डॉ. हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद - मानवतेची अभंग लेणी

विवेक मराठी    18-Nov-2021
Total Views |


RSS_1  H x W: 0
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि उद्यमशीलतेचा समृद्ध वारसा असलेल्या औरंगाबाद शहराचा उल्लेख झाला की त्याच्या जोडीने अगदी अपरिहार्यपणे वेरुळच्या लेण्यांचं नाव ओठांवर येतं. हिंदू-बौद्ध-जैन या तीन धर्मांमधल्या परस्परसहिष्णुतेचं प्रतीक ठरलेली ही जगविख्यात लेणी कोरली गेली इसवी सन 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात. ही लेणी म्हणजे कलावंतांच्या अनेक पिढ्यांमधल्या सहज समन्वयाचं प्रतीक आहेत. कलावंतांच्या पहिल्या पिढीने उभं केलेलं कलावैभव अधिकाधिक आशयसमृद्ध करण्यासाठी त्यानंतरच्या कैक पिढ्यांनी योगदान दिलं. म्हणूनच ती केवळ शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना वाटत नाहीत, तर पिढ्यान्पिढ्यांनी केलेल्या संघकार्याचं एक अजोड प्रतीक ठरतात.

अजोड संघकार्याची हीच परंपरा पुढे नेणारी, मानवतेची लेणी औरंगाबाद आणि नाशिकच्या परिसरात आज आकार घेत आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ आणि ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ ही या कामाची दोन रूपं. परस्परपूरक कामात गढून गेलेली आणि स्वस्थ समाजनिर्मिती या एकाच अंतिम ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी.

या कामाचा अनेक दिशांनी झालेला विस्तार, त्यासाठी केलेलं वेळेचं-श्रमांचं-कौशल्याचं-पैशाचं परिपूर्ण नियोजन आणि यात सहभागी झालेल्या सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसणारा ईश्वरी कार्यात सहभागी झाल्याचा आनंद, यामुळे हे कार्य जमेल तितक्या तपशिलात सर्वांपर्यंत पोहोचवावं, असं वाटलं. त्यातून प्रेरणा घेत शहराशहरांत अशी समाजमंदिरं उभी राहावीत, ही अपेक्षा!
 
25 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानने डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून औरंगाबाद इथं रुग्णालय उभारून या सेवाकार्याला प्रारंभ केला. यात सहभागी झालेल्यांसाठी, रुग्णसेवा हे समाजपुरुषाची पूजा करण्याचं साधन होतं. व्यक्तीच्या आरोग्यापासून सुरुवात करून समाजाचं आरोग्य सुधारण्याचा घेतलेला हा वसा. त्यात सहभागी होते सात उच्चशिक्षित तरुण डॉक्टर्स आणि त्यांना एका उदात्त ध्येयासाठी एकत्र बांधून ठेवणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव तथा नाना नवले, आबासाहेब देशपांडे, डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, बलराम येरमे, रमेश पांडव आणि लातूरला विवेकानंद रुग्णालयाचा यशस्वी प्रयोग उभारणारे डॉ. अशोक ऊर्फ काका कुकडे. या तरुण डॉक्टरांना सेवाकार्यासाठी उद्युक्त करताना नानांच्या नजरेसमोर, काका कुकडे आणि त्यांच्या सहकार्‍यांचा लातूर शहरात यशस्वी झालेला विवेकानंद रुग्णालयाचाच प्रयोग होता. संघाचं तत्त्वज्ञान आणि सेवाकार्याची संकल्पना या तरुण डॉक्टरांमध्ये रुजवतानाच त्यांच्याभोवती समाजातल्या अनेक हितचिंतकांच्या सक्रिय पाठिंब्याचं कडं उभारून त्यांच्यातली प्रेरणेची ज्योत सतत तेवत ठेवण्याचं, तसंच त्यांना समविचारी डॉक्टर्सची-अन्य सहकार्‍यांची जोड कशी मिळेल, हे पाहण्याचं कामही नानांनी या काळात केलं.

रुग्ण - मग तो कोणत्याही आर्थिक स्तरातला असला तरी अत्युत्तम वैद्यकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याचं भान ठेवत डॉ. हेडगेवार रुग्णालयाची वाटचाल चालू आहे. प्रत्यक्ष रुग्णालयात उपलब्ध असलेली वैद्यकीय सेवा, शहराच्या झोपडवस्तीत आणि ग्रमीण भागात चालू असलेली आरोग्य केंद्रं, तसंच अगदी दुर्गम खेड्यातही चल चिकित्सालयाच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोेग्यसेवा, अशी वैद्यकीय सेवेची त्रिस्तरीय रचना आहे.

त्याचबरोबर स्वस्थ समाजनिर्मितीसाठी, आपल्या सेवाकार्याचा वेलू गगनावेरी नेतानाच त्याची क्षितिजसमांतर वाढही तितकीच जोमाने झाली पाहिजे, यावर या सगळ्यांचा कटाक्ष असतो. म्हणूनच अगदी सुरुवातीपासूनच या वैद्यकीय कामाला जोड दिली आहे ती अ-वैद्यकीय कामांची. आरोग्याचे प्रश्न हेे समाजाच्या अनारोग्याचा दिसणारा फक्त चेहरा आहे. म्हणूनच समाजस्वास्थ्य राखण्यासाठी अनेक विषयांवर एकाच वेळी समांतरपणे कामं करावी लागतील, या विचाराने ‘सावित्रीबाई फुले एकात्म महिला समाज मंडळा’च्या माध्यमातून अनेक कामं चालू झाली. रुग्णालयापासून सुरू झालेलं सेवाकार्य समाजासाठी किती वैविध्यपूर्ण कामांची साखळी उभी करतं, त्याचं हे आजच्या काळातलं आदर्श उदाहरण म्हणावं लागेल.

आज दुर्मीळ झालेली, पण इथल्या सर्वच डॉक्टरांमध्ये भिनलेली नि:स्पृह सेवावृत्ती, त्यांच्या कामाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली मन:पूर्वक आणि नियोजनबद्ध विकासकामांची जोड आणि सर्व स्तरांतल्या कर्मचार्‍यांची मिळणारी, थक्क करणारी साथ... हे सर्वच एखाद्या दंतकथेत शोभणारं. पण आज अनेकांना प्रेरणा देण्यासाठी, वस्तुपाठ बनून उभं आहे.

अशा प्रकारचं काम हे सर्वच ठिकाणची गरज आहे आणि या कामात नवीन पिढी येत राहिली, तरच हे काम अखंडपणे चालू राहील, वर्धिष्णू होईल, हे ओळखून इथल्या संस्थापक सदस्यांनी पाच वर्षांपूर्वी पुढचं पाऊल टाकलं, ते अद्ययावत वैद्यकीय सोयींनी युक्त असं ‘श्रीगुरुजी रुग्णालय’ नाशिक इथे उभारून.
अनेक दिशांनी विस्तारलेल्या या सेवाकार्यात आज शेकडो हात मग्न आहेत. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, तसंच प्रसिद्धीची, पुरस्काराची वा प्रतिष्ठेची अभिलाषा न बाळगता त्यांचं काम चालू आहे. ‘या कामातून आम्हांला शब्दांत न मांडता येणारा सात्त्विक आनंद मिळतो’ अशी इथल्या सर्वांची भावना. त्यांच्याशी संवाद साधतानाही तिचा प्रत्यय येतो.
समाजातल्या विविध प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं शोधत चाललेली ही सर्व मंडळी... त्यांच्या इथवरच्या प्रवासाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न!
दिवाळी अंकासाठी डॉ. हेडगेवार रुग्णालयावर आणि सर्व संबंधित कामांवर एक दीर्घ लेख करावा, असं ठरलं आणि त्या दृष्टीने डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांच्याशी बोलणं झालं. ठरावीक व्यक्तींशी बोलण्याऐवजी या कामाशी संबंधित विश्वस्तांपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांपर्यंत सर्व स्तरातल्या प्रतिनिधींशी बोलावं, त्यातून वास्तव चित्रण करायला मदत होईल, असं मत त्यांनी मांडलं. म्हणून माझ्या प्रवासाच्या तारखा डॉ. तुपकरींना कळवल्या आणि ‘इंच इंच लढवू’प्रमाणे माझ्या एकेका मिनिटाचं काटेकोर नियोजन केलेली भलीमोठी मेल आली. सकाळी 9 ते रात्री 10.30पर्यंत ठरवण्यात आलेल्या विविध गटांबरोबरच्या भेटी, त्या बैठकीत अपेक्षित असलेल्या नावांची यादी, बैठकप्रमुखाचं नाव, यातल्या कोणत्या गटाबरोबर मी चहा-नाश्ता किंवाजेवण घ्यायचं आहे, त्याचा तपशील... ते सगळं वाचून मी डॉ. तुपकरींना म्हटलंही, ‘‘किती काटेकोर प्लॅनिंग आहे तुमचं... मला एकदम व्ही.आय.पी.चा दौरा असल्याचा फील देणारं!’’ तेव्हा गंमतीत म्हटलं खरं, पण काटेकोर नियोजन हा या संस्थेचा स्थायिभाव आहे, हे पुढच्या सगळ्या भेटींनी माझ्या मनावर बिंबवलं.

या रौप्यमहोत्सवी वाटचालीच्या सिंहावलोकनाची सुरुवात अर्थातच उगमबिंदूपासून केली. भरपूर ‘मान’ आणि गाठीशी उत्तम ‘धन’ जोडता येईल, अशी खाजगी प्रॅक्टिसची हुकमी वाट सोडून, तळागाळातल्या लोकांना परवडेल अशा दरात उत्तमातली उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी सात सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर्स एकत्र येऊन रुग्णालय उभारतात आणि ते यशस्वीपणे चालवून समाजात नव्याने पडू पाहणारा एक पायंडा भक्कम करतात. अशा आडवाटेने जाण्यासाठी निर्धार असावा लागतो, आत्मविश्वास असावा लागतो, वाटेत आडव्या येणार्‍या संभाव्य संकटांना तोंड देण्याची ताकद असावी लागते. त्या सातही जणांकडे हे भांडवल मुबलक होतं, त्यांना स्वत:ला पुरून इतरांमध्ये वाटता येईल इतकं.

सुरुवातीच्या दिवसातल्या आठवणी जागवताना संस्थापक सदस्य, संस्थापक डॉक्टर्स आणि तेव्हापासून त्यांच्याबरोबर असलेले काही कर्मचारी भूतकाळात रमून गेले.

या प्रयोगाचं बीज होतं, पैठण रोडवरच्या फारोळा इथे सुरू केलेला दवाखाना. औरंगाबादच्या जनकल्याण समितीने फारोळा इथे ग्रमस्थांच्या आग्रहामुळे, ग्रमपंचायतीच्या कार्यालयात साप्ताहिक दवाखाना सुरू केला. समितीचे कार्यवाह आणि औरंगाबादमध्ये स्वत:ची उत्तम प्रॅक्टिस असलेले डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे आठवड्यातून एक दिवस फारोळ्याला जात असत. काही वर्ष हा साप्ताहिक दवाखाना चालला. पण या दरम्यान असं लक्षात आलं की, मधल्या काळात एखाद्या पेशंटची तब्येत जास्त बिघडली तर त्याला औरंगाबादपर्यंत येणंही मुश्कील होतं. यावर उपाय एकच, तो म्हणजे दवाखाना आठवडाभर चालू ठेवणे. संघाचे स्वयंसेवक आणि औरंगाबादच्या सरकारी विमा रुग्णालयात नोकरी करणारे डॉ. सतीश कुलकर्णीआपला रविवारचा वेळ दवाखान्यासाठी द्यायला तयार झाले. आणि उरलेले पाच दिवस दवाखाना पाहण्यासाठी, औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसमोर प्रा. रमेश पांडव यांनी हा विषय मांडला. त्यातले बहुतेक संघाची पार्श्वभूमी असलेले होते. त्यामुळे त्यांनी लगेच कल्पना उचलून धरली आणि अशा रीतीने फारोळ्याचा दवाखाना नियमित चालू झाला.

एकूण साडेचार वर्षं चाललेल्या या दवाखान्याने गावकर्‍यांची सोय झाली खरी; पण यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं की ती दहा दिशांना पांगतील, त्यांना कसं थांबवणार? या प्रश्नावर जनकल्याण समितीच्या पदाधिकार्‍यांत विचार सुरू झाला. उद्योगपती आबासाहेब देशपांडे हे त्या वेळी या समितीचे अध्यक्ष, तर डॉ.अष्टपुत्रे कार्यवाह आणि नाना नवले, प्रा. रमेश पांडव समितीचे सदस्य होते. या मुलांना आपण एकत्र ठेवलं आणि त्यांच्या मदतीने आपण औरंगाबाद शहरात रुग्णालय उभं केलं, तर या शहराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गावांची सोय होईल, असा विचार नाना आणि त्यांच्याबरोबरचे सर्वच करू लागले. या तरुण डॉक्टर्ससमोर हा विचार मांडताना, त्यांच्या मनात तो रुजवताना, सहकारी तत्त्वावर अतिशय यशस्वीपणे चाललेल्या लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचा प्रकल्प नानांच्या डोळ्यासमोर होता. अशा सेवाकार्याची अनेक ठिकाणी गरज आहे. विवेकानंद रुग्णालयासारखे सेवादीप जागोजागी लावायला हवेत, ते अखंड तेवत राहतील याची काळजी घेतली जायला हवी, हा विचार नानांनी या तरुणांमध्ये संक्रमित केला आणि त्यांचा गट बांधलेला राहण्यासाठी बैठकांच्या माध्यमातून सतत भेटत राहिले. त्यांच्या बरोबरीने प्रा. रमेश पांडवही होतेच. वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी त्यांचे काही वर्षापासून स्नेहसंबंध होते. दर बैठकीला नेहमीच्या माणसांव्यतिरिक्त एक नवीन व्यक्ती नाना बरोबर घेऊन यायचे. ‘‘तुमच्यावर प्रेम करणारी इतकी मंडळी आजूबाजूला आहेत. या कामात तुम्हांला साथ देण्यासाठी ती तयार आहेत’’ असं सांगून त्यांचा हौसला बुलंद करायचे.

या सातही जणांमध्ये असलेल्या मुळातल्या सेवावृत्तीवर संघकार्याचेही संस्कार झालेले होतेच. त्यातच ते ज्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकले, तिथल्या अनेक प्राध्यापकांच्या मनात गरिबांबद्दल असलेली कणव, सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून ते गरिबांना देत असलेली उत्तम वैद्यकीय सेवा यामुळे यांच्यातली प्रेरणा वाढीस लागली. नानांसारख्या कुशल संघटकाच्या सहवासात त्यांच्यावर संघटनात्मक कामाचे संस्कार झाले. नानांनी या काळात जे काम केलं, त्याचं नेमक्या शब्दांत वर्णन करताना डॉ. एन.डी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘बहुतेक डॉक्टरांना असं काम करावंसं मनातून वाटत असतं. पण दिशा मिळत नाही. अशा दिशेने जाण्यासाठी समाजाकडून प्रोत्साहनाचं, पाठिंब्याचं जे बळ मिळावं लागतं, ते मिळत नाही. आम्हांला एकत्र आणून नानांनी ते बळ मिळवून दिलं. कश ुिीज्ञशव री र लशाशिींळसि षरलीिीं रािसिीीं र्ीी. कधीकधी कुटुंबाच्या दडपणामुळे अशा कामातून बाहेर पडावं लागतं, तर कधी आधुनिक वैद्यकशास्त्रात लागणार्‍या नवनवीन शोधांमुळे ते शिकण्यासाठी काम थांबवावं लागतं, कधी बाहेरची एखादी आकर्षक संधी खुणावते. कारणं काहीही असली तरी बाहेर पडणं हेच त्यावर उत्तर असतं. प्रत्येकासमोर काही अडचणी होत्या, प्रलोभनात पाडणार्‍या वेगळ्या संधी होत्या... या पार्श्वभूमीवर आमची मनं जाणून घेत, आमच्याशी सतत संवाद करत नानांनी आम्हांला एकत्र बांधून ठेवलं.’’ यातल्या सहा जणांनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याने रुग्णालयात सहा विभाग तर लगेच सुरू करता येतील, हीसुद्धा एक जमेची बाजू होती. त्यामुळेही रुग्णालय उभारण्याचा विचार नक्की झाला. या युवकांच्या उत्साहाला निश्चित दिशा देण्याचं आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी डॉ. काका कुकडेंनी आनंदाने उचलली. कारण त्यांच्यासारखाच सेवाकार्याचा वसा घेण्यासाठी तयार झालेले हे सात जण त्यांचेच तर वंशज होते.
 
 
सगळे जण संघविचारांची पार्श्वभूमी असलेले, त्यामुळे विचारपूर्वक कृतीला अनन्यसाधारण महत्त्व. समूहाने प्रकल्प उभारायचा तर विचारही समूहाने एकत्रितपणे करायला हवा. प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी संस्थापक सदस्यांच्या मनात कामाचं उद्दिष्ट, त्याची दिशा स्पष्ट हवी. तेव्हा बैठकांची आवर्तनं होणं हे ओघाने आलंच. त्या काळात बैठकांना हक्काचं घर डॉ. अष्टपुत्रे यांचं. रात्री सुरू होणारी बैठक अनेकदा दुसर्‍या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत चालूच असे. पदव्युत्तर शिक्षणानंतरही - म्हणजे 1985नंतरही सुमारे अडीच वर्षं बैठकांचं चक्र सुरू होतं. रुग्णालय उभारण्याचे फायदे-तोटे, येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणी, याचा सारासार विचार करून झाल्यावर असं रुग्णालय उभारायचं यावर शिक्कामोर्तब झालं आणि सर्वप्रथम जागेचा शोध सुरू झाला.

आर्थिक स्थिती बेताची असलेल्या मध्यमवर्गीय घरातून आलेली, तिशीचा उंबराही न ओलांडलेली ही सगळी डॉक्टर मंडळी. नुकतंच शिक्षण संपलेलं, त्यामुळे पैशाची साठवण काही नाही. रुग्णालयासाठी जागा घ्यायची तर आर्थिक तरतूद महत्त्वाची होती. एकीकडे आवाक्यातल्या जागेचा शोध आणि दुसरीकडे त्याच्यासाठी आर्थिक उभारणी करण्यासाठी कर्ज मिळेल का, याची चाचपणी. काही महिन्यांच्या पायपिटीनंतर लक्षात आलं की मनाजोगती जागा मिळवणं अवघड आहे. तेव्हा डॉ. अष्टपुत्रेंकडच्या एका बैठकीत नाना त्यांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमचं घर देता का रुग्णालयासाठी?’’ डॉक्टर ताबडतोब म्हणाले, ‘‘देतो की! आम्ही राहू एखाद्या भाड्याच्या घरात.’’ त्यांचं घर इतरांच्या मानाने मोठं, 1400 चौरस फुटांचं होतं. शिवाय बाजूला मोकळी जागाही होती. मग एक दिवस त्यांनी आणि डॉ. सतीश कुलकर्णींनी त्या दृष्टीने घराची पाहणी केली. ‘इथे रिसेप्शन, इथे ऑपरेशन थिएटर, इथे ओपीडी’ अशा मनातल्या मनात खुणा करत फिरत होते. शेवटी असं लक्षात आलं की जेमतेम पाच खाटांचं रुग्णालय या जागेत होऊ शकतं. तात्पर्य, हा पर्यायही बारगळला.

मग एका बैठकीत आबासाहेब देशपांडे म्हणाले, ‘‘माझ्या ‘सिंधुतीर्थ’चं बांधकाम चालू आहे. तीच घ्या. तुम्हांला कसं बांधकाम पाहिजे ते काँट्रॅक्टरला सांगा. रुग्णालय चालायला लागलं की भाडं द्या.’’ हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, असं झालं. शहराच्या मध्यवर्ती भागातली आबासाहेबांची ती कमर्शियल जागा होती. तिथे राज्य विद्युत मंडळाचं कार्यालय होतं आणि आणखीही काही गाळे होते. हळूहळू त्या सगळ्यांना जागा रिकामी करायला सांगून रुग्णालयासाठी बांधकाम सुरू झालं. जनता सहकारी बँकेने दिलेलं 7-7॥ लाखांचं कर्ज, आप्तजनांनी केलेली मदत आणि यातल्या प्रत्येकाने स्वत:च्या नावावर काढलेलं प्रत्येकी 15 हजाराचं कर्ज, या पुंजीवर बांधकाम सुरू झालं.

दोन महापुरुषांची पुण्याई
रुग्णालय सुरू करण्याआधी ट्रस्ट स्थापन करून त्याचं नामकरण करायचं आणि मग रुग्णालयाचं नाव ठरवायचं होतं. ट्रस्टचं नाव ठरायला फारसा अवधी लागला नाही. औरंगाबादशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं असलेलं नातं लक्षात घेऊन आणि रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेचं जे व्रत हे सगळे घेणार होते, ते नजरेसमोर ठेवून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ हे ट्रस्टचं नाव एकमुखाने नक्की झालं. या कामात गुंतलेल्या सर्व मंडळींची नाळ संघाशी जोडलेली, आणि हॉस्पिटल सुरू व्हायला 1989 साल उजाडलं. हे वर्ष संघाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं होतं. कारण संघसंस्थापक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं हे जन्मशताब्दी वर्ष होतं. हे वर्ष सेवावर्ष म्हणून साजरं होईल, असं जाहीर झालं होतं. त्यामुळे या वर्षात सुरू होणार्‍या रुग्णालयाला डॉ. हेडगेवार यांच्या नावाशिवाय दुसरं समर्पक नाव असणं शक्यच नव्हतं.

दि. 5 जुलै 1989 रोजी भाऊसाहेब जहागीरदार यांच्या हस्ते उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम झाला आणि या दोन महापुरुषांची अदृश्य साथ बरोबर घेऊन डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. भारत देशमुख, डॉ. एन.डी. कुलकर्णी, डॉ. मंजिरी व्यवहारे, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर या सात जणांनी 17 खाटांचं रुग्णालय सुरू केलं.

 
दिवसाचे 24 तास रुग्णालयासाठी... डॉक्टर नव्हे, तर पूर्णवेळ कार्यकर्ता ही आजीवन स्वीकारलेली भूमिका, त्यामुळे रुग्णालय देईल तो मासिक पगार. अन्य कुठेही खाजगी प्रॅक्टिस करणार नाही, अशी मनोमन बांधिलकी स्वीकारत, एका ईश्वरी कार्यात सहभागी होत आहोत याची खूणगाठ मनाशी बांधत या सप्तर्षींनी एकसाथ पहिली पावलं टाकली. या सर्वांमध्ये डॉ. सतीश कुलकर्णी वयाने थोडे मोठे. ते सरकारी नोकरीतल्या पाच हजाराच्या पगारावर पाणी सोडून इथे साडेतीन हजार रुपये मासिक पगारावर रुजू झाले आणि बाकीचे सहा जण - जेव्हा त्यांचे अन्य सहाध्यायी महिना 15 हजार कमावत होते, तेव्हा फक्त 1500 रुपये मासिक पगारावर काम करायला लागले. अतिशय उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असताना आणि बाहेर चांगल्या उत्पन्नाच्या अनेक संधी सहज उपलब्ध असतानाही आपण जे केलं ते आगळंवेगळं होतं, असं ही मंडळी मानत नाहीत. वेगळ्या वाटेने जाण्याचा असा निर्णय घेऊन आणि त्यात यशस्वी होऊनही या मंडळींचे पाय आजही किती जमिनीवर आहेत, ते त्यांच्याशी बोलताना लक्षात येतं. या विषयी बोलताना डॉ. सतीश कुलकर्णी म्हणाले, ‘‘आम्ही समाजासाठी काही भव्यदिव्य करतोय असा समज काम सुरू केलं तेव्हा नव्हता आणि आजही नाही. आपण समाजासाठीचं आपलं योगदान देऊ. समाजच त्याच्या दर्जाविषयीचा निर्णय करेल, या शुद्ध हेतूने आम्ही एकत्र आलो.’’
प्रचाराचा अनोखा मार्ग
रुग्णालय उभारलं जात असताना, तळागाळातल्या ज्या बंधुभगिनींसाठी ते सुरू करायचं, त्यांना याची कल्पना देण्यासाठी या सर्वांनी औरंगाबादच्या परिसरातला ग्रमीण भाग पिंजून काढला. जिल्ह्यातल्या जवळजवळ 150 खेड्यांना भेट दिली. ते आजच्या मार्केटिंग युगातलं ‘पब्लिसिटी कँपेन’ नव्हतं, तर केवळ आर्थिक हलाखीपायी दर्जेदार वैद्यकीय सुविधांपासून जो समूह कित्येक काळ वंचित राहिला आहे, त्याला उपचार करून घेण्यासाठी दिलेलं अगत्याचं निमंत्रण होतं. (आणि पुढच्या काळातही ही परंपरा जपली गेली, हे विशेष! गारखेडा परिसरात चार एकरच्या प्रशस्त जागेत जेव्हा नूतन वास्तू उभारली गेली, तेव्हाही पुन्हा ग्रमभेटी घेऊन तिथल्या लोकांना नव्या बदलाची माहिती देण्यात आली.)
उतणार नाही, मातणार नाही...
प्रत्यक्ष रुग्णालय सुरू झाल्यानंतर महिन्याभराने जन्माष्टमीचा मुहूर्त साधून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या हस्ते उद्घाटनाचा जाहीर कार्यक्रम झाला. डॉ. मोदी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना, डॉ. भारत देशमुखांनी उपस्थित औरंगाबादकरांच्या साक्षीने आणि आपल्या सर्व सहकार्‍यांच्या वतीने ‘उतणार नाही, मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही!’ असं वचन समाजाला दिलं आणि पुढच्या वाटचालीत सर्वांच्या योगदानामुळे या शब्दांना सिद्ध केलेल्या मंत्राचं मोल प्राप्त झालं.

उपलब्ध जागेत रुग्णालयाची रचना लागली. अगदी बाहेरच्या अंगणातही पत्र्याच्या शेड टाकून केबिन तयार केल्या. कमतरतांचा बाऊ न करता, जे उपलब्ध आहे त्यात सर्वोत्तम सेवा देत अतिशय उत्साहात कामाला सुरुवात केली. एकीकडे नानांच्या, पांडव सरांच्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या भेटी चालूच होत्या. कारण या सात जणांचे हात बळकट करायला आणखी समविचारी डॉक्टरांची गरज होती. हळूहळू सहभागी डॉक्टरांची आणि अन्य सहकार्‍यांची संख्या वाढायला लागली. रुग्णांनी तर अगदी पहिल्या दिवसापासूनच विश्वास दाखवला. वास्तविक औरंगाबादमध्ये तेव्हाही मोठी रुग्णालयं होती, उत्तम प्रॅक्टिस असलेले डॉक्टर्स होते, तरीही लोकांची पावलं हेडगेवार रुग्णालयाकडे वळत होती. रुग्ण तळागाळापासून सर्व आर्थिक स्तरातले होते. बाबासाहेब आणि हेडगेवार यांच्या नावाची ती पुण्याई होती. ‘गोरगरिबांना परवडतील असे दर’ इतकंच त्यामागचं कारण नव्हतं, तर एवढ्या मोठ्या माणसांची नावं ज्यांच्याबरोबर आहेत, त्यांचं काम चांगलंच असणार हा विश्वासही होता. पुढच्या काळात या सर्व टीमने तो सार्थ ठरवला. सेवाकार्य म्हणून लोकांनी सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून येऊ नये, तर आमच्या गुणवत्तेवर-कौशल्यावर विश्वास ठेवून यावं, अशी त्यांची धारणा होती आणि स्वत:च्या क्षमतेवर विश्वासही. त्यामुळेच महापुरुषांच्या नावांच्या जोडीला देण्यात आलेल्या दर्जेदार वैद्यकीय सेवेमुळेही लोकांचा ओघ वाढला.

आपला हा प्रयोग यशस्वी होईल का? लोक आपल्याकडे येतील का? याविषयी सुरुवातीला धास्ती वाटत होती. पण कौतुकाची गोष्ट अशी की यातल्या कोणालाही कधीही रिकामं बसण्याची वेळ आली नाही. प्रत्येकाची ओपीडी ओसंडून वाहणारी, हे समीकरण लवकरच तयार झालं.

सर्वांनी पूर्णवेळ काम करायचं, या नियमाबरोबरच सुरुवातीपासून आणखी काही नियम केले. आपल्याकडे मानद डॉक्टर आणायचा नाही, हा त्यापैकी एक. आणि सामाजिक कार्यकर्ता - मग तो कोणत्याही विचाराने काम करत असो, त्याला आपल्या रुग्णालयात मोफत ट्रीटमेंट द्यायची, हा महत्त्वाचा दुसरा नियम.

आपली नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेली आहे याचं भान ठेवणं आणि त्याचा प्रकट स्वीकार करणं हे रुग्णालयाने कायमच जाणीवपूर्वक केलं. संघातल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांचा या भागात दौरा असेल, तर त्यांना या कामाची माहिती देण्यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांबरोबर त्यांची एक बैठक योजणं, एखादं बौद्धिक ठेवणं, सेवाकार्याला आणखी काय काय पैलू असू शकतात यासंदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं, असं सगळं आवर्जून केलं जातं. त्यामुळे असलेली प्रेरणा टिकून राहते, त्यात वाढ होत राहते.

 
कोणत्याही आस्थापनेतले वा कार्यालयातले वरिष्ठ जर नेकीने, मूल्यांशी तडजोड न करता व्यवहार करत असतील, तर त्यांच्या सहकार्‍यांमध्ये ते आपोआप झिरपत जातं. याची तर या सेवाकार्याच्या आजवरच्या प्रवासातली शेकडो उदाहरणं देता येतील.
रुग्णालय सुरू झालं, तेव्हा डॉ. अष्टपुत्रे संस्थेचे अध्यक्ष होते. स्वत:च्या खाजगी प्रॅक्टिसचा व्याप सांभाळून रोज संध्याकाळी चार वाजता डॉक्टरांची ‘राउंड’ असायची. रुग्णालयातली स्वच्छता राखली जायलाच हवी, हा त्यांच्या आग्रहाचा विषय. अगदी संडास-बाथरूम साफ करायलाही ते मागेपुढे पाहायचे नाहीत. एकदा त्यांची नेहमीची राउंड चालू असताना एका व्हरांड्यात त्यांना कचरा दिसला. तो तसाच राहण्यामागचं कारण त्यांनी विचारलं, तेव्हा साफसफाई करणारी बाई आली नसल्याचं त्यांना कर्मचार्‍याने सांगितलं. ही प्रश्नोत्तरं त्या व्हरांड्यातच चालू होती. डॉक्टरांना कोपर्‍यात उभा केलेला झाडू दिसला. कोणालाही काहीही न बोलता, त्यांनी तो झाडू घेऊन व्हरांडा साफ करायला सुरुवात केली. त्यांच्या या कृतीचा अर्थ न समजण्याएवढे कोणी असमंजस नव्हते. त्यातून योग्य तो बोध घेतला गेला आणि रुग्णालयातल्या स्वच्छतेशी कोणत्याही कारणामुळे कधी तडजोड करायची नाही, याची सवय सगळ्यांना लागून गेली.

सतरा खाटांनी सुरू झालेल्या या रुग्णालयाच्या कामाचा व्याप अवघ्या दीड वर्षात इतका वाढला की ते 72 खाटांचं झालं. थोडक्यात, घाटी रुग्णालयासारखं मोठं सरकारी रुग्णालय इथे असताना आणि अनेक मोठ्या डॉक्टरांची इथे उत्तम खाजगी प्रॅक्टिस असताना स्वत:ची ओळख निर्माण करण्यात हेडगेवार रुग्णालयाला अल्पावधीत यश आलं. हे यश म्हणजे पावती होती, त्यांच्यातील वैद्यकीय गुणवत्तेवर लोकांनी शिक्कामोर्तब केल्याची!

बीज अंकुरले...

मूळ कामाला निरनिराळ्या आयामांची जोड देत संस्थापकांनी समोर ठेवलेल्या संकल्पचित्रानुसार कामाचा विविध अंगांनी विस्तार झाला तो याच वास्तूत. रुग्णालय सुरू झाल्यानंतर शहरातल्या वंचितांच्या वस्त्यांवर आणि त्यापाठोपाठ ग्रामीण भागात सुरू झालेली आरोग्य केंद्रं, रुग्णालयातल्या कामाला अन्य सामाजिक कामांची जोड देण्यासाठी ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’ची मुहूर्तमेढही याच वास्तूत रोवली गेली. रुग्णालयाची आणि एकूणच समाजाची गरज म्हणून ‘दत्ताजी भाले रक्तपेढी’ची सुरुवातही याच वास्तूत झाली.
बालशिक्षणात मूलभूत स्वरूपाचं काम करण्यासाठी ‘ॐकार बालवाडी प्रकल्पा’नेही आपली पहिली पावलं याच वास्तूत टाकली.
नूतन वास्तुप्रवेश
असं अनेक दिशांनी समाजहिताचं काम सुरू झालं, वाढू लागलं आणि या सगळ्या कामांना जुनी जागा पुरेनाशी झाली. 1989 ते 2001 - म्हणजे एक तपश्चर्या पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या दोन विश्वस्त संस्थांखाली बहरलेलं हे सेवाकार्य गारखेडा परिसरातल्या भव्य वास्तूत स्थलांतरित झालं.

 
या स्थलांतराशी निगडितही अनेक ऐतिहासिक आठवणी आहेत. युती शासनाच्या काळात सरकारने देऊ केलेली ही जमीन, पण सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष ताब्यात यायला दोन वर्षांचा काळ गेला. डॉ. अनंत पंढरेंच्या चिकाटीची, बांधिलकीची परीक्षा पाहणारा हा काळ होता, असंच म्हणावं लागेल.

दररोज नित्य नवी आव्हानं स्वीकारणं आणि सर्वांनी एकत्र येऊन ती यशस्वी करून दाखवणं, हे इथल्या सर्वांच्या हाडीमांशी भिनलेलं. गारखेड्याचा नूतन वास्तू प्रकल्प जेव्हा सुरू केला,तेव्हा या प्रस्तावित प्रकल्पाचा खर्च होता दहा कोटी रुपये आणि संस्थेजवळ होते फक्त पंचवीस लाख. पण मागे हटण्याचा वा थांबण्याचा प्रश्नच नव्हता. उलट हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करायचाच, यासाठी सर्वांनी कंबर कसली. ईश्वरी कार्य सिद्धीस जाण्यासाठी समाजातून अनंत करांनी धन उभं राहिलं आणि प्रकल्पही ठरलेल्या काळात पूर्ण झाला.

या नव्या जागेत येताना अक्षरश: फक्त एक दिवस बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला आणि अतिशय व्यावसायिक शिस्तबद्धतेने शिफ्टिंगचं काम पूर्ण करण्यात आलं. जुन्या जागेतील सर्व वस्तूंचं पॅकिंग करतानाच नव्या जागेत तिची कुठे ‘स्थापना’ होणार आहे, याचा तपशील खोक्यावर लिहिलेला होता. त्यामुळे कसलाही गोंधळ न होता नव्या वास्तूत त्या विराजमान झाल्या. सोमवारी नव्या जागेत बाह्यरुग्ण विभाग सुरू झाला तो जय्यत तयारीत... जणू काही वर्षानुवर्षं इथे लोक येताहेत असं वाटावं, असं दृश्य होतं!

रुग्णालय सुरू झालं, तेव्हा जशी जवळपासच्या खेड्यात डॉक्टर मंडळी गेली होती, तशी पुन्हा एकदा गटागटाने गावांना भेटी देण्यात आल्या. ‘आपलं रुग्णालय आता मोठ्या जागी जातं आहे. तुमच्यासाठी जास्तीत जास्त सोयी देण्याचा प्रयत्न आहे. नवी जागा म्हणून शुल्क वाढणार नाही.’ अशी सगळी माहिती देऊन त्यांना उपचार करून घेण्यासाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. त्यांच्यासाठी रुग्णाला या बदलाची माहिती होणं अगत्याचं, आणि त्यातला बहुतांशी जवळच्या लहानमोठ्या गावातून येणारा. त्याला त्याच्या गावात जाऊनच हे सांगायला हवं, ही भावना.

 
गारखेडा भाग औरंगाबाद रेल्वे स्टेशन/एस.टी.स्टँडपासून लांब आहे. त्यामुळे वास्तू मोठी झाली खरी, पण आपल्या पेशंटना इथवर येणं परवडेल का, ही चिंता रुग्णालयातल्या लोकांना लागून राहिली. आपल्या रुग्णांसाठी बसची सोय करावी, असा विचार करून तो कृतीतही आणला गेला. पण तशी वेळच आली नाही. या रुग्णालयाशी आपुलकीच्या धाग्याने बांधला गेलेला रुग्ण नव्या वास्तूत आलाच. त्यामुळे ती चिंताही दूर झाली.

 
नूतन वास्तूचं उद्घाटन करताना सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी ‘‘अशा संस्था म्हणजे सेवेची मंदिरं आहेत’’ अशा शब्दांत गौरव केला. ते शब्दश: खरं होतं.

या वास्तूत तर सर्वच कामांचा व्याप वाढत गेला. सर्वांच्या उत्साहाला उधाण आलं. आपापले विभाग समृद्ध करण्याकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं.

डॉ. सतीश कुलकर्णी फिजिशियन असल्याने रुग्णालय सुरू झालं, त्या पहिल्या दिवसापासूनच हा विभाग सुरू झाला. मुळातच या शाखेची व्याप्ती मोठी असल्याने जसजशी या विभागातल्या डॉक्टरांची संख्या वाढत गेली, तसं प्रत्येकाने आपापला ‘फोकस’ निश्चित केला आणि त्याप्रमाणे कामावर आपलं लक्ष केंद्रित केलं. विभाग अधिकाधिक परिपूर्ण होण्यामध्ये त्याची परिणती झाली.
डॉ. सतीश कुलकर्णी यांनी गॅस्ट्रोएंटरॉलॉजी या विषयात काम सुरू केलं. अतिशय जोखमीच्या म्हणजे हाय रिस्क केसेस करण्यात डॉक्टर कुलकर्णींचा हातखंडा आहे. आज या विषयातले ते शहरातले तज्ज्ञ समजले जातात. त्यांच्याबरोबरच डॉ. विकास रत्नपारखी यांनी इको-कॉर्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट यावर लक्ष केंद्रित केलं. या विषयात गरजेचं असणारं प्रशिक्षण ते सातत्याने घेत असतात. डॉ. रंजना देशमुख या मधुमेह तज्ज्ञ आहेत, तर डॉ. आनंद पाठक हिमॅटॉलॉजी या विषयातील केसेस हाताळतात. अ‍ॅक्यूट ल्युकेमियाव्यतिरिक्त हिमॅटॉलॉजीचे विविध प्रकारचे पेशंट असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅनिमियामध्ये, त्यातही अप्लास्टिक अ‍ॅनिमियामध्ये शरीरात रक्त होण्याची प्रक्रियाच बंद होते. तर, आयटीपी नावाने ओळखल्या जाणार्‍या आजारात प्लेटलेट्स नावाच्या रुग्णाच्या पेशींना त्याचं शरीरच खाऊन टाकतं. या ल्युकेमियावर हेडगेवारमध्ये उत्तम उपचार होतात. कॅन्सर नसलेल्या पण हिमॅटॉलॉजीशी संबंधित असलेल्या पेशंटवर गेली तेरा वर्षं उपचार होताहेत. आणि उपचार करून घेणार्‍या पेशंटची संख्या इतकी आहे की रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणार्‍या विद्यार्थ्यांना थिसिससाठी रुग्णालयातच पेशंट उपलब्ध असतात. डॉ. विकास रत्नपारखींकडेही येणार्‍या पेशंटची संख्या इतकी लक्षणीय आहे की त्यांनाही त्यांच्या विद्यार्थ्यांना थिसिससाठी विषय देता येतात.
रुग्णालयाचं आणखी एक लक्षणीय योगदान आहे ते एच.आय.व्ही.-एड्स या आजारासंदर्भात. या कामाचे प्रमुख आहेत डॉ. आनंद पाठक. त्यांनी इतकं मूलभूत काम उभं केलं आहे की जगभरातला एक उत्तम प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रकल्प गौरवला गेला आहे. 2002मध्ये रुग्णालयात एच.आय.व्ही.मध्ये कामाला सुरुवात झाली. त्या वेळी एच.आय.व्ही.चे पेशंट खूप होते आणि त्यांना ट्रीट करायला शहरातले डॉक्टर तयार होत नव्हते. तेव्हा ही परिस्थिती पाहून डॉ. फाटक यांनी या विषयात काम करायचं ठरवलं. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलं.

आज या कामाला बारा वर्षं होत आली आहेत. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक एच.आय.व्ही. पेशंटवर उपचार केले आहेत, बहुतेक सगळ्या गुंतागुंतीच्या केसेस होत्या. पाच वर्षांपूर्वी सरकारने एड्सवरची औषधं मोफत देणारी केंद्रं ठिकठिकाणी सुरू केली, तेव्हा रुग्णालयात येण्याआधी गरीब पेशंटना त्याचा लाभ घ्यायला सांगण्यात आलं. या विषयात काम सुरू केल्यावर या आजाराशी संबंधित वेगवेगळे मुद्दे लक्षात यायला लागले. एड्सग्रस्त विधवा-विधुरांच्या समस्या, लग्न न झालेल्या मुलामुलींच्या समस्या समोर आल्या. मग त्यातल्या काहींची लग्नं जुळवायचा प्रयत्न केला. दर महिन्याला या लोकांच्या एकत्रीकरणाला सुरुवात केली.

यात रुग्णालयाचंं महत्त्वाचं आणखी एक योगदान आहे ते समुपदेशनाच्या संदर्भात. एड्सचे पेशंट आणि नातेवाईक अतिशय घाबरलेले आणि तणावाखाली असतात. त्या वेळी त्यांना योग्य समुपदेशनाची गरज असते, हे लक्षात घेऊन इथल्या अनुभवांवर आधारित एक ऑडिओ-व्हिज्युअल सी.डी. करण्यात आली. तिच्या दोन भागांपैकी पहिल्या भागात, एच.आय.व्ही. म्हणून पेशंटला आणि त्यांच्या नातेवाइकांना जी सर्वसाधारण माहिती असायला हवी, ती दिलेली आहे. दुसर्‍या भागात ज्यांना एच.आय.व्ही.वरची औषधं नियमितपणे घ्यावी लागतात, त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. औषधं घेताना घ्यायची काळजी, त्याला येणारा खर्च, वर्षभराच्या खर्चाचं अंदाजपत्रक कसं करावं, औषधं घेण्यात अनियमितता असली तर होणारे तोटे, औषधांचे होणारे दुष्परिणाम आणि ते ओळखायचे कसे, असं सविस्तर मार्गदर्शन देणारी ही सी.डी. आहे. तिला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एच.आय.व्ही.च्या पेशंटना ट्रीट करायला तयार नसतात, कारण स्टाफ त्यासाठी तयार नसतो. पण हेडगेवारमध्ये ही समस्या कधीच येत नाही. कारण स्टाफच्या मनातली भीती काढणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, पेशंटची काळजी कशी घ्यायची त्याचं प्रशिक्षण देणं, असं सगळं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि सर्टिफिकेट्सही दिली जातात.

जेव्हा डॉ. व्यंकटेश देशपांडे हे चेस्ट फिजिशियन रुजू झाले, त्यानंतर या विषयातलं काम वाढलं. दमा, आय.सी.यू.मध्ये काँप्लिकेट झालेले व्हेंटिलेटरवर असलेले पेशंट्स, ब्राँकोस्कोपी, ब्राँकोस्कोपीच्या साहाय्याने करायची बायोप्सी, अशी वैविध्यपूर्ण कामं इथे होऊ लागली. डॉ. मयुरा काळे, आय.सी.यू.मध्ये क्रिटिकल केअरचं काम पाहणारे डॉ. सुधीर देशपांडे, कार्डिऑलॉजी विभागात डॉ. मनोहर शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णीअशी नव्या-जुन्यांची खूप मोठी टीम इथे कार्यरत आहे.

रुग्णालयाच्या अगदी स्थापनेपासून डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर यांच्यावर प्रसूती विभागाची जबाबदारी आहे. डॉ. ज्योत्स्ना लॅप्रोस्कोपीमधल्या तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासह डॉ. वैशाली खडके आणि डॉ. ऋजुता पाळोदे या दोघी या विभागात कार्यरत आहेत. अलीकडेच इथे टेस्टट्यूब बेबी सेंटर नव्याने चालू केले आहे. डॉ. पाळोदे आणि डॉ. खडके यांच्यावर त्याची जबाबदारी आहे. तर स्त्रीरोग व प्रसूती विभागात कार्यरत असणार्‍या डॉ. संध्या भट्टड यांनी ‘कांगारू मदर केअर’सारख्या विविध उपयुक्त गोष्टी राबविल्या आहेत.

रुग्णालयाच्या सुरुवातीपासून बालरुग्ण विभागाची जबाबदारी घेणार्‍या डॉ. राजश्री रत्नपारखे यांनी या विभागाविषयी बोलताना सांगितलं, ‘‘एकेक विभाग डेव्हलप करण्यासाठी वेळ द्यावा लागला. स्टाफला प्रशिक्षित करावं लागलं. पेडियाट्रिक डॉक्टर्स हे व्हेटर्नरी डॉक्टरसारखे असतात. त्यांचे पेशंटही बोलू शकत नाहीत. आणि शिवाय एकेक पेशंट म्हणजे इमोशनल बाँब असतो. आई-वडील, दोन्हीकडचे आजी-आजोबा अशा बाळाच्या सगळ्यात जवळच्या नातेवाइकांना आम्हांला तोंड द्यायचं असतं. त्यात हेडगेवारमध्ये नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा हाय रिस्क डिलिव्हरी जास्त असतात. कारण अशा डिलिव्हरी करायला बाहेरचे डॉक्टर्स सहसा धजावत नाहीत. आमच्याकडे होणार्‍या एकूण डिलिव्हरींपैकी अशा डिलिव्हरींचं प्रमाण 70 टक्के इतकं आहे. त्यामुळे होणारी बाळं हीसुद्धा जास्तच जोखमीची असतात. नॉर्मल बेबीपेक्षा वेगळी असतात.
 
संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी व्यवहारे यांनी बालरोग विभागात ‘हाय रिस्क बेबी’सारख्या उपक्रमांना सुरुवात केली.

आता आम्ही अशा मुलांसाठी ‘मतिमंद’, ‘गतिमंद’ हे शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही, कारण त्या शब्दांनीच त्याच्या जन्मदात्यांना होणारं दु:ख पाहवत नाही. म्हणून त्यांना ‘स्पेशल चाईल्ड’ म्हटलं जातं. बहुतेक वेळा, जन्माच्या वेळी या मुलांचं वजन अगदी तोळामासा असतं. त्यांच्यात काही उणीव राहण्याची मोठी शक्यता असते. कोणाची वाढ मंदगतीने होते, कोणाचा आय.क्यू. कमी असतो, कोणाला फीट्स येतात. ही मुलं मोठी होतात तशी हायपरअ‍ॅक्टिव्ह होतात. त्यांना नॉर्मल शाळेत प्रवेशच मिळत नाही. म्हणून अशा मुलांसाठी आपल्या ओम्कार बालवाडीत वेगळा वर्ग सुरू केला. त्याला ‘विहंग’ असं नाव दिलं. त्यांच्या आकलनाचा वेग नॉर्मल मुलांसारखा नसला, तरी मतिमंद मुलांसारखाही नसतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी काही वेगळी रचना लागते. त्यांच्यासाठी एकच एक सिलॅबस ठेवता येत नाही. या प्रत्येक मुलाच्या वाढीचा स्वतंत्र प्लॅन करायला लागतो. त्यासाठी तिथे येणार्‍या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येतं. या मुलांच्या पालकांचे ग्रूप तयार केले जातात. हे पालक त्यांच्या अनुभवाच्या आधारावर अन्य पालकांना चांगलं मार्गदर्शन करतात, कधीकधी स्वयंसेवी वृत्तीने यात सहभागी होण्याची तयारीही असते.’’

हेडगेवारमध्येे थॅलिसिमियाचे खूप पेशंट असतात. या पेशंटना दर महिन्याला रक्ताची गरज भासते. या छोट्या पेशंटचे पालक पहिल्यांदा हबकून जातात. दर महिन्याला एवढी टोचाटोची करायची, अ‍ॅडमिट व्हायचं, याचं त्यांच्यावर दडपण येतं. त्यावर उपाय म्हणून अशा पालकांचा ग्रूप तयार करण्यात येतो. एका पीडित मुलाचा पालक दुसर्‍या पेशंटच्या पालकाला डॉक्टरपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो, कारण तोही ते दु:ख जगत असतो. म्हणूनच त्याच्या सांगण्याचा परिणामही वेगळा असतो.

ई.एन.टी. विभाग, रेडीऑलॉजी विभाग, जनरल सर्जरी, पॅथॉलॉजी, ऑप्थॅल्मॉलॉजी, फिजिओथेरपी अशा सर्वच विभागात निष्णात आणि अनुभवी डॉक्टरांची फौज हेडगेवारमध्ये आहे. डॉ. भारत देशमुख, डॉ. एन.डी. कुलकर्णी, डॉ. राजेंद्र क्षीरसागर अशा संस्थापक सदस्यांनी आपला वारसा समर्थपणे पुढे चालवणार्‍या सहकार्‍यांची टीम उभी केली आहे.

जगन्नाथाचा रथ पुढे नेणारे सहकारी...
 
 
डॉ. अभिजित चपळगावकर यांनी दंत व मुखरोग विभागामध्ये नव्या गोष्टी सुरू केल्या.
महानगरे सोडून, औरंगाबादसारख्या ठिकाणी एखाद्या प्रयोगशाळेला छअइङसारखे गुणवत्तेतील सर्वोच्च मानांकन गेली अनेक वर्षे सातत्याने मिळते, याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. यामागे अथक परिश्रम आहेत डॉ. रवींद्र पाटवदकर यांचे. त्यांना डॉ. शिल्पा भाले, मायक्रोबायलॉजिस्ट डॉ. सीमा कुलकर्णी यांची आणि इतर तज्ज्ञ मंडळींची साथ लाभली आहे.

डॉ. हेडगेवार रुग्णालयात दररोज गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होतात. यात बधिरीकरण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. या विभागातील डॉ. सीमा पंढरे, डॉ. रेणू चौहान आणि डॉ. सुप्रिया कुलकर्णी यांनी हा विभाग अद्ययावत तर केला आहेच, याशिवाय ‘पेन क्लिनिक’सारख्या उपयुक्त व अभिनव गोष्टीची सुरुवातही केली आहे.डॉ. अभिजित परळीकर हे बालरोगतज्ज्ञ, नव्या पिढीतील डॉक्टर. मेडी-सर्च या संशोधन मासिकाची जबाबदारी सांभाळतात. डॉ. अभिजित चांडगे हे यशस्वी अस्थिशल्यचिकित्सक असून, वैद्यकीय संशोधनासाठी स्थापन झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल रिसर्च सोसायटी’चे पदाधिकारी आहेत. डॉ. गजानन कुलकर्णी यांचं अस्थिशल्य चिकित्सा विभागात महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉ. सत्यजीत पाथ्रीकर हे रुग्णालयातील सर्वात तरुण सर्जन आहेत. तर डॉ. प्रसाद वैद्य हे प्रॉक्टॉलॉजिस्ट असून मूळव्याधीने पीडित रुग्णासाठी ‘प्रॉक्टॉलॉजी चेयर’च्या संशोधनाबद्दल त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. डॉ. अविनाश बुचे हे सांधे-विकृतिशास्त्राचे (ठहर्शीारींश्रिसिूचे ) विशेष तज्ज्ञ आहेत. मुंबईतली अनेक मोठी रुग्णालये सोडून डॉक्टरांनी हेडगेवार रुग्णालय कामासाठी निवडले. नेत्रतज्ज्ञ डॉ. गोविंद देशमुख हे फॅको-इमल्सिफिकेशन या तंत्रज्ञानातील विशेष तज्ज्ञ आहेत.

डॉ. धनश्री भिसेगावकर व डॉ. सचिन गाडेकर हे र्ईवळश्रिसिू, स्पीच थेरपी आणि भौतिकोपचार ही महत्त्वपूर्ण अंगे समर्थपणे सांभाळतात. डॉ. महेंद्रसिंह चौहान यांनी रुग्णालयाची गरज म्हणून झरींहश्रिसिू विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. रक्तपेढीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणणे व विस्तार यात महत्त्वाची भूमिका.डॉ. शुभांगी चांडगे या रक्तपेढीत रक्त संक्रमण अधिकारी.
रामदास आरक हे सरकारी नोकरी सोडून नानांच्या सांगण्यावरून रुग्णालयात रुजू झाले. गेली अनेक वर्ष ते लेखा विभाग समर्थपणे सांभाळतात. सीमा रिसबूड यांनी पेशंट केअरमधली महत्त्वाची कडी असलेला नर्सिंग विभाग उभा करण्यापासून ते परिचारिकांच्या उत्तम प्रशिक्षणापर्यंतची सर्व जबाबदारी सांभाळतात. डॉ. संदीप डफळे आणि डॉ. प्रसाद वाईकर हे दोघे सेवावस्त्यांतील संत रोहिदास आरोग्य केंद्राचे आणि संत गाडगेबाबा आरोग्य केंद्रांचे प्रमुख म्हणून काम पाहतात. या केंद्रांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पुढे नेण्यात दोघांचे भरीव योगदान आहे. याचबरोबर डॉ. सतीश आणि डॉ. सुचेता घोटणकर यांचे अनेक वर्षांपासून रुग्णालयाच्या विविध विभागात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

रुग्णकेंद्री सेवा

रोज किमान 1000 रुग्णांचा बाह्यरुग्ण विभाग अर्थात ओपीडी हे हेडगेवारचं एक लक्षणीय वैशिष्ट्य. रुग्णांनी आणि त्याच्या नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभाग अक्षरश: ओसंडून वाहत असतो. शांतपणे आपला नंबर येण्याची वाट पाहत असलेले पेशंट आणि त्यांच्या शंकांचं समाधान करण्यासाठी तत्पर अशी कर्मचारी-सेवाव्रतींची टीम. आपल्या शारीरिक समस्यांनी ग्रसलेला, आर्थिक विवंचनेत असलेला पेशंट बरेचदा दूरच्या खेड्यातून प्रवास करत करत हेडगेवारपर्यंत पोहोचलेला असतो. कधीकधी एवढ्या प्रवासातच त्याच्याजवळची पुंजी संपलेली असते. कधी तर नुसत्या प्रवासासाठीही त्याने कर्ज काढलेलं असतं. पण पैशासाठी कधीही अडवणूक न करण्याचं हेडगेवारचं धोरण आहे. आधी आवश्यक उपचारांना सुरुवात करायची, मग त्याच्या आर्थिक क्षमतेविषयी बोलायचं. ट्रीटमेंट सुरू झाली की मग त्याविषयी पेशंटला, त्याच्या नातेवाइकांना समजून सांगायचं, ही इथली पद्धत. जे हॉस्पिटलचं धोरण, तेच पंचशील मेडिकल स्टोअरचंही. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घ्यायला एखाद्या गरिबाकडे पैसे नसतील, तरीही त्याला औषधं दिली जातात. बरा होऊन आनंदाने घरी निघालेला रुग्ण औषधपाण्याचे पैसे बुडवत नाही, हा आजवरचा अनुभव आहे.
येणार्‍या पेशंटचा शैक्षणिक स्तर लक्षात घेऊन सर्व डॉक्टर मंडळी आवर्जून मराठीमध्ये औषधं लिहून देतात. एखादा हिंदी भाषिक असेल तर त्याला त्याच्या भाषेत लिहिलेला औषधांचा कागद मिळतो. आणि इतकं करूनही एका वेळी 3/4 प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या असतील, तर पेशंटचा गोंधळ होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळ्या पाकिटात गोळ्या भरून देणं, त्यावर स्टिकर लावून आकडे घालून देणं, इतक्या टोकापर्यंत रुग्णाची काळजी घेणारं हे रुग्णालय आहे.

नवीन वास्तूत स्थलांतर झाल्यानंतर बारा वर्षांनी वास्तुविस्ताराचा प्रकल्प हाती घेतला गेला. अगदी नुकतंच हे काम पूर्ण होऊन सगळे विभाग नियोजनबरहुकूम नवीन जागी शिफ्टही झाले. जुन्या वास्तूला जोडून झालेला हा वास्तुविस्तार करतानाही पेशंटचं हित डोळ्यासमोर ठेवून बांधकाम झाल्याचं ठायी ठायी प्रत्ययाला येतं. या भल्यामोठ्या वास्तूत विविध चाचण्या करण्यासाठी फिरताना, वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटायला जाताना पेशंटचा गोंधळ उडू नये म्हणून चार विंग्जना चार रंग देण्यात आलेले आहेत. विभागाला नावं मराठीत दिलेली असली, सूचना मराठीत लिहिलेल्या असल्या तरी तेही वाचता न येणारा मोठा वर्ग आहे, याचं भान बाळगून केलेली ही तजवीज. आज रुग्णालय ही ‘इंडस्ट्री’ आणि पेशंट हा ‘कन्झ्युमर’ झालेला. अशा काळात ‘रुग्णकेंद्री’ सेवा देणारं हे रुग्णालय पाहून थक्क व्हायला होतं.

रुग्णकेंद्री सेवेचं भान अध्यक्षांपासून!

संस्थेचे अध्यक्ष अनिल भालेराव यांना भेटलं की ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीची प्रचिती येते. प्रत्यक्ष रुग्णसेवेत असणार्‍यांनीच ‘रुग्णकेंद्री सेवे’चं भान ठेवायचं असं नाही, तर धोरणकर्त्या विश्वस्तांनी-पदाधिकार्‍यांनीही धोरणं आखताना त्याची जाणीव ठेवायची असते, याची प्रचिती येते.

गरवारेसारख्या नामांकित कंपनीत उच्चपदावर काम केलेले अनिल भालेराव हे या कामाशी सुरुवातीपासूनच जोडलेले आहेत. अध्यक्षपदाची त्यांची ही दुसरी टर्म. 2011पासून ते पूर्ण वेळ रुग्णालयाला देतात. औद्योगिक जगतात दर्जा सुधारण्यासाठी, त्यात सातत्य राखण्यासाठी मॅनेजमेंटमधल्या ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात, त्यांचा अवलंब रुग्णालयात करण्याचं भालेराव यांनी ठरवलं. आपण सेवाकार्य करतो आहोत म्हणून दर्जाशी तडजोड नाही, ती कोणत्याही प्रकारच्या दर्जात तडजोड नाही. मग ती इथल्या डॉक्टरांनी करण्याचे उपचार असोत किंवा रुग्णाला देण्याच्या अन्य सुविधा असोत - त्या दर्जेदारच असायला हव्यात, याचा आग्रह असतो. याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘छोट्या दिसणार्‍या गोष्टींचा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर परिणाम होत असतो. समजा, एखादी व्यक्ती खूप झोकून देऊन 12/14 तास काम करते. पण ती व्यक्ती झोकून देऊन काम करताना उत्कृष्ट काम करते का, हे तपासलं जायला हवं. ‘डेडिकेशन’ला उत्कृष्टतेची जोड असेल तर काम दर्जेदार होतं. त्याशिवाय त्याचे चांगले परिणाम दिसत नाहीत. मन लावून केलेलं काम दर्जेदार होण्यासाठी त्याला प्रशिक्षणाची जोड आवश्यक असते.’’

 
रुग्णालयात प्रत्येक विभागाला आवश्यक अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री पुरवतानाही कधीही हलक्या प्रतीची मागवायची नाही, आणि किंमती यंत्रसामग्री आणली म्हणून पेशंटचं शुल्क वाढवून त्याचे पैसे वसूल करायचे नाहीत, हा इथे दंडक आहे.

जपानमधली सुप्रसिद्ध कैझन थिअरीचं (कैझन याचा अर्थ लििींर्र्ळिीिीी र्ळािीिींशाशिीं. जेव्हा छोट्या 1000 सुधारणा घडतात, तेव्हा दर्जावर, पैशाची किंवा वेळेची बचत होण्यावर अशा कोणत्याही घटकावर मोठा परिणाम होऊ शकतो. जपानमधल्या टोयोटो कंपनीत सगळ्यात आधी ही संकल्पना सुरू केली.) तसंच सिक्स सिग्मा थिअरीचं रुग्णालयात विविध ठिकाणी उपयोजन केलं जातं. इतकंच नव्हे, तर याच्याशी संबंधित विविध स्तरावर ज्या स्पर्धा होतात, त्यातही सहभागी होण्यासाठी भालेराव प्रोत्साहन देतात.

मागच्या वर्षी इथे ‘क्वालिटी सर्कल’च्या स्पर्धेत रुग्णालयाला सिल्व्हर प्राईज मिळालं. कानपूर इथे झालेल्या कैझनस्पर्धेत मेरिटोरियस अ‍ॅवॉर्ड मिळालं. या वर्षी औरंगाबादमध्ये ‘बेस्ट ऑफ कैझन’ अ‍ॅवॉर्ड मिळालं. मुंबईला नुकतीच कैझनची मोठी स्पर्धा झाली, त्यात अगदी रिलयन्ससारख्या कंपनीपासून 300 स्पर्धक होते. हॉस्पिटल्स मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी होती. हेडगेवार रुग्णालयाने तिथे दोन कैझन सादर केली, दोघांनाही गोल्डन अ‍ॅवॉर्ड मिळालं.

वॉटरबेडमध्ये नळीने पाणी भरताना अर्ध पाणी खाली सांडतं, मग ते पुसण्यासाठी मावशीला बोलवावं लागतं. शिवाय तो बेड पाण्याने भरेपर्यंत एकाला तिथे थांबावं लागतं. म्हणजे एकूण तीन जण एका कामात गुंतून पडतात. म्हणून यावर उपाय शोधायचा ठरवला. या गादीला एक नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह लावून एक कपलिंग जोडलं की कोणी थांबायची गरज नाही हे लक्षात आलं. पाण्याचा एकही थेंब खाली न सांडता आणि कोणालाही एक मिनिटही तिथे थांबावं न लागता काम झालं. शिवाय गादीतलं पाणी काढून टाकण्यासाठी त्याला एक ट्यूब जोडून ती ड्रेनेजमध्ये सोडून दिली.

आपण चांगलं काम करू शकतो, आपल्याला ते जमू शकतं, चांगलं काम करण्याची चांगली पद्धत असू शकते आणि आपण तिचा स्वीकार केला तर त्या वस्तूची गुणवत्ता, विश्वासार्हता वाढू शकते, हा यामागे विचार आहे. यासाठी सर्व सहकार्‍यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवला तर समोर येणार्‍या अडचणी सोडवायचे अनेक मार्ग सुचू शकतात, हे त्यांच्या लक्षात येतं. हे स्पष्ट करून सांगताना भालेराव यांनी दिलेली उदाहरणं म्हणजे रुग्णालयाच्या ‘रुग्णकेंद्री सेवेची’ आदर्श उदाहरणं आहेत.

कँटिनमधला चहा चांंगला होत नाही, अशी तक्रार काही काळ येत होती. त्यावर उपाय शोधायचा ठरवलं. रजिस्टर ठेवून लोकं तक्रार लिहीनात. मग जप मोजण्याचे जे काऊंटर्स मिळतात, ते दरवाजाजवळ बसवले. उत्कृष्ट चहा, मध्यम चहा, खराब चहा अशी त्याची वर्गवारी केली. चहा पिऊन बाहेर पडणार्‍या माणसाने आपले जे मत झाले असेल, त्याप्रमाणे योग्य तो काऊंटर दाबायचा. काही दिवसांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की चहा खराब वाटणार्‍यांचं प्रमाण जास्त आहे. मग हे प्रमाण कमी करण्यासाठी, ‘क्वालिटी इम्प्रूव्हमेंट’साठी एक टीम तयार करण्यात आली. त्यात कँटिन चालवणारा माणूस आणि 2/3 जण होते. आधी चहा खराब लागतो म्हणजे काय, हे शोधून काढायचं ठरवलंं. मग त्याचं विश्लेषण सुरू झालं. कोणाच्या मते चहाला वास येतो, तर कोणाला थंड वाटतो, तर कोणी चहा पावडरची चव चांगली नाही, अशी मतं होती. मग त्या ग्रूपने एकेका मुद्द्यावर काम करणं सुरू केलं. चहा थंड होण्यावर थर्मास हा उपाय शोधला. चहाला वास येतो तर तो कुठल्या भांड्यात ठेवण्यात येतो त्याचा शोध घेतला. ते भांडं कशा पद्धतीने धुतलं जातं, याचं प्रात्यक्षिक झालं. धुतल्यावर त्याला वास येतो आहे का, ते तपासलं गेलं. गरम पाण्याने, साबण बदलून भांडं धुण्याचे प्रयोग झाले. मग चहाची पावडर बदलण्यात आली. वेगवेगळ्या कंपन्यांची चहा पावडर आणून ट्रायल घेण्यात आली. ज्या वेळी लोकांनी चहाचं कौतुक केलं, तेव्हा ती पावडर वापरायचं ठरवलं.

संघाच्या एका मोठ्या कार्यकर्त्याच्या सूनबाईंचं बाळंतपण रुग्णालयात झालं. डिस्चार्ज घेण्याच्या वेळेस ते अध्यक्षांना पेढे घेऊन भेटायला गेले. भालेराव यांनी सवयीने त्यांना ‘‘रुग्णालयात काय सुधारणा हव्या आहेत?’’ असं विचारलं. ‘‘सगळं काही छान आहे, काय सुधारणा सांगणार!’’ असं म्हणायला लागले. खूपच आग्रह केल्यावर, ‘‘स्ट्रेचरवरून जाताना धक्के जास्त बसतात’’ असा अनुभव त्यांनी सांगितला. भालेराव यांनी मेंटेनन्सच्या माणसाला बोलावलं. त्याला आधी हे मान्य होईना. ते म्हणाले, ‘‘ज्या अर्थी पेशंटने तक्रार केली आहे, त्या अर्थी त्यात तथ्य आहे. आपण ही गोष्ट सीरियसली घ्यायला हवी. हे कसं शोधून काढायचं ते तू ठरव.’’

असं म्हटल्यावर तो मेंटेनन्स विभागाचा प्रमुख आ.सी.यू.त गेला, तिथल्या स्ट्रेचरवर झोपला आणि ते स्ट्रेचर ज्या ज्या ठिकाणाहून जातं तिथून, अगदी तळ मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत नेण्यात आलं. मग असं लक्षात आलं की, लिफ्टमधून बाहेर पडत असताना स्ट्रेचरला धक्के बसतात. त्यासंदर्भात ओटिस या लिफ्ट कंपनीशी बोलणी करण्यात आली. पण 32 मि.मि. ही स्टँडर्ड गॅप आहे, याहून कमी करणं आम्हाला शक्य नाही, असं त्यांच्याकडून उत्तर आलं. मग भालेराव यांनी त्यांच्या मेंटेनन्स विभागला सांगितलं की, ‘आता हे चॅलेंज तुम्ही स्वीकारा.’’ मग त्यांनी बरेच प्रयोग करून ती 32 मि.मि.ची गॅप 16 मि.मि.वर आणली. आणि मग पुन्हा स्ट्रेचरवर झोपून खालच्या मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत प्रवास केला, गॅप कमी झाल्याची खात्री करून घेतली.
हॉस्पिटलमध्ये जे ज्येष्ठ नागरिक एकटेच येतात, त्यांना गर्दीत उभं राहून नंबर लावणं अवघड जातं, त्यावर काही उपाय करता आला तर करावा अशा आशयाचं विनंतीपत्र एका वयोवृद्ध व्यक्तीकडून आलं. त्या पत्राची योग्य ती दखल घेत, अशा ज्येष्ठांसाठी वेगळी खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पत्र आल्यानंतर दोनच दिवसात बदल कण्यात आले आणि ही सूचना करणार्‍या आजोबांनाही कळवण्यात आलं. आपण केलेल्या सूचनेची इतक्या लगेच अंमलबजावणी झालेली पाहून त्यांनाही आनंद झाला. रुग्णांकडून आलेल्या तक्रारीवर/सूचनेवर 48 तासाच्या आत विचार करून कार्यवाही झालीच पाहिजे, असा दंडक असल्याचं भालेराव यांनी सांगितलं.


जे पिंडी, तेच ब्रह्मांडी!
‘‘रुग्णालयाविषयी खरं मत जाणून घ्यायचं असेल, तर आम्हां डॉक्टरांपेक्षा अन्य सहकार्‍यांशी बोला, ते सांगतील ती खरी प्रतिमा.’’ डॉ. तुपकरींनी पहिल्या भेटीतच सांगितलं होतं. त्यांच्या स्वरांतला आत्मविश्वास मला चकित करून गेला होता. पण जेव्हा माझ्या प्रवासात मी इथल्या विविध विभागात काम करणार्‍या आयाबाईंपासून मॅनेजरपदावर असणार्‍या लोकांशी गप्पा मारल्या, वरिष्ठांबरोबर पूर्णवेळ कार्यकर्ता या भावनेने काम करणार्‍या आजच्या पिढीतल्या डॉक्टरांशी बोलले, तेव्हा ही सगळी माणसं अशी एका मुखातून बोलल्यासारखी कशी बोलतात, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आनंदाच्या आणि समाधानाच्या धाग्यांनी विणलेला सदरा, जो या सार्‍यांच्या अंगावर आहे, तो आपल्या व्यवहारी माणसांच्या जगात मिळणार नाही. कारण त्याची किंमत पैशात होत नाही. त्यासाठी त्यागाचं, समर्पणाचं मोल मोजावं लागतं, याची जाणीव झाली. एका रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारची कामं करतानाही, ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी या सर्वांची भावस्थिती आहे. त्याला मनोमन दंडवत केला.

बरं, असं असण्यात आपण काही वेगळे आहोत असा अ‍ॅटिट्यूड नाही. सहजपणाचा आणलेला आव नाही. ‘‘मॅडम, आम्हांला जी चांगली वागणूक इथं मिळते, ती आम्ही पेशंटमध्ये वाटतोय, बस्स!’’ हे उद्गार आहेत इथल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याचे, जो बाहेरच्यापेक्षा कमी पगारावर इथे वर्षानुवर्षं आनंदाने काम करतो आहे.

‘‘इथल्या डॉक्टरांनी आम्हाला चांगलं वागायची प्रेरणा दिली. इथे झालेल्या चांगल्या संस्कारांमुळे मी चांगला माणूस झालो. मॅडम, इथून बरा होऊन घरी जाताना पेशंट जेव्हा आम्हाला मनापासून दुवा देतो ना, तेव्हा मनाला वेगळंच समाधान मिळतं’’ असं सांगत होते इथे काम करणारे वाहनचालक.

ऑपरेशनसाठी आलेल्या एका भयभीत वृद्ध पेशंटला इथल्या नर्सने धीर दिला, ‘‘आजोबा, बरं वाटेल तुम्हाला. आमचे डॉक्टर खूप चांगले आहेत. तुमच्या पायानं चालत घरी जाल, बघा...’’ हा पेशंट बरा झाल्यावर जेव्हा पेढे घेऊन आला, तेव्हा त्याच बाईंनी सांगितलं, ‘‘आजोबा, तुम्ही चांगले बरे झालात यातच आम्हांला सगळं मिळालं. हे पेढे घरी नेऊन तुमच्या मुलाबाळांच्यात वाटा!’’
आपण हेडगेवार रुग्णालयात काम करतो, म्हणून बाहेरच्या समाजात आम्हांला मान आहे, याचं या सार्‍यांना खूप कौतुक आहे. एक जण म्हणाले, ‘‘बाहेर वावरताना, कोणी ‘हेडगेवार रुग्णालयाचा’ आहे अशी ओळख करून दिली तर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

स्कूटरवरून येताना माझ्याकडून एकदा सिग्नल तुटला, तेव्हा पोलिसांनी मला पकडलं. पावती फाडताना, त्याने कुठे असता-काय करता, अशी चौकशी केली. मी हेडगेवार रुग्णालयाचं नाव सांगितल्याबरोबर त्याने मला दंड न घेता सोडलं. शिवाय, ‘तुमच्याकडून चुकून सिग्नल तोडला गेला असेल, तुम्ही माणसं असं मुद्दाम करणार नाही’ असं प्रशस्तिपत्रही दिलं.’’

आपण केलेल्या अगदी छोट्या सूचनेचीही वरिष्ठांकडून दखल घेतली जाते. त्यावर संबंधित समिती विचार करते आणि शक्य असेल तितक्या लवकर कार्यवाहीही होते. सिक्युरिटीमध्ये काम करणार्‍या एकांनी आपला अनुभव सांगितला. ‘‘एकदा पोर्चमध्ये मी माझी ड्यूटी करत उभा होतो. बाजूने तुपकरी सर चालले होते. त्यांना म्हटलं, ‘सर, इथे उतार जो आहे तो खूप कमी आहे. आणि फरशी गुळगुळीत. त्यामुळे पेशंटला व्हीलचेअरवरून ढकलताना इथे पाय सरकतो.’ त्यानंतरच्या तिसर्‍या दिवशी मी गावाकडे असताना मला सरांचा फोन आला. म्हणाले, ‘तू सांगितलेली सूचना अंमलात आणली, बरं का! पोर्चवरचा उतार क्लिअर झाला आहे. तू एकदा बघ. मग आपण एकत्र चहा घेऊ.’’

अशा वरिष्ठांविषयी या सर्वांच्या मनात ज्या भावना आहेत, त्याचं एकांनी नेमक्या शब्दांत वर्णन केलं. ते म्हणाले, ‘‘दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर समोरून येत असतील, तर स्टाफवर दडपण येतं. पण डॉ. सतीश कुलकर्णी सर आमच्या समोरून गेले, तरी आम्हाला दडपायला होत नाही. उलट वाटतं, की आमच्या घरातलीच एखादी वडीलधारी व्यक्ती येते आहे.

गरीब पेशंटना डॉक्टर स्वत:च्या नावावर प्रिस्क्रिप्शन मागवतात. कितीतरी गरीब पेशंटची परिस्थिती नसेल, तर त्याचं बिल कमी करून, तेही शक्य नसेल तर स्वत: त्याचं बिल भरून पण त्याच्यावर पूर्ण उपचार करून पाठवलं जातं. हे आम्ही बघत असतो, मग आम्ही चांगले वागलो तर त्यात काय नवल?’’ हा त्यांचा प्रश्न मला निरुत्तर करतो.

एक जण म्हणाले, ‘‘कधीकधी पेशंट म्हणतात, ‘अहो, आमचे कुणी नातेवाईक नाहीत. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, ‘आम्ही आहोत ना तुमचे नातेवाईक. तुम्ही काळजी करू नका, चांगले होऊनच घरी जाणार.’’ हा दिलासा, ही खात्री देणारे असतात रुग्णालयातले कर्मचारी... कधी सिस्टर, कधी मावशी तर कधी वॉर्डबॉयही!

इथली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा साधेपणा. त्यांचं वागणं-राहणं इतकं साधं आहे की हे इतके मोठे डॉक्टर आहेत, याची जाणीवही कोणाला करून देणार नाहीत. कर्मचारी डबा खात असतील तर अगदी सहजपणे येऊन त्यांच्या डब्यातलं खातील. कर्मचार्‍याच्या घरातल्या सुखदु:खाच्या प्रसंगाची त्यांना माहिती असते. त्यांच्यामुळेच इथले कर्मचारीही कमी पगारावर काम करूनही खूश आहेत. ‘‘या वातावरणासाठी, कामातल्या समाधानासाठी आणि आनंदासाठी आम्ही इथे काम करतो. पगाराचा विषय घेऊन आम्ही कधीच सिनियरकडे गेलो नाही.’’ उलट कोणत्याही नव्या जबाबदारीला नाही म्हणायचं नाही, हे सगळ्या कर्मचार्‍यांमध्ये रुजलेलं आहे.

इथले 100 टक्के कर्मचारी असे आहेत की ते कोणत्याही कारणासाठी पेशंटकडून अक्षरश: चहासुद्धा घेत नाहीत. कोणाचे पैसे सापडले, कोणाचं पैशाचं पाकीट सापडलं, अगदी कोणाचं रिव्हॉल्व्हर जरी सापडलं तरी ते परत करतात किंवा संस्थेकडे जमा करतात. हे संस्कार डॉक्टरांनी केले आहेत, असं कोणी कौतुक केलं तर वरतून सांगतात.

आपल्या इथे कार्यकर्ता वृत्तीने काम करणार्‍या डॉक्टर मंडळींचं मोठेपण या सगळ्यांनी जाणलं आहे. म्हणूनच त्यांच्या गप्पांमधूनही डॉक्टर मंडळींच्या भलेपणाचे किस्से सांगितले गेले.

अतिशय गरीब घरातला एक छोटा मुलगा आपल्या आजोबांबरोबर रुग्णालयात आला होता. मुलाला तपासण्यासाठीची कन्सल्टंट फी त्यांनी भरली होती. पण डॉक्टरांनी नंतर टू-डी इको आणि काही तपासण्या करायला सांगितल्या तर त्यांच्याकडे पैसे नव्हते. आजोबा म्हणाले, ‘‘माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. याच्या बापानं नाही सांगितलं तरी मी याला इकडं घेऊन आलो.’’ फक्त 300 रुपये भरू शकतो, असं त्यांनी सांगितल्यावर तेवढेच पैसे भरायला सांगितले आणि म्हातार्‍याला ऐकू येत नाही हे लक्षात आल्यावर एका कर्मचार्‍याला बरोबर देऊन दोन हजारापर्यंतच्या ज्या आवश्यक चाचण्या होत्या त्या करून घेण्यात आल्या. रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी त्या मुलाचं मोठं ऑपरेशन करायला लागेल सांगितलं. ‘‘इथं दाखवायला यायला पैसे नाहीत म्हणून याचा बाप येऊ देत नव्हता. आता तुम्ही ऑपरेशन करायचं सांगता, कुठून आणायचा पैसा?’’ असं आजोबांनी म्हटल्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितलं, ‘‘काही काळजी करू नका. मुलगा लहान आहे, त्याचं सगळं आयुष्य जायचं आहे. त्याची ट्रीटमेंट चालू करू. पैसे कसे भरायचे याची आत्ता काळजी करू नका.’’

स्वच्छता विभागात काम करणार्‍या एका तरुण मुलाने सांगितलेला हा किस्सा - ‘‘एक एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह पेशंट आली होती. तिच्या सासरच्यांनी तिला वेगळी झोपडी करून दिली होती. रात्री 12 वाजता ती पेशंट आली. आनंद पाठक सर एवढ्या रात्रीही आले. तेवढ्यात त्या बाईने उलटी केली, तर कोणी भांडं घेऊन येईल याची वाट न पाहता त्यांनी हात पुढे केला. बाईबरोबर आलेले तिचे आईवडील थक्कच झाले. ते तर सरांना देवच मानायला लागले. पुढे तिची तब्येत इतकी चांगली झाली की हिला असा काही आजार असेल अशी कोणाला शंकाही येऊ नये.’’

‘आमच्या इथे डॉक्टरांमध्ये सिनियर-ज्युनियर असा भेद नाही. आवश्यक ती हायरार्की मेंटेन केली तरी कामाचा विषय संपला की आम्ही एका मोठ्या कुटुंबातले सदस्य आहोत, असं वातावरण असतं. एखादा पेशंट जर 2/3 डॉक्टरांकडे कन्सल्टेशनसाठी गेला, अगदी आमच्या सिनियरकडे जरी गेला तरी तो ‘तो आमचा पेशंट’ असतो, तो कोण्या एका डॉक्टरचा पेशंट नसतो. त्याच्याशी संबंधित सगळे डॉक्टर्स मिळून त्याच्यावर उपचार करतात, एकमेकांना त्याबद्दल सांगत राहतात, सल्ला घेत राहतात’ यावर वेगवेगळ्या विभागात काम करणार्‍या ज्युनियर डॉक्टरांचं एकमत!

कर्मचार्‍यांची घरं जोडण्याचा अनोखा उपक्रम
संस्थेचे ज्येष्ठ कर्मचारी, मॅनेजर या पदावर काम करणारे आप्पा कुलकर्णी यांच्यावर ‘पेशंट संपर्क’ याच्या बरोबरीने एक अनोखी जबाबदारी देण्यात आली आहे, ती म्हणजे रुग्णालयाशी संबंधित 400 कर्मचार्‍यांच्या घरांशी थेट संपर्काची! संस्थाचालक-डॉक्टर्स-कर्मचारी यांच्यात जी एकत्वाची भावना रुजली आहे, तिचा त्यांच्या घरापर्यंत विस्तार व्हावा, हा हेतू त्यामागे आहे. व्यक्तिगत स्तरावर कर्मचार्‍याला असलेली सुखदु:खं जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं, त्यांच्या आप्तजनांशी संवाद साधणं महत्त्वाचं वाटलं. जो रुग्णालयाच्या बृहद् कुटुंबाचा एक घटक आहे, त्याच्या घरातल्या सुखदु:खाच्या प्रसंगात रुग्णालय त्याच्याबरोबर आहे हे त्याला कृतीतून कळावं, यासाठी रुग्णालयाचे प्रतिनिधी या नात्याने आप्पा सर्व घरांशी संपर्कात असतात.
जेव्हा या उपक्रमाला सुरुवात झाली, तेव्हा कर्मचार्‍यांच्या घरी जाणं आणि छोट्या छोट्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र आणणं, एवढंचं त्याचं स्वरूप होतं. कर्मचार्‍यांच्या सहकुटुंब सहली निघायच्या. हळूहळू उपक्रमांमध्ये वैविध्य आलं. एका वर्षी संपूर्ण वर्षभर कुटुंब मेळावे आयोजित करण्यात आले. संघदृष्ट्या या शहराचे चौदा भाग आहेत. या भागातले संघकार्यकर्ते आणि त्या भागात राहणारे डॉक्टर्स-कर्मचारी यांचं एकत्रीकरण एक वर्षभर केलं. ‘बाल महोत्सव’ म्हणून एक वर्ष साजरं करण्यात आलं. सर्वांच्या लहान पाल्यांचे वर्षभर विविध कार्यक्रम आणि शेवटी बालकलासंगम नावाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर ‘मिळून सार्‍या जणी’ या नावाने एक वर्ष खास महिलांचं म्हणून साजरं केलं. त्यात रुग्णालयातल्या महिला डॉक्टर्स, तसंच महिला कर्मचारी आणि कर्मचार्‍यांच्या आणि डॉक्टरांच्या पत्नी यांच्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. दर महिन्याला एक थीम असायची, विविध विषयावर स्पर्धा झाल्या. एकदा सर्वांच्या मुलांना मुंबई दर्शनासाठी नेण्यात आलं. या कार्यक्रमांतून आनंद तर मिळालाच, पण संस्थेला चांगला उपयोगही झाला. त्यामुळे संस्थेचे सदस्य परस्परांच्या अधिक जवळ आले.
 
सेवाकार्यातले सांगाती - सेवाव्रती
 
एकूणच भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यात व्ही.आर.एस./सी.आर.एस. यासारख्या योजनांनी अनेकांना अकाली वृद्धत्व आलं आहे. असे लोक अनेकदा ‘आला दिवस ढकलायचा’ या मनोवृत्तीने जगतात. किंवा प्रकृती उत्तम असतानाही आलेला मोकळा वेळ त्यांना औदासीन्याने घेरतो. आपण कोणाच्या उपयोगाचे नाही, ही भावना त्यांच्या मनात वाढीस लागते. वेळ घालवण्याचा हमखास उपाय असं समजत, दूरचित्रवाहिन्यांवरच्या निरर्थक वाहिन्यांमध्ये दिवस खर्ची पडतात. आणि समाजात उपलब्ध असलेली अनुभवी लोकांमधली ऊर्जा योग्य प्रकारे वापरली न गेल्याने, कधीकधी नकारात्मक ऊर्जेत परावर्तित होण्याची शक्यता असते. या ज्येष्ठांना सेवाकार्यात सहभागी करून घेऊन उपलब्ध उर्जेला विधायक वळण हेडगेवार रुग्णालयात देण्यात आलं.
 
 
काही वर्षांपूर्वी, सत्यसाईबाबांच्या पुट्टुपुर्थी इथं असलेल्या रुग्णालयाला भेट द्यायला डॉ. अनंत पंढरे, डॉ. तुपकरी, जगदीश आफळे ही मंडळी गेली असता तिथे सत्यसाईबाबांचे भक्तगण रुग्णालयात रुग्णांची सेवा करताना दिसले. वर्षातले काही दिवस तिथे राहून सेवा देण्याचं हे काम पाहून ‘सेवाव्रती’ ही कल्पना सुचली आणि ती कल्पना कृतीत आणली गेली. गेली बारा वर्षं अतिशय उत्तम तर्‍हेने चाललेली ही संकल्पना म्हणजे रुग्णालयाची एक विशेष ओळख आहे. ज्या व्यक्तीकडे रुग्णालयात येऊन देण्यासाठी नियमित वेळ उपलब्ध आहे आणि ज्याला अशा प्रकारचं काम करण्यात आनंद आहे, अशी कोणीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. म्हणूनच आज रुग्णालयात जे 50 सेवाव्रती कार्यरत आहेत, ते 33 ते 93 या वयोगटातले आहेत... हो, ही छपाईची चूक नाही. जगन्नाथराव कहाळेकर हे त्या 93 वर्षाच्या सेवाव्रतीचं नाव. गेली अकरा वर्षं हे आजोबा नियमितपणे रुग्णालयात येत आहेत. रुग्णालयाच्या 21 विभागांमध्ये वर्षाचे जवळजवळ 50 हजार तास योगदान देतात. त्यांच्या कामांमध्ये स्वागत कक्ष, तत्कालीन उपचार, बाह्यरुग्ण-ओपीडी, नवीन/जुनी नोंदणी, विविध तपासण्यांचे रिपोर्ट वाटप, चौकशी आणि वैयक्तिक तपासणीसाठी फोनवर पूर्वनोंदणी करून घेणं, रुग्णालयात विविध विभागात रुग्णाला तपासणीसाठी घेऊन जाणं, प्रसूती विभागात मदत वा मार्गदर्शन, रुग्णाची व त्याच्या नातेवाइकांची भेट घेणं, रोज दुपारची भोजन व्यवस्था (10 ते 20 या अल्पदरात, किंवा प्रसंगी देणगीदाराच्या देणगीतून पेशंटला आणि त्याच्या नातेवाइकांना भोजन पुरवलं जातं.) रोज सामान्य वॉर्डात भेट आणि संवाद साधणं, मेडिकल शॉपमध्ये औषध घेताना रुग्णांना मार्गदर्शन करणं, शॉपमध्ये अन्य मदत करणं, रुग्णालयाच्या शैक्षणिक उपक्रमात मदत करणं आदी कामांचा समावेश आहे.
 
 
हे संपूर्ण स्वयंसेवी वृत्तीचं काम असलं, तरी त्यातही कमालीची शिस्त आणि नियम पाळले जातात. 72 वर्षांच्या पानसे काकांवर या विभागाची जबाबदारी आहे. सेवाव्रतींचं मस्टर आहे, तसंच रुग्णांना त्यांना ओळखता यावं म्हणून विशिष्ट रंगाचा कोट आणि ओळखपत्र देण्यात आलं आहे. ज्यांना कोणाला सेवाव्रती म्हणून काम करायची इच्छा आहे, त्याला तसा तपशीलवार अर्ज करावा लागतो. मग त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्या स्वभावाची दिसलेली झलक आणि त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याला कोणत्या विभागात काम द्यायचं हे ठरतं.
 
 
मला जवळजवळ 25 सेवाव्रतींचे अनुभव ऐकता आले. आमची भेटीची वेळ सकाळची होती, आणि त्या घाईगर्दीच्या वेळेत आपल्या नेमून दिलेलं काम सोडून अनुभवकथन करायला जाणं योग्य न वाटल्याने काहींनी प्रत्यक्ष न येता आपले अनुभव लेखी पाठवले. कामाप्रती त्यांची असलेली बांधिलकी पाहून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.
 
 
यांना का ज्येष्ठ नागरिक म्हणायचं? असा प्रश्न त्यांना भेटून मला पडला. कारण बाहेरच्या जगात भेटणार्‍या ज्येष्ठांपेक्षा हे खूपच वेगळे आहेत. रुग्णसेवा हीच ईशसेवा आहे अशी धारणा असलेले तर यांच्यापैकी अनेक जण आहेत. ‘‘ताई, एखाद्या दिवशी माझी घरातल्या देवांची पूजा करायची राहील, पण माझी रुग्णालयात येण्याची वेळ कधीही चुकत नाही. मे महिन्यात माझी भर उन्हात दुपारी 3 ते 5 ड्यूटी असते. पण तीही मी कधीही चुकवत नाही.’’ गेली 10 वर्ष सेवा देणार्‍या उज्ज्वला मान्नीकर सांगत होत्या. स्वत:ची पदरमोड करून रोज ठरलेल्या वेळेत इथे येणारे हे सेवाव्रती रुग्णालयासारख्या ठिकाणी कोणत्या ओढीने येतात, यावर सर्व जण म्हणाले, ‘‘आपण कोणाच्यातरी अडीअडचणीला उपयोगी पडू शकतो, ही गोष्ट आम्हांला खूप समाधान देते. आनंद देते.’’ हे सांगतानाही त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.
 
 
डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केलेल्या तांदळेबाई आज रुग्णालयाच्या स्वागतकक्षात काम करतात. येणार्‍या रुग्णाला स्वागतकक्षातच नीट माहिती मिळाली, तर एवढ्या मोठ्या वास्तूत फिरताना त्याचा कमीत कमी गोंधळ होतो. ‘‘ताई, 20 वर्ष खाजगी प्रॅक्टिस करून पैसा मिळवला, पण हे समाधान मिळवायचं राहून गेलं होतं बघा. हे काम म्हणजे आमच्या जगण्याचं टॉनिक आहे’’ अशा शब्दांत तांदळेबाईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा मी क्षणभर स्तब्ध झाले.
 
 
 
फंड रेझिंग....नव्हे, फ्रेंड्स रेझिंग...!
 
 
संस्थेचा झालेला कार्यविस्तार पाहता आणि लाखो पेशंटना बाहेरच्या दरापेक्षा 40 ते 50 टक्के कमी दरात पुरवली जाणारी वैद्यकीय मदत पाहता, निधीसंकलनाशिवाय हे शक्य नाही याची जाणीव होते. निधीसंकलनासंदर्भातला संस्थेचा दृष्टिकोनही त्यांचं वेगळेपण अधोरेखित करणारा आहे.
 
 
डॉ. अनंत पंढरे यांच्यावर संस्थेने ही जबाबदारी सोपवली तेव्हा संस्थेची गरज लक्षात घेऊन, संत गाडगेबाबा आरोग्य केंद्राची जबाबदारी अन्य व्यक्तीवर सोपवून, आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिसला पूर्णविराम देऊन ते या नव्या भूमिकेत शिरले. ते केवळ आज्ञापालन नव्हतं, तर या कामात त्यांनी नवे मापदंड निर्माण केले. निधी संकलन म्हणजे आपल्या सेवाकार्यासाठी पैसा गोळा करणं नाही, तर विविध प्रकारची माणसं या कामाशी जोडणं. ही तर एक संधी आहे, आपल्याभोवतीचं स्नेहीजनांचं वर्तुळ मोठं करण्याची. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने कामासाठी धन द्यायला नकार दिला, तरी तिच्या नावावर फुली मारणं तर लांबच; पण अन्य देणगीदारांना जितक्या नियमितपणे कामाची माहिती देणारी पत्रं/मेल जातात, तितक्याच नियमितपणे निव्वळ शुभचिंतक असणार्‍या सर्वांशी नियमित संपर्क असतो. अनेकांना काम प्रत्यक्ष आणून दाखवणं, त्यातही इमारती किंवा भौतिक गोष्टी दाखवण्यापेक्षा माणसांच्या भेटी घडवून आणणं, यावर भर दिला जातो. सर्वसाधारणपणे निधीसंकलनाच्या वेळीच देणगीदारांची भेट घेतली जाते, पण डॉ. पंढरेंचा नित्य संपर्काचा आग्रह असतो. आपण ज्या व्यक्तीकडून देणगी घेतली आहे त्या देणगीचा विनियोग कसा केला, काम कुठवर पूर्ण झालं, याचा तपशील देण्याची सवयही डॉ. पंढरेंनी लावून दिली आहे. म्हणून तर देणगीदार त्यांचे निव्वळ देणगीदार राहत नाहीत, तर कामातले भागीदार होतात.
 
 
वाढत्या कामामुळे निधीसंकलनाची गरजही वाढती होती म्हणून डॉ. पंढरेंबरोबर डॉ. प्रसन्न पाटील यांच्यावर हे काम पाहण्याची जबाबदारी आली, तेही आपली वैद्यकीय प्रॅक्टिस पूर्णपणे थांबवून या कामाकडे वळले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाअंतर्गत येणार्‍या सर्व प्रकल्पांसाठीचं निधीसंकलन करण्याची जबाबदारी मुख्यत्वे डॉ. प्रसन्न यांच्यावर आहे. सा.फु.अंतर्गत एकूण 37 प्रकल्प सध्या चालू आहेत. या कामांसाठी निधी उभा करायचा, तर अक्षरश: शेकडो लोकांना भेटावं लागतं. निधीसंकलनाच्या अगदी पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक कामाविषयी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, ‘‘या लोकांकडून फक्त निधीच मिळतो असं नाही. त्यांचे काही विचार, काही विशेष गुण आत्मसात करण्याजोगे असतात. ही माणसं एखाद्या विषयाचा कसा विचार करतात ते समजतं. दुसरं असं की, आपल्या सर्व सहकार्‍यांनी उभारलेलं काम या व्यक्तींपर्यंत पोहोचवायला मिळतं, याचा अभिमानही वाटतो. डॉ. हेडगेवार रुग्णालयाला आणि सर्व प्रकल्पांना लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर जोडले गेले आहेत, पैसाही देतात त्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. पण आपल्याकडे ‘फंड रेझिंग’ अशी धारणाच नाही तर ‘फ्रेंड रेझिंग’ अशी आहे. माणसं जोडणं महत्त्वाचं. त्यातून निधी उभा राहतो, अनेक क्षेत्रातली तज्ज्ञ माणसं कामाशी जोडली जातात. असे अनेक देणगीदार आहेत की ते इथल्या व्यवस्था अधिक दर्जेदार होण्यासाठी आपणहून मदत करतात. इतकी त्यांची या कामात इन्व्हॉल्व्हमेंट होते. त्यांची ही मानसिक गुंतवणूक टिकवून ठेवणं, वाढती ठेवणं हे महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी त्यांच्या सातत्याने संपर्कात राहणं, हे संबंध मैत्रिपूर्ण ठेवणं असं करावं लागतं. यामुळे संघपरिवाराच्या बाहेरचे अनेक लोक या कामाशी जोडले गेले आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी, ज्यांचा आपल्या कामात मोठा वाटा आहे असे लोक कामाशी आत्मीयतेच्या धाग्याने जोडले गेले आहेत.
 
 
या हॉस्पिटलसारखी अनेक हॉस्पिटल्स आहेत. ग्रमीण भागात काम करणार्‍या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. मग आमचं वेगळेपण कशात आहे? आमचे अनेक देणगीदार, हितचिंतक असे आहेत की जे त्यांचे कुणी मित्र, नातेवाईक एखाद्या कामासाठी औरंगाबादला येत असतील तर त्यांना आवर्जून रुग्णालयाला भेट द्यायला सांगतील. फोन करून आम्हाला कळवतील, की त्याला चहाला बोलाव आणि आपलं रुग्णालय दाखव म्हणून. हा जो आपुलकीचा धागा आहे, ते आमचं वेगळेपण आहे. पैसे देऊ शकणारी माणसं जोडत राहणं, तसंच वेळ देणारी माणसं जोडत राहणं हेही आमचं एक उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना जोडत राहतो. वॉटरशेडसारख्या विषयात काही वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही अगदी अनभिज्ञ होतो. पण आज अशी स्थिती आहे की, आम्ही वॉटरशेडमध्ये काम करतो आहोत हे कळल्यानंतर या विषयातले पाच नामांकित तज्ज्ञ आमच्याबरोबर आहेत.
 
 
बालशिक्षणातला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्यावर आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनियर, इंटिरियर डिझायनर या सगळ्यांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. या कामासाठी तीन कोटींचं निधीसंकलन करायचं असून आतापर्यंत दोन कोटींचं संकलन झालेलं आहे. एखाद्या बँकेकडे जागा गहाण ठेवून कर्ज घेणं हा सोपा पर्याय उपलब्ध होता, तरीही आम्ही तसं न करण्याचं ठरवलं. शैक्षणिक शुल्क वाढवून पैसे उभे करण्याचाही पर्याय होताच; पण त्यामुळे पालकांवर बोजा वाढला असता, तसंही आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं. त्याऐवजी थोडा लांबचा रस्ता घेऊन, या निमित्ताने बालशिक्षणासारखा महत्त्वाचा विषय हजारो लोकांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं. लोकांकडून निधी उभा करायचा आणि एकट्याने हे काम करण्यापेक्षा औरंगाबादमधल्या 20 उद्योजकांची समिती त्यासाठी उभी करायची असं ठरलं. या लोकांकडून आपल्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यातले कोणीही संस्थेचे विश्वस्त नाहीत की पदाधिकारी नाहीत. खरं तर या टीममधले सगळे हे पैसे देणारे लोकं आहेत, त्यामुळे लोकांकडे जाऊन पैसे कसे मागायचे? असा सुरुवातीला त्यांच्याही मनात प्रश्न होता. पण हा अडथळा दूर होऊन या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटी उभे राहिले. हा अतिशय वेगळा अनुभव हाता. आजही दर शुक्रवारी सकाळी 9 वाजता या टीममधल्या सदस्यांची कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक होते. त्यांच्या सहभागामुळे आता हा प्रकल्प फक्त डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा न राहता तो ‘सगळ्यांचा’ प्रकल्प झाला आहे. ही आपलेपणाची भावना त्यांच्या मनात निर्माण करणं, आणि ज्या मंडळींना यात प्रत्यक्ष काम करायचं आहे, त्यांना मुक्तपणे काम करता यावं यासाठी संसाधनांची कमी पडणार नाही हे पाहणं, हे आमचं काम.’’
 
 
निधीसंकलनासाठी 4/5 वर्षांपूर्वी डॉ. पंढरेंनी मुंबईतही समिती स्थापन केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीचं काम चालू आहे. समिती सदस्यांच्या नियमित बैठका होत असतात. औरंगाबादमध्ये चालू असलेल्या कामाला या समितीचा फायदा होतो. या समिती सदस्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना या कामाला जोडून दिलं आहे.
 
 
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीतील कमीत कमी पैसा व्यवस्थापकीय कामावर खर्च होईल, हे काटेकोरपणे पाळलं जातं. देणगीदारांचा पैसा जास्तीत जास्त लाभार्थींसाठी खर्च होतो, याचा देणगीदारांवर खूप चांगला परिणाम होतो. एखाद्याने दिलेल्या निधीतला थोडा भाग जरी अन्य कामावर खर्च करण्यात आला, तरी ते लगेच देणगीदाराला कळवलं जातं, किंवा दिलेल्या निधीएवढा खर्च झाला नाही, तरी सांगितलं जातं. पैसा उरला तर परत करणारी ही एकमेव संस्था आहे. अगदी सरकारी संस्थांनाही उरलेला निधी परत केला आहे. त्या वेळी, ‘आमच्याकडे दिलेला पैसा परत घेण्याची व्यवस्थाच नाहीये,’ असं उत्तर ऐकायला मिळालं. कंपन्यांनी दिलेला निधी उरला, तर त्यांनाही कळवलं जातं. बाहेरच्या जगात दुर्मीळ होत चाललेली व्यवहारातली ही पारदर्शकता लोकांना खूप भावते. अनेक माणसं संस्थेशी जोडलेली राहण्याचं ते एक प्रमुख कारण आहे.
 
 
आतापर्यंत लिहिण्याच्या ओघात ‘कामाचा विस्तार’ असा उल्लेख अनेक वेळा आला. मात्र या विस्ताराविषयी विस्ताराने सांगायचं राहिलं. रुग्णालय सुरू झाल्यानंतर अवघ्या सहाच महिन्यात संस्थेने विस्ताराचं पहिलं पाऊल टाकलं, ते गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राच्या रूपात...
 
 
विस्ताराच्या दिशेने वाटचाल सुरू... आरोग्य केंद्रं
 
 
अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं रुग्णालय म्हणजे श्रीमंतांचा हस्तिदंती मनोरा असणार नाही, हे सगळ्या संस्थापकांच्या मनात पहिल्यापासून स्पष्ट होतं. तरीही जे रुग्णालयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, अशा झोपडवस्तीतल्या-ग्रमीण भागातल्या बांधवांच्या दारात आरोग्यसेवा न्यायची, ही संकल्पनाही विचारप्रक्रियेतच अंतर्भूत होती. म्हणूनच रुग्णालयानंतर सहाच महिन्यात औरंगाबादमधल्या सर्वात मोठ्या झोपडवस्तीत ‘गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र’ सुरू झालं. डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली. त्यांना अभाविपतल्या कामाची पार्श्वभूमी होती. त्या वेळी एका कार्यक्रमात त्यांची नाना नवलेंशी ओळख झाली. नानाच्या आग्रहामुळे डॉ. दिवाकर यांनी बाबासाहेबांचं आणि गाडगेबाबांचं चरित्र वाचलं. या दोन्ही चरित्रांनी त्यांच्यावर खोलवर परिणाम केला. त्यामुळे उपेक्षितांच्या, वंचितांच्या वस्तीत जाऊनच काम करायचं, असं त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार औरंगाबादजवळ असलेल्या वरुड नावाच्या खेड्यात खाजगी प्रॅक्टिस सुरूही केली होती. पण जेव्हा, ‘‘हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून वस्तीतही काम सुरू करायचं आहे. त्यासाठी तू तुझा खाजगी व्यवसाय बंद करून ये’’ असं नानांनी सांगितलं, तेव्हा आपली खाजगी प्रॅक्टिस बंद करून डॉ. दिवाकर रुग्णालय सुरू झाल्यानंतर दोनच महिन्यात या टीममध्ये सहभागी झाले.

‘‘आपल्याकडच्या नर्सला जेवढा पगार मिळतो, तेवढा तुम्हाला पगार देता येईल. चालेल का?’’ असं विचारलं. यावर डॉ. दिवाकर यांनी सांगितलं, ‘‘मी काही पगाराची अपेक्षा ठेवून आलेलो नाही. काही पगार दिला नाहीत तरी चालेल.’’

 
तरुण भारतच्या कार्यालयामुळे आणि समरसता मंचाच्या कामामुळे इथल्या वस्तीशी परिचय होता. म्हणूनच या वस्तीपासून कामांना सुरुवात करण्याचं ठरलं आणि तरुण भारतच्या आवारातच 10×10च्या, प्लायवूडने बनवलेल्या खोलीत या आरोग्य केंद्राची सुरुवात झाली. लहुजी साळवे हे मातंग समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होतं. आजन्म ब्रह्मचारी असलेले लहुजी हे प्रखर देशभक्त आणि धर्माभिमानी होते. म्हणूनच या कामाला त्यांचं नाव देण्यावर एकमत झालं.

वस्तीत काम सुरू करताना कामाचा एक पॅटर्न नक्की केला होता. वस्तीतला संपर्क वाढवायचा, त्यासाठी रोज किमान 3/4 घरांना तरी भेटी द्यायच्या. ‘जय भीम’ घालून स्वत:ची ओळख करून द्यायची. हेडगेवार रुग्णालयाची माहिती देऊन हे संघाचं काम आहे, समरसता हा विषय हाती घेतला आहे, या वस्तीत आरोग्य केंद्र सुरू करायचं आहे, त्याविषयी बोलायचं. वस्तीत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे काम करणारे लोक होते. संघाने असं काही काम वस्तीसाठी सुरू केलं, याचं त्यांना आश्चर्य वाटलं. पण सगळ्यांनीच या कल्पनेचं स्वागत केलं.

काही महिन्यातच नारेगाव नावाच्या दुसर्‍या वस्तीत दुसरं ‘संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र’ सुरू झालं. डॉ. अनंत पंढरे या नव्याने सहभागी झालेल्या सदस्यावर मेडिकल ऑफिसर म्हणून या आरोग्य केंद्राची जबाबदारी देण्यात आली. काही वर्षं आरोग्य केंद्राची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळून डॉ. पंढरे यांनी संस्थेची गरज म्हणून, वैद्यकीय प्रॅक्टिस थांबवून निधीसंकलन आणि जनसंपर्क या कामाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या कामावरही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली.

1993 साली ‘संत रोहिदास आरोग्य केंद्रा’ची सुरुवात झाली. वस्तीतली आरोग्य केंद्रं उभी करण्याआधी त्या वस्तीतल्या प्रमुखांच्या भेटी घेणं, त्यांना आरोग्य केंद्राची कल्पना समजून सांगणं हे मूलभूत काम सर्व ठिकाणी डॉ. दिवाकर यांनी केलं. लहुजी साळवे आरोग्य केंद्रावर जे जे उपक्रम सुरू झाले, ते नंतर सगळ्या आरोग्य केंद्रांवर सुरू झाले.

याच काळात मा. हरिभाऊ बागडे आणि कै. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या आग्रह-मार्गदर्शनाने ग्रमीण भागातही तीन आरोग्य केंद्रं सुरू झाली. आरोग्य केंद्रासाठी निवडलेली गावं अतिशय दुर्गम भागात असूनही डॉ. सुरेश रिसबूड, डॉ. प्रतिभा पाठक आणि डॉ. विजय बेंद्रे यांनी कष्टपूर्वक हे काम वाढवलं. ग्रमीण भागातल्या कामाच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी बोलताना डॉ. प्रतिभा पाठक म्हणाल्या, ‘‘सुरुवातीला दवाखान्यात महिला येण्याचं प्रमाण कमी होतं. आल्या तरी फार काही मोकळेपणी बोलायच्या नाहीत. यावर उपाय शोधणं चालू होतं. तेव्हा प्रल्हादजी म्हणाले, ‘डॉक्टरीणबाई, तुम्ही असा वेष म्हणजे पंजाबी ड्रेस घालून गेलात, तर तुमच्याकडे कोणीच येणार नाही. त्या बायका जशा राहतात, त्या वेषात जर तुम्ही गेलात तर त्या तुमच्याकडे येतील.’ तेव्हा आपण साडी नेसूनच दवाखान्यात गेलं पाहिजे, हे लक्षात आलं आणि त्याचा योग्य तो परिणाम होऊन बायका यायला हळूहळू सुरुवात झाली. पेशंट दवाखान्यात आल्या नाहीत तर आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी मैत्री करून घेतली पाहिजे, त्यांची सुखदु:खं विचारली पाहिजेत, तरच त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते कळतील, हे जाणवलं. मग हळूहळू त्याच्या घरी जाणं सुरू झालं.’’
(आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दर वर्षी 1 लाख 30 हजार पेशंट आरोग्यसेवेचा लाभ घेतात. यात शहरी आणि ग्रमीण भागातली आरोग्य केंद्रांचा, चल चिकित्सालयांचा समावेश आहे. या माध्यमातून या लोकांचे किमान 1 कोटी 10 लाख रुपये दर वर्षी वाचतात, असं लक्षात आलं आहे. या आरोग्य केंद्रात एका वेळचे 10 रुपये शुल्क घेतलं जातं, तर हेडगेवार रुग्णालयात पहिल्या व्हिजिटचे 100 आणि फॉलोअपचे 80 रुपये होतात.)

चल चिकित्सालयाची सुरुवात
शहरात आणि ग्रमीण भागात स्थायी स्वरूपाची तीन केंद्रं होती. मात्र त्या वेळी शहरात अशा प्रकारच्या 60/70 वस्त्या होत्या. पण इतक्या वस्त्यांमध्ये केंद्रं उभारण्यासाठी आर्थिक बळ आणि मनुष्यबळही खूप लागलं असतं. म्हणूनच या केंद्रांना पर्याय काय असावा, याचा विचार करायला सुरुवात झाली. त्यातूनच चल चिकित्सालयाची सुरुवात झाली. त्यासाठी लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाकडून एक गाडी मिळाली. आज एकूण 6 वस्त्यांमध्ये चलचिकित्सालयं जातात आणि त्याच्या आजूबाजूच्या 19 वस्त्या त्याचा लाभ घेतात. सकाळ-संध्याकाळ त्या जातात.

जेव्हा आरोग्य केंद्रं चांगली चालायला लागली, त्या वेळी नानांचं म्हणणं असं होतं की, ‘‘रुग्णालयाचं काम वाढलं तर चांगली आरोग्य सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हे नक्की, पण आरोग्यसेवेचा सामाजिक परिवर्तनासाठी उपयोग असं काही त्यातून साध्य होणार नाही. ते साध्य करायचं असेल तर बाकीचे उपक्रम त्याच गतीने वाढायला हवेत.’’ या उपक्रमांसाठी 1994मध्ये ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ अर्थात ‘सा.फु.’ची निर्मिती झाली.

कामाचा नवा आयाम

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ
संस्थेचं अ-वैद्यकीय काम जसं वाढत गेलं, तसं त्यातून या कामांसाठी वेगळ्या संस्थेची गरज असल्याचं लक्षात आलं. पहिल्यांदा मिलिंदनगर वस्तीत महिलांचं काम सुरू केलं. त्यातून मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला उत्कर्ष मंडळ गठित झालं. अर्थात ते कागदोपत्री कुठे गठित झालं नाही. मग त्या अंतर्गत या सगळ्या विषयांची चर्चा होत राहिली. डॉ. बाबासाहेब वैद्यकीय प्रतिष्ठान वैद्यकीय विषयातलं काम प्रामुख्याने करेल. हेडगेवार रुग्णालय, पंचशील मेडिकल, दत्ताजी भाले रक्तपेढी, आरोग्य केंद्रं हे सगळं त्याअंतर्गत येत होतं. अ-वैद्यकीय कामासाठी एक न्यास असावा, अशी 1॥-2 वर्षं चर्चा चालू होती. 1994मध्ये प्रत्यक्षात ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ ही संस्था नोंदणीकृत झाली. यामध्ये नाना नवले, डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर, डॉ. मंजिरी व्यवहारे, डॉ. सीमा पंढरे हे सदस्य होते. हा वेगळा ट्रस्ट असला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान हीच त्याची मातृसंस्था असेल, हे पहिल्यापासून सगळ्यांच्या मनात स्पष्ट होतं. फक्त अ-वैद्यकीय कामांना स्वतंत्रपणे चांगला न्याय देता यावा, यासाठी केलेली ही योजना होती. आज 87 गावांमध्ये आणि 40 वस्त्यांमध्ये साफुच्या माध्यमातून अ-वैद्यकीय कामं चालू आहेत.

हे मंडळ स्थापन होण्यापूर्वी लहुजी साळवे केंद्राच्या माध्यमातून तेथील वस्तीतल्या महिलांशी संपर्क झाला होता. महिलांशी संवाद करण्यासाठी महिला कार्यकर्ती येणं आवश्यक होतं. त्यासाठी नानांनी सविता क्षीरसागर या युवतीला विचारलं. त्या वेळी सविताताई नुकतंच एक वर्ष पूर्ण वेळ वनवासी कल्याण आश्रमाचं काम करून अंबाजोगाईला परतल्या होत्या आणि त्यांच्यावर प्रकाशित झालेला एक लेख नानांच्या वाचनात आला होता. सविताताईंचे वडील संघचालक होते. त्यामुळे त्यांच्या घरातून या कामासाठी पाठवायला विरोध होण्याची शक्यता नव्हती. नानांनी संपर्क साधला आणि सविता क्षीरसागर यांचा या कामात प्रवेश झाला.

साक्षरता वर्गापासून महिल्यांमधल्या कामाची सुरुवात झाली. ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं निमित्त होतं. यामुळे त्यांच्या भावविश्वाची, त्यांच्यासमोरच्या प्रश्नांची ओळख झाली. बचतगटाच्या माध्यमातून आणि पोस्टाच्या बचतीच्या माध्यमातून त्यांना बचतीची सवय लावली. आज सर्वच आरोग्य केंद्रांवर बचत गटाच्या कामाचं उत्तम जाळं विणलं गेलं आहे.

ग्रामीण भागात मात्र एकदम बचत गटाची सुरुवात झाली नाही. महिलांच्या एकत्रीकरणाला एक अस्वस्थ करणारा प्रसंग कारणीभूत ठरला. एकाच महिन्यात तीन कुमारी माता दवाखान्यात आल्या आणि त्या तिघींना फसवणारी व्यक्ती एकच होती. त्यांच्या आयांना ती माहीत होती. यात आणखी एक गोष्ट वाईट अशी, की त्यांनी जिथे कुठे जाऊन अ‍ॅबॉर्शन करून घेतलं, तिथले डॉक्टरही ब्लॅकमेल करणारे होते. यावर उपाय म्हणून सगळ्या आयांची आधी बैठक बोलावू, असा विचार करून त्या गावात बैठक बोलावण्यात आली. आपल्या मुलींना समजावून सांगायचं तर काय समजावून सांगायचं, ते आधी त्यांच्या आयांना माहीत पाहिजे, म्हणून मग महिलांची बैठक सुरू झाली. नियमित भेटीला काहीतरी निमित्त पाहिजे, म्हणून त्यांचा बचत गट सुरू झाला. हा पहिला बचत गट. हळूहळू बचत गट म्हणजे काय ते समजलं. तो एका गावात रुजल्यावर मग आजूबाजूच्या गावात रुजला.
‘किशोरी विकास प्रकल्प’ आधी गावात असाच सुरू झाला. ‘एक कळी उमलताना’चे प्रयोग इतकंच त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. मात्र नंतर असं लक्षात आलं की ही गावोगावची गरज आहे, तेव्हा ठिकठिकाणी त्या प्रयोगांची सुरुवात झाली. एकदा बचत गटात बायका आल्या की त्यांचे प्रश्न, मग त्या प्रश्नावर उत्तर शोधणं असं सुरू झालं. असा ग्रमीण भागातला प्रवास सुरू झाला. मात्र महिलांचं आरोग्य, बचत गट, किशोरी विकास या टप्प्यावर येऊन ग्रमीण भागातलं काम थांबलं होतं. ग्रमविकासाच्या दृष्टीने त्याला आणखी आयाम जोडणं गरजेचं होतं. या टीममध्ये सुहास आजगावकरांचा समावेश झाला आणि पुढचा प्रवास सुरू झाला.

शहरी आणि ग्रमीण दोन्ही भागात दैनंदिन स्वरूपाचे किशोरी विकास प्रकल्प चालतात. स्व-जाणीव, आरोग्याशी संबंधित विषय, स्वयंपूर्णता या मुद्द्यांना स्पर्श करणारे छोटे छोटे उपक्रम आयोजित केले जातात. मात्र दोन्ही ठिकाणच्या किशोरवयीन मुलींच्या परिस्थितीत आजही खूप अंतर आहे. ग्रमीण भागातल्या बहुतांश मुलींचं लग्न आजही 15व्या वर्षीच होतं. जी गावं शहराच्या जवळ आहेत, तिथल्या मुलींच्या लग्नाचं वय 16-17वर पोहोचलं आहे. दुर्गम भागातल्या मुली आजही शालेय शिक्षणानंतर पुढे शिकू शकत नाहीत.

तर शहरातल्या वस्तीतल्या मुलींवर शहरीकरणाचे दुष्परिणाम झालेले दिसत आहेत. प्रसारमाध्यमांचा प्रचंड प्रभाव या मुलींवर आहे