भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या एक महान अभियंता

विवेक मराठी    18-Oct-2021
Total Views |
@अजित पेंडसे 9422331164
 
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी भारतात इंजीनिअरिंगचा पाया घातला. या महान अभियंत्याच्या कार्याचे केलेले हे स्मरण.


photo_1  H x W:
 
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला. हा दिवस भारतात सर्वत्र इंजीनिअर्स डे किंवा अभियंता दिन म्हणून साजरा करतात, कारण डॉ. विश्वेश्वरय्या यांनी भारतात इंजीनिअरिंगचा पाया घातला.
 
 
जागतिक कीर्तीचे अभियंता आणि नवभारताचे एक निर्माते म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, अशा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी बंगलोरला अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला.
 
 
आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे त्यांचे पूर्वजांचे गाव. दक्षिण भारतात आपल्या मूूळ गावाच्या नावाचा स्वत:च्या नावाच्या आधी उल्लेख करण्याची पद्धत आहे. त्यानुसार ‘मोक्षगुंडम’ गावाचे नाव विश्वेश्वरय्या यांच्या नावाच्या आधी आलेले आहे. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होते. पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये (लग्न-मुंजी, सत्यनारायण वगैरे) यांमधून मिळणार्‍या दक्षिणेतून त्यांचा घरखर्च कसाबसा चालवत. घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी पैसा नव्हता, तेव्हा त्यांनी विद्यार्थिदशेत शिकवण्या करून शाळेच्या फीसाठी कष्टाने पैसा जमा केला. थोडक्यात, शिक्षणासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. 1880मध्ये बी.ए.ची पदवी पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर म्हैसूर संस्थानाची शिष्यवृत्ती मिळवून पुण्याच्या त्या वेळच्या सायन्स कॉलेजमध्ये - आजच्या सी.ओ.ई.पी.मध्ये (कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, पुणे) त्यांनी प्रवेश घेतला. तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत पूर्ण करून नोव्हेंबर 1883मध्ये ते एल.सी.ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजीनिअरिंग) - आजची बी.ई. सिव्हिल पदवी बाविसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यावरून त्यांच्या हुशारीची चुणुक दिसून येते. (पुण्याचे सी.ओ.ई.पी. हे भारतातील सर्वात जुने इंजीनिअरिंग कॉलेज असून 16 डिसेंबर 1974 रोजी त्याच्या शतवार्षिक - सेंटेनरी उत्सवाला सर एम. विश्वेश्वरय्या हे मुख्य पाहुणे होते, परंतु प्रकृती ठीक नसल्याने त्यांना हजर राहता आले नाही. त्यांनी लिहून पाठवलेल्या भाषणाच्या प्रती सर्वांना देण्यात आल्या होत्या.) शिक्षण पूर्ण झाल्यावर 1884मध्ये मुंबई राज्याच्या पी.डब्ल्यू.डी. खात्यात असिस्टंट इंजिनिअर म्हणून त्यांची पुण्यात थेट नियुक्ती झाली.
 
मुंबई सरकारच्या नोकरीत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. त्यापैकी काही उल्लेखनीय कामे म्हणजे 1893मध्ये तेव्हाच्या सिंध प्रांतातील सक्कर शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्र, सिंधू नदीपासून पाणी पुरवण्याची एक अभिनव योजना आखून पाण्याची समस्या कायमची सोडवली; त्याव्यतरिक्त येमेन देशाच्या एडन या वाळवंटी प्रदेशांत ब्रिटिशांच्या सैन्याची मोठी छावणी होती, तेथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते ही समस्या दूर करण्यासाठी एडन सरकारने एका हुशार आणि कर्तबगार इंजीनिअरची मागणी केली होती. तिथे अर्थात एम.व्हीं.ची निवड झाली. (सरकारी नोकरीत सर्व जण विश्वेश्वरय्या यांना एम.व्ही. या टोपण नावाने ओळखत असत.) हा प्रश्न सोडवण्यासाठी एडनपासून साठ मैलांवर असलेल्या ठिकाणाहून पावसाचे पाणी पुरवण्याची योजना तयार करून, ती कृतीत आणून, पाण्याची समस्या कायमची दूर केली. त्याव्यतिरिक्त त्या काळात शेतकरी पिकासाठी कालव्याच्या पाण्याचा वाटेल तसा वापर करत असत, त्यावर नियंत्रण नव्हते, त्यासाठी एम.व्हीं.नी या प्रश्नाच्या खोलात जाऊन अभ्यास केला आणि ब्लॉक सिस्टिम नावाची नवीन पद्धत शोधून काढली. सुरुवातीला त्याला प्रचंड विरोध झाला, पण जसजशी शेतकर्‍यांना त्याची उपयुक्तता पटली, तसतसा या योजनेला होणारा विरोध मावळला आणि नंतर ब्लॉक सिस्टिम योजनेस सर्वांनी साथ दिली. सरकारी नोकरीच्या निमित्ताने एमव्हींचे पुण्यात सुमारे चौदा-पंधरा वर्षे वास्तव्य होते. पुण्याजवळच्या खडकवासला धरणाला, 1901-03च्या दरम्यान बसवलेले दरवाजे जलाशयातील पाणी विशिष्ट उंचीवर चढले की आपोआप उघडतात आणि पाणी कमी झाले की आपोआप बंद होतात. या अ‍ॅटोमॅटिक गेटचे डिझाइन एम.व्हीं.नी तयार केलेले आहे. पुणे शहराची जमिनीखालून सांडपाणी नि:सारणाची र्(ीपवशीर्सीेीपव वीरळपरसश ीूीींशाची) योजना एमव्हींनी तयार करुन प्रत्यक्षात उतरवली. त्या काळात ते एक आश्चर्य ठरले होते. पुण्याच्या जवळपास शेतीला लागणारे कालव्याचे पाणी वाचवण्यासाठी एमव्हींनी शेतकर्‍यांना ब्लॉक सिस्टिमचे महत्त्व पटवून देऊन शेती व्यवसायात विश्वास निर्माण केला. पुण्याच्या पायाभूत साधनसुविधा वाढवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान देऊन विकासची दिशा दिली.

 
पुण्याच्या वास्तव्यात एमव्ही सर्वांना खुशीने भेटत आणि त्यांच्या गप्पात सामील होत. मित्रमंडळींना आवर्जून सांगत की मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या पुण्याच्या मुक्कामात मला लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, साहित्यसम्राट केळकर वगैरे अनेक विद्वान, देशप्रेमी, थोर मंडळींचा सहवास लाभला. एमव्हींची आठवण म्हणून पुण्यात नाव घ्यावे असे स्मारक नाही, याची मात्र उणीव नक्कीच भासते.
 
सरकारी नोकरीत असताना त्यांनी असामान्य कर्तृत्व दाखवले, तरी केवळ ते भारतीय होते म्हणून इंग्रज सरकारने त्यांना चीफ इंजीनिअर हे पद नाकारले. ती जागा फक्त गोर्‍या साहेबांसाठी राखून ठेवलेली असे. त्या वेळी एम.व्हीं.ची पेन्शनसाठी लागणार्‍या नोकरीच्या काळाची मुदत पूर्ण होण्यास काही महिनेच शिल्लक होते. एम.व्हीं.च्या नम्र, तत्त्वनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वभावाला बढतीबाबत झालेला अपमान सहन झाला नाही. पेन्शन मिळणार नाही याची कल्पना होती, तरी त्यांनी 1908ला सुपरिंटेंडेंट इंजीनिअर म्हणून नोकरीचा लगेच राजीनामा दिला. परंतु ब्रिटिश सरकारने कडक नियमाला अपवाद करून त्यांना पेन्शन मिळेल अशी इंग्लंडहून खास परवानगी आणून एमव्हींचा मान राखला.
 
अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची सरकारी नोकरी सोडल्याची बातमी सर्वत्र पसरली. लगेच हैदराबाद संस्थानचा खास निमंत्रक त्यांना भेटला. चीफ इंजीनिअर म्हणून त्याच पगारावर त्यांची नेमणूक केल्याचे पत्र त्यांना दिले आणि योगायोग म्हणजे दुसर्‍या दिवशी म्हैसूर संस्थानाचा एक दूत महाराजांचे पत्र घेऊन आला. त्यात त्यांना चीफ इंजीनिअर म्हणून नोकरीवर रुजू होण्याबद्दल विनंती केली होती. एमव्ही मोठ्या पेचात सापडले होते. त्यांना कोणालाही दुखवायचे नव्हते. अर्थात एमव्हींची इच्छा आपल्या मूळ राज्यामध्ये परतण्याची होती. परंतु हैदराबादमधील नद्यांना येणार्‍या पुरांचा प्रश्न गंभीर होता आणि त्यांनी फक्त तेवढीच समस्या सोडवून नंतर म्हैसूरला जाण्याचा निर्णय घेतला.
 
त्या काळात हैदराबाद शहरातील मूसी आणि उपनदी ईसी या दोन नद्यांना मुसळधार पावसाच्या पाण्याने दर वर्षी प्रचंड महापूर येत असे. पुरात घरेदारे, माणसे, गुरे वाहून जात आणि प्रचंड नुकसान होत असे. पूर काबूत ठेवण्यासाठी एमव्हींनी दोन्ही नद्यांवर धरणे बांधण्याची योजना तयार करून नद्यांवरील महापुरांचा प्रश्न सोडवल्यानंतर 1909मध्ये स्वत:च्या म्हैसूर संस्थानात (आजचे कर्नाटक राज्य) चीफ इंजीनिअर म्हणून रुजू झाले.
म्हैसूरचे महाराज एमव्हींच्या योजनाबद्ध, शिस्तीत काम करण्याच्या पद्धतीवर खूश झाले. महाराजांनी 1912मध्ये म्हैसूर संस्थानाचे दिवाण (चीफ मिनिस्टर) म्हणून एमव्हींची नेमणूक केली. एमव्हींनी चालू उद्योगधंद्यात आधुनिक साधनांचा उपयोग करून त्यात सुधारणा केल्या. अनेक नवीन उद्योगधंदे निर्माण केले. भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्ससारखा महत्त्वाचा कारखाना सुरू केला. रेल्वेचे व्यवस्थापन म्हैसूर राज्याच्या कक्षेत आणले. बँक ऑफ म्हैसूर चालू केली. पर्यटनासाठी उत्तम हॉटेल्स सुरू केली. कृष्णराजसागर धरणाचे बांधकाम पूर्ण करून राज्याला मुबलक वीज आणि पाणी दिले आणि महत्त्वाचे म्हणजे नयनरम्य - मनोहर वृंदावन उद्यान भेट म्हणून अर्पण केले. शिक्षणाचे मोल किती आहे याची त्यांना चांगलीच जाणीव होती, म्हणून तरुणांसाठी नवीन शाळा-कॉलेजेस सुरू केली, तर मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये आणि वसतिगृहे चालू केली. शेतकी-मेडिकल-इंजीनिअरिंग कॉलेजेस चालू करून म्हैसूर राज्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले. थोडक्यात, म्हैसूर संस्थानाची सर्व दृष्टीने प्रगती करून राज्याचा कायापालट केला.
 
नीटनेटके, स्वच्छ, कुठेही एकसुद्धा सुरकुती नसलेले धोतर किंवा सूट आणि डोक्यावर म्हैसुरी फेटा (पगडी) घालणे हे विश्वेश्वरय्यांचे खास वैशिष्ट्य होते. ते शिस्तीचे भोक्ते होते. ऑफिसमध्ये कामासंबंधीची गोष्ट आखीव, घाई न करता, व्यवस्थित करणे ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. स्थापत्यशास्त्रज्ञ विश्वेश्वरय्या हे जन्माने मोठे नव्हते, तर ते प्रयत्नाने श्रेष्ठ झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड वाचन, चिंतन, संशोधन, उत्साह आणि तत्त्वनिष्ठा हे त्यांची गुणवैशिष्ट्ये होय.
 
इंग्रज सरकारने त्यांना सर, कैसर-ई-हिंद, तसेच के.सी.आय.ई. आणि सी.आय.ई असे बहुमानाचे किताब बहाल केले, तर भारत सरकारतर्फे 7 सप्टेंबर 1955 रोजी दिल्लीला राष्ट्रपती भवनात डॉ. राजेंद्रप्रसादांनी त्यांना भारतरत्न म्हणून गौरवले. अनेक विद्यापीठांनी त्यांना सर्वोच्च डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 
पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणत, “ ""He is an engineer of Integrity, Character and Broad National Outlook..” 1 सप्टेंबर 1961 रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवात पंडित नेहरूंनी आपल्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्याच छापाची पोस्टाची तिकिटे चिकटवलेली होती. त्यांनी युवा पिढीला दिलेला संदेश असा होता - It is better to worn out than rust out - म्हणजेच झिजलात तरी चालेल, पण गंजू नका. गंज चढलेले आयुष्य काय कामाचे?
 
अशा या महान अभियंत्याचे 14 एप्रिल 1962 रोजी वयाच्या 101व्या वर्षी बंगलोरला निधन झाले.
अजित पेंडसे
9422331164