शेतकरी आंदोलनाला दिशा देणारे अन्नत्याग आंदोलन

16 Oct 2021 19:15:18
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अन्नदात्या शेतकर्‍यांसाठी अन्नत्याग आंदोलन करून सरकारला सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या आंदोलनाला तीन दिवसांत किमान तीन लाखापेक्षा अधिक शेतकर्‍यांनी भेटी दिल्या आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजमाध्यमाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरले.
 
bjp_2  H x W: 0
लातूरची भूमी ही प्रत्येक क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण करणारी आहे. आंदोलनाचा पॅटर्न निर्माण करण्याची या जिल्ह्याला एक जुनी परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी याच लातुरात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्यासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना त्यांचा शर्ट फाटला आणि त्यांना व्यासपीठावरच नवा शर्ट घालावा लागला होता. याचा अर्थ सत्ताधार्‍यांना अक्षरश: उघडे केले गेले. त्याचप्रमाणे रेल्वेच्या मागणीसाठी लातूर ते मिरज दंडवत यात्रा काढणारेही लातुरातीलच होते. या वेळी संभाजीराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे तीन दिवसांत पुरते वस्त्रहरण केले. जनतेशी संवाद साधत पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नाकर्तेपणाचा जाहीर हिशेब मांडला.
 
सामान्यांना वेठीस न धरताही परिणामकारक आंदोलन, तेही अन्नत्यागाचे.. राज्यातील शेतकरी आंदोलनाला दिशा देण्याची परंपरा भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर शृंगारे यांनी केवळच कायम ठेवली असे नाही, तर शेतकरी आंदोलनाला एक नवी दिशा दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि राष्ट्रभक्त प्रामाणिक पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे स्मरण केले जाते. अन्नधान्य कमी पडेल म्हणून शास्त्रीजींनी आठवड्यातून एक दिवस अन्नत्याग करून उपवास करण्याचे आवाहन केले होते. तसाच प्रकार, परंतु आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अन्नदात्या शेतकर्‍यांसाठी अन्नत्याग आंदोलन करून सरकारला सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादनात राज्यात पहिल्या क्रमांकाचा आणि देशात दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा आहे. खरीपाच्या पेरणीत लातूर जिल्ह्यात 80 टक्के पेरणी सोयाबीनची आहे. यंदाच्या मोसमात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गेल्या पन्नास वर्षांत कधी नव्हे तेवढा पाऊस झाला. सरासरीच्या 128 टक्के पाऊस झाला. अत्यंत कमी वेळेत परंतु अत्यंत जास्त पाऊस झाला आहे. गेल्या सत्तर वर्षांत कधी पाहिला नव्हता, तेवढा एका रात्रीत पडलेला पहिल्यांदा पाहिल्याची भावना निलंगा तालुक्यातील चांदुरवाडीचे बाबू माधवराव साबदे यांनी विवेकच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. साबदे यांनी दहा एकरवर सोयाबीनचा पेरा केला होता, त्याचे होत्याचे नव्हते झाले. ते कुजलेले पीक घेऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अन्नत्याग आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी चौकात लक्षवेधी असा 75 बाय 45 फुटाचा भव्य मांडव उभारण्यात आला होता. या मांडवात दिवसभर गावोगावचे शेतकरी येऊन सहभागी होत होते. जिल्ह्यातील दहाही तालुक्यांतील शेतकरी येथे येऊन पाठिंबा देत होते. तीन दिवसांत किमान तीन लाखापेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील 28 सामाजिक संस्था-संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजमाध्यमाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. पाठिंबा देण्यासाठी मिस कॉल करण्यासाठी एक क्रमांक दिला होता. त्यावर 4 लाखांची नोंद झाली आहे. तीन दिवस फेसबुक लाइव्ह सुरू होते, त्याच्या प्रेक्षकांची संख्या 12 लाखावर गेली आहे. समाजप्रबोधन करणार्‍या कीर्तनकारांनी यात रात्रीच्या वेळी तिन्ही दिवस सहभाग घेतला होता.


bjp_1  H x W: 0
या आंदोलनाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवर, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी ध्वनिफितीद्वारे पाठिंबा दिला, आंदोलकांचे कौतुक केले. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवून सरकारवर टीकेचे आसूड ओढले. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी तर स्वत: सहभागी होऊन सरकारची लक्तरे वेशीवर टांगून भाजपा शेतकर्‍यांना साथ देईल असा विश्वास दिला.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मेघना बोर्डीकर या शेजारच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीसुद्धा प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला. हे अनोखे आंदोलन होते. 127 शेतकर्‍यांनी आणि स्वत: संभाजीराव पाटील यांनी व्यासपीठ सोडले नाही. शरीरधर्म उरकण्यासाठी संभाजी पाटील यांनी तर मांडवाजवळच्या सुलभ शौचालयाचा वापर केला, परंतु परिसर सोडला नाही. हे अजबगजब वाटत होते.
आठ आंदोलकांची प्रकृती बिघडली, म्हणून त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. स्फूर्तिदायक गोष्ट अशी की, त्यातील सहा जणांनी पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसण्याचा आग्रह धरला होता. 21 तरुण शेतकर्‍यांच्या मुलांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेधही केला. शिवाजी महाराज चौक आंदोलनमय झाला होता. त्या रस्त्यावरून येणारे-जाणारे शेतकरी, शेती नसलेले, व्यापारी, मजूर हे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना काहीच कसे दिले नाही याबद्दल संताप व्यक्त करून कोणीतरी यांना जाब विचारत आहे, याचा मनोमन आनंदच व्यक्त करीत होते.

ज्या 127 शेतकर्‍यांनी 72 तासांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता, त्यांचे उपोषण भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, खासदार सुधाकर शृंगारे यांनी लिंबूपाणी देऊन सोडवले.

अन्नत्याग आंदोलनाचा समारोपही जर हटकेच करण्यात आला. कुंभकर्णाच्या प्रतीकात्मक रूपाला जागे करण्यासाठी संभाजीराव पाटील यांच्या हस्ते जोडे मारून जागे करण्याचाही प्रयत्न केला गेला.
 
 
संभाजीराव पाटील यांनी समारोपाच्या मनोगतात स्पष्ट केले की, “लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निष्काळजीपणामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिला आहे. प्रत्येक जिल्ह्याला मदत मिळाली, लातूरला मिळाली नाही. जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या आज्ञेशिवाय बाहेर पडत नाहीत, गावपातळीवर शेतावर पंचनामे करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. वसुली सरकार असल्यामुळे शेतकरी आज उघड्यावर आला आहे. शेतकर्‍यांसाठी जी मदत घोषित केली, ती पुरेशी नाही. आमची जी सरसकट मदतीची मागणी आहे, ती पूर्ण होईपर्यंत आम्ही लढा देणार आहोत. पाण्यात कुजलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात येणार आहे. त्यांची भेट झाली नाही, तर जिल्हाभर घेराव आंदोलन केले जाईल आणि त्यानंतर मात्र जेलभरो आंदोलनही केले जाणार आहे. परंतु शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालूच ठेवण्यात येणार आहे.”

- अरुण समुद्रे 

Powered By Sangraha 9.0