संस्कृती जगणारा समाज म्हणजे हिंदू समाज!

विवेक मराठी    12-Jan-2021
Total Views |
@स्वाती शेषराव तळेकर

vivek_1  H x W:

उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत असलेली ही आपली भारतभूमी. या भारतभूमीचा पुत्ररूप समाज म्हणजे हिंदू समाज. या हिंदू समाजाने आपल्या जगण्यातून जी जीवनमूल्ये सिद्ध केली, ती जीवनमूल्ये हिंदुत्वाची आधारशिला आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव अशी प्रतिज्ञा आपण शाळेत असल्यापासून म्हणत असतो. आपली विविधतेने नटलेली परंपरा आहे आणि या परंपरेचा आधार आहे आपली संस्कृती. आणि ती संस्कृती जगणारा समाज म्हणजे हिंदू समाज!

 
 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 

आपल्या गीताच्या एका ओळीत म्हटले आहे -

सिंधुस्त्रोत से हिंदु सिंधु तक

रहते आये, रहते है

इस धरती को माँ कहते जो

हिंदु उनको कहते है

हम हिंदु उन्हेही कहते हैll

अशा प्रकारे या भूमीला आपली मातृभूमी, पुण्यभुमी मानतो तो हिंदू. हिंदुत्व हा शब्दाचा खेळ नाही, तर आचरणात आणायची जीवनपद्धती आहे. आपल्या जगण्यातला हा हिंदुभाव विविध प्रसंगी प्रतिबिंबित होत असतो, त्याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. आपले हिंदुत्व हे पोथीबद्धं तत्त्वज्ञान नसून जगण्याचा रोकडा व्यवहार आहे, हे आपल्या साध्या दैनंदिन आचरणातून आपण सिद्ध करू शकतो.

बंधुभाव हाच धर्म

एका वर्षीचा प्रसंग. श्रीराममंदिराचा उत्सव सुरू होता. सगळीकळे आनंदीआनंदाचे वातावरण होते. चैत्र महिन्याच्या त्या रणरणत्या उन्हात मंदिराच्या प्रांगणात एक वयोवृद्ध जोडपे बसलेले होते. त्यांनी मला आवाज दिला आणि मंदिरातून प्रसाद आणायला सांगितला. मी त्यांना म्हटले, आपण स्वत:च जाऊन प्रसाद घ्या, तिथे वितरण सुरू आहेच. पण आजोबा म्हणाले, आम्ही समाजाने दलित आहोत. आम्ही गेली चाळीस वर्ष इथे रामनवमी उत्सवाला येतो, पण कधी मंदिरात नाही गेलो. आम्ही तसे केले, तर देवाला विटाळ होईल. त्यांचे उदगार ऐकून अक्षरश: हादरुन गेले. गेली चाळीस वर्षे अनवाणी पायांनी रामाच्या दर्शनाला ही भोळीभाबडी खेडवळ माणसे येताहेत, त्यांना साधे दर्शनही मिळू नये? हे असेच सुरू राहिले, तर हिंदुत्वनिष्ठा ही सदाशिवपेठ आणि नारायणपेठेपुरतीच मर्यादित राहील. स्वामी विवेकानंदांनी या देशातील गरिबांची सेवा करण्याचा, त्यांच्याशी बंधुभावाने वागण्याचा संदेश दिला, मग आपण तसे जगतो का? असा विचार अस्वस्थ करून गेला. त्या प्रसंगी कृती काही करता आली नाही, पण हा विचार म्हणजे हिंदुत्व हे नक्कीच कळले. इन्सान और इन्सानियत की पूजा म्हणजे हिंदुत्व असेल, तर माझ्या घरी सण-उत्सवाला आमच्या तथाकथित अस्पृश्य बांधवांना आवर्जून बोलावले जाऊ लागले. माझ्या जगण्यातील हे परिवर्तन म्हणजे हिंदुभावजागृतीचेच उदाहरण म्हणता येईल.

 
 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

अपना देश अपनी माटी

माझ्या हिमाचल प्रवासातील हा अनुभव! राष्ट्र सेविका समितीच्या प्रबोध वर्गाचा समारोप करून आम्ही परतीच्या प्रवासात होतो. प्रवासात आता खूप सुविधा झाल्या आहेत, तरीसुद्धा ग्वाल्हेर रेल्वे स्थानकावर आमच्यासाठी जेवण घेऊन एक दांपत्य आले होते. ओळख ना पाळख, पण अगदी आत्मीयतेने त्यांनी आमच्यासाठी जेवण आणले होते. जेवताना कळले की महिलांनीच करायचे काम या प्रकारात मोडणारा स्वयंपाक स्वत: काकांनी केलेला होता. कदाचित पहिलाच प्रयोग असावा, त्यामुळे तो कसा झाला असेल हे सांगायला नकोच! पण अन्न हे पूर्णब्रह्म हा संस्कार झालेला असल्याने तो भक्तिभावाने ग्रहण केला. कोण कुठले हे काका-काकू? कुठे ग्वाल्हेर आणि कुठे माझे गाव? पण संघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या संस्कारांनी हे अंतर पुसून टाकले होते. त्यांच्याशी बोलताना आम्हाला कुठलाही परकेपणा वाटला नाही. कुठलेही तत्त्वज्ञान न सांगता, भाषण न करता सहज व्यवहारातून साकारलेले हे हिंदुत्व नाही, तर काय होते? जाती-भाषा-प्रांताच्या सीमा ओलांडून आम्हाला प्रेमाने जेवू घालणार्‍या त्या दांपत्याचा आतिथ्यभाव पाहून तुम्ही आम्ही सकल हिंदु, बंधु–बंधु या म्हटलेल्या गीतातील भावार्थाचे दर्शन झाले.

परोपकार पुण्याय

एकदा घरासमोर एक भिकारीण आली, मोठ्याने म्हणाली. माई, धर्म करा, दादा ,धर्म करा. मनात विचार सुरू झाले. धर्म करा म्हणजे तिला काय अपेक्षित होते? व्रतवैकल्ये करा, सत्यनारायण घाला की जपजाप्य करा? यापैकी तिला धर्माचा कुठलाही अर्थ अभिप्रेत नव्हता. धर्म करा म्हणजे तुमच्या भोजनातून जे काही उरले असेल, ते मला द्या ही तिच्या दृष्टीने धर्माची सरळ सोपी व्याख्या होती. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपण समाजाचे देणे लागतो, त्यामुळे आपला स्वार्थ पाहताना समाजाचाही विचार करावा, एवढा व्यापक अर्थ त्या भिक्षेकरी महिलेच्या आर्जवात होता.

मोठमोठे विद्वान धर्माच्या व्याख्येवर डोके फोडत बसतात. पण त्या भिक्षेकरी महिलेच्या त्या दोन वाक्यांत मला हिंदुत्वाचा परोपकारी भाव समजला. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे परोपकार ते पुण्य हा संस्कार हिंदुत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पीडित, शोषित बांधवांना आपण मदत केली पाहिजे.

पर्यावरणदृष्टी

जगभर पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, कार्बन-स्तर असे शब्द आमच्या कानावर आदळत असतात. त्यातून भविष्यात पर्यावरणाचा आणि त्यातून मानवजातीचा विनाश दिसायला लागतो. पण मी जेव्हा आपल्या जीवनपद्धतीचा विचार करते, तेव्हा या प्रश्नांची उत्तरेही दिसायला लागतात. वनवासी क्षेत्रात नदीकिनारी फिरत असताना एक आदिवासी भेटला. त्याला विचारले, यह कौनसी नदी है?” त्याने उत्तर दिले, यह नदी नही, माता है। त्याच्या उत्तराने ओशाळल्यासारखे झाले. पर्यावरण हा शब्दही माहीत नसणारा हा माणूस एका ओळीत हिंदुत्वच सांगून गेला. नदीला माता म्हणण्याची परंपरा आम्ही विसरलो, म्हणून जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली. जर ही भावना जनमानसात प्रभावी होत गेली, तर नदीप्रदूषण होईलच कसे?

दैनंदिन जीवनात परंपरेने सांगितलेली तुळशीची पूजा, पंचमहायज्ञ अशा गोष्टीतून मी पर्यावरणाचेच संवर्धन तर करत असते. किमान तसा विचार तरी करते. त्यातून मकरसंक्रांती, वाढदिवस अशा प्रसंगी वृक्षांचे रोपटे देण्याचे प्रयोगही झाले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी हिंदुत्वाचे रक्षण व्हायला हवे, कारण पाश्चिमात्य विचार सृष्टीचे शोषण करायला सांगतो, पण माझे हिंदुत्व सृष्टीचे शोषण नाही, तर दोहन करायला शिकवते.

माणसातील देवत्व

हिंदुत्वाने माणसात देवत्व पाहायला शिकवले. साक्षात भगवानच मनुष्याला आपला अंश म्हणतात. माणसाला पापी म्हणून तिरस्कार करणे महापाप मानणारी आमची हिंदू जीवनपद्धती आहे. आमच्या संत-महापुरुषांनी आणि उपासना पद्धतींनीही तिचा आविष्कार साकार केला आहे. वारकरी संप्रदायात एकमेकांच्या पाया पडण्यामुळे कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही हीच शिकवण मिळते. जैन धर्मातील माझे परिचित वर्षातून एकदा प्रत्येकाची क्षमा मागतात. त्यांना विचारले, ही कोणती परंपरा?” तेव्हा कळले की हा क्षमापना दिन - म्हणजे पर्युषण पर्वाची सांगता असते. या दिवशी क्षमा मागणे आणि क्षमा करणे यासारख्या गुंणाचा संस्कार होतो. रूढार्थाने जैन नसले, तरी जैन समाजातील हा संस्कार मीही अंगीकारण्याचा प्रयत्न केला. रोजच्या जीवनात अशा अनेक गोष्टींतून आपण हिंदुभावाचे प्रकटीकरणच करत असतो.

हिंदू धर्म म्हणजे नेमके काय? हिंदुत्वाची व्याख्या या विषयावर सातत्याने चर्चा, वाद निर्माण होतात किंवा केले जातात. पण यात वाद करण्यासारखे काय आहे? स्वामी विवेकानंद म्हणाले होते की हिंदू धर्म नष्ट झाला, तर जगातील मानवताच नष्ट होईल. याचा अर्थ हिंदुत्वाचा पर्यायी शब्द त्यांना मानवता हाच अभिप्रेत होता. हे हिंदुत्व किंवा हिंदुभाव आपल्या रोजच्या जगण्यात प्रतिबिंबित झाला पाहिजे. आज सगळे जग भारताकडे आशेने पाहत आहे. आपल्या व्यवहारातील हिंदुत्व हेच जगासमोरील ज्वलंत समस्यांचे आणि प्रश्नांचे उत्तर ठरणार आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्रजीवनातील जीवनमूल्ये आमच्या व्यवहारातून जगासमोर आली पाहिजेत. त्यासाठी अधिक सजग राहून आपण विचार आणि कृती करण्याची गरज आहे.