मोदींनी अनिवासी भारतीयांना आत्मविश्वास दिला!

विवेक मराठी    18-Nov-2021
Total Views |
 राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन
 
 
NRIs_1  H x W:

ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिवासी भारतीयांसोबत गेल्या सात वर्षांत अनेकदा संवाद साधला त्यातून विदेशातील ३ कोटी भारतीयांमध्ये हा ठोस संदेश गेला की हा देश तुमचा आहे, तुमचे स्वागत करणारा आहे. या जनतेला मोदी यांनी आत्मविश्वास दिला असल्याचे प्रतिपादन निवृत्त आयएफएस अधिकारी व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रजागरण व्याख्य्यानमालेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीवर आधारित 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथानिमित्त आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्रात डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी 'मोदी सरकार आणि अनिवासी भारतीय' या विषयावर आपले विचार मांडले. त्यावेळी ते म्हणाले की, न्यूयॉर्कच्या मॅडीसन स्क्वेअरमध्ये आजपर्यंत कोणत्याही विदेशी राष्ट्रप्रमुखाचे भाषण झाले नव्हते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे भाषण करणारे पहिले राष्ट्रप्रमुख ठरले. ही घटना भारतीय विदेशनीतीच्या इतिहासातील नवे पान होते व मोदींचे व्यक्तिमत्व व त्यांची ऊर्जा याला कारणीभूत ठरले. विदेशनीतीमध्ये अनिवासी भारतीय ही मोठी संपदा आहे व त्यादृष्टीने मोदींनी यासंबंधीच्या धोरणाला एक सकारात्मक संबंधांचे स्वरूप दिल्याचे डॉ. मुळे म्हणाले.
 
ज्याप्रकारे पंतप्रधान मोदींनी अनिवासी भारतीयांसोबत गेल्या सात वर्षांत अनेकदा संवाद साधला त्यातून विदेशातील ३ कोटी भारतीयांमध्ये हा ठोस संदेश गेला की हा देश तुमचा आहे, तुमचे स्वागत करणारा आहे. अमेरिका, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युकेपासून अगदी लहानमोठ्या देशात तेथील भारतीयांनी मोदींचे कार्यक्रम आयोजित करून जगाला हे दाखवून दिले की ज्या देशातून आम्ही आलो त्या देशावर आमचे व त्या देशाचे आमच्यावर प्रेम आहे, असेही डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले.
'भारताचे सांस्कृतिक राजदूत'
विदेशातील भारतीयांची प्रगती ही भारताला व भारताची प्रगती विदेशातील भारतीयांना पोषक असल्याचे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी नमूद केले. अनिवासी भारतीय हा त्या देशात भारताच्या संस्कृतीची, इतिहासाची, कला - साहित्याची संक्षिप्त आवृत्ती असते. तो भारताचा सांस्कृतिक राजदूत असतो. या जनतेला मोदी यांनी आत्मविश्वास दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
या आत्मविश्वासामुळे आनंदित झालेले ३ कोटी अनिवासी भारतीय जेव्हा भारताची स्तुती त्या देशात करतात त्यातून भारतात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, गुंतवणूकदार येतात. मोदी यांनी आज सुंदर पिचाई, इंद्रा नुई, सत्या नाडेला अशा उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित करून त्यांना भारतात गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले आहे. यातून मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक देशात येताना दिसते असल्याचे मुळे म्हणाले. मागील शतकात भारत व भारतीयांबद्दल विदेशात काहीशी नकारात्मक भावना होती. मोदींनी जेव्हा जगभरात संवाद साधण्यास सुरुवात केली त्यातून भारताची प्रतिमा केवळ उंचावलीच नाही तर हा देश प्रगती करतो आहे, केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे, हा संदेश जगभर गेला. मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर नेले, जागतिक मान्यता मिळवून दिल्याचेही यांनी नमूद केले. आज एखाद्या देशाला अनिवासी / परदेशस्थ नागरिकांकडून होणाऱ्या वित्त पुरवठ्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी असून ७० बिलियन डॉलर्सहुन अधिक पैसे भारतात आले आहेत. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेस मोठी बळकटी मिळाली असल्याचे प्रतिपादन मुळे यांनी या व्याख्यानात केले.
..तर भारतीय दूतावास मदतीला धावून येईल!
डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, काही दशकांपूर्वी जेव्हा युगांडामध्ये इदी आमिनने तेथील भारतीयांवर अत्याचार केले, तेव्हा स्वदेशात परत येण्यास इच्छुक असलेल्या इच्छुक असलेल्या भारतीयांचे भारताने आनंदाने स्वागत केले नाही त्यामुळे हे लोक अन्य देशांत गेले. मात्र आज आपण अनिवासी भारतीयांना हे ठामपणे सांगतो आहोत की तुमच्या अडचणींच्या काळात भारत तुमच्या पाठीशी उभा राहील. त्याप्रकारची सक्षम यंत्रणाही आज आपण उभारली आहे. त्यामुळेच आज विदेशात कोणत्याही भारतीयाला विपन्नावस्थेत राहण्याची आवश्यकता नाही, तेथील भारतीय दूतावास त्याच्या मदतीला धावून येईल, हा विश्वास मोदींच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचे मुळे म्हणाले.