जनहितासाठी तत्पर आ. सुधीर गाडगीळ

विवेक मराठी    29-Jan-2021
Total Views |

सांगली मतदारसंघातून आमदार सुधीर गाडगीळ यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवला. गेल्या सहा वर्षांत त्यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहेत. त्यातच दोन वर्षे महापूर आणि कोरोरना या सलगच्या आपत्तींना धैर्याने तोंड दिले. जिथे शासनाच्या मर्यादा आहेत तिथे ते संस्था म्हणून पुढे आले.


bjp_1  H x W: 0

गेल्या वर्षभरात कोरोना संकटाला तुम्ही कसे सामोरे गेलात?

संकटे माणसांची परीक्षा बघतात, तशा समाजाच्याही परीक्षा होतात. कोरोनासारखी आपत्तीतून ती होते. अशा काळात एक समाज म्हणून आपले वर्तन कसे होते हे खूप महत्त्वाचे आहे. शासन यंत्रणा काम करीत होत्याच. मात्र त्यांच्याबरोबरीने समाजातील विविध स्वयंसेवी संस्थांनी, व्यक्तींनी हा सुदर्शन पेलला होता. आपले प्रजासत्ताक पंचाहत्तरीच्या दिशेने जात आहे. त्यासाठी हा धडा मला खूप महत्त्वाचा वाटतो. या संकटकाळात आम्ही सांगलीकरांनी गेली दोन वर्षे महापूर आणि कोरोना या सलगच्या आपत्तींना धैर्याने तोंड दिले. जिथे शासनाच्या मर्यादा आहेत तिथे आम्ही संस्था म्हणून पुढे होतो. 23 मार्चपासून टाळेबंदी लागू झाली. पहिल्या टप्प्यात लोकजागृतीचे मोठे आव्हान होते. मतदारसंघात शासनाबरोबरच आम्ही स्वतःच्या प्रचारगाड्या फिरवून जनजागृती केली. चौकाचौकात फलक लावले. या लढ्यात अग्रभागी असणारे कोरोना योद्धे - आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्यासाठी पक्ष कार्यकर्ते पुढे होते. या निमित्ताने समाज आणि प्रशासन एकत्र येऊन काम करीत होते.

कोणत्या प्रमुख कामांचा आपण इथे उल्लेख कराल?

सरकारी यंत्रणा त्यांच्या चौकटीत काम करीत असते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम केले. त्याच वेळी जिथे उणीव आहे, अडचणी आहेत तेथे मार्ग काढण्याची भूमिका मी ठेवली. त्या वेळी डॉक्टर मंडळींकडून एन-95 मास्कची मागणी पुढे आली. आमच्या पीएनजी फर्म अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून असे पाच हजार मास्क्स उपलब्ध करून ते आघाडीच्या सर्व कोरोना योद्ध्यांपर्यंत पोहोचवले. 4 एप्रिलला माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांना 5000 सुरक्षा किट्सचे अन्नपाकिटांचे वाटप केले. शहरात गल्लीबोळात औषध फवारणीची मोहीम कार्यकर्त्यांनी हाती घेतली. अन्नदानाबरोबरच पंतप्रधान निधीस दोन लाख, मुख्यमंत्री निधीस एक लाख आणि भाजपच्या आपदा कोषास एक लाख रुपये दिले. याच काळात आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनाथाश्रमांना रोख मदत दिली. हे जाणीवपूर्वक केले, कारण या काळात या संस्थांचे अर्थकारणच अडचणीत आले होते. मदतीची ही यादी वाढवत नाही, कारण या काळात प्रत्येक जण आपआपल्या परीने खारीचा वाटा उचलत होता.

 
bjp_2  H x W: 0

या काळातील आपले असे काम, जे इतरांसाठी अनुकरणीय ठरेल?

अनेकांनी केलेली अशी खूप कामे आहेत, जी समाजापुढे आलेली नाहीत. माणुसकीच्या भावनेतून त्यांनी केले. या काळात एका वृत्तपत्रांमध्ये शहरातील वेश्यांच्या उपासमारीची बातमी वाचनात आली. यातल्या अनेक वेश्यांना केंद्र सरकारच्या धान्य मदतीचा लाभ होत नव्हता. आम्ही शहरातील अशा अडीचशेवर वेश्यांना दोन महिने पुरेल इतका शिधा तत्काळ पोहोचता केला. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी राज्य शासनाने या महिलांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये द्यायचा निर्णय घेतला. मला वाटते, शासनाच्या पुढे लोकप्रतिनिधींनी पाऊल टाकले पाहिजे. आता जिल्ह्यातील साडेआठशे महिलांना या योजनेचा लाभ होतोय. याच काळात आम्ही शहरातील भगिनी निवेदिता, वेलणकर अनाथालय, भिडे बालगृह या संस्थांमध्ये हापूस आंबे पोहोचवले. पुढे सिव्हिल हॉस्पिटलसाठी तातडीने तीन व्हेंटिलेटर्स दिले. शहरातील काही खासगी कोरोना हॉस्पिटल्सना आम्ही अंजली फाउंडेशन महाबळ मेटल्सच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन्स पुरवली. छोट्या भाजीपाला विक्रेत्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांशी सतत संवाद ठेवत आम्ही या काळात काम केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सर्व पोलिसांसाठी थर्मामीटर्स दिले.bjp_4  H x W: 0 

महापालिकेशी कसा समन्वय साधला?

सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येच्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत मोठी यंत्रणा कार्यरत होती. आयुक्तांसह सर्व संबंधित यंत्रणांसह आम्ही दैनंदिन बैठकांचा सपाटा लावत प्रशासन गतिमान केले. शहरात बेड अपुरे पडू लागल्यानंतर आम्ही महापालिकेच्या वतीनेही आदिसागर मंगल कार्यालयात पंधरा दिवसांत कोविड हॉस्पिटल उभे केले. सुमारे दीडशेवर खाटांच्या या रुग्णालयांमुळे शहरातील नागरिकांची मोठी सोय झाली. मिरजेनंतर सांगली सिव्हिलमध्ये कोविड सेंटर सुरू झाले. त्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना आणि आरोग्य मंत्र्यांना निवेदन देऊन त्यासाठी पाठपुरावा केला. आमच्या विविध संस्थांनी महापालिकेच्या यंत्रणेसह खांद्याला खांदा लावून काम केले. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह पाळला. होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीन्सचे वाटप केले. त्याचा पुढे खूप फायदा झाला.

शासनाच्या कोणकोणत्या योजना वर्षभरात काळात मार्गी लागल्या?

गेले वर्ष संकटाचे होते, तसेच निधीच्या टंचाईचेही होते. अनेक योजनांचा निधी कोविडकडे वळवण्यात आला. कामेही खोळंबली. मात्र त्यातूनही स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 45 लाख रुपयांची कामे मंजूर केली. शहरातीलही 46 लाख रुपयांची कामे मंजूर झाली. जिल्हा वार्षिक योजनेतून अंतर्गत पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता अनुदान योजनेतून 24 लाख रुपयांची कामे मंजूर झाली. यातून सांगलीतील आयर्विन पुलाजवळील माईघाट परिसरातील, तसेच काळ्या खणीजवळील रस्ते-पथदिव्यांचे काम होईल. याशिवाय येत्या वर्षभरात ग्रामीण भागातील 26 लाख 52 हजारांची, तर सांगली शहरातील 19 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नाबार्डच्या माध्यमातून राज्यमार्ग क्रमांक 142 नावरसवाडी फाट्याजवळील पुलाचे 5 कोटी 28 लाख रुपयांचे बांधकाम मंजूर झाले आहे. राज्य शासनाने निधीला हात आखडता घेतल्याने काही कामे मंजूर झाली नाहीत, मात्र येत्या काळात त्यासाठी पाठपुरावा करू.


bjp_3  H x W: 0 

आमदार म्हणून आपली आता दुसरी टर्म. सहा वर्षांतील अशा कोणत्या कामांचा आपण उल्लेख कराल?

कामांची जंत्री खूप असते. मात्र अशी कामे, जी समाजाला पुढे दीर्घकाळ उपयोगी पडतात, त्यांचा मी उल्लेख करीन. सांगलीतील विकसित विश्रामबागमधून रेल्वे मार्ग जातो. दक्षिण उत्तर विश्रामबागला जोडणारा उड्डाणपूल आम्ही पूर्ण केला. या कामामुळे आता विश्रामबागच्या उत्तर बाजूच्या नागरीकरणाला झपाट्याने गती मिळाल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. सांगलीजवळच्या हरिपूरलगतच्या कृष्णा-वारणा संगमावरील पुलाचे कामही पूर्णत्वाकडे असून येत्या पावसाळ्यापूर्वी हा पूल खुला होईल. सांगलीची कनेक्टिव्हिटी आता आणखी वाढली आहे. सांगलीत अपर तहसील कार्यालय आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले. गेल्या टर्ममध्ये मी या कामासाठी पाठपुरावा केला. जवळपास चाळीस वर्षांची मागणी पूर्ण झाली.

 
bjp_5  H x W: 0

सांगलीच्या विकासाला बूस्टर ठरेल अशा कोणत्या कामांचा उल्लेख कराल?

गेल्या तीस वर्षांत कोल्हापूर-पुण्याच्या तुलनेत सांगलीचा विकास खुंटला, याची कारणे शोधली तर सांगलीच्या हायवे कनेक्टिव्हिटीचा मुद्दा पहिल्यांदा चर्चेत येतो. पुणे-बंगळूर महामार्ग (जो आता आशियाई मार्ग झाला आहे) पेठमधून सांगलीशी सहा पदरीने जोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही आणखी पाठपुरावा करून आता सांगलीत बायपासपर्यंत आता भिलवडी पाचव्या मैलापासून सहा पदरीने जोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकापर्यंत हा महामार्ग सांगलीला येऊन भिडेल. जिल्ह्यात चार महामार्गांची कामे गतीने सुरू असून आता सांगलीच्या सभोवतालांनी हे महामार्ग जातात. त्यांचा लास्ट मैल जोडण्याची कामे आम्ही गतीने घेत आहोत. याबरोबरच सांगलीत एक मोठा उद्योग यावा यासाठी गडकरींच्या माध्यमातून माझे प्रयत्न सुरू आहेत. येत्या चार वर्षांत हे काम नक्की पूर्ण होईल. साठ कोटींच्या वाहनतळाचे कामही मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत. बायपास रस्त्याला हा वाहनतळ जोडलेला असेल. सिव्हिल हॉस्पिटलची नवी इमारत आता पूर्णत्वास आली आहे. वसंतदादांनंतर प्रथमच या हॉस्पिटलसाठी इतके भरीव काम झाले. इथे आता सर्व सोयी-सुविधा असाव्यात यासाठी माझे प्रयत्न आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगली शहरातील मध्यवर्ती काळ्या खणीच्या विकासासाठी सर्व परवानग्या द्यायचा शब्द दिला आहे. हे कामही येत्या चार वर्षांत मार्गी लागलेले असेल. सांगली महापालिका क्षेत्रासाठी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची फेरनिविदा काढून जनहिताचा प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. येत्या वर्षभरात हे कामदेखील मार्गी लावू.

मुलाखत - प्रतिनिधी