हिंदुत्वाची झूल उतरते आहे...

विवेक मराठी    01-Jan-2021
Total Views |
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर या विषयात आम्ही शिवसेनेला साथ देणार नाही’ हे काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेत राहण्यासाठी शिवसेना आपल्या संस्थापकांच्या शब्दाला सोडचिठ्ठी देते का आणि सामनामधून संभाजीनगर असा उल्लेख करण्याऐवजी औरंगाबाद असा उल्लेख करायला सुरुवात होते का, हे आणखी काही दिवसात स्पष्ट होईलच.


shivsena_2  H x


शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात प्रखर हिंदुत्व ही शिवसेनेची ओळख होती. नंतर उद्धव ठाकरेंनी सत्तेची ऊब मिळण्यासाठी हे हिंदुत्व झुलीसारखे वापरले आणि आता सत्ता राखण्यासाठी ते झूल म्हणून वापरणेही त्यांना अडचणीचे होऊ लागले आहे.
 
राज्याच्या सत्तेची बळकावलेली सूत्रे हातात राखण्यासाठी शिवसेना मारत असलेल्या कोलांटउड्या आणि मुस्लीमधर्मीयांचे चालू असलेले लांगूलचालन यावरून हेच सिद्ध होते. पक्षाचे संस्थापक असलेल्या कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुस्लीमांसंदर्भातल्या रोखठोक मांडणीचा विसर आजच्या कार्याध्यक्षांना पडला आहे. फक्त राज्याच्या गादीवर बसण्याचे वडिलांना दिलेले तथाकथित वचन तेवढे त्यांच्या स्मरणात आहे. पक्षाच्या मूळ भूमिकेशी विपरीत अशी चालू असलेली ‘कथनी आणि करनी’ एक दिवस पक्षाच्या मुळावर येऊ शकते.
 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 
सत्ता हाती घेतल्यानंतर पहिले 3-4 महिने सोडल्यास कोरोना महामारीमुळे मुख्यमंत्री गृहबद्ध झाले. ‘कोमट पाणी प्या, बैठे खेळ खेळा’ असा समाजमाध्यमांमधून जनतेला सल्ला देणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या मनातले हिंदुत्वही कोमट पाणी पिता पिता पार कोमट होऊन गेले आहे. सत्ता हाती आल्यानंतरच्या मुस्लीमधार्जिणेपणाची गेल्या वर्षभरातली अनेक उदाहरणे देता येतील.
गेल्या वर्षी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही मंडळींनी, पोलीस परवानगी न घेता गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केले. त्या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’ची मागणी करणारा फलक हातात घेऊन महेक मिर्झा प्रभू ही तरुणी सहभागी झाली होती. तिच्यावर त्या वेळी गुन्हा दाखल झाला होता, मात्र शिवसेनेच्या मुखपत्राने - सामनाने तिच्या या कृतीचेसमर्थन केले होते. आता ‘आमच्या नजरचुकीने गुन्हा लिहिला गेला’ असे नोंदवत तिच्याविरोधातला गुन्हा मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे.
 
त्याच दरम्यान मुंबईत छात्र भारतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विवादास्पद पार्श्वभूमी असलेला उमर खालिद आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर असणार होते. हे जाहीर झाल्यानंतर टीकेची झोड उठल्यामुळे आदित्य ठाकरे न जाता संजय राऊत उमर खालिदबरोबर मंचावर विराजमान झाले. त्यात त्यांना कसलेही वैषम्य वाटले नाही, हे विशेष.
 
जून महिन्यात, मानखुर्द इथे राहणार्‍या करिश्मा भोसले या युवतीने परिसरातल्या मशिदीत लाउडस्पीकरवरून होणार्‍या अझानला विरोध केला. ध्वनिप्रदूषण होत हे कारण देत तिने या प्रकरणी आवाज उठवला, तेव्हा तिलाच नोटिस बजावण्याचा पराक्रम मुंबई पोलिसांनी केला होता.
 
एकीकडे अझानसंदर्भात अशी घटना घडलेली असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतील विभागप्रमुखांनी अझान पठण स्पर्धेची घोषणा केली. त्याची भलामणही केली. मात्र भाजपा-संघपरिवारातील, तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी टीकेची झोड उठवल्यानंतर कोरोना महामारीचे कारण पुढे करत खुली स्पर्धा घेतली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. सामनामधून अग्रलेख लिहून या स्पर्धेचे समर्थन करण्यात आले होते, हे विशेष नमूद करण्याजोगे.
 
दहावीच्या/बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरायच्या परीक्षेच्या फॉर्मवर अल्पसंख्याकांच्या - मायनॉरिटीच्या रकान्यात जैन, बुद्ध, मुस्लीम अशी धर्मांची स्वतंत्र नावानिशी नोंद आणि हिंदूंसाठी मात्र ‘हिंदू’ अशा नोंदीऐवजी अल्पसंख्याकेतर (नॉन मायनॉरिटी) असे शीर्षक देण्याचा पराक्रमही या सत्ताधार्‍यांनी केला.
 
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या विषयात, सत्ता हातात असतानाही शिवसेना कच खाणार हे लक्षात आल्यावर सेनेचा या भागातील जिल्हाप्रमुख आपला जाहीर निषेध नोंदवत, आणि ‘बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेसाठी लाचारी?’ असा सवाल करत मनसेत गेला. (तिथे त्याला जिल्हाध्यक्षपदी बढती मिळाली.) ‘या विषयात आम्ही शिवसेनेला साथ देणार नाही’ हे काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलेच आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेत राहण्यासाठी शिवसेना आपल्या संस्थापकांच्या शब्दाला सोडचिठ्ठी देते का आणि सामनामधून संभाजीनगर असा उल्लेख करण्याऐवजी औरंगाबाद असा उल्लेख करायला सुरुवात होते का, हे आणखी काही दिवसात स्पष्ट होईलच.
 
नववर्षानिमित्त शिवसेनेच्या वडाळा शाखेने काढलेले उर्दू भाषेतील शिवशाही कॅलेंडर हे त्यांच्या पातळ होत संपत चाललेल्या हिंदुत्वाचे आणखी एक उदाहरण. मराठी, इंग्लिशबरोबरच उर्द्ू भाषेतल्या या कॅलेंडरमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगात उर्द्ू मजकूर छापला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब’ हे संबोधन वापरणे किंवा छत्रपती ही शिवरायांची बिरुदावली काढणे, शिवजयंतीचा उल्लेख शिवाजी जयंती असा करणे या सगळ्या खोडसाळपणाबरोबरच मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदय देण्याचे पुण्यकर्म करण्यात आले आहे.
विविध कार्यक्रमांच्या/उपक्रमांच्या/घटनांच्या माध्यमातून मुस्लिमांचे जे लांगुलचालन चालू आहे ते असे. अशाने कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष ही शिवसैनिकांच्या आणि स्व. बाळासाहेबांच्या योगदानातून तयार झालेली शिवसेनेची ओळख तर मिटून जातेच आहे, शिवाय यापुढे या पक्षाजवळ नाव वगळता हिंदुत्वाचे काही नामोनिशाण तरी राहील का? अशी शंका वाटते आहे.
हिंदुत्वाची पांघरलेली झूलही उतरवून ठेेवत ही मुस्लीमशरणता नेमकी कशासाठी? महाविकास आघाडीतल्या अन्य साथीदार पक्षांनी ‘आपले म्हणावे’ यासाठी की, मतपेढीवर डोळा ठेवून स्वीकारलेली लाचारी की साथीदारांचीच मतपेढी पळवण्याची ही योजना?
 
शिवसेना भलेही स्वार्थासाठी लांगूलचालनाचे केविलवाणे प्रयोग करेल, मुस्लीम समाज वा सत्तेतले सहकारी त्यांच्या या चाळ्यांना भुलतील का?