माहौल नशेचा...

विवेक मराठी    18-Oct-2021
Total Views |

@प्रभा कुडके
 जेवढी महागाची ड्रग्ज, तेवढी हिट रेव्ह पार्टी.. रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालतात. या दोन्ही गोष्टींना तुम्ही वेगळे करूच शकणार नाही. हा नशेचा माहौल आहे श्रीमंती नशेचा. त्यामुळे अशा पार्टीज पोलिसांच्या रडारवर कायमच असतात. त्यामुळेच पोलीस आणि नार्कोटिक्स एजन्सी नेहमी अशा घटनांवर नजर ठेवूनच असतात. यातूनच अनेक ड्रग पेडलर आणि त्याअनुषंगाने होणारा कोट्यवधींचा व्यवहार उजेडात येतो.
 
Drugs_1  H x W:

नशा अनेक गोष्टींची असते, परंतु नशेची धुंदी चढते तेव्हा मात्र वाटा बिकट होऊ लागतात. यशाची नशा चढली तरी पुढची वाट बिकट असते आणि अमली पदार्थांची चढणे त्यापेक्षाही बिकट. अशा बिकट वाटांमधून परतणे म्हणजे कर्मकठीण काम. नशेच्या वाटांवरचे प्रवासी महत्प्रयासाने परत आलेले दिसतात, तेही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. नशेच्या वाटा खरेच खूपच आकर्षक आणि सुंदर वाटतात, पण तिथून परतण्याचे सर्वच दरवाजे मात्र बंदच झालेले असतात. त्यामुळे कुठल्याही धुंदीचा कैफ चढणे वाईटच असते. 30, 60 आणि 90 पेगची नशा सकाळी उतरते. परंतु कोकेन, एमडी, हशिश, एमडीएमची नशा मात्र श्रीमंती नशा असते. पैशांच्या जोरावर आणि क्लास कल्चर जपण्याच्या नावावरची ही नशा असते. ही सहजासहजी उतरत नाही.


नशेच्या राज्यात एकदा डोकावले की, परतीच्या प्रवासामध्ये केवळ झिंगच आपल्या सोबतीला असते. म्हणूनच रेव्ह पार्टी नामक कल्चर उदयास आलेय. नशेच्या झिंगाटात अंगावरील कपड्यांचेही भान राहत नाही. अनेकदा मुले आणि मुली लघुशंकासुद्धा स्वत:च्याच कपड्यात करतात. एकमेकांवर थुंकतात आणि बरेच काही.. खिशात असलेला लाखोंचा माल, अंगावरील लाखोंचे कपडे आणि लाखोंची तिकिटे असा नशेचा माहौल असतो. साधासुधा माणूस या नशेच्या माहौलमध्ये जाऊच शकत नाही. तो आपल्याला असाच एखाद्या पुलाखाली दिसेल.


नशेचा खरा माहौल अनुभवायचा असेल, तर रेव्ह पार्टीसारखे दुसरे ठिकाण नाही. झिंगलेल्या देहाला कशाचीच पर्वा नसते. किक असते फक्त नशेचीच.

2 ऑक्टोबर म्हणजेच सर्वसामान्यांसाठी ड्राय डे. परंतु याच रात्री एका क्रूझवर श्रीमंती थाटात एक पार्टी पार पडली. ग्लॅमरस जगतातील नामी चेहरे या पार्टीत सहभागी होते. ते पकडले गेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ऊहापोह सुरू झालाय नशेच्या बाजाराचा. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCBने) मुंबईत एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा उच्चवर्गातील हाय फाय ड्रग्जची नावे सर्वसामान्यांच्या ओठी आली.


Drugs_2  H x W:

स्टार किड्स म्हणजे स्टार्सची मुले तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात. सर्वसामान्यांची मुले सातवी-आठवीमध्ये गुटख्याचा तोबरा भरतात, तेव्हा घरी जाताना आईच्या भीतीने तो तोबरा बाहेरच थुंकतात. परंतु श्रीमंताकडे मात्र असा भयाचा मुलाहिजा नसतोच. आई-वडील जाहीरपणे आपल्या मुलाने काय करावे हे सांगतात, तेव्हा घरचे वातावरण कसे असेल याची कल्पना न केलेलीच बरी. 


स्टार किडला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एनसीबीने आर्यन खानला अटक केली. अनेक वेगवेगळे अमली पदार्थ ठेवण्यावरून आर्यनला अटक करण्यात आली. आर्यनकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम हशिश, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये रोख या वेळी सापडले. आर्यनसोबतच्या इतर गँगलाही ताब्यात घेण्यात आले. यामध्ये अरबाज मर्चंट नावाच्या अभिनेत्याचाही समावेश होता.


रेव्ह पार्टीचा उद्देशच केवळ नशा हा असतो. त्यामुळे अशा पार्ट्यांवर छापे टाकून एनसीबीने याही आधी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. शिवाय असे छापे म्हणजे देशातील पहिलीच वेळ नाही, तर रेव्हची संस्कृती आपल्याकडे गेल्या 15 वर्षांपासून बोकाळली आहे. पाश्चिमात्यांची ही संस्कृती आपल्याकडच्या गर्भश्रीमंतांचे क्लास कल्चर आहे.


Drugs_1  H x W:

पाश्चिमात्य भागात रेव्ह पार्ट्या अनेक दशकांपासून आहेत. भारतातही रेव्ह पार्टीचे फॅड वाढत चालले आहे. गर्भश्रीमंतांना खिसे रिकामे करण्यासाठी आणि स्वत:चा क्लास जपण्यासाठी इतरांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याची गरज कायम वाटते. ही अशी गरज जोपर्यंत आहे, तोपर्यंत रेव्हचे पेव वाढतच राहणार यात शंका नाही.

आता आपण बघू या रेव्ह पार्टी म्हणजे काय?
 

इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत म्हणून ‘रेव्ह’ ओळखले जाते. त्याच्याच अनुषंगाने या पार्टीचे आयोजन केले जाते. रेव्ह पार्ट्यांचा उगम 1990च्या दशकात झाला. तेव्हा डीजे नावाचे नवीन मशरूम उगवले होते. म्युझिकच्या समोर हातवारे करणारा डीजे हा त्या काळात आकर्षणाचे केंद्रबिंदू होता. डीजेच्या नावावर पार्टी बुक होऊ लागली आणि पार्टी कल्चरचा एक नवा पायंडा आपल्यासमोर पडू लागला होता. ‘डीजेवाले बाबू मेरा गाना चला दो..’ म्हणत थिरकणारी तरुणाई नाच आणि नशा या दोन्हींच्या आहारी केव्हाच गेली होती.


अनेक रेव्ह पार्ट्यांमध्ये माहौल जमण्यासाठी थेट संगीतकार आणि नामवंत नर्तक-नर्तकीसुद्धा असतात. रेव्ह पार्ट्यांमध्ये उपस्थित असलेले लोक ‘रॅव्हर्स’ म्हणून ओळखले जातात. रॅव्हर्स हा शब्द एक स्टेटस सिम्बॉलचा परिचय करून देणारा आहे.
लेव्हल शो, इमेज प्रोजेक्शन, निऑन सिग्नल आणि फॉग मशीन यांसारख्या व्हिज्युअल इफेक्ट्ससह अनेक आधुनिक गोष्टींनी रेव्ह पार्टीचा माहौल बनतो. सबवूफर्स आणि मोठ्या साउंड सिस्टिम्समुळे डीप बास साउंडसह अत्यंत उच्च व्हॉल्यूममध्ये संगीत वाजते. पाय थिरकतात आणि जोडीला नशाही... रेव्हमधील नशा ही कोट्यवधीची असते, त्यामुळे उपस्थितही करोडो खिशात असणारेच असतात, हेच या पार्टीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.


कोकेन, पार्टी ड्रग किंवा एमडीएमए, एमडी, एलएसडी, जीएचबी, भांग, चरस, केटामाइन, अ‍ॅम्फेटामाइन आणि मेथॅम्फेटामाइन यासारख्या बेकायदेशीर ड्रग्जच्या व्यापक वापरासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. रेव्ह पार्टीचे आयोजन होतेय म्हटल्यावर, कोणते ड्रग असणार याची आधी विचारणा होते. तेव्हा कुठे याचे आयोजन पुढे ठरते. जेवढी महागाची ड्रग्ज, तेवढी हिट रेव्ह पार्टी.. रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालतात. या दोन्ही गोष्टींना तुम्ही वेगळे करूच शकणार नाही. हा नशेचा माहौल आहे श्रीमंती नशेचा.. त्यामुळे अशा पार्टीज पोलिसांच्या रडारवर कायमच असतात. त्यामुळेच पोलीस आणि नार्कोटिक्स एजन्सी नेहमी अशा घटनांवर नजर ठेवूनच असतात. यातूनच अनेक ड्रग पेडलर आणि त्याअनुषंगाने होणारा कोट्यवधीचा व्यवहार उजेडात येतो.


बाटला म्हणजे अगदी खालच्या दर्जाचा अमली पदार्थ ज्याची किंमत 100 ते 200 रुपये असते. यामध्ये कफ सिरपचा प्रामुख्याने समावेश होतो. गांजाची किंमत 150 रुपये असून, यातून तीन डोस दिवसाला पुरेसे होतात. त्यानंतर येणारे एमडीएम हे थोडे महाग असून, दिवसाला यावर किमान 1 ते दीड हजार खर्च करावे लागतात. त्यानंतर बाजार भरतो श्रीमंतांचा, म्हणजेच कोकेनचा. कोकेनमध्येही अनेक प्रकार असून त्याचे भाव लाखात ठरतात. कोकेनच्या पुढे पुन्हा अनेक व्हरायटी लाखो-कोटीच्याच भावात विकल्या जातात. म्हणूनच म्हटले, स्वस्त नशा आणि महाग नशा या दोन्हीही नशा केवळ एकच काम करतात - आयुष्यातून उठवायचे. सध्याच्या घडीला अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांवर एमडीएमएमचा विळखा पडलेला आहे.
 

नशेच्या मोहाखातर आजची तरुणाई वाया गेलेली आहे असे अजिबात म्हणू नका, तर गेल्या कित्येक वर्षांपासून तरुणाईवर नशेचा प्रभाव आहेच, तो आता खुलेपणाने समोर येऊ लागलाय इतकेच.. कारण नशेचा आता ‘माहौल’ झालेला आहे. चुपके चुपके नशा करण्याचे दिवस कालबाह्य झालेत. आता नशेचा माहौल तुमचे स्टेटस ठरवतो. म्हणूनच आता ‘रॅव्हर्स’ हा शब्द तुमचे स्टेटस ठरवतो!