ढगफुटीने खानदेशात हाहाकार

विवेक मराठी    09-Oct-2021
Total Views |
@चिंतामण पाटील 8805221372
 
संपूर्ण ऑगस्ट महिना पाठ फिरविणार्‍या पावसाने सप्टेंबर महिन्यात जळगावसह खानदेशातील बहुतांश भाग झोडपून काढला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर व नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा तालुक्यात ढगफुटीमुळे शेती, पिके आणि जनजीवन प्रभावित झाले. चाळीसगाव तालुक्यात तर एका महिन्याच्या कालावधीत 3 वेळा अतिवृष्टीचे प्रसंग आले.

farmar_2  H x W
नंदुरबार जिल्हा यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाबाबत दुर्दैवी ठरला. सुरुवातीचे दीड-दोन महिने पेरणीलायक पाऊसच झाला नाही. त्यामुळे पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हतीच. ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय होती, त्यांचीच पिके सुस्थितीत होती. 15 जुलैपर्यंत जिल्ह्यात फक्त 59 टक्केच पेरण्या होऊ शकल्या होत्या व त्या क्षेत्रातील पिकेदेखील पावसाअभावी करपून जात होती. ऑगस्टमध्ये पावसात सुधारणा झाली नाही. एक प्रकारे खरीप हातून गेल्यात जमा झाला. जिल्ह्यातील सगळेच नदी-नाले, बंधारे कोरडे पडले होते. उभी होती फक्त बागायती पिके.
पावसाने नंदुरबार जिल्ह्याला तीन दिवस झोडपले
सप्टेंबर सुरू झाला आणि चित्र बदलले. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होऊ लागला. शेतकर्‍यांसह सार्‍यांच्या जिवात जीव आला. सप्टेंबर संपता संपता तर पावसाने कहरच केला. 28, 29, 30 सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला गुलआब चक्रीवादळामुळे धो धो पाऊस कोसळला. 28-29 सप्टेंबर रोजी शहादा तालुक्यात 24 तासांत तब्बल 189 मिलिमीटर पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कच्च्या घरांना गळती लागली, तर नंदुरबारात दरडीचा दगड घसरून घराचे मोठे नुकसान झाले. शहरातील अनेक भागात भटके कुटुंबांची वस्ती आहे. अशा ठिकाणी त्यांनी कच्च्या स्वरूपात निवारा उभा केला आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे या कुटुंबांचे हाल झाले. त्यांना जवळच्या व्यापारी संकुलात व इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागला. शिवाय विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तूंचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
पूर्ण पावसाळाभर कोरड्या असलेल्या शिवण, पाताळगंगा नद्यांसह नाले प्रवाही झाले आहेत. प्रकल्पांमधील पाणीपातळी वाढण्यातदेखील मदत होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकाच दिवसात सरासरी 94.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.
मिरचीचे नुकसान - नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर मिरची खरेदी करून त्या पसरविण्यात आल्या आहेत. पावसात या मिरच्या वाहून गेल्या. परिसरात साचलेल्या पाण्यात मिरच्या तरंगताना दिसत होत्या. यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी संपूर्ण सप्टेंबर ठरला अतिवृष्टीचा महिना
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वच पिके हातची गेल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, जामनेर, जळगाव, एरंडोल, धरणगाव तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सुमारे तीन लाख हेक्टरवरील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिके हातची गेल्याची स्थिती तयार झाली आहे. अनेक भागात पूर्वहंगामी कापूस पिकाचे 100 टक्के नुकसान झाले आहे. सरकीला कोंब फुटत आहेत. शेतीकामे ठप्प आहेत.
नद्या खळाळल्या, धरणे तुडुंब झाली
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव भागात दि, 30 ऑगस्ट रोजी ढगफुटी झाली. रात्रभर कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे पाटणा परिसरात आणि पाच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. नगद, बाणगाव या गावांमध्ये पुराचे पाणी घुसून अतोनात नुकसान झाले.
तितूर व डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील वलठाण आणि कोदगाव धरणे भरल्याने या दोन्ही नद्यांना महापूर आला होता. महापुरामुळे चाळीसगावच्या बाजारपेठेतील अनेक दुकाने वाहून गेली. सदर बाजार आणि भीमनगर भागातील भिल्ल वस्तीत अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.


farmar_1  H x W
 
चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीचे आणि महापुराचे प्रसंग सप्टेंबर महिन्यात अनेकदा आले. तब्बल 5 वेळा तितूर नदीचे पाणी चाळीसगाव शहरातील अनेक भागात घुसले होते. जामनेर तालुक्यातील वाघुर आणि कांग नद्यांनीदेखील काठावरील गावांना तडाखा दिला. पाचोरा तालुक्यातील घोडसगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याची भिंत पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. चाळीसगाव तालुक्यातून येऊन भडगाव, पाचोरा तालुक्यातून जाणार्‍या तितूर नदीला यंदा 5 वेळा महापूर आला. शिवाय गिरणा, तापी, वाघूर, बहुळा, पांझरा, अनेर, कांग आदी नद्यांनादेखील पूर आला. अर्धा जळगाव जिल्हा सुजलाम करणारे नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले असून धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गिरणेलाही महापूर आला होता.
20 मंडळांत अतिवृष्टी, शेतीचे प्रचंड नुकसान
खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टीचे प्रसंग आले. 28, 29 तारखेला कहरच झाला. तब्बल 20 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने थैमान घातले. त्यामुळे 70 गावांमध्ये अडीच हजारांच्या जवळपास घरे, दुकाने, झोपड्या पडल्या. पुरामध्ये सुमारे तीन हजार जनावरांचा मृत्यू झाला, तर 16 हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले असून, तिघा जणांचा मृत्यू झाल्याचे शासकीय सूत्रानुसार समजते. 30, 31 ऑगस्ट, 7, 8, 28, 29 सप्टेंबर आणि 1, 2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते. यात हजारो हेक्टरवरील पीक मातीमोल झाले.
जळगाव जिल्ह्यातील कापूस हंगाम मातीमोल
 
अतिवृष्टीचे प्रसंग जरी महिन्यातून 8 वेळा घडले असले, तरी संपूर्ण महिनाभर सतत पूर येत होता. सलग पूर येत राहिल्याने जळगाव जिल्ह्यातील सगळ्याच 15 जिल्ह्यांतील कापूस पीक 100 टक्के नष्ट झाले. बोंडे लागण्याच्या व कापूस वेचणीच्या कालखंडात पाऊस सुरू राहिल्याने बोंडे काळी पडून गळून पडली. पूर्वहंगामी लागवड करणार्‍या अनेक शेतकर्‍यांना तर कापूस वेचण्याची संधीदेखील यंदा मिळण्याची शक्यता नाही.
स्वप्न दहा हजाराचे, हाती आठशे/हजार - खानदेशात खरेदीच्या मुहूर्ताला व्यापार्‍यांनी 10 हजार ते 11 हजार रुपये क्विंटल भाव घोषित केला. त्यामुळे शेतकरी कापूस उत्पादनापासून आशावादी होते. पण पावसाने या आशा संपवून टाकल्या. अतिपावसाने बोंडे काळी पडली असून व्यापारी आठशे रुपये ते 1 हजार रुपये क्विंटल या दराने हा काळा कवडी कापूस खरेदी करीत आहेत.


पीक विमा आणि भरपाईची अपेक्षा
कापसासह उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे व फळ बागायतीचे मोठे नुकसान झाल्याने ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला आहे, त्यांना तो लाभ मिळावा अशी मागणी होत आहे. परंतु विमा कंपनी त्या बाबतीत अडवणुकीचे धोरण राबवीत असल्याचे दिसते. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी न करता कागद रंगविण्याचे काम विमा कंपनी करीत आहे. त्यामुळे नुकसान होऊनही कंपनी शेतकर्‍यांना भरपाई मिळू देणार नाही अशी चिन्हे आहेत. दरम्यान शेतकर्‍यांनी कंपनीविरोधात आवाज उठविल्याने शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या तक्रारी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे घेतल्या जात आहेत. अर्थात राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या भूमिकेवरच विम्याचा लाभ मिळणे अवलंबून आहे.