योद्धा शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

विवेक मराठी    13-Oct-2021
Total Views |
@भरत देशमुख 9405910801
पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित संशोधनातून कमी वेळेमध्ये, मर्यादित खर्चात तंत्रज्ञानाच्या या सर्वच क्षेत्रांतील संशोधन प्रणाली विकसित करण्याचा ‘स्वदेशी राष्ट्रभाव’ भारतीय संशोधकांमध्ये निर्माण केला. त्याचबरोबर भारताला एक शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी व त्यामध्ये आपले योगदान देण्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य डॉ. कलाम यांनी आयुष्यभर केले. 15 ऑक्टोबरला त्यांची जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून देणारा लेख...

KALAM_2  H x W:
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट पाहता प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटावा इतकी थक्क करणारी त्यांची कामगिरी होती. ते एक सच्चे देशभक्त, थोर शास्त्रज्ञ, उत्कृष्ट प्रशासक, चांगले वक्ते, साहित्यिक, समाजसेवक व त्यांची अनुकरणीय धर्मनिरपेक्षता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व भारतीयांना त्यांचा परिचय होता.
 
तामिळनाडूतील धार्मिक क्षेत्र असलेले रामेश्वरम येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. घरातील मुस्लीम पद्धतीचे राहणीमान, रामेश्वरम येथील हिंदू धार्मिक वातावरण व ख्रिश्चन मिशनरी शाळेतील शिक्षण असा त्रिवेणी संस्कार त्यांच्यावर झाला होता. प्राथमिक शिक्षण तेथेच पूर्ण केल्यानंतर तिरुची येथून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. भौतिकशास्त्राची आवड असलेल्या या विद्यार्थ्याने त्या वेळच्या मद्रास येथील मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथून एरोनॉटिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या आवडीनुसार त्यांना विमाननिर्मितीमध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, असे मनोमन वाटायचे. 1959 साली कलामांची एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या माध्यमातून एक नवीन वैमानिकी विकास संस्थेत त्यांची नियुक्ती झाली. तेथे त्यांनी विमानशास्त्र संशोधनात स्वत:ला झोकून देऊन कोणत्याही परदेशी मदतीशिवाय प्रसिद्ध संशोधक प्रा. सतीश धवन यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील पहिले ‘हॉवर कॉट’ हे हलके विमान तयार केले. त्याच्या चाचणीसाठी त्या वेळचे संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्णमेनन यांनी त्यातून प्रवास केला. या यशानंतर भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी स्थापन केलेल्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर’मध्ये रॉकेट इंजीनिअरिंग विभागत त्यांची नियुक्ती झाली. तेथूनच डॉ. कलाम यांच्यासाठी अंतराळ संशोधनाची दारे उघडली गेली. या सेंटरचे संचालक डॉ. विक्रम साराभाई यांनी कलाम यांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेत पाठविले. तेथे त्यांनी अंतराळ तंत्रज्ञान, कृत्रिम उपग्रह, साइंडिंग रॉकेट प्रणाली याचा अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर केरळमधील थुंबा येथील रॉकेट प्रक्षेपण केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली. याच ठिकाणी 21 नोव्हेंबर 1963 रोजी देशातील पहिले रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. परंतु त्या वेळी या प्रक्षेपणासाठी विदेशी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागली. या यशस्वी मोहिमेनंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी डॉ. कलाम व त्यांच्या संशोधक चमूवर भारतीय बनावटीच्या पहिल्या अंतराळ प्रक्षेपण वाहन एस.एल.व्ही.-3 या प्रकल्पाची जबाबदारी सोपविली. ओदिशातील श्रीहरीकोटा येथून 10 ऑगस्ट 1979 रोजी भारतातील स्वदेशी बनावटीच्या, उपग्रह वाहून नेणार्‍या पहिल्या एस.एल.व्ही.-3चे उ़ड्डाण झाले, परंतु ते अयशस्वी ठरले. या अपयशाने खचून न जाता त्यांच्या चमूने 10 जुलै 1980 रोजी पुन्हा एस.एल.व्ही.-3ने रोहिणी उपग्रहासह यशस्वी उड्डाण केले. हा अंतराळ क्षेत्रातील भारतासाठी मोठा यशस्वी पल्ला ठरला. त्यामुळे उपग्रह प्रक्षेपण करणार्‍या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले. या सर्व यशस्वी मोहिमेचे शिल्पकार डॉ. कलाम होते. त्यामुळे जगातील अग्रगण्य रॉकेट वैज्ञानिक म्हणून त्यांची गणना होऊ लागली. 1982पर्यंत डॉ. कलाम यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रोमध्ये) काम केले. त्यांच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल 1981 साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मान केला.
1 जून 1982 रोजी डॉ. कलाम यांनी इस्रोमधील जबाबदारीचा निरोप घेऊन हैदराबाद येथील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबॉरेटरीमध्ये (डीआरडीएलमध्ये) संचालक म्हणून पदभार स्वीकारला. येथे कलामांना देशासाठी इंटिग्रेटेड गाइडेड क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या चमूने देशाला क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये स्वयंपूर्ण बनविले. भारताने पृथ्वी, त्रिशूल, रणगाडाभेदी नाग, आकाश व 3 ते 5 हजार कि.मी.पर्यंत मारा करणार्‍या अणवस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी’ची निर्मिती केली. क्षेपणास्त्र प्रणालीमधील या यशाने भारताची असे तंत्रज्ञान असलेल्या जगातील मोजक्याच राष्ट्रांमध्ये गणना होऊ लागली. डॉ. कलाम यांना या क्षेत्रातील योगदानाबद्दल 1990 साली पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले.
1992 मध्ये डिफन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डिआरडीओ) हैदराबाद या संस्थेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. काही कालावधीनंतर त्यांची भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. दोन्ही ठिकाणी कार्य करताना कलाम यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविला. डॉ.कलाम हे उत्कृष्ट प्रशासक होते, त्याचबरोबर कुशल संघटकही होते. वेळेचा सदुपयोग कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावे, असे त्यांचे नियोजन असायचे. त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या नवीन संशोधकांसाठी डॉ. कलाम हे एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते. जगात नवे काय? कोठे नवीन संशोधन सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी व ते शिकण्यासाठी ते आपल्या संशोधकांना परदेशात जाण्यास प्रोत्साहन देत. आपल्या देशासाठी त्याचा उपयोग व्हावा, हा त्यांचा भाव होता. परदेशात संशोधक जायचे, परंतु ते त्यांना सावध करत असत. कारण तेथील मुक्त वातावरणामुळे त्यांच्या सवयी बिघडायच्या, ते मद्यपी व्हायचे, त्यावर कलामांची नाराजी राहायची. ते नेहमी आपल्या सहकार्‍यांना अशा सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला देत. मद्याच्या आहारी गेल्यामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या संशोधकांची उदाहरणे देत. आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांनी कडक शिस्त लावली होती. सरकारी पैशाचा वापर काटकसरीने केला पाहिजे, ही त्यांची भावना होती.
 कोणाकडूनही शक्यतो भेटवस्तू व कोणतीही सवलत ते नम्रपणे नाकारत. दिवाळी व ईदलासुद्धा ते मिठाई स्वीकारत नसत. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा काटेकोरपणा असूनही, वैज्ञानिक प्रकल्पांसाठी कितीही खर्च येवो, या बाबतीत ते सरकारकडे मोठ्या आर्थिक तरतुदीची शिफारस करीत व ती मुजूर करवून घेत. संशोधन प्रकल्पांच्या प्रत्येेक क्षेत्रासाठी निधी मंजूर करताना ते जेवढे उदार असत, तेवढेच प्रत्येक विभागाच्या खर्चावर त्यांचे नियंत्रण असे. आपल्यासह काम करणार्‍या संशोधकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा यथायोग्य मानसन्मान केला गेला पाहिजे व त्यांना पुढील काळात प्रेरणा मिळावी म्हणून संशोधकांसाठी त्यांनी वेगवेगळे पुरस्कार सुरू केले व त्याबरोबरच रोख बक्षिसेही द्यायला सुरुवात केली. नवे तंत्रज्ञान धैर्याने पुढे होऊन वापरल्याबद्दल त्यांनी कारखान्यांना व विविध संस्थांना पुरस्कार सुरू केले. वैज्ञानिक व शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दल यंग सायंटिस्ट अ‍ॅवॉर्ड, संरक्षण क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सैन्यदलासाठी बहुपयोगी पडेल अशा संशोधनासाठी स्पिस ऑफ टेक्नॉलॉजी हा पुरस्कार असे भारतातील संशोधनात्मक क्षेत्रात ज्यांनी योगदान दिले त्याची दखल घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांचे कौतूक होऊन त्यांच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन होईल असे प्रेरणादायक पुरस्कार डॉ. कलाम यांनी सुरू केले. उदार मनाने इतरांसाठी भरीव पुरस्कारांची तरतूद करणारे डॉ. कलाम हे पुढे भारतातील सगळ्यात मोठ्या सन्मानाचे धनी ठरले. डॉ. कलाम यांना त्यांनी केलेल्या सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.
1998 साली अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा भारताने अण्वस्त्र चाचणी घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. डॉ.कलाम हे त्या वेळी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. वाजपेयी यांच्या अणुचाचणीच्या निर्णयाला डॉ. कलाम यांची समर्थ साथ होती, म्हणूनच वाजपेयींनी ती जबाबदारी डॉ.कलाम यांच्यावर सोपविली. त्यांच्या पुढाकाराने भारताने 11 व 13 मे 1998 रोजी दोन अण्वस्त्र चाचण्या घेतल्या. त्यामुळे सर्व जगाला भारतीय सामर्थ्याची ओळख झाली. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकी गुप्तहेर उपग्रहांना याची माहिती मिळू शकली नाही, यामुळे जगातील प्रसारमाध्यमे व संशोधन क्षेत्रे चकित झाली. डॉ.कलाम यांनी आपल्या देशासाठी विविध क्षेत्रांतील दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय जनतेमध्ये व विशेषत: भारत सरकारलाही त्यांचा विशेष आदर वाटू लागला. डॉ. कलाम यांच्या ज्ञान-प्रतिभेचा, क्षमतेचा व अनुभवाचा लाभ यापुढेही देशाला झाला पाहिजे, याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जाणीव झाली. म्हणून त्यांनी डॉ. कलाम यांना भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा मान दिला. 25 जुलै 2002 रोजी ते भारताचे 11वे राष्ट्रपती झाले.


KALAM_3  H x W:

डॉ. कलाम हे कठोर परिश्रमी होते. त्यांचा देशासाठी असलेला समर्पित भाव, आपल्या कामावरची अतूट श्रद्धा व ज्ञान-विज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या सर्व समस्यांवर मात कशी करता येईल याबद्दल त्यांचे सततचे चिंतन यामुळेच ते देशाच्या या सर्वोच्च पदावर पोहोचू शकले.

दि. 23 जुलै 2007 रोजी ते राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या ‘इंडिया 2020 - ए व्हिजन फॉर द मिलेनियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. भारत हा युवकांचा देश आहे, त्यांचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी व्हावा, असे त्यांना वाटे. त्याासाठी त्यांनी युवकांशी मोठ्या प्रमाणावर संवाद साधायला सुरुवात केली. कित्येक विद्यापीठे, उच्च शिक्षण देणार्‍या संस्था, शाळा-महाविद्यालये या सर्व ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केले. ते युवकांना म्हणत, “तुमचे सर्वोच्च प्राधान्य देशहिताला असले पाहिजे. ते साध्य करण्यासाठी तुम्ही आपल्या आत्म्याला चेतना दिली, तर जी ऊर्जा निर्माण होईल ती पृथ्वीवरील कोणत्याही ऊर्जेपेक्षा बलवान राहील. त्यामुळे तुमच्यासाठी कोणतेही लक्ष्य असाध्य राहणार नाही.” मुलांच्या मनात महत्त्वाकांक्षेची ठिणगी चेतविण्याबरोबरच देशाच्या विकासात त्यांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून देऊन त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करत. देशहित समोर ठेवून मी देशासाठी काय करू शकतो हा एकच ध्यास असावा, हे विद्यार्थ्यांसमोर ते मांडीत. एकदा मुलांशी संवाद साधताना त्याचा प्रत्यय आला. एकदा एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला “देवाने तुम्हाला वर दिला, तर तुम्ही काय मागाल?” यावर कलाम यांनी उत्तर दिले की, “मी देवाजवळ मागेन की, माझ्या देशाला एक प्रगत राष्ट्र बनव.” इतकी प्रगाढ देशभक्ती व देशासाठी सर्वस्व अर्पण केलेले त्यांचे चरित्र होते.


KALAM_1  H x W: 
 
आपल्या देशातील नागरीकांना डॉ. कलाम यांचे आवाहन होते की, ‘आपल्या देशाला देण्यासाठी तुमच्याजवळ 10 मिनिटे आहेत का?’ तुमच्या-आमच्या व या देशाच्या भल्यासाठी तुम्ही 10 मिनिटे चिंतन करा. या 10 मिनिटांच्या चिंतनातून त्यांना काय सांगायचे होते? ते म्हणत, “मी जेव्हा आपल्या देशाच्या नागरीकांकडे पाहतो तर ते सतत आपले कामे होत नाही म्हणून सरकारविरुद्ध तक्रार करताना दिसतात. आपल्या सर्व समस्या सरकारने सोडविल्या पाहिजेत असे प्रत्येकाला वाटते, म्हणून स्थानिक प्रशासनाविरुद्ध त्यांची सतत ओरड सुरू असते. प्रत्येकाला वाटते आपली प्रगती झाली पाहिजे, देश सुधरला पाहिजे, परंतु हे सर्व होण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण स्वत: काहीही न करता फक्त सरकारने सर्व काही केले पाहिजे, अशी आपली धारणा झाली आहे. आपली कर्त्यव्ये व जबाबदारी टाळून आपण जर असेच वागलो, तर ह्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे अशी अपेक्षा आपण कशी काय करतो? आपण या सर्व व्यवस्थेचे एक घटक आहोत हे विसरून सर्व कर्तव्याची जबाबदारी आपण दुसर्‍यावर ढकलतो. जेव्हा विधायक कार्यात योगदान देण्याची वेळ येते, तेव्हा आपण संकुचित होतो. आपण स्वत: काहीही न करता ही सर्व व्यवस्था बदलविण्यासाठी कोणीतरी मिस्टर क्लीन येईल वा देवदूत या मसिहा येईल, तो जादूची कांडी फिरवून सर्व काही व्यवस्थित करेल अशा वाट पाहणार्‍यांपैकी आपण आहोत.” ते पुढे म्हणतात, “हे भारतीयांनो, असा विचार करून देशाची कधीतरी प्रगती होणार आहे का? देशाचे भविष्य चांगले राहील काय? तुमचा हा संकुचित विचार सर्व भारतीयांना अंतर्मुख करायला भाग पाडणारा आहेे.” डॉ.कलामांनी देशवासीयांकडे देशाच्या हितासाठी विचार करायला 10 मिनिटे मागितली.
डॉ. कलाम यांच्या नेतृत्वात भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात जी अभूतपूर्व प्रगती केली, त्यामुळे आपल्या देशाने कमी खर्चात अग्निबाण व उपग्रह प्रणाली विकसित केली. त्याद्वारे आपण इतर देशांच्या - फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, सिंगापूर व इतर देशांच्या उपग्रहांचे इस्रोद्वारे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. त्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळण्यास मोठी मदत झाली. तसेच या क्षेत्रातील प्रगतीमुळे देशाच्या जडणघडणीला व विकासाला मदत व्हायला लागली. त्यामुळे आपली संपर्क यंत्रणा मजबूत झाली. दुर्गम भागातही संदेशवहन सहज शक्य झाले. भूगर्भातील हालचाली कळू लागल्या, पाणी, खनिजे, नैसर्गिक आपत्ती, हवामान व पर्यावरण संरक्षण याबद्दलची अद्ययावत माहिती मिळू लागली. कृषी क्षेत्रास त्याचा विशेष फायदा झाला. शैक्षणिक प्रकल्प, विज्ञान, सैन्यदल, सरकारी प्रशासन, विविध उद्योग, दळणवळण यंत्रणा, विविध प्रयोगशाळा, वेधशाळा, संशोधन प्रकल्प यांनाही त्याचा फार उपयोग होऊ लागला. या सर्व क्षेत्रोस त्यांनी नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकाराची जागतिक स्तरावरील माहिती मिळू लागली. त्यामुळे त्यांच्या कार्यवाढीला मदत झाली. त्यातून देशाच्या विकासालाही गती मिळाली. परंतु हे सर्व असूनही डॉ. कलामांना हे माहीत होते की, आपल्या देशामध्ये आजही दरिद्री अवस्थेतील गरीबांची संख्या भरपूर आहे. बराचसा मोठा वर्ग विकासापासून खूप दूर आहे. अजूनही त्यांच्याकडे प्राथमिक सुविधांचा अभाव आहे, चांगल्या शिक्षणाची सोय नाही, चांगली आरोग्य सेवा उपलब्ध नाही. परंतु या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना नेहमी वाटे की, भारताजवळ विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, कुशल युवकवर्ग आहे. याच्या जोडीला आधुनिक विज्ञान, गतिमान प्रशासन, सर्वांचा सहभाग याचा योग्य उपयोग केला, तर आपल्या देशातील गरिबी, अज्ञान दूर होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल, प्रत्येक हाताला काम मिळेल, त्यातूनच भारत एक प्रगत व सक्षम राष्ट्र म्हणून उभे राहील.

KALAM_2  H x W: 

डॉ. कलाम यांची साधी राहणी, विनयशीलता, शांत स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी वाटायचे. ते अविवाहित होते. रोज सकाळी ते योगासन करायचे. संगीताचीही त्यांना आवड होती. ते उत्कृष्ट वीणावादक होते. कुराण व भगवद्गीता याबरोबरच त्यांचा सर्व धर्मांच्या साहित्याचा अभ्यास होता. त्याबद्दल त्यांना नितांत आदर वाटायचा. याचे उदाहरण म्हणजे हैदराबाद येथे रिसर्च सेंटर इमारत या प्रयोगशाळा संकुलाची बांधणी सुरू होती, त्या वेळी तेथील कामगारांना खडकांनी वेढलेल्या एका दुर्लक्षित गुहेमधील दुर्गादेवीचे मंदिर आढळले. तो सर्वच भाग विकसित करायचा होता. परंतु त्या मंदिर परिसराला हात न लावता त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी विकसित करायला लावला. उलट सरकारच्या मदतीने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथे नियमित पूजेची व्यवस्था लावून दिली. त्यांच्या सर्व धर्मांविषयीच्या भावनांचे नैसर्गिकरित्या दर्शन अशा सहज पद्धतीने होत असे.
डॉ. कलाम यांच्या योगदानाचे मूल्यमापन करताना असेच म्हणावे लागेल की, पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित संशोधनातून कमी वेळेमध्ये, मर्यादित खर्चात तंत्रज्ञानाच्या या सर्वच क्षेत्रांतील संशोधन प्रणाली विकसित करण्याचा ‘स्वदेशी राष्ट्रभाव’ भारतीय संशोधकांमध्ये निर्माण केला. त्याचबरोबर भारताला एक शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी व त्यामध्ये आपले योगदान देण्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य डॉ. कलाम यांनी आयुष्यभर केले. 15 ऑक्टोबरला त्यांची जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून त्यांना अपेक्षित असलेल्या शक्तिशाली भारताच्या निर्मितीमध्ये प्रत्येक भारतीयाने आपले योगदान निश्चित करावे, हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल.