कुटुंबवत्सल प्रचारक संदीप आठवले

विवेक मराठी    13-Nov-2021
Total Views |
@योगेश वामन वेलणकर

वैचारिक स्पष्टता, अफाट वाचन, सुरेल गीतगायन, उत्तम शारिरीक, आपल्या प्रत्येक कृतीतून, कार्यक्रमातून संघाची मूलभूत उद्दिष्ट साध्य होत आहेत का याविषयी सतत जागरूकता, कार्यकर्त्यांच्या घरी अकृत्रिम संपर्क, स्नेह, बैठकीत आणि अन्यत्रही चर्चेला पूर्ण वाव, बैठकीतील वातावरण चांगले राहण्यासाठी आवश्यक तेथे विनोदनिर्मिती करणे, बैठकीत चर्चा भरकटत असेल तर ती योग्य दिशेला घेऊन येणे असे संघप्रचारकात आढळणारे अनेक गुण संदीपजींकडे होतेच, पण एक विशेष गुण आढळला तो म्हणजे प्राप्त परिस्थितीनुसार कार्यपद्धतीत बदल करणे.

RSS_1  H x W: 0
वहिनी नमस्कार माझी पत्नी चित्रा हिच्या कानावर सुपरिचित आवाज आला. मुंबईतील यशवंत भवन या संघ कार्यालयात रात्री नऊ वाजता चित्रा, रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेत निवासासाठी गेली होती. विद्यार्थ्यांना यायला वेळ असल्याने ती वाट पाहत बसली होती आणि तेथे अचानक संदीपजी आले. तिच्या जेवणाबद्दल चौकशी केली, घरून जेऊन आल्याचे कळल्यावर पाच मिनिटांत येतो सांगून, पाच मिनिटांनी हातात दुधाचा कप घेऊन समोर उभे राहिले. जेवण नाही, निदान दूध तरी घ्या, असा आग्रह करून जनकल्याण समितीचे कार्यकर्ते तेथे येईपर्यंत तिच्याशी बोलत बसले. एवढा ज्येष्ठ प्रचारक आपल्यासाठी वेळ काढून सहज गप्पा मारत बसतो, हा अनुभव माझ्या पत्नीच्या कायमचा स्मरणात राहिला. संघकार्य कौटुंबिक आहे असे आपण म्हणतो, पण सध्याच्या औपचारिकता वाढलेल्या काळात हा अनुभव दुर्मिळ. सहजता हा संदीप आठवलेंच्या कार्यशैलीचा भाग होता. संघकार्यकर्त्यात सहजता असली पाहिजे यासाठी ते आग्रही होते, ते स्वतः तसे वागतही. कार्यकर्त्यांना गप्पा मारता आल्या पाहिजेत, केवळ विषय सांगू नका हे स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून देत. त्यामुळे कोणी खूप मोठा माणूस आपल्या घरी आला आहे, असे कोणालाही त्यांच्याबाबतीत जाणवले नाही. माझे वडील सुपारी खातात हे कळल्यावर जेवण झाल्यावर प्रत्येक वेळी ‘आप्पा सुपारी’ असे म्हणत त्यांच्यासमोर संदीपजी उभे राहत.सुरवातीला संघप्रचारक सुपारी मागून खातो हे मला खटकले, पण नंतर ध्यानात आले की घरातील सर्वांशी संवाद साधायचा आणि त्या परिवाराचा एक सदस्य होऊन जायचे यासाठीचा हा त्यांचा मार्ग होता. त्यानिमित्ताने ते आप्पांकडून संघकार्याच्या आप्पांच्या काळातील आठवणी जागवत असत. असा स्नेह त्यांनी शेकडो घरी निर्माण केला होता.

संदीपजी आणि माझा परिचय खरतर जेमतेम तीन वर्षांचा. परळ विभाग कार्यकर्ता म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर एक वर्षानी संदीप आठवले परळ विभाग प्रचारक म्हणून नियुक्त झाले. तत्पूर्वी ते मुंबईत गोरेगाव विभाग प्रचारक होते. परळ विभागात एक ‘संदीपजी’ जाऊन दुसरे ‘संदीपजी’ प्रचारक म्हणून आले . दोन्ही संदीपजींच्या कार्यपद्धतीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार फरक होता. तो स्पष्ट दिसत होता. संदीप आठवलेंबरोबर त्यानंतरच्या काळात बैठका, सहप्रवास, वर्ग यानिमित्ताने ‘प्रचारकाचा सहवास’ अनेक वर्षांनी लाभला.

वैचारिक स्पष्टता, अफाट वाचन, सुरेल गीतगायन, उत्तम शारिरीक, आपल्या प्रत्येक कृतीतून, कार्यक्रमातून संघाची मूलभूत उद्दिष्ट साध्य होत आहेत का याविषयी सतत जागरूकता, कार्यकर्त्यांच्या घरी अकृत्रिम संपर्क, स्नेह, बैठकीत आणि अन्यत्रही चर्चेला पूर्ण वाव, बैठकीतील वातावरण चांगले राहण्यासाठी आवश्यक तेथे विनोदनिर्मिती करणे, बैठकीत चर्चा भरकटत असेल तर ती योग्य दिशेला घेऊन येणे असे संघप्रचारकात आढळणारे अनेक गुण संदीपजींकडे होतेच, पण एक विशेष गुण आढळला तो म्हणजे प्राप्त परिस्थितीनुसार कार्यपद्धतीत बदल करणे. शाखा एक तास चालवता येत नसेल तर अर्धा तासच चालवा, पण उगाच संघस्थानावर गप्पा मारत उभे राहू नका, संघस्थानावर उत्साह मिळणारे मोजके कार्यक्रम कमी वेळत झाले तरी चालेल, वस्तीत संघकार्य घेऊन जाताना आचार विभाग बाजूला ठेवला तरी चालेल, भगव्या ध्वजाचे पूजन चार नागरिकांनी येऊन केले की गुरू पूजनाचा उत्सव झाला असे म्हणायचे का? एका वस्तीत काही कुटुंबांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले की त्या वस्तीचा हिंदू साम्राज्य दिन साजरा झाला असे म्हणायचे का? या आणि अशा अनेक कल्पनांवर चर्चा व्हायची. त्या कल्पना अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही ठिकाणी प्रयोग करता येतील का यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यस्थितीची यथायोग्य कल्पना वरिष्ठ अधिकार्‍यांना देऊन त्यांच्याशी त्यावर चर्चा करून कार्यक्षेत्रातील आवश्यकतेनुसार त्यांच्याकडून विषयात बदल करून घेणे... या आणि अशा अनेक गोष्टी संदीपजींकडून शिकता आल्या. परळ विभाग पुनर्रचना करणे सुरू असताना दोन भागांतील कार्यकर्ता नियुक्ती करताना वयोगटानुसार नियुक्ती करावी अशी कल्पना समोर आली. हा एक नवीन प्रयोग होता, या कल्पनेचा पाठपुरावा संदीपजींनी केला आणि तो पूर्णत्वास नेला.
 
 
संदीपजी मूळ पुण्याचे. त्यांच्या पुणेरीपणावर आम्ही सर्व विभाग कार्यकर्त्यांनी त्यांना अनेक वेळा छळले होते. पण ते सर्व विनोद खिलाडू वृत्तीने ते घेत असत.त्यामुळे बैठकांतील, चर्चेतील वातावरण चांगले राहाण्यास मदतच होत असे. पुण्यात त्यांनी विविध स्तरांवर जबाबदारी घेऊन काम केले होते, त्या सर्व कामातील विविध प्रयोग ऐकायला मिळायचे. एक विशेष प्रयोग म्हणजे नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे. काही वर्षं सातत्याने त्यांनी एका ज्येष्ठ संघकार्यकर्त्याला बोलावून त्यांच्या समोर सहकारी कार्यकर्त्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायची संधी मिळायची. आपल्या मनातील भावना कोणीतरी ऐकून घेत आहे यामुळेच अनेक जणांची नाराजी दूर होत असे. हा प्रयोग खरोखरच अनुकरणीय आहे असे वाटते. ‘आपल्या कार्यक्षेत्रातील संघ डॉ. हेडगेवारांच्या काळातील आहे का?’ हा मोरोपंत पिंगळे यांनी अनेक ठिकाणी विचारलेला प्रश्न ते विचारत. प्रथम अर्थ न समजल्यामुळे संघ बाल्यावस्थेत आहे, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच स्वयंसेवक आहेत का असा अर्थ काढला जायचा. पण प्रश्नाचा अर्थ येथील संघकार्यकर्ता प्रयोगशील आहे का? नवीन कल्पनांचे स्वागत करून त्यावर विचार केला जातो का? आणि त्या कल्पना अमलात आणल्या जातात का? असा अर्थ होता हे नंतर कळले. ‘सालाबादप्रमाणे यंदाही’ या शब्दाचा त्यांना तिटकारा होता.
 
आमच्यात एक समान आवडीचा धागा होता तो म्हणजे पु.ल. देशपांडे. गप्पा मारताना पुलंचा उल्लेख आला नाही असे क्वचितच व्हायचे. एका निबंध स्पर्धेसाठी मी काही विषय सुचविले होते, हे त्या़ंना माहीत नव्हते. त्यांच्या मते ते विषय फारच जड होते.ते मी सुचविले आहेत असे कळल्यावर पुलंच्या ‘असा मी असामी’तील आध्यात्मिक अनुभवाच्या भागातील IN TUNE WITH THE TUNE या पुस्तकाचे उदाहरण देत (मी वाचलंय? अहो, मी लिहीलं आहे) अशी मला हलकेच कोपरखळी मारली होती.

संघकार्य ईश्वरी असल्याने एक कार्यकर्ता कमी झाला तर त्याच्या जागी दुसरा अधिक क्षमतेचा कार्यकर्ता उभा राहतो हा संघाचा इतिहास आहे. पण अंततः एक गोष्ट संदीपजींच्या बाबतीत लक्षात आली, तिचा उल्लेख करणे अनिवार्य वाटत आहे. हृदयशस्त्रक्रियेनंतर प्रवास करू नका असे सांगितले असताना तो सल्ला संदीपजींनी ऐकला नाही, असे अनेक कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाले. कदाचित त्याची कारणे आपल्याला माहीत नसतील पण परिणाम बघायला मिळाला. संघकार्य आवश्यक आहेच पण ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं’ याचाही विसर कार्यकर्त्यांनी पडू देऊ नये ही विनंती.
 
संघप्रचारक पुण्यात्माच असतो, त्याला सद्गती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.
- योगेश वामन वेलणकर