बालपण आणि शिक्षण

विवेक मराठी    09-Jan-2021
Total Views |

@बाबाजी काठोळे

 वाडा तालुक्यातील गालतरे या आदिवासी कुटुंबात जन्मलेले विष्णू सवरा. शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना विष्णू सवरा यांनी अतिशय कष्टाने शिक्षण पूर्ण केले. त्यांची शिक्षणाची गतीही चांगली होती. माध्यमिक शिक्षणात संस्कृत विषय असल्याने संस्कृत भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. संस्कृतमधील अनेक सुभाषितं त्यांना तोंडपाठ झाली. हलाखीच्या परिस्थितीत घेतलेलं शिक्षण आणि माधवरावांचे विचार यामुळे विष्णूंना समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. संघाच्या शिबिरातून मिळालेल्या विचारांची शिदोरी घेऊन परतलेले विष्णू कायमस्वरूपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सच्चे पाईक बनले.


RSS_1  H x W: 0

वाडा तालुक्यातील गालतरे या आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावातील रामा आणि यशोदा सवरा हे आदिवासी कुटुंब मोलमजुरी करून राहत असे. कमालीचं दारिद्र्य असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट उपसण्याशिवाय या सवरा दांपत्याकडे पर्याय नव्हता. राब राब राबत असतानाच रामा आणि यशोदा सवरा दांपत्याच्या पोटी जून १९५० रोजी विष्णूंचा जन्म झाला. सवरा कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विष्णूंच्या पाठीवर बबन, इंदू, सोमनाथ, किसनी, कांता, मंदा आणि संजू (साधना) ही भावंड जन्माला आली. परिस्थिती अत्यंत हलाखीची. विष्णूंची आई खूप कष्टाळू होती. तिने मोठ्या हिमतीने आणि नेकीने या सर्व मुलांचं संगोपन केलं. मुलंही नीटनेटकी आणि स्वाभिमानी होती. आहे त्या परिस्थितीत जगण्याचा संघर्ष करत होती. शेजारच्या बायाही नेहमी म्हणायच्या, “हालातली पोरा आहेत! पण किती मस्त आहेत! कुणाकडे हात पसरत नाहीत.” स्वाभिमानाने जगणं हे तत्त्व विष्णू सवरांनी जीवनभर जोपासलं.

 

विष्णू पाच-सहा वर्षांचे झाल्यानंतर वडिलांनी त्यांना गावातल्या शाळेत घातलं. गालतरे गावात चौथीपर्यंत शाळा होती. त्यांच्यासोबत लहान भाऊ बबनही शाळेत जाऊ लागला. पण बबनला शिक्षणात फार गोडी नव्हती. त्याची शाळा पहिलीतच थांबली. बबनसोबत शाळेत जाताना विष्णू चांगल्याच खोड्या करत असत. एरवी शांत आणि संयमी असलेले विष्णू बबनसोबत मात्र खूपच मौजमस्ती करत असत. ते मौजमस्ती करत असले, तरी तेवढेच शिस्तीचे आणि संस्कारांचे भोक्ते होते. गावातील इतर मुलं आपल्या आईला 'आया' म्हणत, तेव्हा तेअरे, आया नाही, आई म्हणा!” सुंदर आणि चांगल्या गोष्टींची ओढ त्यांच्यात शिक्षणाने अधिक वृद्धिंगत होत गेली.

चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर विष्णूला शाळेत कुठे टाकायचं हा प्रश्न त्यांच्या वडिलांपुढे निर्माण झाला. अभ्यासात हुशार असलेल्या आपल्या मुलाला पुढे शिकवायचं याची विष्णूच्या वडिलांनी खूणगाठ बांधली होती. जवळच्याच गोऱ्हे गावातील परिचयाच्या विठ्ठल कुंभारांच्या घरी विष्णूच्या राहण्याची सोय लावून तिथल्या शाळेत घातलं. घरातीलच एक मूल म्हणून विष्णू विठ्ठल कुंभारांच्या घरी राहून शिकू लागले. कुंभार कुटुंबानेदेखील त्यांच्यावर मुलागत प्रेम केलं. गोऱ्हे येथील शाळेतून पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मनोर येथील लालबहादुर हायस्कूलमध्ये सहावी इयत्तेत दाखल करण्यात आलं आणि अकरावीपर्यंतचं शिक्षण मनोरमध्येच झालं. आदिवासी सेवा मंडळाच्या वसतिगृहात राहून ते शिकू लागले. आप्पा पाध्ये नावाचे गृहस्थ हे वसतिगृह चालवत असत. प्रवेशासाठी शक्य तेवढं धान्य विद्यार्थ्यांकडून घेऊन प्रवेश दिला जाई. वसतिगृहाच्या शिस्तीत विष्णूंचं शिक्षण सुरू झालं. विष्णूचं अक्षर सुबक असल्याने पाध्येसर वसतिगृहाच्या दफ्तराचं लिखाणकाम त्यांना सांगत असत. त्यामुळे विष्णू पाध्येसरांचा लाडका विद्यार्थी बनला. सुंदर अक्षरामुळे त्यांनी पुढे आमदारकीच्या काळात लाखो पत्रं स्वहस्ताक्षरात लिहिली.

 

मनोरच्या वसतिगृहातील दिवस विष्णूंना माणूस म्हणून घडवत होते. व्यायाम, प्रार्थना, स्वावलंबन यामुळे विद्यार्थी स्वयंशिस्तीने घडत. कुटुंबापासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेणं हे आई-वडिलांना मुलाच्या आठवणीने दु: देणारं असे. त्यामुळे वडील महिना-पंधरा दिवसात विष्णूला भेटायला येत असत. येताना वैतरणा नदीचे मासे आणि भाकरी आणत. पाध्येसरांनाही विष्णूच्या वडिलांनी आणलेला डबा खायला आवडत असे. त्यामुळे पाध्येसरांनाच विष्णूच्या आधी त्याच्या वडिलांची आठवण येत असे. शिक्षण सुरू असताना कायम अभ्यासावर लक्ष केंद्रित करून विष्णूंनी वर्गातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. माध्यमिक शिक्षणात संस्कृत विषय असल्याने संस्कृत भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. त्यांना भविष्यात त्याचा खूप फायदा झाला. शंकरराव ओक नावाच्या संस्कृत शिक्षकाने खूप सोप्या रितीने संस्कृत विषय शिकवल्याने विष्णूंना संस्कृतमध्ये अधिक गोडी वाटू लागली. संस्कृतमधील अनेक सुभाषितं त्यांना तोंडपाठ झाली.

१९६८ साली ५७ टक्के गुण मिळवून विष्णू दहावी उत्तीर्ण झाले खरे, पण पुढील शिक्षणासंदर्भात घरच्यांना आणि त्यांनाही फारशी कल्पना नसल्याने शिक्षण थांबलं होतं. परिस्थितीही हलाखीची होती. त्यामुळे पुढचं शिक्षण घ्यायचं तरी कसं? हा प्रश्न विष्णूंना सतावत होता. एकेदिवशी नाणे गावातील तातू पडवळे नावाचे गृहस्थ त्यांच्या घरी आले. त्यांनी विष्णूची आस्थेने चौकशी केल्यानंतर पुढील शिक्षणाचा सल्ला दिला. तातू पडवळेंचा सल्ला शिरोधार्य मानून विष्णू शिक्षणाचे मार्ग शोधू लागले आणि ते पुढील शिक्षणासाठी भिवंडीतील बी.एन.एन. महाविद्यालयात गेले. त्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बी.एन.एन. महाविद्यालय हा एकमेव पर्याय होता. पद्मश्री अण्णासाहेब जाधवांनी स्थापन केलेल्या हरिजन-गिरिजन उन्नती मंडळाच्या बी.एन.एन. महाविद्यालयात आणि विद्याश्रम वसतिगृहात राहून विष्णूचं उच्च शिक्षण सुरू झालं. तलासरी परिसरातून आलेली पाच-सहा मुलंही याच वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. खासदार राहिलेले अॅवड. चिंतामण वनगा, रमेश गोरखना, कांचन वाडू असे विद्यार्थी या वसतिगृहात होते.

विज्ञान शाखेत प्रवेश घेत विष्णूचं उच्च शिक्षण सुरू झालं. मात्र ग्रामीण भागातील असल्यानं विज्ञान शाखेचा इंग्लिशमधून असणारा अभ्यासक्रम त्यांना जड जाऊ लागला. अभ्यासक्रम समजत नसल्याने काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. मनाचा गोंधळ उडाला. अशातच मित्राने दिलेल्या सल्ल्याने त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. विद्याश्रम वसतिगृहातील वातावरण खूप खेळीमेळीचं होतं. अभ्यासाबरोबरच खेळण्यालाही महत्त्व होतं. त्यामुळे धावणे, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल आदी खेळांमध्ये विष्णू रस घेऊ लागले.

 

वसतिगृहात राहणारी तलासरीतील जी पाच-सहा मुलं होती, त्यांना माधवराव काणेंनी उच्च शिक्षणासाठी येथे दाखल केलं होतं. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी माधवराव नियमितपणे वसतिगृहात येत असत. त्यांची आस्थेने चौकशी करत. माधवराव कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. कल्याणच्या नगराध्यक्षपदाचा त्याग करून त्यांनी तलासरीसारख्या दुर्गम आदिवासी भागात जनकल्याणाचं काम हाती घेतलं होतं. आदिवासींच्या दुर्बलतेचा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू होतं. ते थांबवण्याचं आव्हान माधवरावांनी स्वीकारलं होतं. आदिवासी समाजात शिक्षण आल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत, म्हणून त्यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. त्या दृष्टीने त्यांनी नेटाने काम सुरू केलं. त्याचं केंद्रबिंदू होतं तलासरीचं वनवासी कल्याण केंद्र. माधवरावांनी हेही जाणलं होतं की आदिवासींचं होणारं धर्मांतर हे देशापुढील मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील शिकलेली पिढीच या प्रश्नाला उत्तर असणार आहे, याची पुरती जाण माधवरावांना होती. म्हणून त्यांनी भिवंडीत शिकणाऱ्या या मुलांवर लक्ष केंद्रित केलं होतं. आदिवासींच्या घरात उच्च शिक्षणाची ज्योत पेटली नव्हती. उद्या हीच मुलं शिकून ज्ञानज्योती बनतील आणि इथल्या निद्रिस्त अन पिचलेल्या समाजात नवा प्रकाश आणतील, याचा माधवरावांना विश्वास होता. ते वारंवार विद्याश्रम वसतिगृहात येत. तलासरीतील विद्यार्थ्यांशी गप्पा करत. या गप्पांमधून देशाची सद्य:स्थिती, राष्ट्र म्हणून निर्माण झालेले प्रश्न, देशापुढील आव्हानं, सामाजिक, धार्मिक वातावरण यावर आपले राष्ट्रवादी विचार मांडत. या काळात विष्णूही माधवरांवांच्या विचाराने प्रभावित झाला. माधवरावांशी गुरु-शिष्याचं नातं जोडलं गेलं. दोन वर्षांत माधवरावांशी आलेला संपर्क अधिक दृढ झाला. त्यांच्या विचारसरणीचा एक भाग झाले. त्यातूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले.

 

माधवरावांचं वसतिगृहात येणं हे विष्णूसह अन्य मुलांसाठी वेगळा आनंद, अनुभव देऊन जात असे. माधवरावांचे विचार ऐकणं त्यांच्यासाठी पर्वणी असे. माधवरावही या मुलांच्या मनावर राष्ट्रवादाची, हिंदुत्ववादाची पेरणी करत. सुसंस्कृत विद्यार्थी घडावा म्हणून ते झटत. चौदावीच्या परीक्षेनंतर विष्णूचं आयुष्यच बदललं. मे महिन्याच्या सुट्टीत नाशिक येथे संघाचा एक महिन्याचा वर्ग भरणार होता - ज्याला प्रथमवर्ष असं म्हणतात - त्या शिबिराने विष्णूंना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली.


या
शिबिरात अटलबिहारी वाजपेयी, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची बौद्धिकं झाली. शिबिरातील वैचारिक मंथनातून विष्णूंना नवी दृष्टी मिळाली. शिबिरातून मिळालेल्या विचारांची शिदोरी घेऊन परतलेले विष्णू कायमस्वरूपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सच्चे पाईक बनले. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पदवीच्या अंतिम वर्षाचं शिक्षण सुरू झालं. नियमित महाविद्यालयात हजर राहून आणि नियमितपणे अभ्यास करून विष्णू १९७३ला द्वितीय श्रेणीने बी.कॉम.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. आपल्या अशिक्षित आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचा विष्णूंना खूप आनंद झाला. हलाखीच्या परिस्थितीत घेतलेलं शिक्षण आणि माधवरावांचे विचार यामुळे विष्णूंना समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.