योग: कर्मसु कौशलम्

विवेक मराठी    05-Oct-2021
Total Views |
@उज्ज्वला करंबेळकर
माझ्या आयुष्याला निंबाळकर गुरुजींचा परीसस्पर्श झाला आणि जीवन योगमय झालं. त्यांच्याकडून योगशास्त्र शिकण्याचं भाग्य मला 1990च्या दशकात लाभलं. गुरुवार, 30 सप्टेंबर रोजी पहाटे, वयाच्या 96व्या वर्षी गुरुजींचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला. माझ्या वतीने त्यांना ही शब्दरूपी श्रद्धांजली.


yoga_4  H x W:
पार्श्वभूमी
 
सत्तरच्या दशकात समाजजीवन तुलनेने कमी धकाधकीचं होतं. स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षांत शिक्षण क्षेत्रात, औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योगांत व सरकारी नोकरीत समाज स्थिरावला होता. तुलनेने शहरं लहान व लोकसंख्याही प्रमाणात असल्याने आणि मुख्य म्हणजे करमणुकीच्या साधनांची मर्यादित उपलब्धता यामुळे माणसाची जीवनशैली नैसर्गिक होती. योगाचा प्रचार आणि प्रसार तुलनेने कमी होता. योग आध्यात्मिक प्राप्तीकरता करतात, तो सर्वसामान्यांकरता नाही, असा अपसमज काही प्रमाणात होता.
 
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दोन व्यक्तिमत्त्वं उदयाला आली, ज्यांनी योगाभ्यास सामान्यांच्या आवाक्यात आणला व योगाविषयीचे गैरसमज दूर केले. एक ‘अंबिका योग कुटिर’चे निकम गुरुजी आणि दुसरे ‘योग विद्या निकेतन’चे संस्थापक अध्यक्ष सदाशिव निंबाळकर.
 
गुरुवर्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर, योगसाधकांमध्ये आदरणीय निंबाळकर गुरुजी म्हणून ओळखले जातात.
1974 साली गुरुवर्य निंबाळकर सरांनी काही सहकार्‍यांच्या मदतीने ‘योग विद्या निकेतन’चं रोपटं लावलं. त्याचा विस्तार आज जगभर पसरलाय. गुरुजींनी घडवलेले योगशिक्षक, त्यांचं योगप्रसाराचं कार्य सर्वदूर करत आहेत.
 
 
1926 साली अहमदनगर येथे जन्मलेले निंबाळकर गुरुजी अहमदनगर व मुंबई येथे बी.ए., बी.टी., डी.पी.एड. झाले. हाडाचे शिक्षक असल्याने कोणताही विषय अतिशय सुसंबद्धपणे, पायरीपायरीने, सुलभ पद्धतीने, सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. मुंबईतील मारवाडी कमर्शिअल हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून रुजू होऊन त्याच ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.
 
गुरू स्वामी कुवलयानंदांकडे शास्त्रशुद्ध योगशिक्षण

कैवल्यधामचे संस्थापक स्वामी कुवलयानंद योगप्रसाराचं आणि योग संशोधनाचं उदात्त कार्य करत होते. कैवल्यधाम येथे स्वामी कुवलयानंदांकडून शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन योगशिक्षक बनण्याची संधी गुरुजींकडे चालून आली होती. प्रत्यक्ष स्वामीजींकडून बोलावणं आलं होतं. गुरुजींनी या संधीचं अक्षरश: सोनं केलं. “स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास, सहकारी दिग्गज योगसाधकांबरोबर चर्चा, संवाद, योगविषयक ग्रंथांचं वाचन, स्वामीजींची भाषणं अशा वातावरणात स्वामीजींच्या कृपाप्रसादाने आणि आशीर्वादाने माझं व्यक्तिमत्त्व घडलं” हे ते विनम्रपणे नमूद करतात. 1958 ते 1966 या काळात त्यांना स्वामीजींचा सहवास लाभला.
 
 
संवेदनशील नेता

स्वामीजींच्या निधनानंतर मात्र यापुढे योगप्रसाराचं कार्य करायचं, हा त्यांनी दृढनिश्चय केला.
 
अशेषतापतप्तानां समाश्रयमठो हठ:।
अशेषयोगयुक्त्यानामाधारकमठो हठ:॥
 
( जीवनातील विविध त्रासांमुळे तप्त झालेल्या गृहस्थी लोकांसाठी हा मठरूपी आश्रम आहे, तर बाकी योगसाधकांसाठी हा कासवरूपी आधार आहे.)
“हठप्रदीपिकेतील हा श्लोक माझ्या वाचण्यात आला आणि माझ्या योगप्रसाराच्या कार्याचा निमित्त झाला” असं गुरुजी प्रांजळपणे म्हणत.
 
सर्वसामान्य माणसाला योगाभ्यासाचे फायदे मिळवून देण्यासाठी नियमित योगवर्ग, वासंतिक योगवर्ग, योगविषयक कार्यशाळा आयोजित करणं, योगविषयक जागृती निर्माण करण्यासाठी व्याख्यानं अशा विविध कार्यक्रम-उपक्रमांचा धडाका सुरू झाला. मुंबई महानगरपालिका, एस.एन.डी.टी. कॉलेज, मुंबई विद्यापीठ संगीत केंद्र अशा अनेक ठिकाणी योगवर्ग घेतले. एकदा प्रकाशात आल्यानंतर अनेक ठिकाणांहून निमंत्रणं येऊ लागली.


yoga_3  H x W:
 
 
योग विद्या निकेतन

संस्थेच्या माध्यमातून योगप्रसार केला तर अधिकाधिक समाजघटकांना लाभ देता येईल, ह्या विचाराने मार्च 1974मध्ये वर्षप्रतिपदेला ‘योग विद्या निकेतन’ची स्थापना झाली. समविचारी सहकार्‍यांचं पाठबळ होतंच. आता योगसाधक संस्थेकडे येऊ लागले. योगप्रसार करण्याकरिता प्रशिक्षित योगशिक्षकांची गरज भासू लागली आणि त्यातूनच दादर येथे 1977 साली योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. हा अभ्यासक्रम गुरुजी व निंबाळकर बाईंनी अशा प्रकारे तयार केला की, साधकाचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून जातं. ज्यांना योगशिक्षक म्हणून काम करायचंय, त्यांना या अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली. योग विद्या निकेतनच्या नियमित योगवर्गांकरता प्रशिक्षित योगशिक्षक मिळू लागले.
 
कालांतराने 2000मध्ये योगिक थेरपी कोर्स सुरू झाला. वाशीला योग भवन झाल्यावर तिथेसुद्धा दोन्ही कोर्स सुरू झाले.


yoga_1  H x W:
 
दूरदर्शन व आकाशवाणी
 
दूरदर्शनवर गुरुजींनी योगासंबंधी कार्यक्रम केले. दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने ते आसनांच्या प्रात्यक्षिकांसह विवेचन करत असत. गुरुजी म्हणत, “शरीरातील कार्यगत दोषांवर (functional disordersवर) योगाभ्यास, योगोपचार म्हणून उपयुक्त आहे. औषधांबरोबर साहाय्यक म्हणून, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनासाठी, आजाराला प्रतिबंध म्हणून योगाभ्यास उपयुक्त ठरतो.”
योग हा रोगावर रामबाण उपाय आहे, असा फोल दावा त्यांनी कधीच केला नाही. संसर्गजन्य विकार, अपघाताने झालेला अस्थिभंग, अकारण झालेली हाड-मासाची वाढ यावर योगोपचार कामी येत नाही, हे सांगून ते योगशास्त्राच्या मर्यादा विशद करत. पण त्याच वेळी ते हेही सांगत की, योगाभ्यासाने मनाची शक्ती वाढते, शारीरिक कार्यक्षमता वृद्धिंगत होते व साधकाला आल्हाददायक-चैतन्यदायक अनुभूती प्राप्त होते.

 
1980-1982 या काळात आकाशवाणीवर ‘आरोग्यासाठी योग’ ही त्यांची व्याख्यानमाला प्रसारित होत असे. यातून योग म्हणजे काय? योगाभ्यासाने आरोग्यरक्षण कसं होतं? त्यासाठी आसनं, बंध, मुद्रा, प्राणायाम यांचा सराव कसा करावा हे ते सांगत. शरीरातील कार्यकारी संस्था श्वसन, पाचन, रक्ताभिसरण, स्नायू, अस्थी, मज्जा, उत्सर्जन यांचं स्थान-महत्त्व काय? योगाभ्यासाने या सर्व संस्थांची कार्यक्षमता कशी वाढते? हे सोप्या भाषेत समजावून सांगत. श्रोत्यांनी पत्रातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देत. यातूनच स्थूलता, सांधेदुखी, पाठदुखीने, मानदुखी, दमा, श्वास लागणं, स्त्रियांची मासिक पाळी, रजोनिवृत्ती, सुलभ प्रसूती असे विविध विषय त्यांनी हाताळले. त्या काळात हे विशेष म्हणावं लागतं.
 
 
दादरला अनेक वर्षं योविनीच्या योगोपचार केंद्रावर आरोग्य सल्ला देत. पुढे त्यांचे शिष्य तयार झाले.
 
बहुगुणी-बहुरंगी
 
गुरुजींचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न, तेजस्वी, सदा हसतमुख असं होतं. ते जिथे जात तिथे गप्पा, खुमासदार शैलीत भाष्य, विनोदाची पेरणी करत व वातावरण प्रफुल्लित होई. त्यांचा सहवास सर्वांना हवासा वाटे.
 
योगासारखा थोडासा रूक्ष विषय, योगाची व्युत्पत्ती, प्राणायाम संकल्पना, षट्क्रिया, ध्यानधारणा इ. विषय सहजपणे, आकर्षक प्रस्तावनेसहित, आवश्यक तेथे साधनांचा वापर करून, आपल्या खुमासदार शैलीत समर्पक उदाहरणांतून, प्रसंगी श्रोत्यांना हसवत-हसवत समजावत असत. श्रोते त्यांना ऐकताना मंत्रमुग्ध होऊन जात.
 
जसजसा गुरुजींच्या कार्याचा गवगवा झाला, तशी व्याख्यानं, कार्यशाळा यांकरिता ठिकठिकाणाहून आमंत्रणं येऊ लागली. मुंबई, ठाणे व परिसरातून कार्यक्रम ठरत. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, जयपूर, बेळगाव असे दौरेही सुरू झाले. योगप्रसाराच्या ध्येयाने झपाटलेले गुरुजी अखंड कार्यरत असत.
 
 

yoga_2  H x W:
 
ग्रंथसंपदा

निंबाळकर गुरुजींना शिकवणं व बोलणं जास्त प्रिय. परंतु एकदा दादरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सरांनी प्रात्यक्षिकांसह सहभाग घेतला होता. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका वरीष्ठ पत्रकाराने सरांना विनंती केली की, आपण जे बोललात ते लेख स्वरूपात द्यावं. त्या प्रसंगानंतर गुरुजी लिहू लागले व त्यांचे लेख प्रकाशित होऊ लागले. आघाडीच्या मराठी वृत्तपत्रात लेखमालाच प्रसिद्ध झाली. त्यातूनच ‘आरोग्यासाठी योग’ ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. पुढे त्याच्या 23 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या व याच पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. महिलांसाठी ‘स्वतंत्र आनंददायी योग’ हे पुस्तक 2004मध्ये प्रकाशित झालं. प्राणायाम - मन:स्वास्थ्याचे प्रभावी साधन, पाठदुखी-मानदुखीकरिता योगोपचार, अस्थमावर योगोपचार, योगिक क्रिया आरोग्याचा पाया, सूर्यनमस्कार अशी अनेक.
 
 
योगविषयक प्रदर्शनं
 
योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भाषणं, प्रात्यक्षिकं, योगविषयक लेखन, पुस्तकं याबरोबरच प्रदर्शन हेही उत्तम माध्यम आहे हे सरांनी जाणलं. मग योविनीतर्फे प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात शिक्षक प्रशिक्षण वर्गाला जोडून दोन दिवसीय प्रदर्शनं भरू लागली. त्यात योगाशी संबंधित एक बीजविषय ठरवून त्या विषयाबद्दल प्रतिथयश डॉक्टर्स, विषयाशी संबंधित महानुभाव यांची भाषणं, मुलाखती होत असत. योगशिक्षक संबंधित योगिक आसनं-प्राणायामाचं प्रात्यक्षिक सादर करत. श्रोत्यांना एका विषयावर परिपूर्ण मार्गदर्शन मिळत असे. यातून लोकशिक्षणाचं उद्दिष्ट साध्य होतं. या प्रदर्शनांच्या माध्यमातून गुरुजींनी अनेक मान्यवरांना योविनीशी जोडलं. आता हे प्रदर्शन वाशीला योगभवनात भरतं.

 
पारंपरिक योगशास्त्राचा पुरस्कर्ता
 
निंबाळकर गुरुजी पारंपरिक योगशास्त्राचे पुरस्कर्ते होते.
 
योग हा संस्कृत धातू ‘युज’पासून तयार झालेला शब्द, ज्याचा अर्थ संयोग करणे, जोडणे. योग म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा सुरेख संयोग. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ॠषिमुनींनी हे शास्त्र विकसित केलं. योगशास्त्राचं अंतिम उद्दिष्ट समाधी/कैवल्य.
योगशास्त्र हा आपल्या संस्कृतीचा उदात्त वारसा.
 
 
गुरुजी म्हणत, “सामान्य माणसाचा योगाभ्यास करण्याचा उद्देश असतो सुस्वास्थ्य, व्यक्तिमत्त्वविकास, रोगप्रतिकार, पुनर्वसन, कौशल्यप्राप्ती, मनोकायिक उन्नती इ., तर आध्यात्मिक साधक समाधीच्या ध्येयाने योगसाधना करतात. दोघांचेही उद्देश वेगळे असले, तरी योगाभ्यासाचे तंत्र व मार्ग एकच असतो.
 
महर्षी पतंजलीचा योग दर्शन, स्वात्माराम सुरी यांनी लिहिलेला हठप्रदीपिका आणि घेरंड संहिता, शिव संहिता, गोरक्ष संहिता असे ग्रंथकर्ता माहीत नसलेले ग्रंथ हा आपला मौल्यवान सांस्कृतिक ठेवाच आहे. असे कितीतरी ग्रंथ आहेत, ज्यात विविध प्रकारचे योग सांगितले आहेत. हे सर्व पारंपरिक ज्ञान गुरुजी आपल्यापर्यंत सुलभपणे पोहोचवतात, त्याचं महत्त्व अधोरेखित करतात. आसनं, प्राणायाम, ध्यान, षट्क्रिया आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने विशद करतात.


गुरुवर्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर
 
27 जुलै 1926 भिंगार, अहमदनगर येथे जन्म.
 
शिक्षण : अहमदनगर व मुंबई येथून बी.ए., बी.टी., डी.पी.एड.
 
1953 : शकुंतला निंबाळकर यांच्याशी विवाह.
 
1958 ते 1966 गुरू स्वामी कुवलयानंदांकडून योगविद्या ग्रहण केली.
 
1966नंतर योगप्रसाराचं काम सुरू.
 
1974 ‘योग विद्या निकेतन’ची स्थापना व पहिला वासंतिक योग वर्ग
 
1977 दादरमध्ये वुलन मिल म्युन्सिपल शाळेत पहिल्या योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात
 
2000-2001मध्ये योगिक थेरपी कोर्स सुरू झाला.
 
1986मध्ये वाशी येथे सुरू झालेलं योग भवनचं काम 2006मध्ये पूर्ण झाले. मग तिथेसुद्धा योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम व योगिक थेरपी कोर्स सुरू झाले.
 
 
शीर्षासन, हलासन, उड्डियानबंध, कपालभाती, नौली शिकवताना समर्पक उदाहरणांतून रोजच्या जगण्याशी त्याची सांगड घालतात. त्यामुळे अवघड काही वाटतच नाही.
हठयोगात सांगितलेल्या प्रमुख सहा क्रिया, ज्या षटकर्म म्हणून ओळखल्या जातात - नेती, बस्ती, धौती, नौली, त्राटक आणि कपालभाती. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून क्रियांना हठयोगात महत्त्वाचं स्थान आहे. योग विद्या निकेतनमध्ये या क्रिया योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून शिकवल्या जातात. वमन, दंड धौती, वस्त्रधौती ह्या पाहताना त्रासदायक वाटतात.
सर्वसामान्य लोकांच्या मनातील यौगिक क्रियांबद्दलची भीती, किळस निंबाळकर गुरुजींनी शास्त्रशुद्ध पद्धत विकसित करून पळवून लावली. अनेक साधकांनी एकत्र येऊन केलेली क्रियांची प्रात्यक्षिकं हे योग विद्या निकेतनचं वैशिष्ट्य आहे.
 
 
तसंच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, पूर्व प्रमाणित व प्रमाणित असा, सुलभ योग प्रकारांकडून पारंपरिक प्रकारांकडे टप्प्याटप्प्याने सहज घेऊन जाणारा अभ्यासक्रम तयार करण्यात गुरुजींचं मोलाचं योगदान आहे. साधकाची शारीरिक लवचीकता व मनाची एकाग्रता वाढते.

स्त्री सचिव: कांता

निंबाळकर गुरुजींवर लिहिताना एक उल्लेख करावाच लागेल, तो त्यांच्या उच्चविद्याविभूषित कर्तृत्ववान पत्नीचा. शकुंतला निंबाळकर उर्फ शकुताई उर्फ बाई. बृहन्मुंबई महानगरपालिकेतून उपशिक्षणाधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य करून निवृत्त झालेल्या आदर्श शिक्षिका.
 
 
केवळ सहधर्मचारिणी नव्हे, तर त्या गुरुजींची प्रेरणा होत्या. पुत्र दीपक व कन्या भारती दोघेही उच्चविद्याविभूषित. त्यांचे जावई, सुनबाई, नातवंडं ह्या परिवाराबरोबरच, योग विद्या निकेतनचा देश विदेशातील मोठा परिवार त्यांनी जोडला, सांभाळला.
 
 
सर त्यांना सन्मानाने ‘योविनी प्रेरणा’ म्हणत. त्या गुरुजींबरोबर योग जगल्या. त्यांनी योग विद्या निकेतनची धुरा समर्थपणे सांभाळली. गुरुजी म्हणजे ज्ञानयोग, तर बाई म्हणजे कर्मयोग. जिद्द, ऊर्जा, सकारात्मकता आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची धमक अशा योगिनी, यशोवर्धिनी होत्या त्या. वयाची नव्वद वर्षं गुरुजींसाठी, योविनीसाठी खंबीरपणे उभ्या होत्या. 21 सप्टेंबर 2018 रोजी 91व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला. स्वत: गुरुजी म्हणत, “शकुंतलेच्या दु:खद निधनाने माझ्या आयुष्यातलं आणि योविनीच्या इतिहासातलं एक सुवर्णपर्व संपलं.”
 
 
yoga_1  H x W:

कार्याची पावती
 
अत्यंत निरलसपणे, नि:स्वार्थी भावनेने, तळमळीने गुरुजींनी हे कार्य केलं. ना प्रसिद्धीची आशा ठेवली, ना कौतुकाची. मुख्य म्हणजे योगशिक्षणाचं व्यापारीकरण करण्याच्या विरुद्ध होते ते. अतिशय साधं जीवन जगले. कुठलाही अभिनिवेश बाळगला नाही. आणि त्यामुळेच संपर्कात येणार्‍या प्रत्येकाकडून त्यांना स्नेह व शुभेच्छाच मिळाल्या.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना व त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

कृतार्थ जीवन
 
जे जे आपणांसी ठावे, ते ते दुसर्यासी द्यावे
शहाणे करूनी सोडावे सकल जन।

या समर्थ रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे ते भरभरून देत राहिले. स्वामी कुवलयानंदांकडून प्रेरणा घेऊन सुरू केलेलं योगप्रसाराचं काम उत्तरोत्तर वाढत गेलं. योगाला जगन्मान्यता मिळाल्यानंतर तर योगसाधकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नवनवीन योजना राबवल्या जाऊ लागल्या. संस्थेचं काम समर्थपणे सांभाळणारे कार्यकर्ते सर-बाईंच्या तालमीत तयार झाले. आता गुरुजींशी विचार-विनिमय करून संस्थात्मक निर्णय घेतले जाऊ लागले.

 
कालसुसंगत विचार-आचार

 
गुरुजींच्या विचारतील लवचीकतेचा अनुभव आम्हा सर्व शिष्यांना कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर आला.
कोविड पसरू लागल्यावर जगरहाटी बंद झाली. सगळं ठप्प.
 
 
योविनीचे नियमित योगवर्ग, योग शिक्षक अभ्यासक्रम, यौगिक थेरपी कोर्स सगळंच चक्र अडकलं. अशा वेळी गुरु-शिष्य परंपरेवर ठाम विश्वास असलेल्या गुरुजींनी आभासी मंचावर सगळे वर्ग चालवण्याची परवानगी दिली. मानवतेवर आलेलं संकट हीच संधी समजून काळाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर करून योगशिक्षणाचा वसा योविनी पुढे नेतेय. अनेक आयामांनी योगप्रसाराचं काम सर्वदूर करतेय. आज योग विद्या निकेतन जगभरातल्या अनेक देशांमध्ये पोहोचली आहे. ‘योग विद्या घरोघरी’ हे गुरुजींचं ब्रीदवाक्य शब्दश: खरं होतंय.
 
 
महर्षी पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग (यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी) गुरुजींनी जाणला, सांगितला, आचरला आणि रुजवला.
 
संस्थेचं हे उदात्त कार्य अनेकविध आयामांनी प्रसारित करणं हीच गुरुवर्यांना खरी श्रद्धांजली होय.
 
 
9869609078
 
लेखिका योग विद्या निकेतनमध्ये वरिष्ठ योगशिक्षिका आहेत.