द.मा. मिरासदार विनोद पर्वाचा अस्त

विवेक मराठी    07-Oct-2021   
Total Views |
 मराठी साहित्यविश्वात गेली सहा दशके रसिकांना खळखळून हसवत द.मा. मिरासदारांनी आपली अनिभिषिक्त मिरासदारी मिरवली. मान्यवर विनोदी लेखकांच्या परंपरेला द.मा. मिरासदारांनी नव्या पैलूंनी समृद्ध केले. या विनोद पर्वाच्या परंपरेतील अखेरचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. द.मा. मिरासदार यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन।


mirasdaer_1  H

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, थोर विनोदी साहित्यिक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताराम मारुती उर्फ ‘दमा’ मिरासदार यांच्या निधनाने चिं.वि. जोशी, राम गणेश गडकरी यांच्या परंपरेतील अखेरचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे, विनोदाचे एक पर्व अस्तास गेले आहे. त्यांचा विनोद हा शब्दनिष्ठ नसून प्रसंगातून व मानवी स्वभाववैचित्र्यातून प्रसवलेला आहे. ‘विनोद ही एक जीवनदृष्टी आहे’ असे ते म्हणत. त्यांच्या विनोदी लेखनापेक्षा त्यांच्या कथाकथनावर मराठी रसिक बेहद्द खूश होता, कारण त्यांचे कथाकथन हे एक साभिनय सादरीकरण होते. पंढरपूरच्या जडणघडणीच्या काळात त्यांनी पाहिलेल्या व अनुभवलेल्या व्यक्ती-वल्लींतून त्यांच्या कथेतील सारी पात्रे साकारलेली आहेत. साहित्याबरोबरच त्यांनी अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केलेले कार्यही मौलिक आहे.
 
 
श्रीक्षेत्र पंढरीचा विठोबा महाराष्ट्रात गावोगावी जेवढा परिचित व प्रसिद्ध आहे, तेवढेच पंढरपूरचे सुपुत्र, थोर विनोदी साहित्यिक, कथाकार द.मा. मिरासदार (‘दमा’ उर्फ दादा) हे उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. मराठी साहित्यविश्वात गेली सहा दशके रसिकांना खळखळून हसवत त्यांनी आपली अनिभिषिक्त मिरासदारी मिरवली. मराठी साहित्य दरबारातील श्रीपाद कृृष्ण कोल्हटकर, चिं.वि. जोशी, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे या मान्यवर विनोदी लेखकांच्या परंपरेला द.मा. मिरासदारांनी नव्या पैलूंनी समृद्ध केले. आपल्या कथाकथनाद्वारे महाराष्ट्राच्या गावागावातच नव्हे, तर सातासमुद्रापार अमेरिका-कॅनडामध्ये त्यांनी मराठी विनोदी कथा पोहोचवली. त्यांच्या विनोदी कथा वाचण्यात जेवढा आनंद आहे, त्यापेक्षा त्यांचे कथाकथन समक्ष ऐकणे हा एक वेगळाच आनंदानुभव असे. त्यांचे कथाकथन हे ‘साभिनय कथा सादरीकरण’ असे. त्यांचे हातवारे, हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि अस्सल ग्रामीण संवादावरील हुकमत.. सारेच विलक्षण होते. लोक हसून हसून गडाबडा लोळत, अनेकांचे हसून हसून पोट दुखे, डोळ्यातून पाणी येई. लोक एकमेकाला टाळ्या देऊन, फेटे उडवून दाद देत. एका कथाकथन प्रसंगी एका रसिकाने त्यांच्यावर पैशाची उधळण केली होती व ते पैसे गोळा करून एका शाळेला गरीब मुलांच्या वह्या-पुस्तकांसाठी दान दिल्याचाही एक किस्सा आहे.
 
book_4  H x W:
 

book_3  H x W:
 
मराठी साहित्यविश्वात एकेकाळी रविकिरण मंडळाचे कविगण कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करीत होेेते, त्या वेळी त्या बिनीच्या मान्यवर कवींच्या कविता ऐकण्यास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असे. तो काळ मागे पडला आणि तो मंच कथाकारांनी भूषवला. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द.मा. मिरासदार यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. या तीन कथाकारांच्या कथांचे विषय व कथनशैली भिन्न भिन्न होती, पण त्यामध्ये द.मा. मिरासदार आपल्या साभिनय सादरीकरणाने ‘वन्स मोअर’, ‘हून जाऊ द्या पुन्हा एकदा’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत होते. त्यांच्या कथाकथनाच्या आनंदानुभवाने कृतकृत्य झालेल्या श्रोत्यांपैकी एक होण्याचे भाग्य मला अनेक वेळा लाभले होते. त्यांची कथा ऐकण्याचा कधीच कंटाळा येत नसे. त्यात रंजनाची नित्यनूतनता होती. विनोदी ‘कथालेखका’पेक्षाही ते ‘कथाकथनकार’ म्हणून अधिक प्रसिद्ध व लोकप्रिय होते. महाराष्ट्राबाहेर बेळगाव, कलकत्ता, इंदोर, हैदराबाद, ग्वाल्हेर येथेही त्यांचे कथाकथन कार्यक्रम झाले, एवढेच नव्हे, तर अमेरिका व कॅनडासह त्यांनी 23 विविध ठिकाणी कथाकथन केलेले होते.
 
 
मराठी साहित्यातील योगदान
 
मराठी साहित्यातील सर्वोच्च सन्मान म्हणजे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद’. विनोदी साहित्याचे जनक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना 1933 सालच्या 13व्या संमेलनात तो मान मिळाला होता, तर विनोदसम्राट आचार्य अत्रे यांना 1942 सालच्या 27व्या संमेलनात लाभला होता. त्यानंतर हा सन्मान मिळवणारे ‘दमा’ हे तिसरे विनोदी साहित्य लेखक होते. दादांना (द.मा. मिरासदारांना) 1998 साली मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान लाभला होता. पुण्यातील ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचे’ अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले होते. त्याशिवाय साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमीच्या विशेष पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही त्यांना मिळालेले होते. मराठी विनोदी साहित्यप्रेमींचे सदैव लाभलेले उदंड प्रेम हा त्यांचा सर्वोच्च सन्मान होता.
 
 
मा. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती’ मंडळाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याचा योग दादांना लाभला होता. या काळात त्यांनी अनेक नवे उपक्रम करण्याचा प्रयत्न केला. अनेक नव्या लेखकांना प्रोत्साहन देऊन साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. पण त्यांना अपेक्षेएवढे काम करता आले नाही, याची खंत होती. निर्णयांमध्ये लाल फितीमुळे होणारा विलंब व निरुत्साह याविषयी एकदा डेक्कन क्वीनमध्ये प्रवासात झालेल्या भेटीत ते माझ्याशी त्यांच्या खास शैलीत मनमोकळे बोलले होते. तेव्हा मी शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या ‘साईलीला’चा संपादक होतो व पुणे-मुंबई नित्य डेक्कन क्वीन प्रवास करीत होतो. हा प्रवास जनसंपर्काची व संवादाची पर्वणीच होती. तेव्हा दमा साहित्य संस्कृती मंडळाच्या कामानिमित्त डेक्कन क्वीनने प्रवास करीत असत.
 
 
विपुल व वैविध्यपूर्ण साहित्यसंपदा
 
दादांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला, तर त्यांच्या नावावर 24 कथासंग्रह आणि 18 चित्रपटांच्या पटकथा आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य वाङ्मय मंडळाचे पुरस्कार मिळाले होते. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या चित्रपटांनी त्यांना एका वेगळ्याच प्रसिद्धीच्या झोतात आणले. या दोन्ही चित्रपट कथांसाठी, संवादासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाले. एवढेच नव्हे, तर ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात द.मा.मिरासदारांनी हेडमास्तराची भूमिका करून रसिकांना आपल्या अभिनयाचेही दर्शन घडवले होते.


book_2  H x W:
 
 
‘भोकरवाडीतील रसवंतीगृह’ हा त्यांचा 1957 साली मेहता यांनी प्रकाशित केलेला पहिला कथासंग्रह मानला जातो. त्यानंतर त्यांचा ‘माकडमेवा’ लेखसंग्रह आला. मग ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ कथासंग्रह प्रकाशित होऊन ‘द.मा. मिरासदार’ ही नाममुद्रा मराठी साहित्यविश्वात वाचक-प्रकाशकप्रिय झाली. ‘माझ्या बापाची पेंड’, ‘हुबेहुब’, ‘गुदगुल्या’, ‘चकाट्या’, ‘चुटक्याच्या गोष्टी’, ‘ताजवा’, ‘फुकट’, ‘बेंडबाजा’, ‘भुताचा जन्म’, ‘मिरासदारी’ हे त्यांचे प्रमुख कथासंग्रह.
 
 
कथासंग्रहाबरोबरच त्यांच्या नावावर अनेक लेखसंग्रह आहेत. ‘विरंगुळा’, ‘अंगतपंगत’, ‘खडे ओरखडे’, ‘गप्पांगण’, ‘गंमतगोष्टी’, ‘गोष्टीच्या गोष्टी’ हे त्यांचे लेखसंग्रह असून त्यांच्या नावावर ‘नावेतील तीन प्रवासी’ नावाची भाषांतरित कादंबरीसुद्धा आहे. त्याशिवाय त्यांनी बालसाहित्य, बालनाटिका आणि एकांकिका असे विविध प्रकारचे लेखन केलेले आहे. एकेकाळी मराठीत लोकनाट्ये फारच प्रसिद्ध होती. त्या काळी दमांनी एक वगनाट्य लिहिले होते. ‘मी लाडाची मैना तुमची’ असे त्या वगनाट्याचे नाव आहे.
 
 
त्यांच्या कथेतील अनेक पात्रे त्यांना पंढरीत भेटलेल्या माणसांतून सुचलेली होती. पुलंच्या अंतू बर्वा, चितळे मास्तर या कथांमध्ये आपणास कोकणातील बेरकी-विक्षिप्त-विचित्र पात्रे भेटतात, तशीच दमांच्या कथांमध्ये आपण पंढरी परिसरातील ग्रामीण भागातील पात्रे त्यांच्या स्वभाववैचित्र्यासह भेटतात. दमांच्या कथाविश्वाला त्यांच्या पंढरपुरातील अनुभवाची, निरीक्षणाची पार्श्वभूमी आहे. त्या कथांमागे एक ‘पंढरपुरी बाणा’ दडलेला आहे. ‘गणा मास्तर’, ‘नाना चेंगटे‘, ‘रामा खरात‘, ‘बाबू पैलवान’, ‘ज्ञानू वाघमोडे’ ही बेरकी, इरसाल, टारगट, भोळसट पात्रे वाचकांच्या मनात कायमची घर करून जातात. ग्रामीण भागातील व्यक्तिजीवनाचे ज्वलंत चित्रण आणि अस्सल त्या त्या भाषेतील संवाद हे दमांच्या कथाविश्वाचे वैशिष्ट्य आहे. दमांच्या कथांमधील विनोद हा निखळ निर्मळ विनोद आहे. कोठेही अश्लील कोट्या वा द्य्वर्थी शब्दयोजना नाहीत. ‘व्यंकूची शिकवण’, ‘भुताचा जन्म’, ‘माझी पहिली चोरी’, ‘ड्रॉइंग मास्तरचा त्रास’, ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ या कथा ज्यांनी दमांच्या तोंडून ऐकल्या असतील, ते त्या कधीच विसरणार नाहीत.
 

book_1  H x W:
 
दमांच्या विनोदी कथा या आजच्या पिढीच्या कलावंतांना मोहित करणार्‍या ठरल्या आहेत. ‘दळण’ ही त्यांची कथा निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ या सध्याच्या, आघाडीच्या कलाकारांनी नव्या पद्धतीने सादर केलेली असून त्यामुळे दमांच्या कथा पुन्हा एकदा तरुण पिढीचे आकर्षण ठरल्या आहेत.
 
 
पंढरपुरातील जडणघडण
 
दादांचा जन्म दि. 14 एप्रिल 1927 रोजीचा, अकलूजचा, पण त्यांची जडणघडण झाली ती पंढरपूरमधील शिक्षणकाळात. पंढरपूरमध्ये ज्या घरांना आदराने निष्ठावान संघवाले म्हणून ओळखले जाते, त्यामध्ये घळसासी, मोहोळकर, अत्रे, रुपलग, नाडगौडा, सुरनीस, देवधर याबरोबरच मिरासदारांच्या घराचा समावेश आहे. पंढरपूर म्हणजे विठ्ठलाच्या यात्रेचे गाव. एका वर्षात पंढरपुरात होणार्‍या चार मोठ्या वार्‍या (यात्रा) या पंढरीच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक जीवनाच्या लाइफलाइन्स - म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. या वार्‍यांसाठी जमणारा लाखो वारकर्‍यांचा जनसमुदाय म्हणजे हजारो नमुने. त्यामध्ये सश्रद्ध भाविक भक्त असतात, तसेच ‘हौशे, गौशे, नवशे’ अशा प्रकारचीही असंख्य माणसे असतात. या वार्‍या (यात्रा) म्हणजे मुक्त विद्यापीठ (ओपन युनिव्हर्सिटी) असते. या मुक्त विद्यापीठाचे संस्कार घेऊन दादा मिरासदारांची जडणघडण झाली.
 
 
त्याचबरोबर पंढरपूरच्या स्थानिकाची जीवनशैली, दृष्टी, वर्तन आणि वृत्ती हा एक वेगळाच विषय आहे. ‘निवांत’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे. तब्येतीत मर्जीनुसार वागणे-बोलणे हा पंढरीच्या माणसांचा स्थायिभाव आहे. दमांनी या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण केले व आपल्या कथेतील अनेक पात्रे रंगवली. पंढरपूरचे आणखी एक वेगळेपण म्हणजे सर्व दुकाने बंद झाल्यावर त्यापुढील फळीवर रात्री उशिरा रंगणार्‍या गप्पाष्टकांच्या मैफली. रात्र जशी चढत जाईल, तसे गावगप्पांचे हे अड्डे रंगत जातात व उद्या भेटण्यासाठी उत्तररात्री झोपी जातात. या गावगप्पा म्हणजे असंसदीय शब्दांच्या मालमसाल्यांनी चटकदार, मिश्कील झालेले फडच असतात. अशा फळीवरील गावगप्पा ऐकून दमा बहुश्रुत झाले होते व हेच त्यांनी पुढे आपल्या विनोदी कथांद्वारे फुलवले आणि मराठी माणसाला खळखळून हसवले. पंढरीच्या या पार्श्वभूमीतूनच दादा मिरासदारांप्रमाणे प्रसिद्ध विनोदी लेखक वि.आ. बुवा, वसंत सबनीस (विच्छा माझी पुरी करा, सोंगाड्या फेम) हे लेखक घडले. वसंत सबनीस यांचे काका पंढरपूरच्या लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्या वेळी पुतण्या वसंत सबनीस हे शिक्षणासाठी पंढरपुरात होते. अशा प्रकारे वसंत सबनीस, वि.आ. बुवा आणि द.मा. मिरासदार ही विनोदी लेखकांची त्रिमूर्ती ही महाराष्ट्राला पंढरपूरची देणगी आहे.
 
 
संघविचाराची राष्ट्रीय बांधिलकी
 
 
मिरासदार घराणे म्हणजे संघविचाराची राष्ट्रीय बांधिलकी मानणारे देशभक्त घराणे. द.मा. मिरासदार हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले आणि त्यांनी पदवीप्राप्तीनंतर अध्यापन क्षेत्रात जाण्याआधी काही वर्षे संघप्रणीत ‘दैनिक भारत’मध्ये उपसंपादक-बातमीदार म्हणून पत्रकारिता केली. नुकतेच दिवंगत झालेले थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र.ल. गावडे हे त्यांचे सहकारी म्हणून ‘दैनिक भारत’मध्ये कार्यरत होते. पुढे दमांनी अध्यापन क्षेत्र निवडले आणि ते प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध झाले. ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’ आणि पुढे ‘गरवारे महाविद्यालय’मध्ये त्यांनी अध्यापन केले. कॉलेजजीवनापासूनच त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आला व त्या संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते - पदाधिकारी होते. आणीबाणीच्या बिकट काळात ते अभाविपचे अध्यक्ष होते. (त्यांचे भाऊही संघाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठलराव मिरासदार यांचे विभाग संघचालक म्हणून आणि हरिभाऊंचे पुणे महानगर माजी व्यवस्था प्रमुख व प्रज्ञा प्रवाह प्रमुख म्हणून संघकार्यात योगदान आहे.) संघाच्या शिक्षा वर्गात शिबिरार्थी स्वयंसेवकांना एक रात्र दमांच्या कथाकथनाचा लाभ होत असे. संघशिबिराच्या सार्‍या बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षणात दमांचे कथाकथन ही एक प्रसन्न हसवणूक असे.
 
व्यक्तिगत जिव्हाळ्याचा मार्गदर्शक
 
इ.स. 1991 सालची एक व्यक्तिगत आठवण, दमांच्या स्वभावातील वेगळ्या पैलूचे दर्शन आहे. माझे वडील त्यांचे शिक्षक होते. मला ते ताठे गुरुजींचा मुलगा म्हणत व इतरांनाही ओळख करून देत. पुण्याचा दैनिक ‘तरुण भारत’ बंद झाल्यावर मी एकदा त्यांना भेटलो, तेव्हा ते म्हणाले, “अन्यत्र संपादक म्हणून काम मिळेल तेव्हा मिळेल, तोवर तू स्वस्थ बसू नको, एक दिवाळी अंक काढ. तुझ्या प्रचंड जनसंपर्काचा-लेखकसंपर्काचा सदुपयोग कर.” मी त्यांची सूचना मनावर घेतली आणि ‘शिवश्री’ नावाचा दिवाळी अंक काढला. त्या अंकाच्या प्रकाशनास ते स्वत: आलेच, शिवाय त्यांनी उद्योजिका सुधाताई मांडके यांनाही पंढरपूरकर म्हणून बोलवले होते. 2005 साली पुण्यातील ‘एकता’ या संघपरिवारातील मासिकाच्या संपादकपदाचे दायित्व अनपेक्षितपणे माझ्याकडे आले, तेव्हाही मी संपादन केलेल्या पहिल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनास ते आवर्जून आले होते. त्यांच्या शुभहस्ते व चित्रकार रवी परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन झाले. तेव्हा ‘एकता’ दिवाळी अंकास जाहिराती किती मिळाल्या? विचारून त्यांनी चक्क जाहिरातीची पाने मोजली व संतोष व्यक्त केला होता. कारण ‘संघाची प्रकाशने म्हणजे जाहिरातींचा दुष्काळ’ असा त्यांचा पूर्वानुभव होता. पुरेशा जाहिराती मिळाल्या तर अंक चांगला चालेल, वाढेल. ती काळजी घे असाही त्यांना मंत्र दिला, जो मी पुढे यशस्वीपणे पाळला.
 
 
मराठी साहित्य संमेलनाच्या (परळी) अध्यक्षपदी दमांची निवड झाली, तेव्हा पंढरपूरकरांनी मोठ्या अभिमानाने त्यांचा भव्य नागरी सत्कार केला. तेव्हा ज्येष्ठ पत्रकार, ‘गोफणकार’ माजी आमदार पांडुरंग डिंगरे, दमांच्या गौरवार्थ केलेल्या भाषणात म्हणाले होते - “दमा म्हणजे ‘पंढरपूरचे शेक्सपिअर’ आहेत. इंग्लिश माणसाला शेक्सपिअर साहित्याचा जसा अभिमान वाटतो, तसाच आम्हा पंढरपूरकरांना दमांच्या साहित्याचा अभिमान आहे. दमा म्हणजे पंढरपूरचे महाराष्ट्राला दिलेले लेणे आहे.”
द.मा. मिरासदार यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन। मृत्योर्मा अमृतगमय॥
माजी संपादक - एकता/साईलीला