‘संघ सुगंध’ पुस्तकाचे भैय्याजी जोशी यांच्या हस्ते प्रकाशन

विवेक मराठी    13-Oct-2021
Total Views |
नाशिक : ‘विवेक प्रकाशना’तर्फे प्रकाशित होणार्‍या ‘संघ सुगंध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे पार पडणार आहे.शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड येथे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रा. स्व. संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह आणि अ. भा. कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, प. महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 

book_1  H x W:  
 
डॉ. त्र्यंबक गंगाधर गायधनी तथा राजाभाऊ गायधनी यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रेरणेतून १९३६ पासून संघ कार्याला प्रारंभ केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. सायंशाखेतील गटनायकापासून, शाखा मुख्य शिक्षक, कार्यवाह, शहर व जिल्हा कार्यवाह, शहर व जिल्हा बौद्धिक प्रमुख, जुन्या मुंबई विभागाचे विभाग सहकार्यवाह, नाशिक-धुळे-जळगाव विभागाचे सहकार्यवाह अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. १९४७ मध्ये इगतपुरी तालुका प्रचारक होते.
मराठी विषयाचे अभ्यासक, एम.ए. (मराठी) पी.एचडी. (प्राचीन मराठी साहित्य), संत साहित्याचे अभ्यासक उत्तम वक्ते, मो.ह.विद्यालय, ठाणे तसेच जु.स.रुंग्टा हायस्कूल नाशिक येथे मराठीचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांनी वैचारिक लेखन तसेच कविता लेखन केले आहे. गायधनी यांच्या संघजीवनातील प्रेरक, चित्तथरारक, भावपूर्ण घटना, प्रसंग आणि आठवणींचा हा संग्रह आहे. आजच्या पिढीतील स्वयंसेवकाला, सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्याला अक्षयऊर्जा देणारा हा मौलिक ’संघ सुगंध’ आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश गायधनी व ‘विवेक प्रकाशना’चे प्रदीप निकम व शीतल खोत यांनी केले आहे.