‘वाल्याचा वाल्मिकी’ झालो...

12 Jan 2021 17:57:31

@कल्पेश दीक्षित

 
२०१४च्या मकरसंक्रमण उत्सवाला प.पू. सरसंघचालक मोहनजी आले होते. मी त्यांच्या व्यवस्थेत असल्यामुळे २ दिवस त्यांचा सहवास लाभला - नव्हे, परीसस्पर्श झाला म्हटले, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्यावर त्यांच्या व्यक्तित्वाचा इतका प्रभाव पडला की मी नोकरी सोडून पूर्णवेळ प्रचारक निघालो. दोन वर्षे मी संघाच्या रचनेत ठाणे आणि नवी मुंबई ह्या भागात कार्य केले. हा काळ माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. जे लहानपणी जमले नाही, ते आता करायचे हा माझा संकल्प होता. मनापासून संघकाम केल्याने, समाजाचे बारकाईने अध्ययन केल्याने आणि खूप वाचन केल्याने थोड्या प्रमाणात तरी मी संघ आणि हिंदू धर्म आत्मसात करण्यात यशस्वी झालो.
 

hindu_1  H x W:

माझा जन्म १९८९ साली जळगावला झाला. खान्देशात फक्त पावसाचा दुष्काळ नसून साधू, संत, क्रांतिकारक, समाजसुधारक यांचाही दुष्काळ आहे. त्यामुळे इथे पश्चिम महाराष्ट्रासारखे घरोघरी वारकरी आणि धारकरी नाहीत! शेतकरी आणि कष्टकरी मात्र मुबलक आहेत. कारण देवाने एक वरदान आम्हाला दिले आहे, ते म्हणजे सुपीक काळी माती. इथल्या बहुतांश समाजाचे जीवन ह्या मातीची सेवा करण्यात खपते. त्यामुळे पीक हाच आमचा विठ्ठल आणि शेत हेच पंढरपूर; कामातच राम असतो हा संस्कार मातीमुळेच माझ्यात रुजला आहे.


माझे शिक्षण डोंबिवलीमध्ये सुरू झाले. वायुदलातून निवृत्त होऊन वडिलांनी दुसरी सरकारी नोकरी स्वीकारली आणि त्यांची बदली इथे झाली. लहानपणीच बाबांनी मला शाखेत पाठवले
, कारण बाबा आणि आजोबासुद्धा स्वयंसेवक आहेत. त्यामुळे सामाजिक समरसता काय असते हे समजण्याआधीच ती माझ्या मनात झिरपली आहे. दहावीपर्यंत एक आदर्श स्वयंसेवक आणि विद्यार्थी म्हणून माझी ओळख झाली खरी, पण ते केवळ बाहेरील आवरण ठरले. महाविद्यालयात पाऊल टाकताच अनेक प्रलोभनांना मी एक एक करून बळी पडत गेलो.


मैत्रीच सर्व भुतेषु ह्या सूत्राचा विपर्यास करत, संस्कार आणि मित्र यामध्ये नेमके कोणाला निवडायचे? ह्या जटिल प्रश्नाला टीचभरही महत्त्व न देता मी मित्राचा हात घट्ट धरला आणि त्याची तंबाखूची पुडी बघता बघता माझ्या हातात कधी आली, ते कळलेसुद्धा नाही! पुढे मी दारूच्या प्रवाहात किती वाहत गेलो ते वेगळे सांगायला नको. माझे भविष्य सिगारेटच्या धुरामुळे इतके धूसर झाले की इंजीनिअरिंग पूर्ण झाल्यावर आपले काय होईल ह्याची चिंता सतावू लागली. हॉस्टेलमध्ये लागलेल्या सवयी मला घरी स्वस्थ राहू देतील का? असे नको नको ते प्रश्न सतावू लागले.


२०१२ साली स्वामी विवेकानंदांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्या वेळेस मी इंजीनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. लहानपणी शाखेत
, दिवाळी वर्गात आणि शिबिरात स्वामींच्या अनेक कथांनी घर केले होते. आपण त्यांचे चरित्र वाचू असा विचार आला आणि मी वाचनालयातून पुस्तक घेऊन वाचू लागलो. त्यात स्वामी विदेशातून यात्रा करून आल्यावर जाहाजातून उतरल्या उतरल्या मातीमध्ये अक्षरशः लोळले. त्यांचे मातीवर इतके प्रेम बघून माझ्यात अपराधी भावना जागृत झाली. ज्या मातीत स्वामी लोटांगण घालत, त्या मातीवर आपण तंबाखू खाऊन थुंकतो! हा विचार मला अस्वस्थ करत होता. मी तंबाखू सोडायचा प्रयत्न करायचो, पण मन इतके दुर्बल झाले होते की ते मला जमले नाही.

 

इंजीनिअरिंग पूर्ण झाल्यावर मी डोंबिवलीला परत आलो आणि शाखेत जायला सुरुवात केली. सुट्टीमध्ये योगासन, ध्यान करायची गोडी निर्माण झाली. विवेकबुद्धी पुष्ट होत गेली. काही महिन्यांतच मला नोकरीसुद्धा लागली. २०१३च्या गणेश चतुर्थीला मी ठरवले की गणेशोत्सव संपेपर्यंत व्यसन करायचे नाही. १० दिवस सहज गेले. मग १ महिना, ६ महिने असे करत करत आता ८ वर्षे उलटून गेली, मला परत व्यसन करायची इच्छासुद्धा झाली नाही.

 

२०१४च्या मकरसंक्रमण उत्सवाला प.पू. सरसंघचालक मोहनजी आले होते. मी त्यांच्या व्यवस्थेत असल्यामुळे २ दिवस त्यांचा सहवास लाभला - नव्हे, परीसस्पर्श झाला म्हटले, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्यावर त्यांच्या व्यक्तित्वाचा इतका प्रभाव पडला की मी नोकरी सोडून पूर्णवेळ प्रचारक निघालो. दोन वर्षे मी संघाच्या रचनेत ठाणे आणि नवी मुंबई ह्या भागात कार्य केले. हा काळ माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. जे लहानपणी जमले नाही, ते आता करायचे हा माझा संकल्प होता. मनापासून संघकाम केल्याने, समाजाचे बारकाईने अध्ययन केल्याने आणि खूप वाचन केल्याने थोड्या प्रमाणात तरी मी संघ आणि हिंदू धर्म आत्मसात करण्यात यशस्वी झालो.

ह्याच काळात मी मोहनजींनी गीताजयंतीच्या दिवशी केलेले भाषण यू-ट्यूबवर ऐकले. त्यात त्यांनी योगाचा अर्थ खूप सोपा करून सांगितला. योग कर्म सुकौशलम - आपण जे काम करतो, ते उत्तम करायचे, वेळेत करायचे आणि सगळ्यांना आवडेल असे करायचे यालाच योग म्हणतात हे वाक्य माझ्या अंतःकरणावर कायमचे उमटले.

आज मी नोकरीत यशस्वी आहे. संघाची जबाबदारी घेऊन काम करतो आहे. लग्न झाले असल्यामुळे प्रपंचही नेटाने करतो आहे, पण दिवसेंदिवस माझी ज्ञानाची भूक वाढत चालली आहे. हिंदू धर्म आणि संस्कृती हा माझा अभ्यासाचा विषय कधी होऊन बसला, समजलेच नाही. अनेक संतवाङ्मय वाचायची प्रेरणा माझ्यात स्फुरते आहे. नेमाने दासबोध अध्ययन सुरू आहे. सूर्यनमस्कार आणि ध्यान (विपश्यना) हे माझे दिनचर्येचे अनिवार्य कार्यक्रम झाले आहेत. प्रपंच करता करता परमार्थसुद्धा करता येतो, हे मी आज स्वानुभवाने सांगू शकतो.

पूर्णत्वाच्या प्रवासात अजून मी कुठेच नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आज जेव्हा मी १० वर्ष मागे वळून बघतो, तेव्हा माझ्यात झालेले परिवर्तन बघून वाल्याचा वाल्मिकी आणि नराचा नारायण करणाऱ्या आपल्या सनातन हिंदू धर्मप्रती माझा आदर द्विगुणित होतो!

धर्म रक्षति रक्षित:

कल्पेश दीक्षित
९७३०४२०१५०

Powered By Sangraha 9.0