गांभीर्याने घेण्याचा विषय

विवेक मराठी    18-Oct-2021
Total Views |
  
परराष्ट्र धोरण हा विषय प्रत्येक देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असतो. भारत हा देश प्राचीन देश आहे. त्याला कैक हजार वर्षांची परंपरा असली तरी तो सुमारे एक हजार वर्षे पारतंत्र्यात राहिला, त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण जगात काय चालले आहे, याचे ज्ञान शून्य. हीच परिस्थिती पुन्हा ओढवायला नको असेल, तर देशांतर्गत घडामोडींबरोबर जागतिक घडामोडींचेही ज्ञान असणे गरजेचे आहे.
 
bjp_2  H x W: 0
भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की, ‘भारत हा एका बेचकीत सापडलेला देश आहे. एका बाजूला मुसलमान देश आहेत आणि दुसर्‍या बाजूला चीन आहे. चीनचे आक्रमण झाले, तर सर्व देश त्याविरुद्ध उभा राहील, पण मुस्लीम आक्रमण झाल्यास काय होईल?’ ‘बहिष्कृत भारत’मधील एका अग्रलेखात त्यांनी हे विचार मांडलेले आहेत. त्याचे आज स्मरण होण्याचे कारण असे की, एका बाजूला मुस्लीम पाकिस्तान आहे, ज्याने भारताशी दहशतवादी लढाई सुरू केलेली आहे आणि उत्तरेला चीन आहे, ज्याने उत्तर सीमेवर सतत कटकटी सुरू केल्या आहेत आणि भारताला चारही बाजूंनी घेरण्याचे धोरण त्याने ठेवले आहे.
 
 
देशाच्या संरक्षणाचा प्रश्न परराष्ट्र धोरणाचा असतो. आपला देश सुमारे एक हजार वर्षे पारतंत्र्यात राहिला, त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण जगात काय चालले आहे, या बाबतीत आपण झोपून राहिलो. अरबस्तानात इस्लामचा उदय झालेला आहे, त्याची आक्रमणे सुरू झालेली आहेत, इराणचे पर्शियन साम्राज्य धुळीला मिळाले आहे, अरबांनी अफगाणिस्तान जिंकून घेतलेला आहे.. हे अरबी इस्लामी आक्रमण काय आहे आणि आज न उद्या ते भारतात येणार आहे, ते कसे रोखायचे, त्याच्याशी मुकाबला कसा करायचा याचा विचार तेव्हाच्या समाजाने केला नाही. समाज झोपला, त्यामुळे राज्यकर्ते झोपले. गोर्‍या लोकांच्या बाबतीत हीच गोष्ट झाली. गोरे लोक कोण आहेत, ते भारतात कशासाठी आले आहेत, त्यांची समाजव्यवस्था कशी आहे, त्यांच्याकडे विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान कोणते आहे, त्यांनी समाजसंघटन कसे बांधले आहे, हे जाणून घेण्याची तेव्हा कुणाला गरज वाटली नाही. आम्ही झोपलो आणि आमच्या हातापायात बेड्या कधी पडल्या, हे आम्हाला थोडी जाग आल्यावर समजले.
 
 
भविष्यात अशी स्थिती व्हायची नसेल, तर जगात काय चालू आहे, याची माहिती प्रत्येकाने करून घेणे हे त्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. इंडो-पॅसिफिक महासागरात काय चालू आहे, रशियाने क्रिमिया गिळंकृत केला, युक्रेनमध्ये बंडाळी सुरू केली, ती कशासाठी? आपल्या अस्तित्वावर त्याचे काय परिणाम होतील, हे बारकाईने समजून घेतले पाहिजे. चीनचे लष्करी सामर्थ्य किती आहे, आधुनिक शस्त्रे किती आहेत, ती चीनने कुठे कुठे ठेवली आहेत, तिबेटमध्ये चीनने किती ठिकाणी लष्करी तळ बांधले आहेत, हे जाणून घ्यायला पाहिजे. चीनचे हस्तक बनून - म्हणजे चीनच्या कम्युनिझम विचारांनी प्रेरित होऊन भारतात कोणते पक्ष काम करतात, त्यांच्या संघटना कुठे कुठे आहेत, याचीदेखील माहिती सामान्य माणसाने करून घेतली पाहिजे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हा विषय आहे, संरक्षणाचा विषय सेनादलाचा आहे, माहिती काढण्याचा विषय हेरखात्याचा आहे आणि आमचा विषय पगडी-पागोट्याचे राजकारण करण्याचा आहे, जातीचे राजकारण करण्याचा आहे, भाषेवरून राजकारण करण्याचा आहे! आणखी काही झाले नाही, तर व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकारण करण्याचा आहे. अशी जर आमची स्थिती झाली, तर कडवड शब्दात सांगायचे म्हणजे, आम्ही आमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अपात्र लोक आहोत.
 

bjp_1  H x W: 0
 
अफगाणिस्तानात तालिबान्यांचे राज्य आलेले आहे. हे तालिबानी कट्टर इस्लामी जिहादी आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. अमेरिका वीस वर्षे अफगाणिस्तानात होती. अमेरिकेने माघार घेतल्यामुळे मध्य आशियात एक पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न तुर्कस्तान करीत आहे. चीनदेखील करतो आहे. अफगाणिस्तान हा देश जर दहशतवादी गटांची सुवर्णभूमी झाला, तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील. जगाचे काय होईल, याचा विचार थोडा बाजूला ठेवू. भारतावर त्याचे काय परिणाम होतील, हा आपल्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. तुर्कस्तान इस्लामी देश आहे. एकेकाळी हा तुर्कस्तान साम्राज्यवादी होता. त्याचे साम्राज्य संपूर्ण अरबस्तानात आणि युरोपमधील अनेक देशांत पसरलेले होते. त्याला ऑटोमन साम्राज्य म्हणतात. हा इतिहास तुर्कस्तान विसरत नाही. आज तो नाटो संघटनेचा सदस्य आहे. अमेरिकेशी आणि युरोपातील देशांशी या कराराने तो बांधलेला आहे, परंतु स्वतंत्रपणे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्याची धडपड चालू आहे. त्याचे प्रस्थ अफगाणिस्तानात वाढले, तर ते भारताच्या दृष्टीने हिताचे होणार नाही.
 
 
अशा सर्व प्रश्नांचा अत्यंत बारकाईने आणि गंभीरपणाने विचार करणारे शासन केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शासनाचे नेतृत्व करीत आहेत. भारताला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिली गोष्ट आपले खरे मित्र कोेण आहेत, यांचा शोध घेऊन ते जोडावे लागतात आणि दुसरी गोष्ट आपले शत्रू कोण आहेत, हे निश्चित करून त्यांच्याशी सामना करण्याची तयारी करावी लागते. मागील लेखात क्वॉडची माहिती दिलेली आहे. नवीन मित्र जोडण्याच्या दृष्टीने मोदी यांनी केलेले हे सकारात्मक प्रयास आहेत. नेहरूंच्या काळापासून, काही कारण नसताना, आपल्या शासनाने अमेरिकेपासून दुरावा आणि काही वेळा शत्रुत्व निर्माण केले. यामुळे भारत जगात एकाकी झाला. चीनने भारताला 1962 साली ठोकले. जग गंमत बघत बसले. पाकिस्तानने भारतावर तीन वेळा आक्रमणे केली. तेव्हादेखील जग काही भारताच्या मदतीला धावून आले नाही. हे परराष्ट्र धोरणाचे प्रचंड अपयश समजले पाहिजे.
 
 
अफगाणिस्तानच्या प्रश्नाचे गांभीर्य नरेंद्र मोदी यांनी फार उत्तम प्रकारे जाणलेले आहे. डहरपसहरळ उेशिीरींळेप जीसरपळीरींळेप (डउज) ही एक जागतिक संघटना आहे. 2001 साली तिची स्थापना झाली. या संघटनेत चीन, भारत, कझागस्तान, किरगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताझिकिस्तान, उझबेकिस्तान, असे आठ देश आहेत. 2017 साली भारत या संघटनेत सामील झाला. परस्परांच्या संरक्षणाचा समझोता या देशांमध्ये झालेला आहे. आशियातील आणि युरोपातील देश असा याचा खूप मोठा विस्तार आहे. या संघटनेची बैठक 17 सप्टेंबर रोजी होती. तिला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलेले आहे, ते अतिशय महत्त्वाचे आहे. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी जे विषय उपस्थित केले आणि काही गर्भित इशारे दिले, ते समजून घ्यायला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय मंचावरील भाषण निवडणूक प्रचारसभेतील भाषण नसते. अशा भाषणात परोक्षपणे अनेक विषय सुचविलेले असतात. ‘लेकी बोले सुने लागे’ अशा प्रकारची भाषा असते.
 
 
अफगाणिस्तानावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “अफगाणिस्तानातील सत्ता बदल हा सर्वसमावेशक नाही आणि कोणत्याही चर्चेने तो झालेला नाही. त्यामुळे सत्तेवर येणार्‍या शासनास मान्यता देण्याच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. यामुळे जागतिक समुदायाने एकत्रितपणे विचार करून अफगाणिस्तानातील शासनाच्या वैधतेबद्दल काळजीपूर्वक निर्णय केला पाहिजे.” मोदी जे बोलले नाहीत, ते असे आहे - अफगाणिस्तानातील बदल पाकिस्तानच्या मदतीने झालेला आहे. त्यात अन्य कुणाचा समावेश नाही. अफगाणिस्तानातील जनतेचा त्यात सहभाग नाही.
 
 
मोदी पुढे म्हणतात की, जर अफगाणिस्तान अस्थिर आणि उग्रवादी गटांच्या ताब्यात राहिला, तर “दहशतवादी आणि अतिरेकी विचारधारांना बळ मिळेल. अफगाणिस्तानात फार मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे सोडून देण्यात आलेली आहेत. हादेखील एक धोका आहे. भविष्यात अफगाणिस्तान अमली पदार्थांच्या अनिर्बंध व्यापारात, बेकायदेशीर शस्त्रव्यापारात आणि मानवी व्यापारात प्रवेश करण्याचा धोका आहे.” एससीओ संघटनेच्या सदस्य देेशांना संबोधित करीत नरेंद्र मोदी म्हणाले की, “या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व सदस्यांनी कणखर आणि सर्वमान्य निकष ठरविले पाहिजेत. भविष्यातील दहशतवादविरोधी सहकार्यासाठी या निकषांचा उपयोग केला जाऊ शकतो. उग्रवादाशी संघर्ष हा आवश्यक आहे. कारण त्यामुळे एससीओ संघटनेच्या सदस्य देशांमधील विश्वाची वृद्धी होईल.”
 
 
मोदींना हे सुचवायचे आहे की, पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे. या देशावर काही नियंत्रण आणायचे असेल, तर एससीओ सदस्य देशांनी सर्वांना मान्य होतील असे दहशतवादविरोधी निकष निश्चित करायला पाहिजेत. भारताला दहशतवादाशी एकाकी लढायचे नाही. दहशतवाद ही समस्या सर्वांची सामायिक समस्या आहे, हे मोदींना बोलायचे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या शत्रूंना राजनीतिक व्यूहरचनेच्या मार्गाने वठणीवर आणायचे असते. मोदी हे काम फार कौशल्याने करताना दिसतात.
 
 
याच भाषणात ते पुढे म्हणाले, “याच प्रदेशातील सर्वात मोठे आव्हान शांतता, सुरक्षा आणि उणे विश्वासाचे (र्ढीीीीं ऊशषळलळींचे) आहे. यामागचे मुख्य कारण वाढत चाललेला उग्रवाद आहे. आताच्या अफगाणिस्तानातील घटनांनी हे आव्हान अधिक प्रकाशात आणलेले आहे. म्हणून एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) सदस्य देशांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे.” नरेंद्र मोदी यांनी सूचकपणे पाकिस्तानकडे अंगुलिनिर्देश केलेला आहे. सगळे जग जाणते की, तालिबान ही पाकिस्तानची निर्मिती आहे आणि तालिबानींना सर्व प्रकारचे संरक्षण, प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानने केलेले आहे. त्यांच्यात धार्मिक उन्माद भरण्याचे कामदेखील पाकिस्तानने केलेले आहे. म्हणून पाकिस्तानला सर्वांनी मिळून नियंत्रणात आणले पाहिजे.
आपण इस्लामविरोधी आहोत, असा संदेश जाणे धोक्याचे होईल, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौम्य इस्लामचा विचार मांडला. ते म्हणाले की, “ऐतिहासिकदृष्ट्या मध्य आशिया सौम्य इस्लामची भूमी राहिली आहे. येथे सुफी संप्रदायाचा उदय झाला आणि त्याचा विस्तार झाला. इथूनच त्याचा जगभर प्रसार झाला. हा ऐेतिहासिक वारसा लक्षात घेऊन एससीओने उग्रवाद आणि अतिरेकीवाद याच्याशी संघर्ष करण्याची समान रचना उभी केली पाहिजे.” म्हणजे मोदींना हे सांगायचे आहे की, इस्लाममधील सुफी संप्रदायाला खूप बळ दिले पाहिजे.
 
 
अफगाणिस्तानचा विषय आपल्यासाठी नाजूक आहे. असे नाजूक विषय अत्यंत कौशल्याने हाताळावे लागतील. विश्वनेता म्हणून गेल्या सात वर्षांतील मोदी यांची जी वाटचाल चालू आहे, त्यावरून असे ठामपणे म्हणता येईल की, अफगाणिस्तानचा विषय समर्थपणे आणि भारताच्या हिताच्या दृष्टीने हाताळण्याची पूर्ण क्षमता नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे.