चंद्रकांतदादांचे एकच कार्यसूत्र सेवा, सेवा, सेवा

विवेक मराठी    27-Jan-2021
Total Views |

@डॉ. दिनेश थिटे

कोरोनाच्या संकटातून उसंत मिळाल्यानंतर दादांनी संकल्पनाम्याच्या अंमलबजावणीसाठी मोहीम सुरू केली आहे. योजनाबद्ध प्रयत्न करून दादा ही विकासाची मोठी कामे पूर्ण करतीलच, याची वर्षभराच्या अनुभवावरून मतदारांनाही खात्री वाटू लागली आहे. कोथरूडचे आमदार म्हणून विधिमंडळाच्या माध्यमातून अनेक प्रश्न लावून धरण्यासाठी योजना केली. पण दुर्दैवाने सध्याच्या सरकारने गेल्या वर्षभरात एकदाही विधिमंडळाचे पूर्णवेळ अधिवेशन घेतले नाही. तरीही सरकारी यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करून दादा आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.

 

bjp_2  H x W: 0

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून 2019ची विधानसभा निवडणूक लढवावी, असा निर्णय पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अनपेक्षितपणे घेतला. जुलै 2019मध्ये प्रदेशाध्यक्ष झालेले चंद्रकांतदादा विधान परिषदेचे सदस्य होते आणि सुमारे वर्षभराचा सदस्यत्वाचा कालावधी बाकी होता. त्यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढविण्याचा विषय चर्चेतही नव्हता. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी पूर्ण वेळ आणि संपूर्ण शक्तीनिशी झपाटून राज्यभर काम करायचे, असे त्यांनी ठरविले होते. अचानक भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरविले आणि पक्षाचा आदेश मान्य करून दादा कोथरूडमध्ये भाजपाचे उमेदवार झाले.

कोथरूडची निवडणूक गाजली. दादांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकच उमेदवार दिला होता आणि अनेक उपाय केले होते. पण अखेर दादांनीच निवडणूक जिंकली. ऑक्टोबर 2019मध्ये ही निवडणूक जिंकल्यानंतर दादांच्या कार्यकर्त्यांनी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनिमित्त कोथरूड मतदारसंघातील वस्ती विभागातील 20,000 महिलांना साड्या भेट दिल्या, भाऊबीज म्हणून! कोथरूडच्या मतदारांना हा आश्चर्याचा धक्का होता. असे कधी झाले नव्हते. मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकल्यानंतर मतदारांशी संपर्क साधून महिलांना भाऊबिजेची भेट पाठविणे, हे भलतेच झाले. कोथरूड मतदारसंघासाठी काम करण्याच्या दादांच्या आगळ्यावेगळ्या शैलीची ही झलक होती. पुढे वर्षभर मतदारसंघातील नागरिकांनी दादांच्या सेवाभावी वृत्तीचा अनुभव घेतला. राजकारण करायचे ते समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून आणि मतदारसंघात काम करायचे ते केवळ सेवा करण्यासाठी. निवडणूक जिंकण्याचे आडाखे मांडून आपला-परका असा भेद करायचा नाही, हा दादांचा दृष्टीकोन कोथरूडकरांना भावला.

 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या महायुतीला 161 जागा - म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जनादेश मिळाला होता आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांच्या खात्यात एक महत्त्वाचा विजय जमा झाला होता. पण नंतर विपरीत घडले. जनादेश धुडकावून सरकार स्थापन झाले. निवडणूक जिंकूनही भाजपा विरोधी पक्ष ठरला. या सगळ्या धामधुमीत निवडणुकीनंतरचा काही काळ गेला. आता नव्या उत्साहाने काम सुरू करायचे, तर कोरोनाचे महासंकट आले. राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात 9 मार्च रोजी आढळले होते. सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत कोथरूडकरांनी दादांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या खूप मोठ्या टीमने समर्पित भावनेने केलेले सेवा कार्य अनुभवले.


bjp_3  H x W: 0

कोरोना काळात सेवेसाठी दादांनी पूर्ण शक्ती पणाला लावली. कोथरूडच्या मध्यवर्ती भागात मतदारांच्या सोईसाठी नवे कार्यालय निर्माण केले होते. हे कार्यालयच आता सेवा कार्याचे कमांड सेंटर बनले. कोरोनाचे संकट आल्यानंतर या कार्यालयातून ताबडतोब दहा हजार मास्क्सचे आणि सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप केले. लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आणि शिक्षणासाठी कोथरूड परिसरात राहिलेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल झाले. त्यांची समस्या ओळखून मार्च महिन्याच्या अखेरीस पाच रुपयात पोळी-भाजी अशी योजना सुरू केली. दररोज अडीच हजार लोक त्याचा लाभ घेत होते. ज्या गरजूंना पाच रुपयेही परवडत नव्हते, त्यांना तर मोफतच जेवण दिले जात असे. सर्व व्यवहार ठप्प झालेले, रेशनवरील धान्यही सुरुवातीला मिळत नव्हते, ही समस्या ध्यानात घेऊन 80,000 कुटुंबांना शिधावाटप केले. लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दिव्यांगांना घरपोच औषधे पोहोचविण्याची व्यवस्था केली, तीसुद्धा 25 टक्के सवलतीच्या दरात. कोरोनाच्या संकटात कोथरूडमध्ये दादांनी स्वतः आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची यादी खूप मोठी आहे. सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी, कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मादान उपक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करताना दिव्यांगांना व्हील चेअर देणे अशी अनेक कामे केली. रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांना 3000 पीपीई कीट वाटण्यासाठीही पुढाकार घेतला. कोथरूड परिसरातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुविधा वाढविण्यासाठी आमदार निधीतून पन्नास लाख रुपये उपलब्ध करून दिले.

 

कोथरूड मतदारसंघात जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि त्यांना रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले. अशा स्थितीत चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला आणि हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये 104 बेडचे अद्ययावत कोविड सेंटर उभारले. तेथे रुग्णांना चहा, नाश्ता, पौष्टिक जेवण, काढा अशी सर्व सोय करण्यात आली. दोन महिने हे सेंटर चालू होते. लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या. आर्थिक चणचणीमुळे त्यांच्या घरी समस्या होऊ लागल्या. अशा वेळी दादांनी संवेदनशीलतेने एक अनोखा उपक्रम राबविला. नोकरी गेलेल्या घरातील एकाला महिनाभरासाठी अर्धवेळ नोकरी उपलब्ध करून दिली, तसेच त्याला पाच हजार रुपये वेतन, प्रवासाचे पाचशे रुपये आणि एक महिन्यांचे रेशन देण्याची व्यवस्था केली.


विधानसभा
निवडणूक लढविण्याचे निश्चित झाल्यानंतर दादांनी कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्पनामा तयार करून जाहीर केला होता. रहदारीतील अडथळे दूर करणे, मतदारसंघातील रस्त्यांची कामे पूर्ण करणे, बाणेरचा कचरा प्रकल्प अशी अनेक कामे त्यांनी ठरविली होती. निवडून आल्यानंतर संकल्पनामा पूर्ततेसाठी बैठका सुरू केल्या होत्या. मतदारांच्या सेवेसाठी एक कायमस्वरूपी कार्यालय सुरू केले. अशा स्थितीत अचानक कोरोनाचे संकट आले. मग लोकांना मदत करणे, दिलासा देणे यासाठी सर्व प्रयत्न एकवटले. कोरोनाच्या संकटातून उसंत मिळाल्यानंतर दादांनी संकल्पनाम्याच्या अंमलबजावणीसाठी मोहीम सुरू केली आहे. योजनाबद्ध प्रयत्न करून दादा ही विकासाची मोठी कामे पूर्ण करतीलच, याची वर्षभराच्या अनुभवावरून मतदारांनाही खात्री वाटू लागली आहे. कोथरूडचे आमदार म्हणून विधिमंडळाच्या माध्यमातून अनेक प्रश्न लावून धरण्यासाठी योजना केली. पण दुर्दैवाने सध्याच्या सरकारने गेल्या वर्षभरात एकदाही विधिमंडळाचे पूर्णवेळ अधिवेशन घेतले नाही. परिणामी आमदार म्हणून सरकारला मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी धारेवर धरण्याची विशेष संधी मिळाली नाही. तरीही सरकारी यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करून दादा आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.

 

bjp_1  H x W: 0


मोठी
विकासकामे करताना सेवा उपक्रम चालविताना माणसे जोडण्यावर दादांचा अधिक भर आहे. केवळ मदत करायची नाही, तर माणसे आपल्या पायावर उभी राहिली पाहिजेत, यावर त्यांचा भर आहे. मतदारसंघातील महिलांना केवळ साड्या भेट पाठवून किंवा संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून ते थांबले नाहीत. त्यांनी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी 3000 महिलांचा मेळावा आयोजित केला होता.


कोथरूड
हा सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे. अनेक जणांना संपन्नता लाभलेली आहे. त्यांची आर्थिक विकासाची तशी काही कामे नसतात. पण माणसाला सांस्कृतिक गरज असतेच. दादांनीआम्ही कोथरूडकरम्हणून गीत, संगीत, नृत्य आदी कलांचा आविष्कार करणारा भव्य कार्यक्रम आयोजित केला आणि कोथरूडकरांनी उदंड प्रतिसाद दिला.


कोथरूड
हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात संघविचारांच्या मतदारांचे प्राबल्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला येथून निवडून येणे अवघड नाही. तरीही दादा इथे इतके काम का करतात, असा एक व्यावहारिक प्रश्न पडतो. त्यांना विचारले तर ते म्हणतात, “लोकांनी मला या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यांची सेवा करणे हे माझे काम आहे, असे मी समजतो. सेवा करताना आपला-परका असा विचार करायचा नसतो आणि निवडणुकीची गणिते तर बिलकुल मांडायची नसतात, असे मी संघात शिकलो आहे. निवडणूक कशी जिंकायची हे निवडणुकीच्या वेळी पाहू. पण मतदारसंघासाठी एकच मंत्र आहे - सेवा, सेवा, सेवा.”

 

जनतेच्या सेवेला वाहून घेऊन चंद्रकांतदादा पाटील यांनी आपण आपल्या मतदारसंघासाठीप्रजासत्ताकाचे प्रहरीअसल्याचे आपल्या कामाने दाखवून दिले आहे.