एक मनस्वी प्रचारक - आयुर्वेदाचार्य डॉ. दीपक रामदास घुमे

विवेक मराठी    16-Jan-2021
Total Views |

 @अशोक तावडे

आयुष मंत्रालयाचे मंत्री व संरक्षण राज्यमंत्री श्रीपादजी नाईकांच्या गाडीला झालेल्या अपघातात रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक य आयुर्वेदाचार्य डॉ. दीपक घुमे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कार्यप्रवासावर प्रकाश टाकून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख. 

RSS_1  H x W: 0


यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर

घडविले मानवतेचे मंदिर

परी तयांच्या दहनभूमीवर

नाही चिरा नाही पणती

तेथे कर माझे जुळती..

कविवर्य बा.भ. बोरकरांची ही प्रसिद्ध काव्यपंक्ती भारतमातेच्या ज्या अनेक अज्ञात सुपुत्रांना समर्पक ठरते, त्यातील एक आमचे लाडके मित्र डॉ. दीपक रामदास घुमे - आयुर्वेदाचार्य, नागपूर आयुर्वेदिक महाविद्यालय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक (होते). 
 

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

डॉ. हेडगेवारांनी ज्या राष्ट्रीयत्वाच्या मार्गावर चालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घडविण्याचा महायज्ञ चालू केला, जो अनेक तपस्वी जनांनी अविरत चालू ठेवला आहे. सर्व ज्ञात/अज्ञात राष्ट्रीय स्वयंसेवकांमधील एका व्यक्तीशी माझी अगदी जवळीक झाली होती ते डॉ. दीपक घुमे. ज्यांनी आद्य संघसंचालकांप्रमाणे नागपूरला डॉक्टर होऊन डॉक्टरीचा व्यवसाय सुरू केला नाही, लग्न केले नाही की संसार थाटला नाही. पण शालेय जीवनापासून ज्याविषयी प्रेम आहे, आत्मीयता आहे आणि ज्यात मन गुंतले आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते.
 
डॉक्टरांच्या जवळच्या नातेवाइकांविषयी कोणतीच माहिती नव्हती. कारण स्वयंसेवकाचे नाते संघाशी आणि राष्ट्राशी. कोकण प्रांताचे आरोग्य भारतीचे चिटणीस निलेशजी सिंघानिया ह्यांच्याकडून थोडी माहिती मिळाली. वडील रामदास घुमे सरकारी नोकरीत होते. आई आजारी आहे. भाऊ (मोठा) अमर घुमे पोलीस खात्यात कामाला. वहिनी, पुतण्या, बहीण-भावोजी आणि भाची असा परिवार मागे आहे.
 
दि. 11 जानेवारी 2021ची शांत रात्र. अचानक बातमी ऐकली - ‘आयुष मंत्रालयाचे मंत्री, संरक्षण राज्यमंत्री श्रीपादजी नाईकांच्या गाडीला गोकर्ण महाबळेश्वरहून गोव्याला येताना अपघात होऊन पत्नी विजया आणि त्यांचे स्वीय साहाय्यक ह्यांचे निधन झाले आहे.’
 
मित्रवर्य डॉ. दीपक घुमे या वेळी मंत्रिमहोदयांसोबत असतील, अशी एक शंकेची पाल चुकचुकली. पण मन अघटित स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे डॉ. घुमे मंत्रिमहोदयांसोबत नसावे असे वाटत होते. रात्री झोप लागत नव्हती. एवढ्यात सकाळी 6 वाजता फोन वाजला. डॉ. जाई किणींनी दुसर्‍या बाजूने विचारले, “तुम्हाला डॉ. दीपक घुमेंविषयी काही कळले का?” डॉ. जाईंच्या आवाजावरून मन कातर झाले आणि त्यांच्या पुढच्या शब्दांमुळे मन सुन्न झाले, विचारशक्ती कुंठित झाली. अघटित घडले होते. आमचे मित्र डॉ. दीपक घुमेच मंत्रिमहोदयांसोबत होते आणि आता ते आमच्यात नाहीत. डॉ. दीपक आणि माझा तसा 2016 सालापासूनचा परिचय, पण बाप-मुलाच्या नात्यातील जवळीक कधी झाली ते कळलेच नाही.
 
 
डॉ. दीपक रामदास घुमे यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1977 रोजी झाला. या वर्षी मी बी.फार्म.ची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. डॉ. दीपक ह्यांनी नागपूर आयुर्वेदिक महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. पूर्ण करून आपले आजमितीचे संपूर्ण आयुष्य आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी वेचले.
 
कॉलेजजीवनापासूनच सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या डॉ. दीपक ह्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली होती. सन 1995 ते 11 जानेवारी 2021 - म्हणजे आपली पूर्ण उमेदीची 26-27 वर्षे संघाच्या संघटनात्मक, सांघिक आणि वनवासी जनांच्या उन्नतीसाठी वापरली, खर्‍या अर्थाने आयुष्य संघकार्यासाठी अर्पण केले.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
 
 
 
संघ प्रचारक म्हणून 1997पासून त्यांच्या आयुष्याला नवीन प्रकाशवाटा दिसल्या. त्यांच्यावर औंध वनौषधी शोधाचे दायित्व देण्यात आले. नंतर कर्जत येथील वनवासी प्रकल्पाचे दायित्व व त्याबरोबर आयुर्वेद व्यासपीठाचे दायित्वही देण्यात आले होते.
 
 
आयुर्वेद व्यासपीठाचे काम उत्तम करत असल्यामुळे 2001मध्ये सुरू करण्यात आलेल्या आरोग्य भारती या भारतव्यापी आयुर्वेद प्रचार-प्रसार आणि उन्नती साधताना इतर पॅथींतील चांगल्या औषधोपचारांचे एकत्रीकरण करणार्‍या संघटनेचे संस्थापक सदस्य व कोकण प्रांत संघटन सचिव असे दायित्व त्यांना देण्यात आले.
 
 
2014 मार्च ते 2018पर्यंत आरोग्य भारती पश्चिम क्षेत्र संघटन सचिवाचे दायित्व त्यांच्याकडे आले. 2018 ते 2021 हा काळ त्यांच्या आयुष्यातील ‘हेची फळ काय मम तपाला’ म्हणण्याचा काळ होता, ह्याची दखल राष्ट्रीय संघटनेनेे घेतली.
 
मी डॉ. दीपकजींना अनेक शिबिरे, सेमिनार्स, संगोष्टी, विषय आधारित चर्चा, वनौषधी प्रचार-प्रसार, सुप्रजा संस्कार शिबिरे, विश्व योग दिवस कार्यक्रम, नियमित योग व सूर्यनमस्कार वर्ग नियोजन, विश्व आयुर्वेद महोत्सव, तसेच मधुमेहमुक्त भारत कार्यक्रम यांच्या आयोजनात झोकून देऊन काम करताना पाहिले आहे. 2014 ते 2018 त्यांनी आरोग्य भारतीच्या कार्याचा - कार्यकर्त्याचा जो संघ कोकण प्रांतात निर्माण केला होता, त्याचा मी 2016 सालापासून एक साक्षीदार आणि सहकारी होतो. पण 2019 साली आरोग्य भारतीतील त्यांच्या कोकण प्रांत कार्याचा भार काढून त्यांना नाशिक येथे दुसरा कार्यभार दिल्यामुळे आमचा संघटनात्मक संपर्क कमी झाला, पण वैयक्तिक संपर्क तसाच राहिला.
 
 
आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी त्याच्या पहिल्या उत्तरदायित्वापासूनच - म्हणजे कर्जत वनौषधी प्रकल्प व वनवासी बंधूंचे जीवनमान उंचावून त्यांना हिंदुत्वाच्या मुख्य धारेत सामाविण्याच्या कार्यापासून त्यांनी परिश्रम घेतले. त्यांचे एक सहकारी महेश काळे यांच्या शब्दात, “आम्ही दोघांनी एकाच वेळेस काम सुरू केले होते. त्यामुळे तब्बल दहा वर्षे अनेक वेळा वेगवेगळ्या निमित्ताने आमच्या भेटी-गाठी, चर्चा होत असत. वनवासी बांधवांसाठीच्या अनेक योजना आम्ही एकत्रितपणे प्रत्यक्षात आणल्या होत्या. हे करत असताना त्यांचे वेगळेपण कायम नजरेत भरत असे.”
 
डॉ. दीपक तसा आयुर्वेद व्यासपीठचा पूर्णवेळ कार्यकर्ता. प्रचारक म्हणून कामास सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडे कर्जत येथील वनौषधी संशोधन संस्थेची जाबाबदारी देण्यात आली. आयुर्वेदातील त्यांचा अभ्यास, रुची, आयुर्वेद व्यासपीठचा पूर्णवेळ कार्यकर्ता या नात्याने काम केल्याने त्यांच्या गाठीशी आलेला या क्षेत्रातील अनुभव या आधारावर मा. मुकुंदराव पणशीकरांनी त्यांना वनौषधी संशोधन व संवर्धन करण्याची सूचना केली होती. त्यामुळे एका अर्थाने जबाबदारी म्हणण्यापेक्षा त्यांनी संस्थापक म्हणून पूर्णपणे नव्याने ही संस्थाच सुरू केली, असे म्हणावे लागेल.
 
ओक वनौषधी संशोधन व संवर्धन संस्था या नावाने अवघ्या काही वर्षांतच त्यांनी एक नवीन ओळख असलेली संस्था उदयास आणली. त्यांचा कामाचा उरक, झपाटल्याप्रमाणे काम करण्याचा स्वभाव, प्रचंड कल्पनाशक्ती व अफाट संपर्क या बळावर कर्जत परिसरात त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना पाहता पाहता प्रत्यक्षात उतरविल्या होत्या. शेकडो ठाकर व कातकरी वाड्यांवर त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठे संघटन उभे केले. एका अर्थाने कर्जतजवळ देणगी स्वरूपात मिळालेल्या एका उजाड माळरानावर त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून अक्षरशः जिवंतपणा आणला होता. त्यांच्या या प्रयत्नातूनच कर्जत परिसरातील अनेक बचत गटांवर राखी उद्योग सुरू झाला होता. संघ व वनवासी कल्याण आश्रमासाठी लाखो राख्या बनविण्याचे व त्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे यशस्वी प्रयत्न दीपकने प्रकल्पाच्या माध्यमातून केले. जवळपास 350 बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे त्यांनी सुरू केलेले कार्य आजही चालू आहे. वेगवेगळ्या मान्यताप्राप्त प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना व्यासपीठाबरोबरच आत्मविश्वासदेखील मिळवून दिला.
 
 
जनजाती समाजास केवळ संघटित करून उपयोगाचे नाही, तर त्यांच्या दृष्टीने आर्थिक विकासाचीदेखील संकल्पना प्रत्यक्षात उतरविली पाहिजे, हा डॉ. दीपक घुमेंचा ध्यास होता. त्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण, मार्गदर्शन याचा त्यांनी जणू धडाकाच लावला होता. कर्जत परिसरात असलेल्या विविध डोंगरकपारींमध्ये उपलब्ध असलेला मध शुद्ध करून विकण्यासाठी प्रकल्पावर त्यांनी एक खूप मोठे मध संकलन केंद्र उभे केले. अशा स्वरूपाचे हे महाराष्ट्रातील कदाचित पहिलेच केंद्र असावे. त्यासाठी खादी ग्रामोद्योगाच्या सहकार्याने त्यांनी अनेक प्रशिक्षणांचे आयोजन केले. आज या संशोधन केंद्रात तयार होत असलेला ‘राजमाची‘ हा ब्रँड विकसित करण्यात डॉ. दीपक यांचा खूप मोठा वाटा होता. परिसरातील ठाकूर बांधवांना मध काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांनी हजारो लीटर मध दर वर्षी एकत्र करून त्या माध्यमातून शेकडो ठाकर बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात उतरली होती.
 
 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

 
वनौषधी संशोधन केंद्राचे काम जरी सेवाभावी संस्थेचे असले, तरीदेखील डॉ. दीपक यांनी या सर्व कामाला संघाच्या रचनेत बसविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी गावागावांमध्ये संपर्क करणे, कार्यकर्ते शोधणे, त्यांना संघाच्या कार्याचा परिचय करवून वेगवेगळी जबाबदारी देणे अशा प्रचारकांकडून अपेक्षित असलेल्या कामाचादेखील त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. त्यांच्या या कामामुळेच ज्या ठिकाणी संघाचा विचार पोहोचविणे आणखी काही काळ शक्य झाले नसते, अशा शेकडो पाड्यांवर संघाचा विचार पोहोचविणे शक्य झाले. अनेक नवीन कार्यकर्ते या निमित्ताने या विचारधारेशी जोडले गेले.
 
डॉ. दीपकच्या कामाचा एकंदरीतच झपाटा जबरदस्त होता. त्यांनी अनेक वेगवेगळ्या व नामांकित संस्थांना या कार्यात जोडले होते, त्यातून त्यांनी कार्यकर्त्यांना, तसेच परिसरातील वनवासी बांधवांना कृषी व सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिले होते. शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीची माहिती व मार्गदर्शन व्हावे, यासाठी अनेक गावांमध्ये त्यांनी कृषीमंडळे सुरू केली होती. एकंदारीतच दहा वर्षांच्या म्हटले तर अल्प कालावधीत त्यांनी एक सामाजिक संस्था नावारूपाला आणली होती.
 
त्यांच्या या अनुभवाचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी मध्यंतरी त्यांच्याकडे आरोग्य भारतीची क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कार्यातदेखील त्यांनी स्वतःची एक वेगळी छाप उमटविली होती, गेली दोन वर्षे वेगवेगळ्या माध्यमांतून आयुर्वेद संशोधनाच्या व संवर्धनाच्या विविध योजना ते आखतच होते, याबाबत आणखी काही नव्याने उपक्रम सुरू करून डॉ. घुमे यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्याची योजना बनत होती. मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, या योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना अचानक गाठले.
 
डॉक्टरांच्या जाण्याने पूर्ण कोलमडून गेलेले कार्यकर्ते रमेश भुरकुले म्हणतात, “मला आठवतं, माझ्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये त्या वेळेचे (2003 साली) संघाचे रायगडमधील विभाग प्रचारक अण्णा कारखानीस यांनी माझी डॉक्टरांशी भेट घडविली आणि सांगितले की आपल्या कर्जतच्या प्रकल्पावर प्रचारक म्हणून डॉ. दीपक घुमे आलेले आहेत. अधूनमधून घरी येतील. ते त्या निमित्ताने घरी येऊ लागले आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच कुटुंबातील एक सदस्य झाले. आजही आमच्या कुटुंबात डॉक्टर आहेत हीच भावना आहे.
 
 
 
डॉक्टरांचा संघकार्यासाठी सतत प्रवास होत असे. अशा एखाद्या प्रवासात मीही असे. त्या वेळी जाणवू लागलं की डॉक्टर म्हणजे पायात चाक बसविल्याप्रमाणे पूर्ण तालुकाभर फिरायचे. ह्या भागात राहणार्‍या वनवासी बांधवांचे आयुष्य त्यांच्या नजरेतून सुटले नाही. ऊन, वारा, पाऊस आणि उपासतापास ह्यांची पर्वा न करता सरकारी योजना वनवासी बांधवापर्यंत कशा पोहोचविता येतील, ह्याची व्यवस्था वाडी-वाडीवर जाऊन त्यांनी तयार केली होती. वाडीवर आले की “डॉक्टर आले, डॉक्टर आले” असे वनवासी बंधुभगिनींचे स्वागताचे शब्द कानावर पडायचे.

 
एका प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी गीर गाईंची गोशाळासुद्धा उभी करविली. हे सर्व करताना कर्जतच्या दुर्गम वाड्यांवरून संघकार्यासाठी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली. उदा., कोंदिवड्याच्या वाडीवर एमएसडब्ल्यूपर्यंत शिक्षण घेतलेले अनंता उघडे, भागूची वाडीवरील बाळू मागविले, रजपेवाडीवरील विष्णू गावडा आणि इतर अनेक संघकार्यकर्ते डॉक्टरांनी निर्माण केले. संघाच्या शिबिरांची व्यवस्था डॉक्टर स्वतःच पाहत असत. संघकार्याच्या वाढीचा ध्यास, कार्यकर्त्यांची काळजी करणारा प्रचारक अचानक आम्हाला सोडून गेला, यावर कार्यकर्त्यांचा विश्वासच बसत नाही. डॉक्टर कार्यरूपाने आमच्या कर्जत प्रकल्पावर अमर राहतील.”
 
 
मी स्वतः 2016 साली डॉ. घुमेंच्या संपर्कात आलो, मुलुंड (पश्चिम)मध्ये महाराष्ट्र सेवा संघासह मुंबईत पहिले आरोग्य भारतीचे आयुर्वेदविषयक चर्चासत्र डॉक्टरांनी घडवून आणले. महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, कार्यक्रम प्रमुख धामणकर ह्या सर्वांच्या आणि माझे मित्र डॉ. मिलिंद शेजवळ यांच्या अथक परिश्रमाने आरोग्य भारतीच्या डॉ. अशोक वर्ष्णेय, डॉ. सुनील जोशी, डॉ. रमेश गौतम ह्या सर्वांनी केलेल्या सहभागाने डॉ. घुमेंनी मुंबईत आरोग्य भारतीच्या संघटनाचा पाया घातला होता. ह्यानंतर डॉ. घुमेंमुळे आरोग्य भारतीचा कोकण प्रांतामध्ये खूपच विस्तार झाला होता.
 
डॉक्टर, तुमची समर्पणशीलता, निष्ठा, धडाडी, जनसंपर्क, कल्पनाशक्ती या सामाजिक कार्यासाठी अत्यंत आवश्यक गुणांची एक वेगळी छाप माझ्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर सोडून गेलात. आपणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मन अजूनही धजावत नाही.
 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

 
- अशोक राजाराम तावडे
9821891216