ऑनलाइन ते ऑफलाइन पुन्हा श्रीगणेशा

विवेक मराठी    09-Oct-2021
Total Views |
@विनया पिंपळे 9130289604
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणे हा फक्त एका बातमीचा विषय नाहीये. शाळेशी संबंधित असणारे तीन घटक - शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा तीन वेगवेगळ्या स्तरांवर परिणाम करणारा हा विषय आहे. त्याला अनेक कंगोरे आहेत. शाळा ग्रामीण आहे की शहरी, खाजगी आहे की शासकीय ह्यावरसुद्धा ऑफलाइन शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळ्या समस्या आहेत.

school_1  H x W
 
मार्च 2020मध्ये लागलेल्या कोरोनाच्या सुट्ट्या गेल्या दीड वर्षांपासून संपायचे नाव घेत नव्हत्या. त्यात मध्यंतरी काही दिवसांकरिता (27 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021) इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही काळ सुरू झाले होते, पण तेव्हाही शालेय शिक्षण नेहमीसारखे रुळावर आलेय असे म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्याही वेळी पालकांच्या, शिक्षकांच्या, शाळा व्यवस्थापकांच्या, शिक्षण क्षेत्रातील अधिकार्‍यांच्या - एकूणच सर्वांच्या मनात धाकधूक होतीच. अशातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जोर धरला आणि सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद पडल्या. या वर्षी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भाकिते अनेक वेगवेगळ्या आरोग्य संस्थांनी वर्तवलेली असल्याने शासनाने ऑफलाइन शिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. परंतु आता तिसरी लाट येण्याची शक्यता नाहीशी (कमी) झाल्यानंतर मात्र इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुलांची शाळा 4 ऑक्टोबरपासून नेहमीप्रमाणे ऑफलाइन सुरू कराव्यात असा शासनाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार बर्‍याचशा शाळा ऑफलाइन सुरू झालेल्या आहेत.
 
 
मधल्या दीड वर्षाच्या कालावधीत एकंदर परिस्थिती बदललेली असल्याने कोरोनापूर्वीची शाळा आणि नंतरची शाळा यात काही तफावती राहणारच आहेत. शाळा सुरू करताना वेगवेगळ्या स्तरांवरील शाळांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. शाळा सुरू करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे शासनाने ठरवून दिलेली असली, तरी ती आदर्श परिस्थितीला धरून असतात आणि म्हणूनच सर्व ठिकाणी ती सारख्याच न्यायाने लागू पडत नाहीत, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते.
 
 
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणे हा फक्त एका बातमीचा विषय नाहीये. शाळेशी संबंधित असणारे तीन घटक - शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा तीन वेगवेगळ्या स्तरांवर परिणाम करणारा हा विषय आहे. त्याला अनेक कंगोरे आहेत. शाळा ग्रामीण आहे की शहरी, खाजगी आहे की शासकीय ह्यावरसुद्धा ऑफलाइन शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळ्या समस्या आहेत.
 

school_2  H x W 
 
पूर्वी शाळेला सुट्टी म्हटले की मुले आनंदाने उड्या मारायची. रोजरोजच्या सुट्टीने ह्या आनंदातली मजाच निघून गेली. मग मुले शाळा उघडण्याची वाट बघू लागली. मग परिस्थिती निवळत नाहीये असे लक्षात येऊन शाळा बंद पण शिक्षण सुरू ह्या नावाने ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. म्हणजे शाळा घरीच आली असे म्हणा ना! सुरुवातीला काही मुलांना, पालकांना आणि शिक्षकांनाही ऑनलाइन शिक्षणातली वाट सापडली असली, तरी त्यात जिवंतपणा नव्हता. याउलट काही मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळणे दुरापास्त होते. मग झाले काय, की जी मुले शहरात आहेत, फ्लॅटसंस्कृतीत राहणारी आहेत ती सोशल मीडियावर सोशल झाली. सामाजिक जीवनाचा आभासी अनुभव घेण्यात दंग झाली. आणि ज्या मुलांना ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधांची सोय उपलब्ध झाली नाही, ती निव्वळ कागदोपत्री पुढच्या इयत्तेत गेली. आता पुन्हा शाळा सुरू होताना या दोन्ही गटांतील मुलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. शाळा सुरू होण्याबाबत दोन्हीही गटातील मुले उत्साही असली, तरी शाळा या मूलभूत संकल्पनेतील काही गोष्टी वगळल्या जाणार आहेत, हे कळल्यावर मात्र त्यांचे प्रतिसाद बदलण्याची दाट शक्यता आहे. आता पूर्वीसारखी मोठी मधली सुट्टी, त्यातली डबा खाण्याची गंमत, त्यातूनही वेळ मिळाला की मित्रांसह केलेला दंगा ह्या सगळ्यांना फाटा द्यावा लागणार आहे. महत्त्वाच्याच विषयांच्या काही तासिका घेतल्या जातील, सामाजिक अंतर राखावे लागेल आणि सारखे स्वत:ला जपावे लागेल. शाळेत त्यांना मुक्त फूलपाखरासारखे वाटणारच नाही. ऑनलाइन शिक्षणात रुळलेल्या मुलांचे प्रत्यक्ष वर्गात कितपत अवधान टिकेल, ही एक शंका आहे. गेल्या दीड वर्षात स्क्रीनपुढे बसून क्लास अटेंड करताना कंटाळा आला की मुले इतरत्र फिरून यायची, व्हर्च्युअल जगात एखादा फेरफटका मारून यायची, ग्रूप डिस्कशन वगैरेही तिथेच चालायचे. आता नव्याने सुरू होणार्‍या शाळेत बंधने जास्त असल्याने तिथे जुळवून घेणे त्यांना जड गेले, तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीही नाही. ग्रामीण भागातील मुलांनाही पुन्हा शाळेतील नव्या वातावरणाशी जुळवून घेताना अनंत अडचणी येणार आहेत. कारण यातील अधिकांश मुले प्रत्यक्षात ज्या इयत्तेत सध्या आहेत त्या इयत्तेपेक्षा कितीतरी खालच्या स्तरावर त्यांचे शिक्षण आहे. त्यांनी शाळेत सद्य:स्थितीत सुरू असलेल्या शैक्षणिक बाबींशी जुळवून कसे घ्यायचे, हा एक मोठाच प्रश्न आहे.
 
 
शाळा सुरू होताना पालकांमध्ये शंका आहे आणि उत्साहही. सध्या खाजगी वाहनांमधून मुलांची ने-आण करणे तितकेसे सुरक्षित नसल्याने स्वत: आपल्या मुलांना शाळेत नेऊन सोडणे आणि आणणे यासाठी वेळ देणे शहरी पालकांसाठी एक आव्हानच आहे असे म्हणावे लागेल. पालकांना समस्या आहेत, परंतु आपापल्या पाल्याच्या भवितव्याची काळजी असणे साहजिक असल्याने शाळा सुरू होण्याला पालकांची सकारात्मक प्रतिक्रिया आहे, यात नवल नाही. त्यांची संमती असणे हीच शाळा सुरू करण्याची पहिली अट आहे, हे विशेषत्वाने सांगावे लागेल. मुलांना शाळेत प्रवेश देण्याआधी त्यांच्या पालकांचे संमतीपत्र असणे गरजेचे आहे. बहुतांश पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, हे सांगणे न लगे. आणि ज्यांना आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याची धास्ती वाटते, त्यांच्या मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाची वाट अजूनही खुली आहेच.


school_1  H x W
 
 
शाळा सुरू होण्याला शिक्षकांचा मात्र संमिश्र प्रतिसाद दिसून येतो. त्यातल्या त्यात अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षकांचे वर्तमान आणि भविष्यसुद्धा अत्यंत अस्थिर स्वरूपाचे झाले आहे. बर्‍याचशा शहरी शाळांमधे गावाकडून येऊन शिक्षण घेत असलेली मुले आपापल्या पाल्यांसोबत आपल्या मूळ गावी जाऊन तिथल्या शाळेत दाखल झालेली असल्याने शाळेतील पटसंख्या कमालीची बदलून गेली आहे. त्यामुळे शिक्षकसंख्येची गणितेही बदलली आहेत. ऑनलाइन शाळा असल्याने विनाअनुदानित शाळांनी शिक्षकांचे मानधन कमी केले. त्यामुळे ह्या शिक्षकांना आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागते आहे. ऑनलाइन शिक्षण आपापल्या घरी राहून देता येत होते. पण आता ऑफलाइन शिक्षण पुन्हा सुरू होताना नोकरी असेल त्या गावात राहण्याची सोय करण्यापासून ह्या शिक्षकांना सर्व तयारी करावी लागणार आहे. त्यातही शाळेत एकाच वर्गातील मुले विभागून सामाजिक अंतर राखत वेगवेगळ्या वर्गात बसवली गेल्याने शिक्षकांना एकच पाठ दोनदा शिकवावा लागणार आहे. याचा अर्थ तेवढ्याच पगारात दुप्पट काम करावे लागणार आहे.
 
 
तर याउलट ग्रामीण भागातील शिक्षकांपुढच्या समस्या आणखीनच वेगळ्या आहेत. स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ह्या कोरोना काळात पुन्हा शाळा सुरू करताना स्वच्छतेची सगळी बंधने पाळणे हेच एक मोठे आव्हान असणार आहे. भौतिक सुविधांच्या बाबतीत सर्वच ग्रामीण शाळा सारख्याच समृद्ध आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शासकीय आकडेवारी भौतिक सुविधांची समृद्धी दर्शवत असली, तरी प्रत्यक्षात मात्र अभाव आहे हे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शाळा सुरू करूनही मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घेणे आव्हानात्मक ठरणार आहे.
 
 
असंख्य स्तरांवर अनेक आव्हाने, अनंत अडचणी असल्या, तरी आपल्याला पुन्हा आपल्या ठरलेल्या मार्गावर यावे लागतेच. एखाद्या सुरकुतलेल्या कपड्याला इस्त्रीचे चटके सोसावे लागतात, मगच त्याची घडी नीट बसते. कोरोनाच्या संकटामुळे सद्य:स्थितीत आपणा सर्वांचेच सामाजिक आयुष्य एखाद्या सुरकुतलेल्या निस्तेज कपड्यासारखे झाले आहे. वेगवेगळ्या अडचणींना आणि आव्हानांच्या इस्त्रीला समर्थपणे तोंड देत आपलेही सामाजिक जीवन देखण्या परीटघडीसारखे नीट होवो, हीच अपेक्षा आणि सदिच्छा!