतवणूक वाढणार नाही, कारण आपण या कंपन्यांच्या वेटेजेसनुसार गुंतवणूक केली नाही, म्हणून.

३. टिप्सवर किंवा फुकटच्या सल्ल्यांवर गुंतवणूक करू नका.

काही विशिष्ट कंपन्यांच्या शेअर्सबद्दल अफवा पसरत असतात - उदा., अमुक कंपनीला पेटंट मिळणार आहे, म्हणून थोड्याच दिवसात कंपनीचे शेअर्स आकाशाला भिडतील किंवा अमुक कंपनीला अनपेक्षित नफा मिळणार आहे, म्हणून या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, किंवा अमुक कंपनीला सरकारचे मोठे कंत्राट मिळणार आहे... अशा अफवांवर विश्वास ठेवून बाजारात गुंतवणूक करू नका. तसेच बरेचदा जवळचे नातेवाईक किंवा मित्र सांगतात, "मी अमुक कंपनीचा शेअर सहा महिन्यांपूर्वी या किमतीला घेतला आणि आता तो या किमतीला आहे. दुपटीहून अधिक वाढ सहा महिन्यात झाली.." अशा बातम्यांवर विश्वास ठेवून जर आपण गुंतवणूक केली, तर नुकसान ठरलेलेच.

तसेच काही जण सांगतात, "मी अमुक शेअरमध्ये इतके लाख टाकले आणि सहा महिन्यांतच लाखाचे बारा हजार झाले" हे ऐकल्यावर आपण विचार करतो, "अरे, हा माझा एवढा हुशार मित्र जर गोत्यात आला, तर मी शेअर बाजारापासून दूरच राहिलेले बरे." पण जर कोणी असे म्हणाला तर त्याला विचारा की त्याने काय चूक केली, आणि ती चूक तुम्ही करू नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल, तर रोज थोडा वेळ अर्थविषयक घडामोडी आणि आपला पोर्टफोलिओ याकडे लक्ष द्या. बरेचदा 'नजर हटी, दुर्घटना घटी' असे होते.

४. 'स्टॉप लॉस'ची संकल्पना राबवा.

आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार 'स्टॉप लॉस'ची संकल्पना राबवा. अगदी सोपे आहे, जर आपण १०% नुकसान सहन करू शकत असू, तर रोज जेव्हा आपण आपला पोर्टफोलिओ बघतो, तेव्हा जर एखाद्या कंपनीचा शेअर १०%हून जास्त नुकसान देत असेल, तर तो त्वरित विकून टाका. कुठल्याही कंपनीच्या प्रती अनाठायी प्रेम बाळगू नका. येस बँक हे त्याचे जीतेजागते उदाहरण आहे. २० ऑगस्ट २०१८ म्हणजे केवळ दोन वर्षांपूर्वी याचा भाव होता ३९४ आणि कालचा बंद भाव होता १४.६५ रुपये रुपये; सिंटेक्स इंडस्ट्री ही पाण्याच्या टाक्या बनवणारी कंपनी अशीच १२० रुपयांवरून ५५ पैशांवर आली. समजा, आपण या कंपन्यात जरी गुंतवणूक केली असती, तरी १०% स्टॉप लॉसवर जर याची विक्री केली असती, तर प्रचंड नुकसानापासून आपण वाचू शकलो असतो. पण बरेचदा आपल्याला एखाद्या नावाचे आकर्षण असते किंवा कोणीतरी आपल्याला सांगतो, "थांब, ही तात्पुरती घट आहे, It will bounce back." आपण विश्वास ठेवतो आणि स्टॉप लॉसच्या संकल्पनेला तिलांजली देतो आणि मग आपल्याला वृथा प्रचंड नुकसान सहन करावे लागते. तेव्हा स्टॉप लॉसची संकल्पना निर्दयपणे राबवा.

५. कर्ज काढून शेअर बाजारात गुंतवणूक करू नका.

मी अशी अनेक उदाहरणे बघितली आहेत की रातोरात कोट्यधीश होण्याच्या उद्देशाने अनेकांनी नातेवाइकांकडून, प्रॉव्हिडंड फंडावर, बँकेतून कर्ज काढून शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि देशोधडीला लागले. शेअर बाजारात सीमित उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करा. संपूर्ण बचत शेअर बाजारात लावू नका. कर्जाऊ रक्कम तर अजिबात लावू नका. लाभाचे उद्दिष्ट ठेवा, लोभाच्या हव्यासाने शेअर बाजारात रक्कम गुंतवू नका. अतिलोभ ठेवला, तर लाभालाही मुकाल.

थोडा वेळ काढा, अभ्यास करा आणि शेअर बाजारात मजेने खेळा. वरील पथ्ये पाळलीत, तर सहसा शेअर बाजारातील गुंतवणूक बँकेतील एफडीहून २-३ टक्के अधिक आणि दोन अंकी वाढीत उत्पन्न देईल, याची खात्री बाळगा.

(लेखक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वित्त सल्लागार, तसेच इर्डा (IRDA) अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या मंडळाचे माजी सदस्य आहेत.)