भारतीय क्रीडा प्रांगणातील बारा रत्ने

विवेक मराठी    15-Nov-2021
Total Views |
@ॠजुता लुकतुके
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत घेतलेल्या कठोर मेहनतीनंतर आणि मिळवलेल्या दैदिप्यमान यशानंतर या खेळाडूंसाठी आताचे दिवस हे स्वप्नपूर्तीचे आणि फळं चाखण्याचे आहेत. आणि आता खेलरत्न पुरस्कार ही त्यावरील आणखी एक कडी आहे. या सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी यंदा बारा खेळाडूंची वर्णी लागली आहे.

sports_1  H x W

कदाचित हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या क्रीडारत्नांचा गौरव सोहळा (13 नोव्हेंबर) पारही पडला असेल. यंदा ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कारासाठी तब्बल बारा खेळाडूंची एकत्रित निवड झाली आहे. वरवर बघितलं तर ट्वेल्थ मॅनसह अख्ख्या क्रिकेट संघाचा सत्कार एकाच वेळी झाल्यासारखं वाटेल. पण, हे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचं वर्षं होतं आणि भारतीय पथकाची दोन्ही स्पर्धांमधली कामगिरीही दमदार होती. टोकयो ऑलिम्पिकमध्ये आपण आतापर्यंतची सर्वाधिक पदकांची (1 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य) कमाई केली. तर नंतर झालेल्या पॅरालिम्पिक खेळांत तब्बल 19 पदकं मिळवून पहिल्यांदा दोन आकडी एकत्रित पदक संख्या गाठली. आणि म्हणूनच सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी यंदा बारा खेळाडूंची वर्णी लागली आहे.
 

sports_4  H x W
 
अ‍ॅथलेटिक्समध्ये देशाला पहिलं पदक आणि तेही सुवर्ण जिंकून देणारा नीरज चोप्रा यात आहे. त्याचप्रमाणे मुष्टीयुद्धात रौप्य आणि कांस्य जिंकणारे रवी दाहिया आणि लवलिना बोरगेहेन यांच्याबरोबरच श्रीजेश (हॉकीपटू - टोकयो कांस्य), अवनी लेखरा (नेमबाज - टोकयो दोन पदकं), सुमित अंतिल (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन - टोकयो सुवर्ण), कृष्णा नागर (पॅराबॅडमिंटन), मनिष नरवाल (पॅरा शूटिंग), मिथाली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल) आणि मनप्रीत सिंग (हॉकी) यांचाही सन्मान यंदा होणार आहे. तर मानाचा अर्जुन पुरस्कारही 35 जणांना जाहीर झाला आहे.
 
 
या खेळाडूंची मैदानावरची कामगिरी तर आपण सगळ्यांनीच बघितली. पण, त्यानंतरचं मैदानाबाहेरचं त्यांचं नम्र वागणं आणखी सुखावणारं आहे. ‘खेलरत्न’साठी नामांकन झाल्या झाल्या नीरज चोप्राने लिहिलेला सोशल मीडिया संदेश बघा. त्यात ऑलिम्पिक बरोबरच विश्वविजेतेपद, आशियाई विजेतेपद अशा महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये त्याने मिळवलेल्या पदकांचे फोटो आहेत आणि जोडीला पाय जमिनीवर ठेवून एक संदेश आहे, ‘सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारासाठी देशातील इतर अद्वितीय खेळाडूंच्या बरोबरीने माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे. आता देशासाठी अशीच कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करेन’. सुवर्णपदक जिंकून भारतात आल्यापासून आपल्या शांत, संयमी आणि सहज बोलण्याने नीरजने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. कधी भेटायला आलेले पत्रकार किंवा चाहते यांना आपल्या सहीचा सरावावेळी वापरलेला टी-शर्ट भेट देऊन त्यांना खूश कर, कधी त्यांची एखादी विचित्र फर्माईश (मलिष्काबरोबर केलेला डान्स आठवा!) पूर्ण कर, न थकता लोकांसाठी वेळ काढ... नीरज चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलाय.
 
पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऑलिम्पिकच्या सरावासाठी मागची दोन वर्षं परदेशात घालवलेल्या नीरजच्या आई-वडिलांनी इतक्या वर्षांत विमानातूनही प्रवास केला नव्हता. त्यामुळे टोकयोहून भारतात परतल्यावर नीरजने आवर्जून त्यांची ही इच्छाही पूर्ण केली. नीरजला आता मिळणार्‍या मोठ्या मोठ्या मान-सन्मानांबरोबरच त्याने आपले आणि कुटुंबीयांचे असे छोटे आनंदही पूर्ण करताना पाहून क्रीडाचाहतेही सुखावत होते.
 
थोडक्यात, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत घेतलेल्या कठोर मेहनतीनंतर आणि मिळवलेल्या दैदिप्यमान यशानंतर या खेळाडूंसाठी आताचे दिवस हे स्वप्नपूर्तीचे आणि फळं चाखण्याचे आहेत. आणि आता खेलरत्न पुरस्कार ही त्यावरील आणखी एक कडी आहे.


sports_12  H x
लवलिना

sports_6  H x W
रवी दाहिया

विकसनशील देशांची क्रीडा संस्कृती बघितलीत तर तिथं खेळाडू नेहमी खेड्यांमधून जास्त प्रमाणात तयार होतात. या मुलांकडे कष्टांची तयारी असते आणि परिस्थितीने शिकवलेला काटकपणा असतो. भारतही याला अपवाद नाही. नीरजबद्दल आपण हल्ली भरभरून बोलतो. पण, एकंदरीतच सगळ्या पदकविजेत्या खेळाडूंवर एक नजर टाकलीत तर माझं म्हणणं तुम्हालाही पटेल. मीराबाई चानू 30 किलोमीटर लांब असलेल्या प्रशिक्षण केंद्रात जाण्यासाठी मणिपूरच्या दुर्गम भागातून वाळूच्या ट्रकबरोबर प्रवास करायची. का? तर बसपेक्षा ते स्वस्त आणि वेळेच्या दृष्टीनेही परवडणारं होतं म्हणून. आधीच 46 किलो वजनी गटात खेळणारी चणीने लहान ही मुलगी. ट्रकचा तो थकवणारा प्रवास आणि वजन उचलायचा खेळ! तिने वर्षानुवर्षं हे कसं निभावलं असेल? त्यात प्रावीण्य कसं मिळवलं असेल? पण, पदक मिळवून ती भारतात आली, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ट्रक वाहतूक करणार्‍या गावातल्या सगळ्या चालक आणि मजूरांचा तिने घरी बोलावून सत्कार केला. त्यांच्या ऋणांची तिने जाणीव ठेवली.
 
 
आसामच्या लवलिनाचा जन्म 1997चा आहे. आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या अशा मिलेनियल पिढीला डोळ्यासमोर आणा. काय नसतं त्यांच्याकडे? शिक्षणाच्या संधी, आधुनिक मोबाईल, आधुनिक कपडे, त्यांच्यासाठी कुठलाही खर्च करायला तयार असणारे आई-वडील...पण, लवलिनाचा जन्म गोलघाटमध्ये एका टपरीवजा दुकान चालवणार्‍या वडिलांच्या पोटी झाला. त्यामुळे तीनही मुलींनी खेळांची आवड जोपासण्याला त्यांची ना नव्हती. पण, त्यासाठी वेगळं काही करण्याची तयारी आणि क्षमताही नव्हती. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या चाचणी स्पर्धेत लवलिना सहभागी झाली नसती आणि मूळात ती स्पर्धा अगदी तिच्या शाळेत झाली नसती, तर आताची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी लवलिना आपल्याला दिसलीच नसती. तिच्या मोठ्या दोन बहिणींबरोबर आसाममध्येच ती किक बॉक्सिंग करत राहिली असती. वेगळं करण्याची दिशा दाखवणारंही आसपास कुणी नव्हतं. पण, साई केंद्रात गेल्यावर ती बदलली. मेहनतीला, कष्टाला कमी पडली नाही. आणि म्हणता म्हणता 2018पासून मुष्टियोद्धात जागतिक स्तरावर नाव कमवायला तिने सुरुवात केली.


sports_10  H x
अवनी लेखरा
sports_8  H x W
प्रमोद भगत
 
साप्ताहिक विवेकच्याच आधीच्या एका लेखात आपण अवनी लेखरा (नेमबाज - टोकयो दोन पदकं), सुमित अंतिल (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन - टोकयो सुवर्ण), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन), मनिष नरवाल यांच्या कामगिरीबद्दल बोललो आहोत. त्यांचा लढा दुहेरी होता. अपंगत्वामुळे शारीरिकदृष्ट्या आपण इतरांपेक्षा वेगळे असू. पण, आपली धमक कमी नाही, हे त्यांना वेळोवेळी दाखवून द्यावं लागलं. अवनीच्या आयुष्यावर एक नजर टाका. मूळात नेमबाजी या खेळात शरीराचं संतुलन आणि समतोल महत्त्वाचा. पण, अवनीचा हा समतोल कधीच गेलाय. ती 11 वर्षांची असताना कार अपघातात तिचं कमरेखालचं शरीर लुळं पडलं. पण, वडिलांनी एखाद्या खेळात मन रमवण्याचा आणि त्यामुळे तंदुरुस्तीकडे गांभीर्याने बघण्याचा सल्ला दिला. तिने तो मानला आणि व्हीलचेअरवर बसून पठ्ठी नेमबाजी करते. आज देशासाठी पॅरालिम्पिक सुवर्ण जिंकणारी ती पहिली महिला क्रीडापटू आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. 2015 साली अभिनव बिंद्राकडून प्रेरणा घेऊन तिने नेमबाजीला सुरुवात केली. आणि आज सुवर्ण जिंकल्यावर तिचं कौतुक करणारा पहिला खेळाडू होता खुद्द अभिनव.
 

sports_5  H x W
 कृष्णा नागर

sports_11  H x
 
सुमित अंतिल
पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरची उंची जेमतेम साडेचार फूट आहे आणि वजन 40 किलो. शरीराची पूर्ण वाढ न झाल्यामुळे लहानपणापासून आजूबाजूच्या लोकांनी कायम त्याला नावं ठेवली, त्याची चेष्टा केली. पण, कृष्णाला एक गोष्ट माहीत होती. उंची, शरीरयष्टी आपल्या हातात नाही. हातात आहे ते करणं मात्र जमायला हवं. म्हणजे मेहनत करून परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. आणि पुढे पॅरा बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान आणि टोकयो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवण्यापर्यंत मजल त्याने मारली.
 
 
 
ऑलिम्पिक स्पर्धा ज्यावर्षी होतील तेव्हा पदकविजेत्या खेळाडूंना जर यापूर्वी खेलरत्न पुरस्कार मिळाला नसेल, तर तो पदक जिंकलेल्या वर्षी देण्यात यावा असा पुरस्काराचा नियम आहे. त्यामुळे यापूर्वीही ऑलिम्पिक वर्षांत असे पुरस्कार विभागून देण्यात आले आहेत. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक नंतर सुशील कुमार आणि विजेंदर सिंग यांना विभागून पुरस्कार मिळाला होता. तर चारदा विश्वविजेतेपद मिळवणारी मेरी कोमही त्यांच्या जोडीला होती. तर 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू, दीपा कर्माकर आणि साक्षी मलिक यांना पुरस्कार विभागून मिळाला होता. यंदा ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गाजवलेले नऊ खेळाडू आहेत. त्यांच्या जोडीला आहेत मिताली राज (महिला क्रिकेट) आणि सुनील छेत्री (फुटबॉल).


sports_1  H x W
 
 मिताली राज (महिला क्रिकेट)

sports_9  H x W 
 सुनील छेत्री (फुटबॉल).
 
या दोघांनीही महिला क्रिकेट आणि फुटबॉल यांची आजन्म सेवा केली आहे. भारतीय क्रीडा रसिकांना जेव्हा फक्त क्रिकेट एके क्रिकेट दिसत होतं, तेव्हा सुनील छेत्रीने फुटबॉल खेळ स्वत:साठी निवडला. फुटबॉलमध्ये भारत कधीच पुढे नव्हता. राष्ट्रीय संघाची क्रमवारी कधी पहिल्या शभर देशांतही नव्हती (काही सन्माननीय अपवाद वगळले तर). पण, सुनील भारतीय संघाचा एकखांबी तंबू असल्यासारखा खेळत राहिला. आपल्या परीने खेळत राहिला. जमेल आणि मिळेल त्या आंतरराष्ट्रीय क्लबच्या संधी घेत राहिला. आणि शेवटी भारतासाठी शंभरच्या वर आंतरराष्ट्रीय गोल करण्याची किमया त्याने केली. फुटबॉलमध्ये राष्ट्रीय संघापेक्षा खेळाडू अनेकदा आपल्या क्लबला महत्त्व देतात. इथं क्लब कल्चरचं प्रस्थ मोठं आहे. पण, अशावेळी लायनेल मेस्सीच्या बरोबरीने एका बाबतीत सुनीलचं नाव घेतलं जाईल. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या यादीत सुनील पाचव्या स्थानावर आहे. आणि यात त्याच्या जोडीला लायनल मेस्सी आहे. दोघांचे 80 आंतरराष्ट्रीय गोल आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत 115 गोलसह पहिल्या स्थानावर आहे. रोनाल्डो पोर्तुगाल आणि मेस्सी अर्जेंटिनाकडून खेळतो. या देशांमधल्या फुटबॉल संस्कृतीबद्दल वेगळं सांगायला नको. पण, भारतात जन्मल्यामुळे सुनील कुठे राहिला आणि दोघं किती पुढे गेले हे आंतरराष्ट्रीय गोलची यादी बघितली की कळतं. पण, निदान सुनीलमुळे या यादीत वरच्या पाच खेळाडूंमध्ये एक भारतीय आपल्याला दिसतोय हे किती भाग्याचं आहे!
मिताली राजची तर गोष्टच वेगळी. भारतीय महिला क्रिकेटची तिने 25 वर्षं सेवा केलीय. म्हणजे सचिन तेंडुलकरपेक्षा तिची कारकीर्द मोठी आहे. यात महिला क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक ठोकण्याचा मान तिच्याकडे जातो. सलग खेळणं, सातत्यपूर्ण कामगिरी यात ती ना सचिनच्या मागे आहे ना राहुलच्या. पण, सडेतोड कामगिरी असतानाही सुरुवातीची कित्येक वर्षं मितालीचं नावही कुणाला माहीत नव्हतं. मला आठवतंय, मी एकदा तिला ‘महिला क्रिकेटमधली राहुल द्रविड’ असं म्हटलं होतं, तर ती अगदीच संकोचून गेली होती. कसंनुसं हसली होती. कारण, असं कौतुक ऐकायची महिला क्रिकेटरला सवय नव्हती. आणि आपण कुणापेक्षा कमी नाही हा विश्वास महिला क्रिकेटपटूंमध्ये होता पण, चाहते आणि पत्रकार म्हणून आम्ही त्यांना तो दिला नव्हता. पण, अशाही परिस्थितीत मिताली खेळत राहिली. निमूटपणे रन आणि विक्रम दोन्ही करत राहिली.


sports_13  H x  
मनीष नरवाल
sports_7  H x W
श्रीजेश
sports_2  H x W
मनप्रित सिंग
आणि अखेर सर्वोच्च पुरस्कारासाठीही सुनील छेत्री आणि मिताली राज या अनाम वीरांची दखल क्रीडा खात्याला घ्यावीच लागली. यंदा हा पुरस्कार त्यांना मिळाला नसता तर कदाचित दोघं निवृत्त होऊन तो पुढे मिळण्याची शक्यताही मावळली असती. त्यामुळे ऑलिम्पिक-पॅरालिम्पिक वीरांबरोबरच या दोघांचा विचार झाला हे योग्यच झालं.
 
जाता जाता एकच. सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकाच वेळी बारा खेळाडूंची निवड झाल्याबद्दल अनेकांनी भुवया उंचवल्या आहेत. खेलरत्न पुरस्कारांसाठी जे नियम आणि निकष आहेत त्यांच्या आधारेच ही निवड झाली आहे. त्यामुळे ती अयोग्य नाही. नियमांचं उल्लंघनही कुठे झालेलं नाही. पण, कधी कधी अशी शंका येते की, सर्वोच्च पुरस्काराचं असं घाऊक वाटप झाल्यामुळे त्याचं महत्त्व तर आपण कमी करत नाही ना? शिवाय सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, कृष्णा नागर, अवनी यांना आपण इतर पदकं मिळवणार्‍या खेळाडूंच्या पंक्तीत बसवत आहोत. भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरच कामगिरी गेल्या काही वर्षांत झपाट्याने सुधारतेय. अशावेळी पदकांची संख्याही सुधारणार आहे. अशावेळी सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी चुरस ही असणारच. आणि ती चुरस असण्यातच कदाचित पुरस्कार आणि खेळाडूचा गौरव असेल. तेव्हा तो खरा सर्वोच्च पुरस्कार असेल.