@राजेश कुलकर्णी
नाशिक येथे होणार्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. नारळीकर यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या असून विज्ञानावर आधारित त्यांची इतर साहित्यसंपदाही आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र कला अकादमी पुरस्कार या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. नारळीकरांच्या निमित्ताने प्रथमच एका संशोधक व विज्ञान कथालेखकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये 26 ते 28 मार्चदरम्यान होणार्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘नारायण विनायक जगताप’ यांची झालेली निवड अतिशय स्वागतार्ह आहे. त्यांनी 1974मध्ये पहिल्याच प्रयत्नात लिहिलेल्या ‘कृष्णविवर’ या विज्ञानकथेला मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवले होते. चमकलात ना? खगोलशास्त्र (अॅस्ट्रॉनॉमी) आणि ब्रह्मांडशास्त्र (कॉस्मॉलॉजी) या क्षेत्रात आधीच मोठे नाव कमावलेल्या डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी आपण मराठीतून विज्ञानकथा लिहू शकतो का, याची चाचपणी करण्यासाठी ते नाव धारण करून या स्पर्धेत भाग घेतला होता. आणि या पहिल्याच प्रयत्नात त्यांना त्याची पावती मिळाली. आपले खरे नाव परीक्षकांना कळायला नको, यासाठी त्यांनी वरील नावाने या स्पर्धेत भाग घेतला होता.
डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूरमध्ये 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री प्रख्यात संस्कृत पंडित. वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख, तर आई सुमती नारळीकर या संस्कृतज्ञ. वडील उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले असता 1932मध्ये पं. मदनमोहन मालवीय त्यांना तेथे भेटले आणि ते केवळ 24 वर्षांचे असताना त्यांना वाराणसीत गणिताचे प्राध्यापक म्हणून येण्याची विनंती केली. योगायोगाने छोट्या जयंतलाही शालेय जीवनापासून गणितातच चांगली गती होती. त्यांची गणितातील गती पाहून वडलांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तेजन दिले. वाराणसीमधील शालेय शिक्षणांनतर 1957मध्ये तेथूनच पदवी मिळवल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला प्रयाण केले. त्यासाठी व पुढील शिक्षणासाठी त्यांना जमशेदजी टाटांनी स्थापित केलेली शिष्यवृत्ती मिळाली. तेथे गणितातील संशोधनाचा भाग म्हणून आणि फ्रेड हॉएल यांच्या व्याख्यानांमुळे प्रभावित होऊन त्यांनी खगोलशास्त्रीय विषय हाताळण्याचे ठरवले आणि तेथून पुढे त्यांची खगोलशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी या अथांग विषयांवरील संशोधनाची यात्रा सुरू झाली. 1963मध्ये त्यांनी पीएचडी पूर्ण केली. 1965मध्ये भारतदौर्यावर आले असता त्यांना राष्ट्रपती राधाकृष्णन, पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री व शिक्षणमंत्री छागला यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या काळात देशात परतण्यासाठी त्यांना अनेक देकार मिळाले, मात्र संशोधनातील काही भाग बाकी असल्यामुळे त्यांनी हा विचार पुढे ढकलला. त्यांचे संशोधन चालू असतानाच - म्हणजे 1965मध्ये वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला. पुढे 2004मध्ये यावर पद्मविभूषण सन्मानाचा कळस चढला. गणितज्ञ असलेल्या मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी 1966 साली त्यांचा विवाह झाला. त्यांनी एम.ए.ला मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवले होते. पुढे त्यांनी बर्याच उशिरा गणितातच पीएचडी केली व अध्यापन केले. इंग्लंडमधील वास्तव्यात डॉ. नारळीकरांचे मार्गदर्शक फ्रेड हॉएल यांच्याशी मैत्र जमले आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये देदीप्यमान कामगिरी केली. आपल्या ‘स्टेडी स्टेट’ सिद्धान्ताच्या संशोधनाने त्यांनी प्रचलित बिग बँग सिद्धान्ताला आव्हान दिले. तेथील वास्तव्यादरम्यान त्यांनी केंब्रिज अक्षरश: गाजवले असे म्हणता येईल. यादरम्यान त्यांनी मिळवलेले सन्मान आणि त्यांनी पार पाडलेल्या जबाबदार्या यांची जंत्री केवळ विस्तारभयास्तव देता येत नाही. पुढे 1972मध्ये ते भारतात परत येऊन मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (ढखऋठमध्ये) आपले संशोधन चालू ठेवले. देशातील विविध विद्यापीठांमधील अंतराळविषयक संशोधनात कसलीही सुसूत्रता नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वातंत्र्यानंतर झालेली विद्यापीठांची अधोगती पाहता संशोधनातून काही भरीव निष्पत्ती व्हायची, तर ती विद्यापीठांमधून नव्हे तर संशोधन संस्थांमधूनच होईल अशी स्थिती देशात निर्माण झाल्याची जाणीव त्यांना झाली. ‘आयुका’च्या (खगोलशास्त्र व खगोलभौतिकी आंतरविद्यापीठीय केंद्राच्या) स्थापनेच्या निमित्ताने ही फार मोठी उणीव भरून काढता येईल, असे त्यांना वाटले आणि टाटांच्या संशोधन संस्थेतील सतरा वर्षांची कारकिर्द संपवत त्यांनी यूजीसीच्या प्रा. यशपाल यांचे यासाठीचे निमंत्रण स्वीकारले. पुढे ही संकल्पना वास्तवात आली आणि त्या निमित्ताने संशोधकाचे रक्त असलेल्या डॉ. नारळीकरांनी आपल्यातील उत्तम प्रशासकाचीही ओळख दाखवली. 1963मध्ये - म्हणजे शिक्षण चालू असताना ते लंडनमधील रॉयल खगोलशास्त्र सोसायटीचे पार्टनर होते. 1978मध्ये त्यांना देशातील प्रतिष्ठेचा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ मिळाला आणि पुढे 1996मध्ये युनेस्कोतर्फे दिला जाणारा विज्ञानाच्या प्रसारासाठीचा कलिंग पुरस्कार मिळाला. पुढे 2004मध्ये त्यांना फ्रान्सच्या खगोलशास्त्रीय सोसायटीने सन्मानित केले. 2010मध्ये त्यांना राज्य सरकारचा महाराष्ट्रभूषण हा सन्मान जाहीर झाला.
‘द लाइटर साइड ऑफ ग्रॅव्हिटी’ या पुस्तकात त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा वरवर सोपा वाटणारा, परंतु क्लिष्ट असलेला विषय अतिशय सोप्या व रंजक पद्धतीने समजावला आहे. ते करताना त्यांनी भारतीय संस्कृतीतील ध्रुव तार्यासारख्या उदाहरणांचाही संदर्भ दिलेला आहे. ‘द सायंटिफिक एज (एवसश)’ या आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी प्राचीन काळापासून आजवरच्या भारतीय संशोधनाचा आढावा घेतलेला आहे आणि एकेकाळी अतिशय प्रगत असलेली भारतातील संशोधनसंस्कृती का ठप्प झाली असावी, याचाही ऊहापोह केला आहे. ‘आकाशाशी जडले नाते’ या ग्रंथरूपी पुस्तकात त्यांनी खगोलीय विश्वाचा अतिशय सखोल असा आढावा घेतला आहे. ज्याला या क्षेत्रात जेवढी रुची आणि जेवढे कुतूहल, तेवढे घेता यावे अशा पद्धतीने या ग्रंथाची उत्कृष्ट मांडणी झाली आहे.

मराठी विज्ञानलेखनामधील ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक, तर विज्ञानकथांमधील ‘वामन परत न आला’ ही कादंबरी यांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे ते सांगतात. 14 फेब्रुवारी 2013 रोजीच्या लोकसत्तामधील ‘कल्पनेपेक्षाही वास्तव अद्भुत’ या लेखामध्ये त्यांनी त्यांची विज्ञानलेखनाची वाटचाल सविस्तर सांगितली आहे. तो लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. ‘मराठी वाङ्मयातील नवे प्रवाह’ या 1993च्या ग्रंथामध्ये ‘विज्ञान साहित्य’ या लेखात डॉ. नारळीकर यांनी विज्ञानलेखनाचे सहा प्रकार सांगितले आहेत. वैज्ञानिक विषयांवरील संशोधन प्रबंध, विज्ञान शाखा-उपशाखांवरील परीक्षणे, वैज्ञानिक मुद्द्यांची नियतकालिकांमधून केलेली उकल, विज्ञान माहितीकोश, मासिक-पुस्तकांमधील वैज्ञानिक माहिती देणारे लेख आणि कथा-कादंबरी-कविता-नाटके हे ते सहा प्रकार. ज्या क्रमाने हे सहा प्रकार मांडले आहेत, त्याच क्रमाने त्यातील विज्ञानाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्या-त्या माध्यमाचे महत्त्व वाढत जाते, असे ते सांगतात. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, व्हायला हवा; मात्र मराठीमध्ये लिहिण्यात येणार्या विज्ञानकथा बव्हंशी भयकथा वाटतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांच्या वैज्ञानिक लेखनाचे वैशिष्ट्य असे की ते त्या बाबतीत असलेल्या पारंपरिक गैरसमजुती दूर करतात. उदाहरणार्थ, गॅलेलियोने वा इतरांनी केलेल्या संशोधनातील त्रुटींचे बारकावेही ते दाखवून देतात. तेव्हा तीच पद्धत ते प्राचीन भारतीयांच्या संशोधनाबाबत आता उपलब्ध असलेल्या उल्लेखांबाबत अवलंबतात, यात आश्चर्य नाही. एखादा सिद्धान्त संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात चुकीचा ठरला, तरी त्या काळात त्याच्या आधारावर पुढील सुधारणा झालेली असते, हे ते उदाहरणांसह दाखवून देतात. पुराणातील विमाने, ब्रह्मदेवाच्या संदर्भातील सापेक्षतावादाचा सिद्धान्त, महाभारतातील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला बसल्या जागी सांगणारा संजय, अंतराळात स्वैर संचार करणारे देव-गंधर्व, गणपतीला असलेले हत्तीचे शिर या व अशा अनेक उदाहरणांची आजच्या काळाशी सांगड घालत ‘त्या’ काळातही आजचे तंत्रज्ञान अस्तित्वात होते असा दावा करण्याची सहजप्रवृत्ती आपल्याकडे आढळून येते. सहसा असे दावे करणार्या व्यक्ती स्वत: संशोधन क्षेत्रात नसूनही असा सवंगपणा करण्यात धन्यता मानत असतात. काही जण याचा प्रतिवाद करताना वेद-उपनिषद-पुराण वगैरे वारशात काही विज्ञान आहे हे साफ नाकारून आपली मानसिक गुलामगिरी दाखवत असतात, तर काही जण स्वप्नरंजनाचे दुसरे टोक गाठत असतात. डॉ. नारळीकरांचे याबाबतचे म्हणणे इतकेच की याबाबत केवळ विधानांपेक्षा या दाव्यांना पूरक असे आणखी काही तपशील मिळाले, तर या दाव्यांना पुष्टी देता येईल. आता कालौघात यातले कोणते संदर्भ मिळणे खरोखर शक्य आहे, हा प्रश्न पाहता हे अनुत्तरितच राहील की कसे, हे पाहावे लागेल. वैज्ञानिक निकष लावले की उपलब्ध पुरावा पुरेसा नाही, असे म्हणावेच लागते; असे असले, तरी हा प्रश्न येथे संपत नाही आणि याबाबतचे आव्हान पुराण वाङ्मय संशोधकांनी स्वीकारावे, असे त्यांचे सांगणे आहे. अर्थात या प्राचीन ज्ञानाचा अर्थ लावून आजच्या संदर्भात ते पडताळून पाहण्यापुरतेच नव्हे, तर भविष्यातील संशोधनासाठी ते कसे वापरता येईल, हे फार मोठे आव्हान आहे. अन्यथा आपण समृद्ध वारसाशून्य नव्हतो हे दाखवण्यापलीकडे त्याचा काही उपयोग उरणार नाही. कारण हे बहुतेक ज्ञान संस्कृतमध्ये उपलब्ध आहे आणि आज बहुतेक वैज्ञानिकांना संस्कृतचे वावडे आहे. याच प्रकारे डॉ. नारळीकरांचा ज्योतिषशास्त्राला मोठा विरोध आहे, हे सर्वविदित आहे. ज्योतिषशास्त्राची परीक्षा करण्यासाठी स्वत:च कसोट्या ठरवायच्या की या पद्धतीच्या विविध मर्यादा मान्य करून हे भविष्यकथन कसे केले जाते याची अचूकतेच्या दृष्टीने पडताळणी करायची, याबाबत त्यांच्याशी कोणाची चर्चा झाली आहे का, हे कळण्यास मार्ग नाही. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त सर्वंकष नसला, तरी तो सरसकटपणे नाकारता येत नाही हे ते स्पष्टपणे सांगतात.
मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे सर्वविदित आहेत. परंतु देशातील शासन व्यवस्थेच्या इच्छाशक्तीचा अभाव ते प्रत्यक्षात आणण्याच्या नेहमीच आड येतो. जर विचार करण्याची क्षमता मातृभाषेतील शिक्षणामुळे वृद्धिंगत होत असेल, तर मग त्याचा मुलांच्या कल्पकतेवरही विपरीत परिणाम होत नसेल का? मात्र आपल्याकडचा विचारप्रवाह असा असतो की किमान गणित आणि विज्ञान हे विषय तरी इंग्लिशमधून शिकवले जावेत. नेमक्या याच कारणाने डॉ. नारळीकर विज्ञानाचे विषयदेखील मातृभाषेतून शिकवले जावेत असे सांगतात. इंग्लिश माध्यमातून शिकण्यातून इंग्लिश भाषा येण्याखेरीज (अर्थात हेदेखील साध्य झाले, तर!) आणखी काय साध्य होते? हा प्रश्न ते उद्विग्नपणे विचारतात.

डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्यसंपदा
(संदर्भ: विकिपीडिया). यात इंग्लिश, हिंदी व इतर भाषांमधील पुस्तकांचा अंतर्भाव नाही.
विज्ञानकथा पुस्तके : अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
विज्ञानविषयक इतर पुस्तके : अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप.
डॉ. नारळीकरांनी लिहिलेल्या आत्मचरित्राव्यतिरिक्त डॉ. विजया वाड यांनी लिहिलेले ‘विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर’ हे त्यांचे चरित्रही उपलब्ध आहे.
2014मध्ये ‘चार शहरांतले माझे जीवन’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता आणि त्याच्या पुढच्याच वर्षी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या पुरस्कारवापसीच्या खोडसाळ मोहिमेच्या वेळी त्यांनी आपला पुरस्कार परत न करण्याचे ठरवले होते. यात साहित्य अकादमीचा काही दोष नाही, कायदा-सुव्यवस्थेसाठी आवाज उठवला जावा असे त्यांचे म्हणणे होते.
डॉ. नारळीकरांच्या मिश्कील स्वभावाची उदाहरणे त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी मिळतात. याबाबत एक भिक्षेकरी व कुत्रा त्यांचे भांडण घेऊन रामाकडे जातात, तेव्हा कुत्रा त्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रामास जे सुचवतो, त्याचा त्यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अवस्थेशी जोडलेला संबंध फार मजेशीर आहे.
सेलिब्रिटी आणि सह्यांसाठी चाहत्यांची गर्दी हा प्रकार आपल्याला नवा नाही. डॉ. नारळीकरांच्या स्वाक्षरीसाठी बाळगोपाळांची झुंबड उडते. त्या वेळी ते अगदी प्रेमाने त्यांना सांगतात की तुम्ही पोस्टकार्डाद्वारे त्यांना एक प्रश्न विचारा आणि मग ते उत्तरादाखल जे पत्र पाठवतील त्यावर त्यांची स्वाक्षरी मिळेल. अशा प्रकारे हजारो मुलांना त्यांनी प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले आहे. त्यापैकी काही प्रश्नोत्तरे पुस्तिकारूपाने प्रसिद्ध केली आहेत. या विलक्षण उपक्रमाचे साहित्यिक मूल्य कसे जोखणार? यावरून ‘कथित’ साहित्याबाबतचा आणखी एक विरोधाभास दाखवावासा वाटतो. बालसाहित्य हा प्रकार जणू कमी दर्जाचा हे समीकरण आपल्याकडे बनवले गेलेले आहे. म्हणूनच बालसाहित्याशी संबंधित कोणी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बसल्याचे फारसे दिसत नाही. फार फार तर बालसाहित्याचीच लघुसंमेलने भरवा व आपली हौस भागवून घ्या असा प्रकार दिसतो. लहान मुलांसाठी लिहायचे तर त्यांचा वयोगट आणि त्याला साजेसे मानसशास्त्र जाणून घ्यायला हवे, याची दखल कोणीच घेत नाही. तोच प्रकार विज्ञानकथांचा. विज्ञानकथा म्हटले तरी वयोगटानुसार शाळकरी मुलांपासून प्रौढांपर्यंत वाचकांचे आकलन वेगळे असणार, याची दखल घेतली जात असावी का? कोणी म्हणेल की मुळात विज्ञानकथा या प्रकारालाच प्रतिष्ठा नाही आणि मी हे आणखी पुढचे काय विचारत आहे! मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार व्हावा ही डॉ. नारळीकरांची कळकळ आहे, त्यासाठी हेदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. संशोधनामधील आपले मार्गदर्शक फ्रेड हॉएल यांच्याकडून डॉ. नारळीकरांनी विज्ञानकथा लिहिण्याची प्रेरणा घेतली. त्यांनीच लहान मुलांसाठी विज्ञान नाटक लिहिले होते. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याबाबत आपल्याकडे केवढा अंधार आहे, याची कल्पना यावी.
दोन वर्षांपूर्वी डॉ. अरुणा ढेरे यांची अध्यक्षपदी यथार्थ निवड केल्याचे प्रायश्चित्त म्हणून की काय, नयनतारा सहगल यांच्यासारख्या भयगंड निर्माण करण्याखेरीज दुसरे काही करू न शकणार्या, उसासेखोर बाईंना संमेलनाला बोलावण्याचा घाट घालून अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने डॉ. ढेरे यांना स्वत:ला व रसिकांनाही त्यांच्या निवडीचा आनंद पुरेपूर घेता येणार नाही, याची दक्षता घेतली होती. मागच्या वर्षी तर मंडळाने हद्दच केली. कोणत्याही अंगाने साहित्यिक नसलेल्या व धर्मांतराचे निलाजरे समर्थन करणार्या फादर दिब्रिटो यांना संमेलनाच्या अध्यक्षपदी बसवून मंडळाने आजवरच्या संमेलनांच्या अध्यक्षांची यादी कलंकित केली. याच मंडळाने आता अध्यक्षपदी डॉ. नारळीकरांची निवड करून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा गोड धक्का तर दिला आहे; परंतु मागच्या अनुभवाप्रमाणे मंडळाने इतर कारणाने वाद निर्माण करू नये म्हणजे मिळवली.
वर उल्लेख केल्याप्रमाणे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले व सिद्धहस्त संशोधक असलेले डॉ. नारळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्याला न रुचणारे काही खडे बोल ऐकवण्याची शक्यता गृहीत धरायला हवी. खरे तर भयानक मालिकांच्या मनोरंजनात, सार्वजनिक बेशिस्तीत, अंधश्रद्धांमध्ये आणि जाती-धर्माच्या नावाखाली बजबजपुरीत बुडालेल्या आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा लवलेशही नसलेल्या समाजाला झोडपण्याची संधी त्यांनी सोडूच नये. त्यामुळे या बजबजपुरीचे वावडे नसलेल्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत सावधपणेच केलेले बरे. अर्थात ऋषितुल्य व वडीलधारे डॉ. नारळीकर केवळ झोडपणारे नव्हेत, आधार देणारेही आहेत.