पुरस्कार सन्मानित झाले

विवेक मराठी    11-Nov-2021   
Total Views |
याआधी बहुतेक वेळा प्रसिद्धी झगमगाटात वावरणार्‍या व्यक्तींचाच अशा यादीत समावेश होत असे. विशेषतः टुकार चित्रपट करणारे दुय्यम दर्जाचे कलावंत या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आपण पाहिले आहे. पण आता परिस्थिती बदलत असून सामान्य फळविक्रेत्यापासून ते पारंपरिक कला जतन करण्यासाठी काम करणार्‍या व्यक्तींचा सहभाग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये आहे. हीच बदलाची सुरुवात आहे.
 
padmshree_1  H
 
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. तसेच 2020साठी 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण व 112 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दूरचित्रवाणीवर व समाजमाध्यमातून या संबंधित बातम्या व चित्रफिती मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्या.

यावर्षी ज्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पद्मश्री व दोन पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यापैकी आनंद महिंद्रा हे पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी असून पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, “आता मूलभूत स्वरूपाचे काम करून समाज सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांच्या बरोबरीचा नाही ही जाणीव मला होते आहे.” पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले आनंद महिंद्रा यांचे हे मनोगत केंद्र सरकारच्या कार्याची दिशा स्पष्ट करणारे आहे. सुप्रसिद्ध, विविध प्रकारच्या माध्यमातून कौतुक झालेल्या व्यक्तींना सन्मानित केले, तर त्यात वेगळे घडले असे म्हणता येत नाही. पण समाजजीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, एखाद्या विशिष्ट विषयासाठी मूकसाधना करणार्‍या व्यक्तींना शोधून काढणे आणि त्यांना सन्मानित करणे हे मोठे जिकरीचे काम असते. ते करण्यात केंद्र सरकार यशस्वी होत आहे असे म्हणायला हरकत नसावी.

या पुरस्कार प्रदान सोहळ्याने भारतीयत्वाचे दर्शन घडवले आहे. साधारणपणे असा सोहळा म्हणजे आखीव रेखीव आणि घड्याळाच्या काट्यांवर चालणारा असतो. पाश्चात्य देशात ज्या पद्धतीने सन्मानित करण्यात येते, त्याचा प्रभाव या सोहळ्यावर दिसून येतो. पण त्याला छेद देण्याची सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती महोदयांचा सन्मान, त्यांच्याशी ठराविक अंतरावरून केलेला संवाद, ठराविक पद्धतीने केलेले अभिवादन या सर्व यांत्रिक गोष्टी बाजूला ठेवून अस्सल भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे प्रकटीकरण या पुरस्कारप्रदान सोहळ्यात झाले. आणि ते आनंददायी आहे.

पॅरा अ‍ॅथिलिटीक्स क्षेत्रात 1994 पासून काम करणार्‍या के.वाय. वेंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती स्वतः दोन पायर्‍या खाली उतरून आले. तर तृतीयपंथियांसाठी काम करणार्‍या मंजम्मा जोगती यांनी राष्ट्रपती महोदयांची दृष्ट काढून भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे प्रकटीकरण केले. एका अर्थाने त्यांनी राष्ट्रपतीपदी विराजमान असणार्‍या व्यक्तीची दृष्ट काढली नसून ज्या भारताचे ते सर्वोच्च प्रमुख आहेत, त्या भारताची त्यांनी दृष्ट काढली आहे. भारताला लागलेल्या परकीय परंपरा आणि प्रथांचा लय होण्याची ही सुरुवात आहे, असे आम्हाला वाटते. कारण याआधी बहुतेक वेळा प्रसिद्धी झगमगाटात वावरणार्‍या व्यक्तींचाच अशा यादीत समावेश होत असे. विशेषतः टुकार चित्रपट करणारे दुय्यम दर्जाचे कलावंत या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आपण पाहिले आहे. पण आता परिस्थिती बदलत असून सामान्य फळविक्रेत्यापासून ते पारंपरिक कला जतन करण्यासाठी काम करणार्‍या व्यक्तींचा सहभाग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये आहे. हीच बदलाची सुरुवात आहे.
 
मूकपणे काम करत राहणार्‍या व्यक्तींना सन्मानित करून केंद्र सरकारने खर्‍या भारताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हा सन्मान आणि शोध त्या व्यक्तीचा नसून भारतीयत्वाचा आहे. आपली मूळं कोणती? आपली संस्कृती काय? त्याचा सन्मान कशाप्रकारे केला पाहिजे यांची उत्तरे या पुरस्कार प्रदान सोहळ्याने दिली आहेत.

महाराष्ट्राचा विचार करता गिरीश प्रभुणे, परशुराम गंगावणे, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार, सुरेश वाडकर, सिंधूताई सपकाळ, जयवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, सय्यदभाई इत्यादी मान्यवरांना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्वच मान्यवरांची कार्यक्षेत्रे आपल्या सर्वांनाच माहिती असण्याची शक्यता कमी आहे. या मान्यवरांनी स्वतःला आपापल्या कार्यक्षेत्रात विलीन करून घेतले आहे. त्यांना कोणत्याही मान-पानाची, सन्मानाची अपेक्षा नाही. मात्र कला, समाज, पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वपरिचित नाही. ही मंडळी काम कशासाठी करतात? त्यांच्या कामाचे अंतिम गंतव्य काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे - भारतीयत्व. भारत म्हणून विकसित होताना ‘कुणी ना राहो दुबळा येथे’ अशी धारणा मनाशी बाळगून काहीजण काम करतात. काही मंडळी आपल्या कला, परंपरा, साहित्य, संस्कार, ज्ञान यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काम करतात. अशा मंडळीना केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अन्य प्रांतातील मान्यवरांविषयी असेच म्हणता येईल. एकूणच काय तर आता राष्ट्रपती भवनात ही भारतीयत्वाची ‘पद्म’चिन्हे उमटू लागली आहेत, हा शुभशकून आहे.