देवदुर्लभतेच्या सर्व कसोटीला उतरणारे व्यक्तिमत्व, राजाभाऊ गायधनी : भय्याजी जोशी

विवेक मराठी    16-Oct-2021
Total Views |
नाशिक:- संघ स्थापनेला आज ९६ वर्षे पूर्ण होत आहेत आणि राजाभाऊ हयात असते तर त्यांच्या वयाला आज ९७ वर्ष पूर्ण झाली असती. काही चांगल्या गोष्टी निर्माणासाठी विशिष्ट काळ यावा लागतो, तो काळ म्हणजे संघ स्थापनेचा आणि राजाभाऊ गायधनी यांचा. संघाला अनेक देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा संच लाभला, त्यापैकी एक राजाभाऊ गायधनी. देवदुर्लभतेचे मापदंड असणाऱ्या सर्व कसोटीला उतरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजाभाऊ गायधनी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य भय्याजी जोशी यांनी सा. विवेक प्रकाशित 'संघ सुगंध' पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी केले.

 
RSS_3  H x W: 0

'संघ सुगंध ' हे पुस्तक राजाभाऊ गायधनी लिखित, राजाभाऊंच्या संघकामातील आठवणी, अनुभव, घटनाप्रसंग आहेत. या पुस्तकात १७० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या आठवणींचा संग्रह आहे. हे पुस्तक आपल्याला भूतकाळात घेऊन जाते, एवढी या पुस्तकाची ताकद आहे. पुस्तक वाचन करताना आपल्याला संघ सुगंधाचा दरवळ जाणविल्याशिवाय राहणार नाही. पुस्तक प्रकाशन दिनीच राजाभाऊंची जन्मतिथी आहे. राजाभाऊ लिखित 'संघ सुगंध' पुस्तकाचे यादिवशी प्रकाशन म्हणजे राजाभाऊंना अभिवादन करण्याची संधी या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मिळाली आहे, असेही भय्याजी पुढे म्हणाले.
 
'संघ सुगंध' पुस्तक प्रकाशन कार्यक्रम नाशिक येथे शंकराचार्य न्यास डाॅ. कुर्तकोटी सभागृहात १४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, आणि राष्ट्र सेविका समिती, प्रांत निधी प्रमुख आणि राजाभाऊ गायधनी यांच्या कन्या सुधाताई ताथोडे यांसह अनेक मान्यवर व श्रोते उपस्थित होते.RSS_1  H x W: 0

संघ स्थापनेचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. त्यावेळच्या परिस्थितीनुसार समाजासाठी जगणारे लोक पाहिजे होते. आज आपण संघाचा वटवृक्ष झालेला पाहतो आहोत. परंतु आणीबाणीच्या प्रतिकूल कालखंडात संघ ज्या पिढीने जगवला, ती पिढी म्हणजे 'राजाभाऊ गायधनी'. राष्ट्रव्यापी शक्तीचे दर्शन स्वयंसेवकात होते. संघ, समाज, राष्ट्राची खरी शक्ती ही व्यक्तिनिर्माणात आहे. प्रतिकूलता - अनुकूलता यांच्या प्रवाहात वाहत न जाता, कुठल्याही परिस्थितीत समान भाव ठेवणारी ही संघशक्ती आहे, असे भय्याजी जोशी यांनी विशद केले.
संघ हा बुद्धीने, चिंतनाने, अध्ययानाने, समजण्याचा विषय नाही, तर संघात गेल्याशिवाय संघ समजणार नाही. संघकामाची उत्सुकता, आदर समाजात वाढला आहे. त्याचे कारण संघ कुणाला शत्रू मानत नाही. माणसं जोडण्याची कला स्वयंसेवकाला संघ संस्कारातून अवगत झाली आहे. हे भय्याजींनी सोदाहरण स्पष्ट केले.
स्वतः संघकार्याचे अविरत व्रत घेतलेल्या राजाभाऊंनी त्यांच्या परिवारातही संघकामाची गोडी रुजविली, याचा अनुभव गायधनी परिवाराचे ज्यांना सानिध्य लाभले आहे, त्यांना अनुभव आला असेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. संघ सुगंध हे पुस्तक संघ कार्यकर्त्यांना दिशादर्शक ठरणारे झाले आहे, असेही ते पुढे म्हणाले.


RSS_2  H x W: 0
 
प्रत्येक पुस्तकाची एक जन्मकथा असते. तशीच संघ सुगंध या पुस्तकाचीही आहे. पुस्तकाची जन्मकहाणी यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी उलगडली.
राजाभाऊंनी या पुस्तकात संघ आशय, सात्विकतेचा आशय असल्याचे पतंगे यांनी सांगितले. संघ कार्यकर्त्यांना हे पुस्तक चिरकाल प्रेरणा देणारे ठरेल, शिवाय आज संघ शक्तीस्थानावर आहे, त्यामुळे अनेकजण स्वतःला संघाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांनाही हे पुस्तक संघ समजून घ्यायला मार्गदर्शक ठरेल.


सा. विवेकचा आगामी ग्रंथ 'लोकनेता ते विश्वनेता' आणि संघ शताब्दी निमित्त ' कर्तव्यभूमीचे पुजारी' , अशा एकत्रित संचानिमित्त, सा. विवेकच्या प्रतिनिधींसाठी ' विजयादशमी अभियान'आयोजित केले होते. या अभियानात जे प्रतिनिधी यशस्वी झाले, त्यांचा सत्कार मा. भय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानात यशस्वी झालेले प्रतिनिधी विलास आराध्ये ( हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे सदस्य, देवगिरी प्रांताचे पालक, सा. विवेक प्रतिनिधी, लातूर), सुनील गायकवाड ( संभाजीनगर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी), सुभाष आंबट ( पाथरी तालुका सरपंच,सा. विवेक पाथरी तालुका प्रतिनिधी), प्रमोद मुळे ( नाशिक जिल्हा प्रतिनिधी), नितीन बिबीकर ( नाशिक शहर प्रतिनिधी), विजय भिडे (सा. विवेक नगर प्रतिनिधी) अशा सहा प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सा. विवेक प्रतिनिधी संपर्क प्रमुख राहुल पाठारे यांनी केले.

 
मराठी विषयाचे अभ्यासक, एम.ए. (मराठी) पी.एचडी. (प्राचीन मराठी साहित्य), संत साहित्याचे अभ्यासक उत्तम वक्ते, मो.ह.विद्यालय, ठाणे तसेच जु.स.रुंग्टा हायस्कूल नाशिक येथे मराठीचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांनी वैचारिक लेखन तसेच कविता लेखन केले आहे. गायधनी यांच्या संघजीवनातील प्रेरक, चित्तथरारक, भावपूर्ण घटना, प्रसंग आणि आठवणींचा हा संग्रह आहे. आजच्या पिढीतील स्वयंसेवकाला, सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्याला अक्षयऊर्जा देणारा हा मौलिक ’संघ सुगंध’ आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश गायधनी व ‘विवेक प्रकाशना’चे प्रदीप निकम व शीतल खोत यांनी केले आहे.प्रसिद्धीपरान्मुखता हा राजाभाऊंचा स्थायीभाव होता. त्याचप्रमाणे त्यांचे आचरण होते. यावेळी राजाभाऊंच्या जीवनातील अनेक अनुकरणीय प्रसंग आणि अलिखित आठवणींचा पट राजाभाऊंची कन्या सुधाताई ताथोडे यांनी उलगडला. कवी मनाचे लेखक असलेल्या राजाभाऊंची काही स्फुटे सुधाताईंनी कार्यक्रमाप्रसंगी सादर केली. तसेच कौटुंबिक आठवणींनाही सुधाताईंनी उजाळा दिला.

पुस्तकाविषयी माहिती पुस्तक प्रकाशन विभागाच्या प्रमुख शीतल खोत यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी आगामी 'लोकनेता ते विश्वनेता: नरेंद्र मोदी आणि कर्तव्यभूमीचे पुजारी मालिकेतील पाच पुस्तिकेंची माहिती दिली. स्वानंद बेदरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी राजाभाऊ गायधनी रचित स्फूटगीत, मोहन उपासनी यांनी चाल दिलेले, श्रीराम तत्त्ववादी यांनी या गीताचे सादरीकरण केले. राजाभाऊंची पणती श्रावस्ती हरहरे हिनेही इंग्रजीतून आपले मनोगत व्यक्त केले. सुरेश गायधनी यांनी ॠणनिर्देश व्यक्त केले.