लोकदेवतेचे राष्ट्र मंदिर

विवेक मराठी    15-Jan-2021
Total Views |

@देविदास देशपांडे

श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियानाला १५ जानेवारीपासून शुभारंभ झाला आहे. या निधीसंकलन अभियानाच्या निमित्ताने देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व असे अ-राजकीय संपर्क अभियान सुरू झाले आहे. या अभियानादरम्यान देशातील सहा लाख गावांपैकी सुमारे पाच लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे आणि ३५ ते ४० लाख कार्यकर्ते देशभरात फिरणार आहेत. या दरम्यान १३ कोटी कुटुंबांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.


National Temple of the sh

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील राममंदिराच्या कार्याला आता बऱ्यापैकी गती मिळाली आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने होणार असलेल्या या मंदिराचे बांधकाम एका अर्थाने सुरू झाले आहे. कारण जमिनीचे सपाटीकरण, साफसफाई इत्यादी कामे ही प्रत्यक्ष बांधकामाचाच भाग मानायला हवीत आणि ही कामे सध्या तेथे सुरू आहेत. त्यामुळे मंदिराची बांधणी प्रत्यक्ष सुरू झाली आहे, असे म्हणायला कोणतीही अडचण नाही.


बाबर असो किंवा त्याचा सेनापती मीर बंकी असो
, त्यांच्यापैकी कोणीतरी हे मंदिर उद्ध्वस्त केले. त्या नासधुशीनंतर हिंदू समाज शांत बसला असे कधीही झाले नाही. मंदिराच्या पुन:उभारणीसाठी हिंदू समाजाने सातत्याने लढा दिला. त्यातले सातत्य कधीही नष्ट नाही झाले. हिंदू समाजातील वेगवेगळ्या पंथांनी असो, राजवटींनी असो किंवा नेत्यांनी असो, हे मंदिर पुन्हा त्याच जागी उभारावे यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, प्राणांची बाजी लावली. मग त्यात पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठे सैन्य असो किंवा निहंगांच्या रूपातील शीख असोत. या काळात सुमारे ७६ छोट्या-मोठ्या लढाया झाल्या आणि एक लाखांच्या वर हिंदूंनी हौतात्म्य स्वीकारले.

National Temple of the sh

सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा हा संघर्ष यशस्वी होऊन दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्याचा अधिकृत उद्घोष केला. आता मंदिरासाठीचा लढा संपुष्टात आला आणि त्याच्या बांधकामाचा टप्पा सुरू झाला. मंदिराचे हे निर्माण कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेच मार्ग आखून दिला आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. या न्यासाच्या विनंतीवरून माननीय पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी श्री रामजन्मभूमीच्या जागेवर भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्रीगणेशा केला. संपूर्ण देशातील व जगातील सर्व रामभक्तांच्या डोळ्यांचे पारणे त्या दिव्य दृश्याने फेडले.

या न्यासाने दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची असेल. मंदिराची एकूण उंची १६१ फूट, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखरे असतील. तीन मजल्यांमध्ये मिळून एकूण १६० स्तंभ लागतील. हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी असेल. सिमेंटचा व लोखंडाचा वापर यात होणार नाही. मंदिर परकोटाच्या बाहेर सुमारे १०८ एकर जागेवर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा होतील. मंदिर बांधकामाचे वास्तुकार चंद्रकांतमाई सोमपुरा, बांधकामकर्ता लार्सन अँड टूब्रो, तसेच व्यवस्थापन सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग इंजीनिअर्स यांना निश्चित करण्यात आले आहे. एकूण तीन ते साडेतीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल.

आता प्रश्न येतो तो हे मंदिर बनणार कसे? हा. या बाबतीत न्यासाने एक स्तुत्य भूमिका घेतली. प्रभू श्रीराम हे कोट्यवधी जनतेच्या आकांक्षेचे, श्रद्धेचे व आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचे मंदिर हे संपूर्ण समाजाचे असायला हवे, ते कोणा एखाद्या व्यक्तीकडून होता कामा नये. म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या योगदानातून हे मंदिर उभारायचा निर्णय न्यासाने घेतला. खुद्द रामायणातसुद्धा आपल्याला याचा दाखला मिळतो. भगवान रामांना रावणाचा पराभव करून सीतेला परत आणणे निव्वळ स्वकर्तृत्वावर करणे अजिबात अशक्य नव्हते. परंतु त्यांनी वानरांना व अन्य समाजघटकांना या कार्यात सहभागी करून घेतले आणि सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यामुळे अयोध्येतील राममंदिरालासुद्धा राष्ट्र मंदिराचे स्वरूप यायला हवे होते.
 

 त्याचसाठी श्रीरामजन्मभूमीवरील मंदिरासाठी निधीसंकलन अभियान सुरू करण्यात आले. या निधीसंकलन अभियानाच्या निमित्ताने देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व असे अ-राजकीय संपर्क अभियान सुरू झाले आहे. या अभियानादरम्यान देशातील सहा लाख गावांपैकी सुमारे पाच लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे आणि ३५ ते ४० लाख कार्यकर्ते देशभरात फिरणार आहेत. या दरम्यान १३ कोटी कुटुंबांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.


यामागची भूमिका आपल्याला समजून घ्यायला हवी
. श्रीराम हे केवळ भक्तीचे नव्हे, तर सांस्कृतिक-सामाजिक आदर्शांचे प्रतीक आहेत. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा या दैवताशी, त्या दैवताच्या मंदिराशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच गुलामीचे प्रतीक असलेला ढाचा उखडून टाकण्यासाठी लाखोंच्या संख्येने रामभक्त पुढे आले, कोठारी बंधूंसारख्या कितीतरी जणांनी प्राणांची आहुती दिली. म्हणूनच जेव्हा या मंदिराच्या विटा एकमेकांवर चढतील, तेव्हा त्या विटांमध्ये आपलाही वाटा असावा, ही या भक्तांची अपेक्षा असणारच. त्यामुळे हे केवळ एका संप्रदायाचे किंवा पंथाचे मंदिर न होता त्यात सर्वांचे योगदान असावे हा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. यात अनेक जण असेही असतील की ते श्रीरामाला आपली उपास्य देवता मानत नाहीत, परंतु राम हे या देशाचे एक सांस्कृतिक प्रतीक आहे असे मनापासून मानतात.

यासाठी आपल्याला फार दूर जायला नको. प्रस्तावित मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एकतेचे धागे अगदी अलगद उलगडून दाखवले. त्या छोटेखानी भाषणात त्यांनी तुलसीदासांच्या रामचरितमानस आणि तामिळमधील कम्ब रामायणापासून गुरू गोविंदसिंगांच्या शिकवणीपर्यंतचे अनेक दाखले दिले. त्यात या सर्वांनी श्रीरामांकडे व्यवहाराचा आदर्श म्हणून कसे पाहिले, याची उदाहरणे होती. इतकेच नाही, तर भारताबाहेरसुद्धा निरनिराळ्या धर्मांचे लोक रामाकडे किती आदराने बघतात हेही त्यांनी सांगितले. इंडोनेशिया, मलेशिया या मुस्लीम देशांबरोबरच कम्बोडिया, लाओस आणि थायलंडसारख्या देशांमधील रामाच्या लोकप्रियतेचा त्यांनी उल्लेख केला. यानंतर ते म्हणाले, की श्रीराम सर्वांचे आहेत, श्रीराम सर्वांमध्ये आहेत.

याच दृष्टीने हे केवळ राममंदिर नाही तर राष्ट्र मंदिर होणार आहे. राष्ट्र ही संकल्पना एखाद्या प्रदेशाशी निगडित अशा राजकीय अर्थाची नाही. ती सांस्कृतिक आहे. राम हे लोकमानसाच्या पीठावर आरूढ झालेले दैवत आहेत. या राष्ट्राला आकार देणाऱ्या प्रत्येक घटकाला साद घालणारे व्यक्तिमत्त्व आहेत आणि त्यांचे निवासस्थान या राष्ट्राच्या प्रत्येक घटकाचा हातभार लागूनच व्हायला हवे. म्हणूनच मंदिराच्या निर्माणासाठी ज्याची ज्याची इच्छा असेल, त्या प्रत्येकाला सामावून घेण्यात येत आहे.

शतकानुशतकांच्या संघर्षानंतर राष्ट्राच्या आदर्शाचे जे निधान उभे राहणार आहे, त्यासाठी निर्मितीचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता असेल?

देविदास देशपांडे