श्री आर्य चाणक्य पतसंस्था रौप्यमहोत्सवी रुपेरी वाटचाल

विवेक मराठी    19-Oct-2021
Total Views |
श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीची थोडक्यात माहिती करून देणारा लेख.

bank_1  H x W:
इचलकरंजी शहरात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर 1994 साली श्री आर्य चाणक्य पतसंस्थेची स्थापना झाली. मोठे तळे परिसरात गोरे बंधू इलेक्ट्रॉनिक्सच्या माडीवर अत्यंत छोट्या जागेत संस्थेचा कारभार सुरू झाला. रा.स्व. संघाचे तत्कालीन जिल्हा संघचालक रामभाऊ राशिनकर यांचे सक्रिय पाठबळ सुरुवातीच्या काळात लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे लोकांनी विश्वासाने ठेवी आणून दिल्या. हळूहळू कारभार वाढू लागला, तशी जागा कमी पडू लागली. त्यामुळे समोर भगतरामजी छाबडा यांच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक हॉल भाड्याने घेऊन संस्थेने तेथे स्थलांतर केले. थोडी मोठी जागा मिळाल्याने कामकाजाला आणखी गती मिळाली. ठेवी आणि त्यापाठोपाठ कर्जपुरवठा वाढला आणि नफादेखील वाढला. त्यामुळे आता संस्थेची स्वमालकीची वास्तू खरेदी करावी, असा संचालक मंडळाने निर्णय घेतला. 1998 साली जुन्या नगरपालिका इमारतीच्या पिछाडीस गिरनार अपार्टमेंट्स या इमारतीत संस्थेने 2 गाळे विकत घेतले आणि संस्थेने पुन्हा एकदा स्थलांतर केले. या जागेत संस्थेच्या मुख्य शाखेचे कामकाज आजही सुरू आहे. या जागेमुळे संस्थेच्या कारभाराला मोठीच गती लाभली. 1996 साली संस्थेच्या ठेवी केवळ 25 लाख होत्या. 2000 साली त्या 1.5 कोटींवर गेल्या, तर 2005 साली ठेवी 4.5 कोटी रुपये इतक्या झाल्या. संस्थेच्या कामकाजास गती आल्याने संचालकांंचा उत्साह वाढला आणि त्यामुळे संस्थेचा कार्यविस्तार करण्याचे ठरले. 2002 साली सांगली नाक्याशेजारी पतसंस्थेची दुसरी शाखा कार्यान्वित झाली. दरम्यान ठेवींचा ओघ वाढतच होता. 2010 साली ठेवी 11 कोटी, तर 2015 साली त्या 63 कोटी रुपयांच्या वर गेल्या. 2010 ते 2015 हा संस्थेच्या दृष्टीने सुवर्णकाळ ठरला. याच काळात शेखरजी चरेगावकर यांचे संस्थेस बहुमोल मार्गदर्शन लाभले. चरेगावकर यांनी संस्थेचा बहुमुखी विकास होण्याच्या दृष्टीने योजना आखल्या आणि संचालक मंडळाने त्या अंमलात आणल्या. 2015 या एकाच वर्षांत संस्थेने 3 नव्या शाखा सुरू केल्या, पैकी 2 इचलकरंजीमध्ये आणि 1 शाखा इचलकरंजीबाहेर हुपरी येथे सुरू केली. गतवर्षी संस्थेने जयसिंगपूर व कोल्हापूर येथे आणखीन दोन शाखा सुरू केल्या. आजघडीला संस्थेच्या एकूण ठेवी 150 कोटी रुपयांच्या वर असून संस्थेने 100 कोटी रुपये इतके कर्जवितरण केेलेले आहे. गत आर्थिक वर्षात संस्थेला 2.81 कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाला. विशेष म्हणजे संस्थेची एक हप्ता थकबाकी 4.10% इतकी असून निव्वळ एन.पी.ए. 0% आहे. संस्थेने आपल्या सभासदांना 13 ते 15% दराने सातत्याने लाभांश दिला आहे.

संस्थेची आर्थिक प्रगती विशद करताना हे सांगायला अभिमान वाटतो की, संस्थेने केवळ अर्थकारण न करता आपली सामाजिक बांधिलकीदेखील सदैव जपली आहे. संस्थेचे संकल्पक स्व. रामभाऊ राशिनकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेने 1996 साली तीन दिवसीय व्याख्यानमाला सुरू केली. ही व्याख्यानमाला गेली 23 वर्षे अखंडपणे सुरू आहे. दर वर्षी एप्रिल अखेरीस व्याख्यानमालेचा कार्यक्रम होतो. आजवर अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेसाठी आपली हजेरी लावली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दाजी पणशीकर, सु.ग. शेवडे, सच्चिदानंद शेवडे, विवेक घळसासी, अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर, कृषितज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडक, ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन, आचार्य किशोरजी व्यास इ. महनीय वक्त्यांनी ही व्याख्यानमाला समृद्ध केली आहे. व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी प्रा. अशोक दास सर यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. दर वर्षीचे वक्ते ठरवितानादेखील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. 2010 सालापासून संस्थेने आणखी एका सामाजिक उपक्रमास प्रारंभ केला. समाजात अनेक हुशार आणि होतकरू मुले असतात, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे उच्च शिक्षण होऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीस हातभार लावण्याचे संस्थेने ठरविले आणि त्यासाठी चाणक्य प्रतिष्ठान या वेगळ्या ट्रस्टची स्थापना केली. संस्थेने चाणक्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा शेकडो गरजू विद्यार्थ्यांना आजवर सुमारे 50 लाख रुपये इतकी मदत केली आहे. याखेरीज निवृत्त होणार्‍या गुरुजनांविषयी कृतज्ञता म्हणून संस्थेच्या वतीने दर वर्षी गुरुपौर्णिमेदिवशी या गुरुजनांना भेटून त्यांचा सन्मान केला जातो. हे झाले नित्य उपक्रम. याबरोबरच दुष्काळ, महापूर इ. नैसर्गिक संकटांच्या काळात संस्थेने आपला हातभार उचलला आहे, तसेच समाजातील सेवाभावी संस्थांना वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे.

श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या सध्या 7 शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका मुख्य कार्यालयाची गरज होती. तसेच संस्थेची सांगली नाक्याशेजारी असणारी शाखा अत्यंत अपुर्‍या जागेत काम करीत होती. या शाखेसाठीदेखील मोठ्या जागेची आवश्यकता होती. या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेने सर्व सोयींनी युक्त, संगणक सुसज्ज अशी स्वत:ची वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला. आता सांगली मार्गावर हॉटेल राज कॅसलच्या पिछाडीस ही भव्य वास्तू साकार झाली आहे. एक भूमिगत मजला आणि त्यावर 3 मजले अशी 4 मजली इमारती आहे. पैकी तळघरात लॉकर्स, स्टोअर रूम आणि ऑडिटर्स रूम इ. सुविधा आहेत. त्यावरच्या जमिनीसमांतर असणार्‍या मजल्यात शाखेचे नित्य व्यवहार चालतात. शाखा कार्यालयास लागून प्रशस्त संचालक मंडळ सभागृह आहे. त्यानंतर पहिल्या मजल्यावर मुख्य कार्यालय आहे. कार्यकारी संचालक, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची कार्यालये याच ठिकाणी आहेत. शेवटच्या मजल्यावर एक प्रशस्त सभागृह बांधले आहे. संस्थेचे संकल्पक स्व. रामभाऊ राशिनकर यांचे नाव या सभागृहास दिले आहे. या सभागृहात कर्मचारी/संचालक यांचे प्रशिक्षण कार्यक्रम, बैठकी, व्याख्याने इ. विविध उपक्रम चालतात. या सभागृहाला लागूनच अतिथींसाठी सर्व सोयींनी युक्त 2 खोल्या आहेत. ही संपूर्ण इमारत वातानुकूलित आहे. संस्थेने या नवीन वास्तूबरोबरच आपले सॉफ्टवेअरदेखील बदलले आहे. नवीन सॉफ्टवेअरमुळे संस्थेच्या सर्व शाखा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांस त्याच्या सुविधेनुसार कोणत्याही शाखेत जाऊन आपले व्यवहार करता येतात. सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या प. महाराष्ट्रात सहकारी संस्थांची संख्या काही कमी नाही. पण श्री आर्य चाणक्य पतसंस्थेने एक वेगळी वाट चोखाळावी असे ठरले. आर्य चाणक्यांचा आदर्श समोर ठेवून पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करण्याचे आणि अर्थकारणातून समाजकारण साधण्याचे उद्दिष्ट संस्थेने डोळ्यांपुढे ठेवले. संस्थेच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेच्या कार्याचे सिंहावलोकन करताना असे निश्चितपणे वाटते की, संस्थेने आपले उद्दिष्ट साध्य करीत असताना अर्थसंस्थांच्या विश्वात मानदंड ठरेल अशी कामगिरी करून दाखविली आहे. संस्थेच्या या प्रगतीमध्ये संचालक, कर्मचारी आणि सभासद, ग्राहक इ. सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. संस्थेवर अविचल निष्ठा, विश्वास आणि प्रेम असणारे हजारो सभासद हेच संस्थेचे खरेखुरे भांडवल आहे आणि या भांडवलावर श्री आर्य चाणक्य पतसंस्था भविष्यकाळातही प्रगतिपथावर अग्रेसर राहील, असा विश्वास वाटतो.

- जवाहर छाबडा
अध्यक्ष, श्री आर्य चाणक्य पतसंस्था मर्या., इचलकरंजी.