मोदींसारखा पंतप्रधान लाभणे हे देशाचे भाग्य : विक्रम गोखले

विवेक मराठी    28-Oct-2021
Total Views |
सा. विवेकच्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत केली पंतप्रधान मोदींची प्रशंसा
 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना त्यांचा कणखरपणा मला जाणवला. असा कणखरपणा यापूर्वी लालबहादूर शास्त्री सोडल्यास कोणत्याही पंतप्रधानांमध्ये दिसला नव्हता. नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान देशाला लाभला हे देशाचे भाग्य आहे, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काढले. साप्ताहिक 'विवेक' आयोजित 'राष्ट्रजागरण व्याख्यानमाले'त ते बोलत होते.

gokhale_1  H x
 
साप्ताहिक विवेकच्या 'लोकनेता ते विश्वनेता' ग्रंथनिमित्त 'राष्ट्रजागरण व्याख्यानमाला' या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन विवेकच्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवर करण्यात आले असून त्यातील बुधवारच्या चौथ्या सत्रात विक्रम गोखले यांनी आपले विचार मांडले. 'अवरोध' या वेबसीरीजमध्ये गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली. यानिमित्ताने मोदींच्या व्यक्तित्वाचा त्यांनी कसा अभ्यास केला, त्याचे कोणते पैलू गोखले यांना जाणवले आदी मुद्द्यांवर गोखले यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 'लोकनेता ते विश्वनेता' अशी वाटचाल करणारा पंतप्रधान भारताने यापूर्वी एकच पाहीला. ते म्हणजे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. तशीच वाटचाल नरेंद्र मोदी यांचीही झाली आहे. नरेंद्र मोदी यांची पडद्यावर साकारत असताना मोदींचे वेगळेपण मला जाणवले. या भूमिकेनंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वतः फोन करून माझी प्रशंसा केल्याचीही आठवण गोखले यांनी सांगितली.
 
 
विक्रम गोखले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे जे केले ते गेल्या सत्तर वर्षांत कधीच झाले नाही आणि मोदी नसते तर भविष्यातही कधी होऊ शकले नसते. मोदींनी कलम ३७०, ३५-अ रद्द करून दाखवले. दुसरीकडे जगातील अनेक मुस्लिम राष्ट्रांशी नरेंद्र मोदी यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. मोदी यांनी अनेक देशांचे दौरे करत जगभरात भारताचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मोदी यांनी बरेच काम केल्याचे सांगत शत्रूला 'जशास तसे' उत्तर देण्याचा मोदी यांचा निर्णय महत्वाचा ठरल्याचे गोखले यांनी नमूद केले. चीनने अनेकदा विरोध करूनही भारताने या काळात उत्तर सीमेवर विमान धावपट्ट्या, रस्ते बनवले. हे सर्व कदाचित कधीही घडले नसते परंतु मोदी यांनी ते करून दाखवले. भारत देश आता १९६२ साली होता किंवा त्यापूर्वी होता तसा राहिलेला नसून एक बलवान देश बनला आहे. तो तसा होण्यामागे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे मत गोखले यांनी व्यक्त केले.
 
 
मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना त्यांचा कणखरपणा मला जाणवला. असा कणखरपणा यापूर्वी लालबहादूर शास्त्री सोडल्यास कोणत्याही पंतप्रधानांमध्ये दिसला नव्हता. नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान देशाला लाभला हे आपले भाग्य असल्याचे उद्गार गोखले यांनी काढले. चहावाला पंतप्रधान झाला अशी टिंगल काही राजकीय पक्ष करतात परंतु एक चहावाला लोकनेता होतो, पंतप्रधान होतो हीच गोष्ट महत्वाची आहे. तसेच, आपल्याला काय करायचे आहे हे ठरवून, त्याची आखणी करून योग्य वेळी योग्य पावले उचलणे ही नरेंद्र मोदी यांची वैशिष्ट्ये आपल्याला या भूमिकेचा अभ्यास करताना अनुभवास आल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले.
 
 
गुरुवारी रमेश पतंगे यांचे व्याख्यान
राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे चौथे सत्र गुरुवार दि. २८ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक - विचारवंत रमेश पतंगे यावेळी बोलणार आहेत. 'लोकनेता ते विश्वनेता - का व कशासाठी' अशा विषयावरील या व्याख्यानात या ग्रंथाच्या निर्मितीमागील विवेकची भूमिका, विदेशनीतीचे महत्व, भारताच्या विदेशनीतीने गेल्या सात वर्षांत काय साध्य केले व त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र यांचे योगदान काय, आदी मुद्द्यांवर रमेश पतंगे भाष्य करणार आहेत.