माझे काका शशिकांत चौथाईवाले

विवेक मराठी    18-Nov-2021
Total Views |
@अनिल चौथाईवाले
शशिकांत चौथाईवाले लिखित आणि अनिल चौथाईवाले अनुवादित ‘माझी प्रचारक यात्रा’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पुणे येथील सदाशिव पेठेतील ‘भारतीय विचार साधना भवन’ येथे होणार आहे. मूळ हिंदी ग्रंथाचा हा मराठी अनुवाद असून रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे.

RSS_3  H x W: 0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आसाम प्रांतातील वरिष्ठ प्रचारक शशिकांत चौथाईवाले यांनी लिहिलेल्या ‘मेरी प्रचारक यात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन सिल्चर (आसाम) येथील गुरुचरण कॉलेजच्या प्रेक्षागृहात दिनांक 26 फेब्रुवारीला, रा.स्व. संघाचे अ.भा. शारीरिक प्रमुख सुनील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.
 
 
संघ-वर्तन-संकेताप्रमाणे संघप्रचारकाने संस्मरण आणि स्वानुभव यावर एखादे पुस्तक लिहिणे आणि ते प्रकाशित होणे असे आजपर्यंत क्वचित घडले आहे, म्हणून हे पुस्तक आगळेवेगळे आहे.
 
 
शशिकांत चौथाईवाले म्हणजे माझे काका. माझ्या जन्मवर्षापासून (1961) काका आसाम प्रांतात प्रचारक या नात्याने अजूनही कार्यरत आहेत. पुढच्या वर्षी या प्रचारक यात्रेला पाच तपे पूर्ण होतील. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनात वयाची साठी गाठणे जरा खासच असते. वयाच्या हीरकमहोत्सवी वर्षात सेवानिवृत्ती व नंतर आयुष्य निरामय जगता यावे म्हणून अक्षरश: तन-मन-धनाने तजवीज करण्यात धन्यता मानण्याचे असे ते वर्ष असते. काकांच्या ‘प्रचारक यात्रा जीवनाचे’ हे हीरकमहोत्सवी वर्ष मात्र आयुष्य-इतिकर्तव्याचे नवीन मापदंड घालून देणारे ठरले आहे.


RSS_4  H x W: 0

शशिकांत चौथाईवाले
 
पू. सरसंघचालक मा. मोहनरावजी भागवत यांच्या शुभेच्छा संदेशाने या पुस्तकाचा आरंभ झाला आहे. मा. सुनीलजींच्या प्रस्तावनेतून व्यक्त झालेली आशयसंपन्नता पुस्तकाच्या पानापानातून दृग्गोचर होत जाते. त्यातील संदर्भपटातून आसाम व ईशान्य भारतातील गेल्या साठ वर्षांतील प्रमुख घटना काकांच्या संस्मरणातून आपल्या डोळ्यासमोर येत राहतात.

 
जाणते किंवा टीकाकार लोक या पुस्तकाच्या मूल्यमापनांचे निकष उलगडून दाखवताना खूप काही लिहितील, पण इथे मला माझ्या काकांविषयी थोडेसे काही सांगावेसे वाटते. ते वैयक्तिक आहे, तरीही लिहावेसे वाटते.
 
 
Statistics विषयात M.Sc.ची परीक्षा दिल्यानंतर काकांनी संघप्रचारक होण्याचे पक्के केले. पुस्तकाचा प्रारंभ त्या विचाराच्या प्रकटीकरणाने झाला आहे. काही त्रोटक उल्लेख वगळता ‘त्या अगोदरचे’ काका या पुस्तकात सापडत नाहीत. अतिशय प्रांजळपणे सांगतो की शशीकाका व त्यांची भावंडे यांचे बालपण, उमेदीच्या तरुण वयातील त्या सर्वांचे जीवन याविषयी वर्तमान पिढीतील आम्ही अजूनही फारसे जाणून नाही आहोत. ती सहा भावंडे आणि तीन बहिणी. तीन भावांनी संसार स्वीकारला, तर प्रथम शरदकाका विदर्भात, नंतर शशीकाका आसाममध्ये व धाकटे अरुकाका ओरिसा प्रांतात आजीवन प्रचारक राहिले. त्या भावंडांत आज फक्त शशीकाका हयात आहेत.
 

RSS_1  H x W: 0

मूळ हिंदी पुस्तकचे मराठीत अनुवाद केले आहे....
 
माझे बाबा (मु.कृ. उपाख्य बाबूराव चौथाईवाले) हयात होते, तोपर्यत त्यांना कुटुंबप्रमुख म्हणून या तिन्ही काकांची साध्या पोस्टकार्डवर लिहिलेली पत्रे मी माझ्या लहानपणापासून बघत आलो आहे. तेव्हा पत्र हेच प्रमुख संपर्कमाध्यम असायचे आणि काकांनी अतिशय काटेकोरपणे, नियमाने त्या पत्रमाध्यमाचा अवलंब केला. शशीकाकांना रेखीव हस्ताक्षराचे आंदण लाभले आहे. सुवाच्य अक्षरातील त्यांच्या पत्रातून अतिसंक्षेपाने स्वत:ची खुशाली आणि बाकी मजकूर म्हणजे त्यांचा प्रवास आणि विविध संघकार्यक्रम याचे आरेखन असायचे. सगळे काही स्वच्छ, मोकळे प्रकटन. अंतर्देशीय पत्राचा किंवा पाकिटाचा वापर बहुधा नाहीच, त्यामुळे अंतर्देशीय पत्राच्या घडीमध्ये ‘दडलेले’ किंवा पाकिटात ‘सीलबंद’ झालेले खासगी असे काहीच नसायचे. ही ‘शुचिता’ काकांनी स्वआचारणात जपली आहे आणि त्यांच्या सहवासात आलेल्या शेकडो लोकांनी अनुभवली आहे.
 
 
दोनेक वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीसह शशीकाकांच्या प्रचारक क्षेत्रातील काही स्थानांना भेट देवून आलो. आमच्या वर्तमान पिढीतील एखादे कुटुंब शशीकाकांच्या घरी गेले होते, याचा काकांना कोण आनंद झाला होता. आठ-दहा दिवस शशीकाका आमच्याबरोबरच होते. त्या आठवणींचे एखादे छोटेसे पुस्तक होईल किंवा पुन: पुन: स्मरणात कित्येक तासही संपून जातील. या भेटीमध्ये प्रकर्षाने समजले की शशीकाका त्या प्रांतातील वरिष्ठ प्रचारक तर आहेतच, त्यापेक्षाही काका कुणाचे ‘शशीभाई’ आहेत, कुणाचे ‘शशीजी’ आहेत, कुणाचे ‘शशिकांतजी’ आहेत. काका कुणाचे ‘पालक’ आहेत, कुटुंबप्रमुख आहेत, कुणाचे गणिताचे शिक्षक आहेत, कुणाचे दादाजी आहेत, नानाजी आहेत. काकांना ‘शशी’ अशी एकेरी हाक मारणारी पिढी आता अस्तंगत झाली असली, तरी त्या सर्वांची आठवण काकांनी जपून ठेवली आहे. साठ वर्षांपूर्वी, सुदूर महाराष्ट्रातून आसाम देशी संघप्रचारक म्हणून आलेल्या शशीकाकांना त्या घरांनी, कुटुंबांनी ‘आपले’ म्हणून स्वीकारले आणि शशीकाकांनीही त्यांना ‘आपलेसे’ केले, त्या ‘घरचे आतिथ्य’ स्वीकारताना आम्ही दोघेही भाग्यवान झालो होतो.
 
 
आणि त्या प्रांतातून येणारे शशीकाकांचे, अरुकाकांचे परिचित न चुकता आम्हा भावंडांच्या घरी ‘शशीजी का घर, अरुजी घर’ म्हणून जेव्हा भेटतात, तेव्हा ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असे विलक्षण अनुभवाला येते. मला स्वल्प उमगलेले संघकार्य हे असे आहे.
 
 
काका उत्तम बासरीवादक आहेत, त्यांना गोड गाता गळा लाभला आहे. जुन्या मराठी कविता, मोरोपंतांच्या आर्या, हिंदी, मराठी, बंगाली, आसामी भाषेतील उत्तमोत्तम गाणी मुखोद्गत आहेत, ‘गीत रामायण’ कंठस्थ आहे, भगवद्गीता सर्व अध्यायांतील श्लोक सहज स्मरणात आहेत आणि कमीत कमी नाहीच नाही, पण तीनशेपेक्षा जास्त संघगीते आणि वैयक्तिक पद्य अजूनही ओठांवर सहज खेळती आहेत. आज वयाच्या 82व्या वर्षीही ते स्वत:ची कामे सहज करतात. काही वर्षांपासून संघयोजनेप्रमाणे सिल्चर हे काकांचे मुख्य केंद्र असून तेथील संघकार्यालयात निवास असतो. आवश्यकतेनुसार संघशिबिर, संघ शिक्षा वर्ग याकरता प्रवासही एकट्याने करणे त्यांना सहज जमते. मदतनिसाची गरज सहसा लागत नाही. आणि हे पुस्तक लिहिताना काका Computer typing शिकले, आत्मसात केले. असे आणखी खूप काही आठवते आहे. ती. काका मात्र स्वत:बद्धल काही सांगत नाहीत.
 
न राहवून एकच अनुभव लिहिण्याचा मी प्रयत्न करतोय.
 
 
काकांसोबत प्रवास ठरताना आम्ही काकांना म्हणालो की “आम्हाला काझीरंगा पार्क बघायचं आहे.” फोनवर बोलताना काका सहजपणे म्हणाले की “मी अवश्य काझीरंगाला येईन. मी ते जगप्रसिद्ध स्थान आतापर्यंत बघितलेलं नाही.” हे आत्तासुद्धा आठवून, लिहिताना अंगावर काटा आला आहे. या साठ वर्षांत स्वरंजनासाठी एखादी ‘ट्रिप’ काढण्याचं ज्यांनी ठरवलं नाही, त्या शशीकाकांच्या निग्रहाचे कोणत्या शब्दांनी वर्णन करता येईल?
 
 
पू. सरसंघचालकांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात शशीकाकांच्या ‘आत्मविलोपी’ विशेषत्वाचा गौरवाने उल्लेख केलेला आहे.
 
या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ती. काकांचे, दूरदुरून आलेले स्नेहीजन आवर्जून उपस्थित होते. मी, माझे मोठे बंधू व वहिनी, धाकटी वहिनी आणि दोन चुलत भाऊ असे सहा जण आमच्या पिढीचे प्रतिनिधी होतो. चौथाईवाले परिवाराला, आप्तस्वकीयांना आणि स्वयंसेवकांना स्नेहबंधनात गुंफून ठेवणारी सहज, विलक्षण वृत्ती काकांनी जपली आहे, त्याचे यथार्थ प्रतिबिंब या आनंद सोहळ्यात प्रकट झाले होते.
 
 
ती. काकांची ही प्रचारक यात्रा ‘देशकार्यी विरमू दे’ या एकमेव इच्छेने अविरत चालू आहे.
 
आता या पुस्तकाविषयी थोडेसे..

केशव स्मारक समिती, सिलचरने प्रकाशित केलेले हे प्रथम पुस्तक शशीकाकांनी त्यांचे वरिष्ठ सहयोगी, मार्गदर्शक व प्रेरणास्रोत राहिलेले जेष्ठ प्रचारक मधुकरराव (मधूजी) लिमये यांना समर्पित केले आहे.
काकांनी या यात्रेचा साठ वर्षांचा प्रवास केवळ एकशे अडतीस पानांतून संक्षेपाने, अनेक आठवणींमधून वर्णन केला आहे. कोणतीही टीकाटिप्पणी, मतप्रदर्शन किंवा सारांश-मीमांसा नाही. हे काम त्यांनी वाचकांवर सोपवले आहे.

RSS_1  H x W: 0

काका सर्वप्रथम नौगावला प्रचारक म्हणून नऊ वर्षे राहिले. 1961 ते आणीबाणीपर्यंतचा पहिला कालखंड, ज्यात चीनचे आक्रमण, पूजनीय श्रीगुरुजींचे प्रवास, त्यांचे व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांना झालेले मार्गदर्शन, त्यांचे देहावसान, संघकार्यवृद्धीसाठी झालेल्या योजना व विविध कार्यक्रम, पूर्व प्रांत प्रचारक मा. ठाकूर रामसिंहजी यांचे व्यक्तिदर्शन आणि नौगावच्या काही हृद्य आठवणी आहेत. पृष्ठ 68वर मा. ठाकूर रामसिंहजींचे उदाहरण देताना संघकार्यपद्धतीत प्रचाराकांचे स्थानांतरण, नंतरच्या पानांतून लिहिलेले जबाबदारीचे हस्तांतरण ही स्वाभाविक प्रक्रिया असते, हे वाचताना साध्याच शब्दांमधून फार मोठा आशय ध्वनित झाला आहे. त्या सर्व प्रचारकांना काम करताना आलेल्या अनंत अडचणी, त्यातून काढलेले मार्ग हा तर वेगळ्याच अभिसरणाचा विषय आहे.
आणीबाणीनंतर आसाम आंदोलनापर्यंत हा दुसरा कालखंड समजता येईल. देशाच्या प्रत्येक प्रांताचा आणीबाणीचा अध्याय हा स्वतंत्र इतिहास आहे. शशीकाका शेवटपर्यंत भूमिगत होते तो कालखंड काकांच्या शब्दांतूनच वाचायला हवा. तर आसाम आंदोलनात संघकार्यकर्त्यांचे अपहरण व हत्या काकांसाठी किती क्लेशदायक होत्या, मनात तीव्र क्षोभ असताना शांत डोक्याने, विचारपूर्वक केलेल्या कार्यविस्ताराचे वर्णन सगळ्यांना अंतर्मुख करते.
विसाव्या शतकाच्या अंतिम वर्षांपासून संघकार्याला आलेली अनुकूलता व त्याचे सद्य:स्थितीतील दृश्य परिणाम, काकांचे अस्वास्थ्य आणि दायित्व मुक्ती हा तिसरा कालखंड ठरावा.
या प्रचारक यात्रेमध्ये अनेक सुहृद, सहप्रचारक, संघ अधिकारी ती. काकांच्या जीवनात आले. काकांनी अनेक पानांतून त्यांचा परिचय करून दिला आहे. ते या सर्वाचे ऋण व्यक्त करतात आणि ‘चरैवति चरैवति’ या मंत्राचे स्मरण करून या प्रचारक यात्रेमध्ये मार्गक्रमण करत राहण्याचे अभिवचन देतात.