वाल्मिकींच्या रामायणाचे सिंहावलोकन

19 Oct 2021 15:11:20
@सई  लेले 
‘वाल्मीकींच्या रामायणाचे सिंहावलोकन ’ हे पुस्तक रूढार्थाने ज्याला धार्मिक म्हणतात तसे धार्मिक पुस्तके ह्या सदरात मोडणारे नाही. राजकीय, राष्ट्रीय, सामाजिक आशय असलेले, त्या काळातील चालीरिती, प्रथा, अद्भुत वैज्ञानिक प्रगती ह्यांची वर्णने असलेले असे हे पुस्तक वाचनीय आहे.
book_1  H x W:  
नुकतेच ‘वाल्मीकिंच्या रामायणाचे सिंहावलोकन’ हे गिरीश यशवंत टिळक, ठाणे यांचे वेधक ई-पुस्तक वाचनात आले.
 
अर्पण पत्रिकेपासून ते शेवटच्या पानापर्यंत, मूळचे रामायण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा लेखकाचा ध्यास नजरेत भरतो. प्रखर राष्ट्रनिष्ठ विचार आणि वाल्मिकी रामायणाचे केलेले डोळस अवलोकन ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.

मन विशाल करणार्‍या श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर कित्येकांनी लिहिले आहे. आपण सारे जण रामायण वाचत वाचतच मोठे झालो आहोत. तथापि अभ्यासकांना आजही रामचरित्र भुरळ घालते. आपल्याला उमजलेले इतरांपर्यंत पोहोचवावे असे वाटते. गिरीश टिळकांनी कोरोना टाळेबंदीच्या सक्तीचा गृहवासाचा सदुपयोग केला. त्यांनी मूळ वाल्मिकी रामायण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. द्वारकाप्रसाद शर्मा, श्रीपाद दामोदर सातवळेकर, विश्वनाथ लिमये आदींच्या संदर्भ पुस्तकांच्या मदतीने त्यांनी वाल्मिकी रामायणाचे रसग्रहण करण्याचे मोठेच काम केले आहे.

पुस्तकाचे भाग्यच आहे की ह्या पुस्तकाला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची व श्रीरामांसाठी आयुष्य वेचलेल्या स्वामी गोविंददेवगिरी महाराजांची अभ्यासपूर्ण आशीर्वचनपर प्रस्तावना लाभली आहे.

लेखकाने कांडश: वाल्मिकी रामायणाचे सिंहावलोकन केले आहे. त्याचे परिशीलन केल्यानंतर लेखक आग्रहाने सांगतो की, जे प्रत्यक्ष घडले, ते सांगणारा हा इतिहास आहे. रामाला माणूस म्हणून बघा. असे केल्यानेच रामाचे असामान्य गुण आपल्या अंगी बाणवण्याची प्रेरणा मिळेल.

रामाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अनेक दु:ख-संकटांना त्याने तोंड दिले. तथापि धैर्य, दूरदृष्टी, बुद्धिमत्ता व क्षमता या चार असामान्य गुणांचा विकास करून तो अजेयच राहिला. रामायणात महापराक्रमी राम आहेच. त्याचे निर्मोही रूपही गिरीश टिळकांनी दाखवले आहे. तसेच व्याकूळ, शोकाकुल, दक्ष, हितैषी रामही ते आपल्याला दाखवतात. असा राम, जो मानवी आहे, मनोहर आहे.

रामाने आनंदाने, विधिलिखित म्हणून वनवास स्वीकारला. त्याने कैकेयीला किंवा दशरथाला बोल लावले नाहीत. सीतेसह, लक्ष्मणासह वनवासात असताना त्याने वेगवेगळ्या ऋषींच्या भेटी घेतल्या. गिरीश टिळक असे भाष्य करतात की, रामाने ऋषिजनांशी संपर्क वाढवला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. रामाने दुर्जनांचे पारिपत्य करून ऋषींची नित्यकर्मे सुकर केली. ह्या सकारात्मक ऊर्जेने रामाला पुढच्या खडतर काळात बळ मिळाले असणार. दुर्जनांचा नाश ही अहिंसाच होय. अशा तर्‍हेने राम अहिंसेचा पाठपुरावा करीत असे.

वनवासात राहत असताना स्वाभाविकपणे रामाला निसर्ग जवळून अनुभवता आला. जिवंत प्रजातींच्या उत्पत्तीचे अनेक तपशील अरण्यकांडात आहेत. अरण्यकांडातच सीताहरण झाले. रामालाही सुवर्णमृग आणून पत्नीची हौस पुरवण्याचा मोह झाला, असे टीकाकार मानतात. गिरीश टिळकांनी ह्याचे खंडन केले आहे. मारीच ह्या अगोदर दोन वेळा निसटल्यामुळे, आता त्याला संपवायचेच हा रामाचा हेतू होता.

 
सीताहरणानंतर सीतेला शोधण्याचा दोन्ही भावांनी ध्यासच घेतला. तिच्या शोधार्थ दक्षिणेकडे फिरत असता, महाबली हनुमानाशी त्यांची गाठ पडली. त्यांना सुग्रीव-वालीचे वैर कळले. समदु:खी सुग्रीवाला त्याने न्याय मिळवून दिला आणि संस्कृती, कला, सभ्यता, धर्म आणि नीतिशास्त्र यांत पारंगत असलेल्या वानरांचा विश्वास व मैत्री आयुष्यभरासाठी मिळवली. हे किष्किंधाकांड प्रकरण लेखकाने अत्यंत रोचक लिहिले आहे. संपूर्ण पृथ्वीचा भूगोल सुग्रीवाला ज्ञात होता, ते वाचून आश्चर्य वाटते.

 
अडथळ्यांवर मात करून हनुमानाने लावलेला सीतेचा शोध सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत आहे. असाहाय्य परिस्थितीत भावना अनियंत्रित झाल्या, तरी त्यावर मात करण्याची शिकवण आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासकीय मार्गदर्शन आहे. हे सगळे लेखकाने काढलेले निष्कर्ष त्याचा खोल अभ्यास दर्शवतात.

रामाच्या बाजूने निष्णात स्थापत्यशास्त्रतज्ज्ञ आणि नीलासारखे स्थापत्यकर्मी होते. तरबेज वानरवीर होते. सीता नेमकी कोठे आहे, ते सांगणारा जटायूचा भाऊ संपाती होता. अहंकारी रावणाची मनमानी न पटणारा विभीषण होता, जो रामाला मिळाला होता. सीतेलाही राजरस्त्यानेच रावणाकडून सुटका हवी होती. ह्या सगळ्याच्या जोरावर राम-रावण तुंबळ युद्ध झाले. राम जिंकला. ह्या युद्धात अनेकांचे गुण उजळून निघाले. सीतेनेही स्वेच्छेने अग्निप्रवेश करून आपले पावित्र्य सिद्ध केले आणि सर्वांसह राम अयोध्येत दाखल झाला. रामाचा राज्याभिषेक झाला.

 
पुढे उत्तरकांडात रामाचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय जीवन चित्रित केलेले आहे. प्रामुख्याने प्रजाहितदक्ष, कुटुंबवत्सल राम वाचताना क्षणिक समाधान लाभते. क्षणिक अशासाठी की, हे सर्वज्ञात आहे की, गर्भिणी महाराणी सीता परित्यक्ता झाली. सीतेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी कुजबुज रामाच्या कानावर आली आणि प्रजाहितदक्ष राजा रामाने तिचा अव्हेर केला. कोठल्याही काळात काळीज पिळवटणारे हे घटित. तेव्हापासून राम दु:खी, व्यथित झाला. जुळ्या मुलांना घेऊन सीतेची पुनर्भेट झाली, पण पुन्हा तिला अग्निदिव्य करावे लागले. त्यातच लुप्तच होणे तिने पसंत केले. मुलांना नीट मार्गी लावून रामानेही शरयू नदीत जलसमाधी घेतली.

 
हे पुस्तक रूढार्थाने ज्याला धार्मिक म्हणतात तसे धार्मिक पुस्तके ह्या सदरात मोडणारे नाही. राजकीय, राष्ट्रीय, सामाजिक आशय असलेले, त्या काळातील चालीरिती, प्रथा, अद्भुत वैज्ञानिक प्रगती ह्यांची वर्णने असलेले असे हे ई-पुस्तक अवश्य वाचा. सहयोग राशीमधून मिळणारा निधी समाजकार्यार्थ वापरला जाणार आहे.

 
संपर्क
गिरीश टिळक - 9820352412
 
Powered By Sangraha 9.0