'समग्र वंदे मातरम्' ग्रंथाचे स्वामी गोविंददेवगिरी महाराजांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन

विवेक मराठी    13-Nov-2021
Total Views |

RSS_2  H x W: 0

पुणे :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि 'वंदे मातरम्' या गीताच्या जयंतीचे औचित्य साधून मिलिंद सबनीस यांच्या 'वंदे मातरम्' या स्वातंत्र्य महामंत्राचा समग्र इतिहास सांगणाऱ्या हिंदी भाषेतील 'समग्र वंदे मातरम्' या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील 'एसपी महाविद्यालया'च्या लेडी रमाबाई सभागृहात स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, 'एमएनजीएल'चे व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विचारवंत रमेश पतंगे, 'एनवायसीएस'चे प्रमुख राजेश पांडे, 'एमएनजीएल'चे व्यावसायिक प्रमुख संजय शर्मा, या ग्रंथाचे अनुवादक गंगाधर ढोबळे आणि लेखक मिलिंद सबनीस सपत्निक व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
यावेळी स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, “१७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना जशी 'हर हर महादेव' ही घोषणा प्रेरणा देत असे तशीच प्रेरणा १९व्या आणि २०व्या शतकातील क्रांतिकारकांना 'वंदे मातरम्' या दोन शब्दांतून मिळत होती. कोणताही देश निर्माण होऊन त्याला यशस्वी व्हायचे असेल, तर त्या देशाला भूमी हवी, त्या देशाला आपली संस्कृती किंवा परंपरा हवी आणि त्या परंपरांचं पालन करणारी जनता देखील हवी आणि भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास 'वंदे मातरम्' या दोन शब्दांमुळे भारतीय संस्कृतीचं दर्शन होत असे,” असेही स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले. “भारत देश आणि भारत देशातील जनता समर्पण करणे जाणते. मात्र, भारताला अजून जोमाने प्रगती करण्यासाठी क्षात्रतेजाची गरज आहे,” असेदेखील स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले.
 
 
रमेश पतंगे यांनी या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील सा. 'विवेक' प्रकाशित 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीवर भाष्य करणाऱ्या 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाबद्दल बोलताना रमेश पतंगे म्हणाले की, “भारत देशाचे परराष्ट्रीय धोरण नरेंद्र मोदी २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर बदलले आहे. २०१४ पूर्वी भारत आंतरराष्ट्रीय राजकरणात नेहमीच बोटचेपी भूमिका घेत असे, पण नरेंद्र मोदी यांनी सत्ता हातात घेताच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तमरित्या कामगिरी बजावली आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यावर त्यांना एका पत्रकाराने भारताच्या आगामी विदेशनीती बद्दल विचारले होते तेव्हा पत्रकाराला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ” हम विदेशी नेताओं के साथ आंख उंची कर के नही, या आंख नीची कर के नही तो आंख मे आंख मिलाकर विदेशी नेताओं कि साथ व्यवहार करेंगे,” असे उत्तर दिले होते,” याचा रमेश पतंगे यांनी भारताच्या विदेशनीतीबद्दल बोलताना आवर्जून उल्लेख केला. आता सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणारी मंडळी 'मोदी डॉक्ट्रिन' असा शब्दाचा उपयोग करत आहे, हे नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीचे यश असल्याचे रमेश पतंगे म्हणाले. 'वंदे मातरम्' हा ग्रंथ भारत मातेला विश्वगुरू व्हायला मदत करेल, असेही ते म्हणाले. रमेश पतंगे यांनी या वेळी सा. 'विवेक' प्रकाशित 'राम मंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथाबद्दल पण भाष्य केले. राम मंदिर हे आधुनिक भारताच्या राष्ट्रवादाच्या पायाभरणीच मंदिर आहे असे ते 'राम मंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथाबद्दल बोलताना म्हणाले. तसेच त्यांनी 'विवेक समूहा'बद्दल पण माहिती दिली. सा. 'विवेक'ने आता ७४व्या वर्षात पदार्पण केले आहे. उपक्रमशीलता हे 'विवेक'चे वैशिष्ट्य असून 'विवेक' हे एक वैचारिक साप्ताहिक आहे, असे ते म्हणाले.

RSS_1  H x W: 0

...तर 'वंदे मातरम्' या ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीस म्हणाले की, " 'वंदे मातरम्' हे केवळ दोन शब्द नसून तो एक महामंत्र आहे. कार्तिक शुद्ध नवमी म्हणजे हिंदू तिथीने आजचा (११ नोव्हेंबर) हा दिवस म्हणजे बंकीमचंद्र चटोपाध्याय (चॅटर्जी) लिखित 'वंदे मातरम्' या स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा देणाऱ्या महामंत्राचा जयंती दिवस होय. बंकीमचंद्र चॅटर्जी यांच्या या 'वंदे मातरम्' या दोन शब्दांचा अर्थ केवळ 'भारत माते तुला वंदन' असा नसून तो एक महामंत्र आहे आणि त्यामुळे अनेकांना आज पण ऊर्जा मिळत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी या वेळेस 'वंदे मातरम्' हा ग्रंथ लिहताना काय अनुभव आले हे पण सांगितले. इतिहासकार आनंद हर्डीकर हे माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले म्हणून हा मौल्यवान ८५० पानी ग्रंथ निर्माण होऊ शकला, असे ते म्हणाले. या ग्रंथात भारतमातेची ४५ हाताने रेखाटलेली चित्रे आहेत, असे ते 'समग्र वंदे मातरम्' या ग्रंथाबद्दल बोलताना म्हणाले. तसेच २०१४ मध्येच हा हिंदीमधील ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हा ग्रंथ वेळेत पूर्ण होत नव्हता. परंतु, 'विवेक समूहा'चे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी मागे लागून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी हे पुस्तक पूर्ण करून घेतले, अशा शब्दांत त्यांनी पोहनेरकर यांचे कौतुक केले.
 
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,” 'वंदे मातरम्' या दोन शब्दांवर पण तब्बल ८५० पानांचे पुस्तक होऊ शकते ही अत्यंत आनंदाची बाब असून हे ८५० पानी 'समग्र वंदे मातरम्' केवळ पुस्तक नसून हा एक ग्रंथ आहे.” चंद्रकांतदादा पाटील यांनी या वेळी 'हिंदुस्थान प्रकाशन संस्थे'चे अध्यक्ष रमेश पतंगे यांच्या गाढ्या अभ्यासाचे आणि विश्लेषणकलेचे कौतुक केले. रमेश पतंगे यांच्यामुळेच आम्हा सर्वांना वेगवेगळ्या विषयांवरचे उत्कृष्ट प्रतीचे ग्रंथ वाचावयास मिळतात, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. कोणतेही मोठे काम करायचे असल्यास मागे आर्थिक पाठबळ हे लागतेच, असे म्हणत 'समग्र वंदे मातरम्' या ग्रंथाच्या आर्थिक साहाय्यासाठी काम केल्याबद्दल 'एमएनजीएल' (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) चे कौतुक केले. 'वंदे मातरम्' या विषयावर खोलात जाऊन अभ्यास करून ते लोकांसमोर मांडल्याबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांनी 'समग्र वंदे मातरम्' या ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीस यांच्या परिश्रमाचे कौतुक केले आणि 'समग्र वंदे मातरम्' हा ग्रंथ घरोघरी पोहोचावा आणि तरुणांनी या ग्रंथाचे वाचन करावे म्हणून आपण एका स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे, जेणेकरून तरुण मंडळी हा ग्रंथ वाचतील आणि त्यावरील प्रश्नांची उत्तर देऊन बक्षीस जिंकतील, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
 
 
या कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने झाली, तर सांगता 'वंदे मातरम्'च्या गायनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन 'विवेक समूहा'चे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी स्नेहल दामले यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या दरम्यान राहुल सोलापूरकर यांच्या दमदार आवाजातील 'वंदे मातरम्' या गीताच्या इतिहासाची हिंदी भाषेमधील ध्वनिचित्रफीत पण दाखवण्यात आली.
 
- अनीश कुलकर्णी