तुळजाई प्रतिष्ठानचा स्वआधार मतिमंद प्रकल्प

विवेक मराठी    18-Oct-2021
Total Views |
@उत्तरा मोने
मतिमंद मुलींच्या संगोपनासाठी शहाजी जाधव यांनी तुळजाई प्रतिष्ठानतर्फे 2008 साली ‘स्वआधार मतिमंद प्रकल्प’ सुरू केला. प्रेमाला पारख्या झालेल्या या मुलींचं संगोपन तिथे अगदी आईच्या मायेने केलं जातं. मुलींचं आरोग्य, शिक्षण आणि पुनर्वसन करणं हेच आता त्यांचं ध्येय झालेलं आहे. संस्थेत असणार्‍या 150 मुलींना शिक्षण आणि आरोग्याबरोबरच त्यांच्यावर संस्कार आणि मायेची ऊब देण्याचं काम आज शहाजी जाधव नेमाने करताहेत.

social _1  H x
 
 
खरं तर एखाद्या घरात लहान मूल जन्माला येणं ही आनंदाची भावना असते. संपूर्ण घर आनंदाने न्हाऊन निघतं. त्या बाळाचं संगोपन करण्यात, त्याचं कोडकौतुक करण्यात दिवस कसे मजेत निघून जातात. पण ज्या घरात मानसिक विकलांग मूल जन्माला येतं, तिथे मात्र सगळीकडे सारखी परिस्थिती नसते. काही वेळा फक्त स्वत:च्या सुखाचा विचार केला जातो, काही वेळा खोट्या प्रतिष्ठेपायी, तर काही वेळा आर्थिक दुर्बलतेमुळे या मुलांना वार्‍यावर सोडलं जातं. ‘चोच देई जो पिलांना, तोच चारा देतसे’ या न्यायाने अशाही मुलांना मायेची पाखर घालणारी, मदतीचा हात देणारी, त्याचं आयुष्य सुखावह करणारी माणसं समाजात असतात. तुळजाई प्रतिष्ठानचे संस्थापक शहाजी जाधव यांनी आपल्या कामाने असाच आदर्श निर्माण केला आहे.
 
मराठवाड्यात अशाच मानसिक विकलांग, मतिमंद मुलींच्या संगोपनासाठी त्यांनी तुळजाई प्रतिष्ठानतर्फे 2008 साली ‘स्वआधार मतिमंद प्रकल्प’ सुरू केला. प्रेमाला पारख्या झालेल्या या मुलींचं संगोपन तिथे अगदी आईच्या मायेने केलं जातं. मुलींचं आरोग्य, शिक्षण आणि पुनर्वसन करणं हेच आता त्यांचं ध्येय झालेलं आहे. संस्थेत असणार्‍या 150 मुलींना शिक्षण आणि आरोग्याबरोबरच त्यांच्यावर संस्कार आणि मायेची ऊब देण्याचं काम आज शहाजी जाधव नेमाने करताहेत. या अनाथांना घडवण्याचा, शिक्षणाद्वारे स्वावलंबी बनवण्याचा वसा त्यांनी उचलला आहे.
 
 
गतिमंद, एच.आय.व्ही., कर्णबधिर आणि मूकबधिर अशा मुलांना सांभाळताना शहाजी जाधव यांची दररोज तारेवरची कसरत असते. आजारपण नेहमीचंच, दररोज कोणालातरी रुग्णालयात दाखल करावंच लागतं. कारण 43 एच.आय.व्ही.बाधित मुलांचाही ते आपुलकीने सांभाळ करतात. कळंबच्या सहारा एच.आय.व्ही.बाधित मुलांचं बालगृह यांच्या कामामुळे चर्चेत आलं आहे. एका पेट्रोल पंपावर एक मुलगी कोणीतरी टाकून गेलं. या मुलीला घेऊन पोलीस तब्बल 21 दिवस फिरत होते. शेवटी तिला शहाजी यांनी जवळ केलं. त्या मुलीला चालता-बोलताही येत नव्हतं. प्रकृती एकदम तोळामासा, तिची प्रकृती बिघडली की काहीच कळत नसे. अशा मुलीला सांभाळताना शहाजींनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जी मेहनत घेतली, ती शब्दातीत आहे.

social _2  H x
 
केवळ एच.आय.व्ही.च नाही, तर मतिमंद आणि अनाथ मुलांच्या समस्या तर वेगळ्याच असतात. आपण किती खातो हे त्यांना समजत नाही. त्यामुळे त्यांना ‘शी-शू’ कुठे करायची, हेही कळत नाही. सारखे कपडे बदलणं हा एक उद्योगच असतो. एवढे कपडे आणायचे कुठून, असाही प्रश्न असतो. दानशूर व्यक्तींकडून जुने किंवा नवे कपडे मिळवण्यासाठी शहाजी आणि त्यांच्या सहकार्‍यांना वेगळेच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक मुलाचा आहार किती असावा, कसा असावा, याचं वेळापत्रक ठरवावं लागतं. जन्मदात्यांनी सोडून दिलेल्या अशा मुलांचा सांभाळ करणं सोपं नाही. हे सगळं काम ते अगदी मनापासून करतात. मायेचा आणि प्रेमाचा ओलावा एवढा की त्यांनी अनेक मुलांना आपलंसं केलं आहे.
 
 
या बालकाश्रमाला आणि मतिमंद मुलांच्या निवासी विद्यालयाला सरकारकडून अनुदान आहे. मात्र, ते पुरत नाही. एच.आय.व्ही.बाधित मुलांसाठी औषधं मिळणंसुद्धा कधीकधी अवघड होऊन बसतं. अशा वेळी गावातल्या औषध विक्रेत्यांच्या संघटनेकडून, काही दानशूर व्यक्तींकडून निधी गोळा करायचा आणि जमेल तेवढं काम सकारात्मक पद्धतीने पुढे न्यायचं, ही त्यांची सवय. अर्थात त्यांनी उभारलेलं काम लक्षात घेऊन मदतीचा ओघही वाढू लागला आहे. दिवाळी आणि गणेशोत्सवदेखील अनेक जण या मुलांबरोबर साजरे करत आहेत. एखादं मूल आजारी पडलं, तर त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी पूर्वी त्यांना बरेच कष्ट करावे लागले. आजारी पडलेल्या मुलाला दुचाकीवरून अंबाजोगाई येथील दवाखान्यात त्यांना न्यावं लागे. त्यांनी सलग 8 वर्षं हा कष्टाचा प्रवास केला. अलीकडेच उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने त्यांना रुग्णवाहिका दिली आहे. शहरातले संवेदनशील नागरिक आता शहाजींच्या बाजूने उभे आहेत. हे काम पुढे नेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता शहाजी यांच्या अंगी असल्याने त्यांना मदतही मिळत आहे.
 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील पानगाव या गावी शहाजी यांचा जन्म झाला. अत्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या या कुटुंबाकडे फक्त तीन एकर शेती होती. घरात तीन भावंडं, त्यामुळे दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी रोजंदारी करावी लागत असे. घराच्या गरिबीमुळे ते वडील-भावांबरोबर ऊसतोड मजूर म्हणून काम करत असत. त्याच वेळी त्यांना एका बालविकास संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांना समाजकार्याची गोडी निर्माण झाली. आपल्यापेक्षाही खडतर आयुष्य ज्यांच्या नशिबी आहे, त्या मुलाचं जीवन बदलण्याच्या निर्धाराने त्यांनी ही स्वत:ची संस्था निर्माण केली.


social _2  H x
 
स्वआधार प्रकल्पाअंतर्गत त्यांनी बेवारस विशेष मुलींचं संगोपन सुरू केलं. आळणी (ता. उस्मानाबाद) येथे संस्थेसाठी जमीन घेऊन सुसज्ज इमारत उभी केली. पाच ते सहा मुलींसह सुरू केलेल्या या संस्थेत आज 150 मुली आहेत. या सर्व मुलींसाठी शहाजी मायबाप बनले आहेत. स्वआधार प्रकल्पातल्या या मुलींच्या कार्यक्षमतेवरून त्यांची वर्गवारी केली आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणार्‍यांची काही फारशी काळजी नसते. परंतु काही मुली जन्मत: अधिकच विकलांग असतात. त्यांना सातत्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. अनेक मुलींना पौष्टिक आहार देऊन त्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्याचं काम प्रकल्पातले कर्मचारी आणि स्वत: शहाजी करतात. अनेक मुली स्वत:च्या हाताने जेवणही करू शकत नाहीत. देवाने जे दोन हात दिले आहेत, ते या मुलींसाठी आहेत या भावनेतून शहाजी स्वत: या मुलींना भरवतात.
 
 
इतकी वर्षं हे काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करून ‘स्वआधार’च्या संपूर्ण परिवाराने या मुलींची काळजी घेतली. कोरोनाच्या कठीण काळातही इथल्या शिक्षकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. उस्मानाबादपासून 10 कि.मी. अंतरावर गडपटीजवळ स्वआधार गतिमंद मुलाचं निवासी बालगृह आहे. या वसतिगृहातल्या 11 शिक्षकांनी एकही दिवस सुट्टी न घेता, स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून या अनाथ गतिमंद मुलींची शुश्रुषा केली. कधी आई-ताई, तर कधी शिक्षिका होऊन त्या मुलींना आधार दिला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 52 मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला. पण त्याही परिस्थितीत या मुलींची योग्य काळजी घेतली गेली.


social _1  H x
 
अत्यंत निसर्गरम्य वातावरणात, मोकळ्या हवेत इथे मुलींची देखभाल केली जाते. त्यांच्यातल्या क्षमता आणि मर्यादा ओळखून त्यांना कौशल्यं शिकवली जातात. या मुलांना आता काही वस्तू करायला शिक्षकांनी शिकवलं आहे. वेगवेगळे खेळ, संगीत, व्यायाम अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. प्रत्येक मुलीचं निरीक्षण करून त्यांच्या बुद्ध्यंकानुसार त्यांना निवडलं जातं. त्यांचे गट करून शिक्षण दिलं जातं. बालगृहात काही मुली अपंग आहेत, त्यांना शारीरिक आधार दिला जातो. ज्या मुलींच्या हाताच्या बोटांना ग्रिप नाही, त्यांना हाताळण्यासाठी वेगवेगळी खेळणी दिली जातात आणि त्यांच्या बोटांना व्यायाम दिला जातो. मुलींचे मैदानी खेळही घेतले जातात. शाळेच्या परिसरात छान फळझाडं आणि फूलझाडं लावलेली आहेत. त्यामुळे शाळेचं वातावरणही सुंदर राहतं. या झाडांची काळजी कशी घ्यावी, त्यांचं संगोपन कसं करावं याचंही शिक्षण मुलींना दिलं जातं. त्यामुळे निसर्गाशी मैत्रीही या निमित्ताने जपली जाते.
 
 
संस्थेचे संस्थापक शहाजी जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय कल्पकतेने स्वआधार तुळजाई प्रतिष्ठान या वास्तूची उभारणी केलेली आहे. परिसरात चिकूची, सीताफळाची, पेरूची, जांभळाची, नारळाची झाडं, लाल मातीचं मैदान, घसरगुंडी, सीसॉ अशी खेळांची साधनं, शिवाय मुगाच्या, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं लावलेली, चार गाई, गोबर गॅसचा छोटा प्लँट, गांडूळ खतनिर्मिती अशा अनेक निसर्गपूरक गोष्टी या परिसरात दिसतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या थकलेल्या मुलींनाही एक वेगळा हुरूप नक्की येतो.


social _3  H x
 
समाजातल्या अशा निराधार स्त्रियांना, मुलींना आधार देण्याचं काम ‘स्वआधार’ची सगळी मंडळी अत्यंत मनापासून करताहेत. समाजानेही सढळ हस्ते त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे आणि आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, तरच हे सकारात्मक काम करणार्‍यांचं मनोबल अधिक उंचावेल.