निडर विरोधी पक्षनेता

विवेक मराठी    27-Jan-2021
Total Views |
@डॉ. दिनेश थिटे


2014 साली त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर येईपर्यंत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाचे प्रभावी आमदार म्हणून राज्याला परिचित होते. विषयाचा सखोल अभ्यास आणि टोकदार मुद्द्यांच्या आधारे सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची त्यांची क्षमता महाराष्ट्राने पाहिली होती. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकल्यानंतर देवेंद्रजींच्या अभ्यासाला आणि वकिली बाण्याला आणखी धार आली. प्रामाणिकपणे आणि तडफदारपणे काम करणार्या नेत्याला जनतेचा आशीर्वाद मिळतोच, मग भूमिका मुख्यमंत्र्याची असो किंवा विरोधी पक्षनेत्याची असो. प्रजासत्ताकाचे प्रहरी म्हणून देवेंद्रजी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी उत्तम पार पाडत आहेत.


bjp_1  H x W: 0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते, “मी पुन्हा येईन!” विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेली टिप्पणी गाजली होती. विधानसभेची 2019ची निवडणूक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीने 161 जागा जिंकून स्पष्ट बहुमताने निवडणूक जिंकली. जनतेने देवेंद्रजींना पुन्हा मुख्यमंत्रिपदी येण्यासाठी जनादेश दिला. म्हटल्याप्रमाणे ते खरेच पुन्हा आले. या जनादेशाचे एक वैशिष्ट्य आहे. 1985 साली काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत 161 जागा जिंकून काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले होते. त्यानंतर तब्बल 35 वर्षांनी महाराष्ट्रात एखाद्या पक्षाला किंवा निवडणूकपूर्व युतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. जनतेची इच्छा स्पष्ट होती. पण शिवसेनेने दगा दिला. मुख्यमंत्रिपदाच्या लोभाने भाजपाची साथ सोडली आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना मिळाले आणि निवडणूक जिंकूनही देवेंद्रजी विरोधी पक्षनेते बनले. घातपाताने असली, तरी लोकशाहीतील खेळात आपल्या वाट्याला आलेली भूमिका त्यांनी स्वीकारली. गेले सव्वा वर्ष त्यांनी मनापासून ही जबाबदारी पार पाडली.

bjp_1  H x W: 0
 

2014 साली तत्कालीन भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक जिंकली आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे भाजपाच्या सरकारला लाभलेले जनसमर्थन आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा स्वच्छ, पारदर्शक कारभार यामुळे विरोधी पक्षाला काही खोट काढता येत नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला त्या पाच वर्षांत विरोधी पक्ष म्हणून कामगिरी बजावताच आली नाही. विधिमंडळात सरकारला धारेवर धरण्यासाठी त्यांच्याकडे ठोस मुद्दे नव्हते आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची धमकही नव्हती. परिणामी विरोधी पक्ष ही संकल्पना निस्तेज झाली होती. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्षाइतकेच विरोधी पक्षाचे महत्त्व असते. सत्ताधारी पक्षाने केलेल्या चुका दाखविणे आणि जनतेच्या समस्या मांडून लोकांना न्याय मिळवून देणे यासाठी विरोधी पक्ष आवश्यक असतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणूनही कामगिरी बजावता आली नव्हती. अशा परिस्थितीत मित्रपक्षाच्या विश्वासघातामुळे का होईना, विरोधी पक्षनेत्याची भूमिका मिळाल्यावर देवेंद्रजींनी ती अशी काही वठविली की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या आतापर्यंतच्या प्रभावी कामगिरीची आठवण यावी. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 1995च्या सत्तांतरापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सरकारला कसे सळो की पळो करून सोडले होते, याची लोकांना अजूनही आठवण आहे. भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष उत्तमराव पाटील यांच्यापासून भाजपाला प्रभावी विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे. सध्या केंद्रीय मंत्री असलेले नितीनजी गडकरी यांनीही राज्यात विरोधी पक्षातर्फे प्रभावी कामगिरी केली होती. त्याच परंपरेत देवेंद्रजी चपखल बसले आणि अवघ्या सव्वा वर्षात त्यांनी कामाची छाप निर्माण केली.


bjp_2  H x W: 0

देवेंद्रजींनी 1999पासून विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. 2014 साली त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर येईपर्यंत ते विरोधी पक्षाचे प्रभावी आमदार म्हणून राज्याला परिचित होते. विषयाचा सखोल अभ्यास आणि टोकदार मुद्द्यांच्या आधारे सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची त्यांची क्षमता महाराष्ट्राने पाहिली होती. केवळ औपचारिक शिक्षण म्हणून नाही, तर स्वभावतःच त्यांच्याकडे वकिलीची हातोटी आहे. आपला वकिली बाणा ते सातत्याने जनतेच्या हितासाठी वापरत होते. या पार्श्वभूमीवर 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकल्यानंतर देवेंद्रजींच्या अभ्यासाला आणि वकिली बाण्याला आणखी धार आली. एवढा अनुभव असल्यानंतर त्यांच्यासारख्या कसलेल्या राजकीय नेत्याने विरोधी नेत्याची भूमिका समर्थपणे पार पाडावी यात काही नवल नव्हते. विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड दिली आहे. वृत्तपत्रे, विविध अहवाल, सरकारी कागदपत्रे यांचे बारकाईने अध्ययन करून तयारी करण्याबरोबरच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन विषय समजून घेण्यावर भर दिला आहे.

राज्यावर 2020 साली कोरोनाचे महासंकट आले. ते संपूर्ण जगावर आले, भारतावर आले आणि महाराष्ट्रालाही या महासाथीचा फटका बसला. राज्यात मार्च महिन्यात पहिले दोन रुग्ण आढळले. त्यानंतर सुरुवातीला राज्य सरकारने, नंतर केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केला. जनजीवन ठप्प झाले. संपूर्ण समाज कोरोनाच्या दहशतीत जगत होता. अशा वेळी राज्य सरकारने पुढाकार घेऊन जनतेला दिलासा देणे गरजेचे होते. पण शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने निवांतपणावर भर दिला. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस असे कोरोना योद्धे आपापल्या परीने लढत होते, पण सरकार म्हणून कोठे दिसत नव्हते. जनतेला आपल्या नशिबावर सोडून दिले होते. अशा वेळी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस निडरपणे राज्यात ठिकठिकाणी जात होते, जनतेला भेटत होते, त्यांचे दुःख समजून घेत होते. ज्या वेळी राज्याच्या प्रमुखाला घराबाहेर पडण्याचे धैर्य होत नव्हते, त्या काळात देवेंद्रजी बिनधास्त कोविड केंद्रात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेत होते.

या काळात सरकारच्या अपयशाचे वास्तव ठळकपणे त्यांच्या ध्यानात आले. सरकारला धारेवर धरावे असे अनेक खणखणीत मुद्दे त्यांना गवसले होते. पण देवेंद्रजींनी आपले वेगळेपण दाखवून दिले. विरोधी पक्षनेत्याने सरकारच्या चुका दाखवून द्याव्यात हे त्याचे कर्तव्य असते. देवेंद्रजींनी सरकारच्या चुका चव्हाट्यावर मांडल्या असत्या, तर काहीच चूक झाले नसते. पण त्यांनी मात्र चुका दाखविण्यापेक्षा सरकारने चुका सुधाराव्यात यावर भर दिला. संपूर्ण राज्यावर महासाथीचे संकट आहे, अशा वेळी लोकांना दिलासा मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी आपला राजकीय फायदा बाजूला ठेवून सरकारला सावध करावे, अशा भावनेने त्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांना कोरोनाबाबतची वस्तुस्थिती लेखी कळविली आणि त्यावर उपायही सुचविले. देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखविला, तरी दुर्दैवाने आघाडी सरकारने मात्र तसा प्रतिसाद दिला नाही. कोरोनाच्या संकटात वस्तुस्थिती सांगणार्या त्यांच्या पत्रांना उत्तर देण्याचेही सौजन्य या सरकारने दाखविले नाही. पण नाउमेद होता देवेंद्रजी सर्वत्र धावत राहिले, चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या जनतेला धीर देत राहिले.


bjp_1  H x W: 0 

मुंबईत आणि महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची होणारी वाढ, शेकडोंच्या संख्येने होणारे मृत्यू यामुळे परिस्थिती आणखीनच चिंताजनक झाली. रुग्णालयांतील अपुर्या आरोग्य सुविधा, डॉक्टर्स, औषधे, बेड्स, ऑक्सिजन आदींची कमतरता राज्यात प्रकर्षाने जाणवू लागली. कोरोना रुग्णांसाठी ॅम्ब्युलन्स मिळणे, ‘कार्डिअॅक रुग्णवाहिकांची कमतरता, कोरोनापासून बचावासाठी अत्यावश्यक असणारे मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, ‘पीपीईकिट्स आदींच्या गगनाला भिडणार्या किमती अशा स्थितीत प्रशासकीय सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा स्थितीत देवेंद्रजी विरोधी पक्षनेता म्हणून सर्वत्र संचार करत राहिले आणि जनतेच्या समस्या मांडत राहिले. त्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे प्रशासकीय यंत्रणेला काम करावे लागले. महाराष्ट्रात देवेंद्रजींचा आणि भारतीय जनता पार्टीचा दबाव नसता, तर महाविकास आघाडीने जनतेची काय अवस्था केली असती याची कल्पनाच केलेली बरी.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रभावी कामगिरी करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भलताच खेळ खेळला. कोरोनाच्या महासाथीच्या बाबतीत अपयश तर येतच होते, त्याचबरोबर राज्य सरकारने गोरगरिबांना कोणतीही मदत केली नसल्याने नाराजी वाढत होती. अशा वेळी रोज नवे वाद निर्माण करणे आणि सातत्याने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे बोट दाखविणे असा खेळ या आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला. अशा परिस्थितीत राज्यात नुसतेच वाद होऊ लागले आणि मूळ समस्येकडे दुर्लक्ष होऊ लागले. आघाडी सरकारच्या नेत्यांचे डावपेच एका परीने यशस्वी होते होते, पण त्यात जनतेचा जीव जात होता. मग एक दिवस देवेंद्रजींनी पत्रकारांना बोलावले आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला कशी किती मदत केली आहे, याचा आकडेवारीसह हिशेब मांडला. त्यांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे तीन मंत्री धावले. त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला खरा, पण वस्तुस्थिती ही आहे की, देवेंद्रजींनी एकच टोला लगावल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार केंद्राकडे बोट दाखविणे कमी झाले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे हा परिणाम झाला. कोणत्याही विषयात स्पष्ट आकडेवारीच्या आधारे ते मुद्दा मांडतात. खणखणीत पुरावे देतात. मग त्यांच्या म्हणण्याची दखल घ्यावी लागते.

विरोधी पक्षनेत्याचे खरे व्यासपीठ विधिमंडळ असते. विधानसभेच्या व्यासपीठावर संसदीय आयुधे वापरून सरकारला जेरीस आणायचे आणि जनतेला न्याय देण्यास भाग पाडायचे यामध्ये विरोधी पक्षनेत्याचा कस लागतो. पण दुर्दैवाने या आघाडीवर विशेष कामगिरी करण्याची संधी अद्याप देवेंद्रजींना मिळालेली नाही. बहुधा त्यांच्याकडून होणार्या मार्याच्या भीतीने आणि भाजपाच्या 105 आमदारांच्या आक्रमकतेच्या धाकाने असेल, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या सव्वा वर्षात पूर्ण वेळाचे अधिवेशन एकदाही घेतलेले नाही. कोरोनाच्या काळात त्या महासाथीचे कारण होते, पण त्यापूर्वी - म्हणजे मार्च 2020पूर्वी तर तसे काही कारण नव्हते. विधिमंडळ अधिवेशनाचा कामकाज कालावधी कमी कसा राहील आणि देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या मार्याला फारसे तोंड कसे द्यावे लागणार नाही, याचीच काळजी सत्ताधारी आघाडीने घेतलेली दिसते. तरीही मर्यादित कालावधीत जी काही भाषणाची संधी मिळाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असे काही चौकार, षटकार लगावले की सत्ताधारी आघाडी घायाळ झाली. त्यांच्या भाषणांमध्ये प्रभावी मांडणी असते, पण ती भाषणे प्रभावी होण्याचे खरे कारण त्यामध्ये मांडले जाणारे मुद्दे हेच असते. स्पष्ट मुद्दे, निश्चित आकडेवारी आणि निर्विवाद युक्तिवाद हे देवेंद्रजींच्या विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या भाषणांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना कायद्याचे आणि विधिमंडळातील नियमांचे सखोल ज्ञान आहे. त्यामुळे ते सत्ताधार्यांना सहज कोंडीत पकडू शकतात. स्वतः पाच वर्षे सरकार चालविल्यामुळे सरकारी यंत्रणेतील खाचाखोचाही ते चांगल्या जाणतात. मग दुखर्या नसेवर बोट ठेवणे सहज शक्य असते.

 

कोरोनाची महासाथ, कोकणातील निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भातील पूर, अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालेली पिके अशा कोणत्याही संकटात ते जनतेच्या भेटीला धावून गेले. मराठा आरक्षण संकटात आल्यानंतर राज्य सरकारने बैठकीसाठी बोलावल्यानंतर ते बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या प्रचाराचे काम थांबवून मुंबईला धावून आले. ते कोणत्याही अडचणींची आणि संकटांची पर्वा करत नाहीत. राज्यभर इतका संचार केल्यानंतर स्वतःलाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका होता आणि त्यांना कोरोनाची लागण झालीच. पण त्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतला आणि कोरोनाविरोधातील लढाईत सरकारी यंत्रणेचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला. बुद्धिमत्ता, अविरत परिश्रम, आपली भूमिका शक्य तितकी चांगली पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि स्वच्छ प्रतिमा यांच्या जोरावर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणूनही प्रभावी ठरले आहेत. प्रजासत्ताकाचे प्रहरी म्हणून ते आपली जबाबदारी चांगली पार पाडत आहेत. त्यांच्या मुद्द्यांना उत्तरे देता येत नाहीत, म्हणून सत्ताधारी आघाडीकडून भलतेच खेळ खेळले जात आहेत. त्यांची सुरक्षितता कमी करण्याचा आणि त्यांना मिळणारी बुलेटप्रूफ गाडी काढून घेण्याचा निर्णयही असाच आहे. पण त्यामुळे ते डगमगणार नाहीत. “मी सदैव जनतेत असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. सुरक्षा व्यवस्था कमी केली तरी माझ्या दौर्यावर परिणाम होणार नाहीअसे त्यांनी बजावले. त्यांना जनतेच्या प्रेमाचे कवच लाभले आहे, म्हणून तर त्यांना घेरण्यासाठी इतके प्रयत्न करूनही ते अपयशी ठरले. प्रामाणिकपणे आणि तडफदारपणे काम करणार्या नेत्याला जनतेचा आशीर्वाद मिळतोच, मग भूमिका मुख्यमंत्र्याची असो किंवा विरोधी पक्षनेत्याची असो. प्रजासत्ताकाचा प्रहरी म्हणून देवेंद्रजी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी उत्तम पार पाडत आहेत.

9822025621