हरेश्वर वनगा पुरोगामी वारली चित्रकार

विवेक मराठी    17-Oct-2021   
Total Views |
हरेश्वर वनगा यांना राज्य सरकारने आदिवासी सेवक पुरस्काराने गौरवले आहे. त्यांनी वारली कलेत स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे. वारली समाजाचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचे जतन केले आहे. रामायणावर आधारित असलेले त्यांचे चित्र थेट राष्ट्रपती भवनात विराजमान झाले आहे.


warli_2  H x W:
आई मथीबाई यांच्याकडून हरेश्वर वनगा यांना वारली चित्रकलेचा वारसा मिळाला. उद्धवराव पंडित यांच्या घरी ती मोलकरणीचे काम करायची. तेथे हरेश्वर व त्यांच्या भावंडांवर नागरी संस्कार झाले. तलासरीच्या जनजाती आश्रमशाळेतील विकास प्रकल्पात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमी विचारांनी ते प्रेरित झाले व स्वयंसेवक बनले. पुरोगामी विचारसरणीच्या हरेश्वर यांनी नातेवाइकांच्या व समाजाच्या दबावाला न जुमानता, आपल्या दोन मुलींना ‘वंशाची पणती’ मानून उत्तम शिकवले. त्यांना उच्चशिक्षित केले. राज्य सरकारने आदिवासी सेवक पुरस्काराने त्यांना गौरवले आहे. त्यांनी वारली कलेत स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे. रामायणावर आधारित असलेले त्यांचे चित्र थेट राष्ट्रपती भवनात विराजमान झाले आहे.

डहाणू आगर येथे 1965 साली जन्मलेल्या हरेश्वर नथूत वनगा यांची आई मथीबाई झोपडीच्या भिंतीवर चित्रे रंगवायची. ते बघून छोट्या हरेश्वरला खूप उत्सुकता वाटायची. आईकडून ही कला त्यांनी आत्मसात केली. 5 बहिणी व 1 भाऊ अशा मोठ्या कुटुंबात हरेश्वर सर्वात लहान असूनही त्यांनी हिमतीने घर सावरले. सर्वांना चांगल्या मार्गावर आणले. शेतमजूर असलेले वडील ‘वझ्या’चे म्हणजे दिवसकार्याचे काम करायचे. पंडित परिवाराने वनगा कुटुंबाला आधार दिला, त्यांची उपासमार होऊ दिली नाही, याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. 30 वर्षांपूर्वी विमल आणि हरेश्वर यांचा विवाह झाला. मोठी चित्रगंधा व धाकटी धनश्री यांच्या जन्मानंतर, मुलगाच व्हावा यासाठी समाजाचा, नातेवाइकांचा दबाव होता. मात्र पुरोगामी विचारांच्या वनगा दांपत्याने तो झुगारला. मोठी मुलगी चित्रगंधा हिची नावाप्रमाणेच असलेली चित्रकलेची आवड लक्षात घेऊन तिला मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कलेचे उच्चशिक्षण दिले. शासकीय आरोग्य विभागात आदिवासी रुग्णांना दाखल करून तेथे हरेश्वर सामाजिक सेवा करायचे. छोटी धनश्री त्यांच्याबरोबर जायची. बालवयात रुग्णसेवेचे संस्कार झाल्याने तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले व आईवडिलांचा पाठिंबा मिळवून, तसेच स्वत:च्या प्रयत्नांनी पूर्णही केले. कलाकार असलेल्या हरेश्वर यांना आरोग्य विभागाने वाडा तालुक्यातील आरोग्य केंद्रातील भिंतींवर श्लोक, सुविचार लिहिण्याचे काम दिले होते. त्या वेळी ‘मुलापेक्षा मुलगी बरी, संस्कार करते दोन्ही घरी’ हा सुविचार त्यांना सुचला व त्यांनी तो लिहिला. पुढे तोच चित्रगंधा व धनश्री या दोन मुलींच्या रूपाने प्रत्यक्षातही आला.


warli_1  H x W:
 
चित्रगंधाने मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये एम.एफ.ए.पर्यंत चित्रकलेचे उच्चशिक्षण घेतले आहे. सुरुवातीला 3 महिने हरेश्वर स्वत: मुलीला सोबत करण्यासाठी डहाणू ते मुंबई लोकल प्रवास करायचे. कॉलेजच्या परिसरात थांबून वारली चित्रे रंगवायचे. आता चित्रगंधा रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापिका असून चित्रकार पती सागर सुतार यांच्यासमवेत सफाळ्यात राहते. दोघेही परिसरातील युवकांना वारली कलेचे प्रशिक्षण देतात. गेल्या वर्षी तिला लोकसत्ताच्या दुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. धनश्री दंतवैद्य असून, मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर आहे. विशेष म्हणजे हरेश्वर यांच्याकडे वारली बोलीभाषेतील सुमारे पाच हजार शब्दांचा संग्रह आहे. त्यांनी वारली जमातीतील अनेक म्हणी, पारंपरिक गाणी, वाक्प्रचार, लोककथा यांचे संकलन केले आहे. आदिवासींचे रितीरिवाज, परंपरा, संस्कार यांचा हा कालौघात अस्तंगत होणारा अमूल्य ठेवा त्यांनी जपला आहे. जमातीतील वृद्ध माणसे, पारंपरिक भगत व धवलेरी यांच्याबरोबर त्यांचे बहुमोल ज्ञान नष्ट होऊ नये, ही त्यांची तळमळ आहे. हे सारे संचित मिळवण्यासाठी त्यांना खूप धडपड, कष्ट व खर्च करावा लागला. या सार्‍याचे दस्तऐवजीकरण व्हावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. तलासरीच्या आश्रमशाळेच्या व परिसरातील अनेक ठिकाणच्या भिंतींवर हरेश्वर यांनी रंगवलेली वारली चित्रे त्यांच्यातील प्रतिभावान कलाकाराची साक्ष देतात.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक आहेत.)